आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माणूस असो की एखादी संस्था, जोवर त्यांच्याविषयी आपल्या कानांवर काही बरंवाईट पडत नाही तोवर आपलं शक्यतो त्यांच्याविषयीचं मत बरं असतं, पण एकदा असं काही कानांवर पडलं की लगेचच त्यांच्या चांगुलपणाबद्दल, विश्वासार्हतेबद्दल आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकते.
‘देअर इज नो स्मोक विदाउट फायर’ अशी एक प्रसिद्ध इंग्रजी म्हण आहे. त्यामुळे कुठलेही वाद आपल्या कानांवर पडले तर नक्की काहीतरी गौडबंगाल असणार, त्याशिवाय अशा वादांना पेव फुटणार नाही असा विचार आधी आपल्या डोक्यात येतो.
एखाद्या व्यक्तीला, संस्थेला सतत कुठल्या ना कुठल्या वादांनी घेरलेलं असतं त्यामुळे त्यांची ओळखच कालांतराने ‘वादग्रस्त’ अशी होते. पण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीविषयी, संस्थेविषयी, सोहळ्यांविषयी असे वाद ऐकायला मिळतात तेव्हा मात्र आपण चकित होतो.
ऑस्करचे पुरस्कार हे केवळ हॉलीवूडमध्येच नाही तर जगभरातले सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार मानले जातात. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेगवगेळ्या पुरस्कारांच्या मांदियाळीत फिल्मफेअर पुरस्काराकडे तो बहुमान आहे, पण हाच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आजवर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
पुरस्कार बहाल केले जाण्यामागे राजकारण असतं असा आरोप फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर केला गेलाय. नेमके काय आहेत हे वाद? थोडक्यात जाणून घेऊ.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
फिल्मफेअरच्या म्हणण्यानुसार, कुठल्या अभिनेत्यांना, फिल्ममेकर्सना, तंत्रज्ञांना पुरस्कार द्यायचे हे सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच ठरवलं जातं. लोकांच्या मतांवर हे पुरस्कार अवलंबून असतात.
जानेवारीच्या १ तारखेपासून डिसेंबरच्या ३१ तारखेपर्यंत जितके चित्रपट प्रदर्शित झालेले असतात त्या सगळ्या चित्रपटांमधूनच लोक आवडत्या चित्रपटांना मतं देतात. छापील आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात फिल्मफेअरकडून लोकांना फॉर्म्सचं वाटप केलं जातं.
चित्रपटांचे चाहते वेगवेगळ्या श्रेण्यांअंतर्गत आपल्या आवडत्या चित्रपटांना, गाण्यांना आणि कलाकारांना मतं देतात. हा सगळा डेटा नंतर एकत्र केला जातो आणि त्यातली लोकप्रिय नामांकनं वेगळी काढली जाऊन ती पुढे ज्युरीच्या सदस्यांना पाठवली जातात. त्यानंतर ज्युरीचे सदस्य १० वेगवेगळ्या श्रेण्यांमधल्या पुरस्कारांचे कोण मानकरी ठरले आहेत हे ठरवतात.
हा सगळा कारभार सांगितलं गेलंय तितक्याच स्वच्छपणे चालत असेल यावर आपण विश्वास ठेवायचा म्हटलं तरी बॉलिवूडच्याच अभिनेत्यांनी पुढे येऊन भारतातले चित्रपटांचे पुरस्कार सोहळे खोटे आणि बोगस आहेत असा आरोप केल्याच्या अनेक घटना आहेत.
—
- पुरस्कार नाकारण्यासाठी बॉलिवुड सेलिब्रिटींनी दिलेल्या `या’ कारणांवर हसावं की रडावं?
- या कारणांमुळे प्रेक्षकांनी ‘फिल्मफेयर’ ला ‘फिल्मफेक’ हे लेबल लावलं!
—
पैशांच्या बदल्यात हे पुरस्कार खरेदी केले जातात असेही आरोप भारतीय चित्रपट पुरस्कारांवर केले गेले आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात काही वेळा एखाद्या श्रेणीअंतर्गत पुरस्कार मिळायला खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या कलाकाराला तो पुरस्कार न मिळता त्याच्यापेक्षा तुलनेने कमी चांगली कामगिरी केलेल्या कलाकाराला तो पुरस्कार मिळतो तेव्हा आपणही याबाबत काहीसे साशंक होतो.
फिल्मफेअरशी जोडले गेलेले असेच काही वाद पाहू.
१. ‘गल्ली बॉय’चा वाद : ६५व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाला विविध श्रेण्यांअंतर्गत तब्बल १३ पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर #BoycottFilmfare हा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इतकंच नाही, तर एका युजरने विकिपीडियावर फिल्मफेअरला ‘paid’ म्हणून टॅग केलं होतं.
२०१९ सालच्या या पुरस्कार सोहळ्यात अनन्या पांडे या अभिनेत्रीला पदार्पण केलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाल्यामुळे, ‘केसरी’ चित्रपटातल्या ”तेरी मिट्टी’ या गाण्याच्या शब्दांपुढे ‘अपना टाईम आयेगा’ या गाण्याला ‘बेस्ट लिरिक्स’ हा पुरस्कार मिळाल्यामुळे आणि त्यावर्षी ट्रेन्डसेटर ठरलेल्या कबीर सिंग या चित्रपटाला एकही पुरस्कार न मिळाल्यामुळे लोक संतप्त झाले होते.
२. आमिर खान – शाहरुख खान : आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना का जात नाही हे सर्वश्रुतच आहे. १९९६ साली फिल्मफेअर सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या श्रेणीअंतर्गत आमिर खान आणि शाहरुख खान या दोघांनाही नामांकन होती.
‘डीडीएलजे’ साठी शाहरुख खानला हा पुरस्कार मिळाला होता. मात्र आपण हा पुरस्कार मिळायला पात्र होतो असं वाटून तेव्हापासून आमिर खानने पुरस्कार सोहळ्यांना जाणं बंद केलं.
३. राणी मुखर्जी : ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीला ‘उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला होता, पण त्यावेळी या श्रेणीअंतर्गत ‘सत्या’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी शेफाली शहाला नामांकन असूनही राणीला हा पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला.
त्यानंतर काही वर्षांनी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या श्रेणीअंतर्गत ‘वीर झारा’ या चित्रपटासाठी प्रीती झिंटाला आणि ‘एक हसीना थी’ या चित्रपटासाठी उर्मिला मातोंडकरला नामांकनं असूनही त्यांच्या भूमिकांच्या तुलनेत कमी प्रभावी असलेल्या ‘हम तुम’मधल्या राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला. यश राज बॅनर आणि करण जोहरमुळे राणीला हा पुरस्कार मिळाल्याचा आरोप लोकांनी केला होता.
४. काजोल-तब्बू : तब्बूच्या ‘चांदनी बार’मधल्या कामापुढे ‘कभी ख़ुशी कभी गम’ या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणं हे हास्यास्पद आहे. पण असं घडलं खरं! तब्बूला तिच्या या चित्रपटातल्या अभिनयासाठी नंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
५. आयुष्मान खुराना – सोनू निगम :
आयुष्मान खुराना हा चतुरस्त्र कलाकार आहे यात शंकाच नाही. तो चांगला गायकही आहे. पण ‘अभी मुझ मे कहीं’ या गाण्यासाठी सोनू निगमला पुरस्कार न मिळता ‘पानी दा रंग’साठी आयुष्मानला पुरस्कार मिळणं ही गोष्ट नक्कीच आश्चर्यजनक होती.
६. सुरज पांचोली – विकी कौशल : ‘मसान’ मधल्या आपल्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकून घेतलेल्या विकी कौशलला केवळ सर्वोकृष्ट पदर्पणाचाच नव्हे तर त्यावर्षीचा सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला असता तरी कुणाला त्यात काही वावगं वाटलं नसतं. पण त्याला त्या वर्षीचा सर्वोकृष्ट पदार्पणाचा पुरस्कार न मिळता हा पुरस्कार कुणाला मिळाला तर साक्षात सूरज पांचोली यांना! असो! यावर फार काही न बोललेलंच बरं.
फिल्मफेअरच्या या वादांमध्ये पूर्णतः तथ्य आहे असं जरी आपल्याला ठोसपणे म्हणता आलं नाही तरी कुठेतरी पाणी मुरतंय हे म्हणायला निश्चितच जागा आहे.
एकेक करत आता वेगवेगळे पुरस्कार सोहळे आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतील. रसिकांच्या काही अपेक्षा पूर्ण होतील तर काही बाबतीत अपेक्षाभंग होतील. यंदाच्या वर्षीही मनोरंजनाच्या आणि नव्या वादांच्या तडक्यासाठी नेहमीप्रमाणेच सज्ज होऊया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.