…म्हणून सोनू निगमने तेव्हा पद्मश्री स्वीकारण्यास नकार दिला होता!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखादा कलाकार दीर्घकाळ आपल्या कलेतून लोकांना रिझवतो तेव्हा त्याचा बराच मोठा चाहतावर्ग तयार होतो. कुठल्याही कलाकारासाठी ही गोष्ट खास असतेच. पण जेव्हा त्याच्यावर एका महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराची, सन्मानाची मोहोर उमटते तेव्हा त्या कलाकाराच्या कलेचा खऱ्या अर्थाने सन्मान होतो.
काही कलाकारांच्या बाबतीत आपल्याला दर्जेदार कला आणि अमाप लोकप्रियता या दोन्ही गोष्टी घडून आल्याचं पाहायला मिळतं. हे कलाकार सर्वार्थानेच यशस्वी ठरलेले असतात. त्यामुळे नाही म्हटलं तरी आपल्याला योग्य वेळी योग्य तो बहुमान मिळावा असं त्या कलाकारांनाही वाटू लागतं. कधी हे घडतं तर कधी नाही!
आपल्या अतिशय हृदयस्पर्शी आवाजाने सोनू निगमने गेली अनेक वर्षं आपल्यावर मोहिनी घातलीये. ‘ये दिल दिवाना’, ‘अभी मुझ मे कहीं’, ‘कल हो ना हो’, मै अगर कहूं’ अशी त्याने गायलेली अनेक उत्तमोत्तम गाणी वर्षानुवर्षे आपल्या कानांत गुंजत आहेत.
सोनू निगमने गेली तीन दशकं आपल्या गाण्यांनी भारतीय सिनेसृष्टी भारून टाकली आहे. त्याला नुकतंच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलंय.
आता जरी त्याने हा पुरस्कार स्वीकारलेला असला तरी यापूर्वीही एकदा पद्मश्री पुरस्कार स्वीकाराल का अशी विचारणा त्याला करण्यात आली होती आणि त्यावेळी हा पुरस्कार स्वीकारायला त्याने नकार दिला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
त्यामागची आपली काही कारणंही त्याने स्पष्ट केली होती. काय होती ती कारणं? थोडक्यात जाणून घेऊ.
आपली कारकीर्द पाहता हा पुरस्कार आपल्याला खूप आधीच मिळायला हवा होता; आपल्याला यासाठी खूप उशीरा विचारणा झाली अशी खंत सोनू निगमला वाटली होती. सरकारी अधिकाऱ्यांकडून या पुरस्कारासाठी विचारणा झाली तर त्यांना काय उत्तर द्यायचं हे त्याने आधीच ठरवून ठेवलं होतं.
या पुरस्कारासंदर्भात जेव्हा एका अधिकाऱ्याचा त्याला फोन आला होता तेव्हा त्याने ,”मला पद्मश्री दिला जायला जरा उशीरच झालाय असं तुम्हाला वाटत नाही का? म्युझिक इंडस्ट्रीत माझ्यानंतर १५ वर्षांनी आलेल्या कलाकारांना ५ वर्षं आधी सन्मानित करण्यात आलंय.”, असं उत्तर त्याला दिलं.
गेल्या महिन्यात ‘बॉलिवूड हंगामा’सोबतच्या एका मुलाखतीत सोनु निगमने त्याला पुरस्कार मिळालाय असं ज्या सरकारी अधिकाऱ्याने त्याला सांगितलं होतं त्याच्यासोबत झालेल्या संभाषणाचा सविस्तर खुलासा केला.
—
- या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!
- एकेकाळी पोटापाण्यासाठी भजन गाणारी नेहा आज सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे!
—
तो म्हणाला, “मी त्या अधिकाऱ्याला म्हणालो, “तुम्ही मला आता पद्मश्री देताय? गेला बराच काळ तुम्ही माझी चेष्टा चालवली आहे. आम्हीही माणसंच आहोत आणि आम्हालाही प्रलोभनांचा मोह होतो.” अशी एक तरी व्यक्ती असेल का जिला पुरस्कार मिळालाय आणि तिला ही गोष्ट आवडली नसेल? ज्यांना पुरस्कार मिळत नाही तेच असं काहीतरी म्हणतात.
योग्य वेळी प्रशंसा केली गेली आणि दखल घेतली गेली की बरं वाटतं. उशीरा दिलेल्या न्यायाला न्याय म्हणत नाहीत. त्यामुळे मी म्हणालो, “मला हा पुरस्कार स्वीकारता येणार नाही. खूप उशीर झालाय. तुम्ही मला आता पद्मश्री देताय. असा बहुमान मिळावा अशी पूर्वी मला असलेली अपेक्षा आता मी मागे टाकली आहे आणि त्या दिशेने मी बघतही नाहीये.”
त्या अधिकाऱ्याने त्याला विनंती केली. १० मिनिटं त्या अधिकाऱ्याशी फोनवर बोलणं झाल्यावर मी या संदर्भात माझ्या वडिलांशी बोलतो आणि पुन्हा तुम्हाला फोन करतो असं आश्वासन सोनू निगमने त्या अधिकाऱ्याला दिलं.
सोनू निगमने त्यावेळी इंडस्ट्रीतल्या लॉबीच्या राजकारणावरही भाष्य केलं. बरेच लोक पुरस्कार मिळवण्यासाठी लॉबीचा मार्ग अवलंबतात. पण जर अशा प्रकारे आपल्याला पद्मश्री मिळाली तर आपण हा पुरस्कार मिळाल्याचा निखळ आनंद अनुभवू शकणार नाही असं त्याने सांगितलं.
आपल्याला हा पुरस्कार इतरांसारखा नव्हे तर स्वतःच्या क्षमतेमुळे मिळाला आहे या जाणीवेने सोनू निगम मनोमन सुखावला होता. सोनू निगम पुढे म्हणाला, “या पुरस्काराकरता माझं नाव कुणी पुढे केलंय हे मी जाणतो. ते एक महान शास्त्रीय गायक आहेत. मी त्यांचं नाव उघडपणे सांगू शकतो की नाही हे मी त्यांना एकदा विचारेन.
“त्याला पुरस्कार मिळायला फार फार उशीर झालाय त्यामुळे तुम्ही त्याला हा पुरस्कार द्यावा.” असं ते गायक म्हणाले होते आणि हे सगळंच फार छान घडून आलं.” मात्र त्यावेळी सोनू निगमने हा पुरस्कार नाकारला होता.
सोनू निगमने मुख्यतः हिंदी आणि कानडी चित्रपटांमधली गाणी गायली असली तरी त्याने मराठी, बंगाली, ओडिया, नेपाळी, गुजराती, भिजपुरी, तामिळ, मल्याळम, तेलगू या आणि अशा अनेक भारतीय भाषांमधली गाणी गायली आहेत.
सोनू निगमला ‘कल हो ना हो’ साठी २००३ साली ‘नॅशनल फिल्म अवॉर्ड’ मिळाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याला नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
आधी ही सगळी कारणं देऊन पद्मश्री नाकारणाऱ्या सोनू निगमने आता कसा काय हा पुरस्कार स्वीकारला ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहेच. पण तूर्तास आपण इतका दीर्घ काळ आपल्या मनावर राज्य केलेल्या या गायकाला पद्मश्री सारखा बहुमान मिळालाय आणि त्याने तो आता स्वीकारलाय याचाच आनंद मानू.
सोनू निगमने याहीपुढे आपल्या गायकीने रसिकांवर जादू करत राहावी हीच इच्छा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.