Site icon InMarathi

मर्दानी खेळात १०वीतली मुलगी मारतेय बाजी, बैलगाडी शर्यत लढवणारी जुन्नरची दीक्षा

diksha parve im 3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘राकट देशा कणखर देशा’ असे ज्याचे वर्णन केले जाते तो महाराष्ट्र कणखर लोकांचा देश आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्राचा मावळ भाग हा रांगड्या लोकांचा. या रांगडेपणात तिथल्या मुली ही काही कमी नाहीत.

याचेच ताजे उदाहरण म्हणजे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील दीक्षा पारवे ही दहावीत शिकणारी मुलगी , असे म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो असे काय केले असावे या दीक्षाने? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिकच आहे. तर या मुलीने तो पराक्रम करून दाखवला आहे ज्याने परिसरातूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

 

 

कालपर्यंत तिच्या सोबत खेळणार्‍या तिच्या मैत्रिणी आज तिच्यासोबत सेल्फी काढण्यास उत्सुक असतात. असे काय घडले? काय आहे या आधुनिक मावळ कन्येची यशोगाथा? चला माहिती करून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अलीकडेच राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यात आली आहे. काही नियमांचे पालन करून या स्पर्धा आयोजनास न्यायालयाने परवानगी दिली असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक राजकीय नेते बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहेत. तसेच विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहेत.

राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. ही शर्यत पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे. मुळात बैलगाडा शर्यत हा एक साहसी खेळ प्रकार आहे. जिवाची बाजी लावूनच तो खेळला जातो. जितकी रोमांचक, तितकीच बैलगाडा शर्यत ही खूपच जिकरीची असते कारण बैलाला सांभाळणं हे सोपं काम नसतं.

बैलगाडा शर्यतींच्या घाटात गाड्याला बैलजोडी जुंपताना भल्याभल्यांची तारांबळ उडते. महिला तर या घाटाच्या आसपासही फिरकत नाहीत, पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील दहावीत शिकणारी दिक्षा पारवे ही मात्र याला अपवाद ठरली. तिने उंचखडक घाटात थेट बैल जुंपण्याचं धाडस केलं. ज्या घाटात भल्याभल्यांची भंबेरी उडते त्या घाटात दिक्षा नुसती उभीच राहिली नाही, तर तिने गाड्याला बैल जुंपण्याचं यशस्वी धाडस करून दाखवले आहे.

 

 

जुन्नर तालुक्यातील उंचखडक घाट हा बैलगाडा शर्यतींसाठी प्रसिद्ध आहे. घाटात शर्यती दरम्यान बैल उधळण्याच्या घटना बरेचदा घडतात. यातून अपघाताची देखील संभावना असते. अशा वेळी बैलांना सांभाळणे जिकरीचे काम असते. अशाच एका शर्यतीत आपल्या उधळलेल्या बैलाला शांत करून पुन्हा गाड्याला जुंपण्याचे दिव्य दीक्षाने करून दाखवले आहे.

पारवे कुटुंबियांच्या दोन पिढ्यांना बैलगाडा शर्यतींचा मोठा छंद होता, पण तिसऱ्या पिढीत सलग सात मुली जन्मल्या पण परंपरा कायम राहिलीच पाहिजे ही जिद्द कायम राहिली, मग काय त्यातील दीक्षा, प्रियांका आणि दिव्या या तिघींनी कुटुंबातील शर्यतीची परंपरा कायम जोपासली आहे.

बैलांची सर्व निगा राखण्यापासून बैलगाडा जुंपण्यापर्यंत सर्व कामे दिक्षा उत्साहाने करते. विशेष म्हणजे शिक्षण सांभाळून ती हे सर्व करीत असते. त्यामुळेच आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा शर्यतींना सशर्त परवानगी दिली तेव्हा या मुली घाट गाजवू लागल्यात.

 

 

घरच्याच ‘विज्या’ या खोंडाचा या तिघींनाही लहानपणापासून लळा होता. दिक्षाने विज्याला (बैलाचं नाव) आवाज दिला की तो लगेच जवळ येतो. शर्यतीला जायचंय का असं विचारताच, तो मान डोलवत होकार ही देतो.

दहावीच्या परीक्षेचा अभ्यास ही दिक्षा विज्याच्या साक्षीनेच करते. विज्यासोबतचा तिचा हा लळा पाहून दिक्षाची आई सुद्धा अचंबित होते. दिक्षासह तिच्या बहिणी प्रियांका आणि दिव्या यांच्यावर बैलजोडीच्या सांभाळाची जबाबदारी आहे. शिक्षण करत-करत त्या ही जबाबदारी सक्षमपणे पेलत आहेत.

दीक्षाचा घाटातील पराक्रमाचा विडियो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर दिक्षा कमालीची फेमस झाली आहे. म्हणूनच आज पंचक्रोशीतील मंडळी कौतुकाची थाप द्यायला तिच्या घरी पोहचत आहेत.

 

 

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील दिक्षाचं कौतुक केलं आहे. दिक्षा अन् तिच्या बहिणींप्रमाणे प्रत्येक महिलेने ठरवलं तर त्या अशा धाडसी क्षेत्रात ही ठसा उमटवू शकतात असेही ते म्हणाले, तर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील तिच्याशी फोनवरून बातचीत करत तिचे कौतुक केले आहे. आणि तिचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

अमोल कोल्हे दिक्षाचे कौतुक करताना म्हणाले की, “तुझा व्हिडीओ पाहिला. खूप छान वाटलं.” बैलाचं नाव काय आहे ? हा बैल तुझ्याकडे कधीपासून आहे ? तू कधीपासून शर्यतीची तयारी करते आहेस? असे अनेक प्रश्न कोल्हे यांनी दिक्षाला विचारले. तसेच फार हिमतीने तू हे केलंस. फार अभिमान वाटला मला. पण हे सगळं करताना काळजी घे. सर्व नियमांचे पालन करा. बैलगाडा शर्यत बंद होणार नाही पण अभ्यासाकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नको, असा सल्लादेखील कोल्हे यांनी तिला दिला.

अमोल कोल्हे यांनी बैलगाडा जुंपणाऱ्या दिक्षाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर अपलोड करताना तिला रणरागिणी म्हटलं होतं. “शाब्बास गं रणरागिणी! शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत. जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते.

आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दिक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली. दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवलंस. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे,” असं कोल्हे यांनी म्हटलं होतं.

मित्रांनो बदलत्या काळाशी जुळवून घेत मुलीही प्रत्येक क्षेत्र जिंकत आहेत हेच दिक्षाच्या उदाहरणावरून आपल्याला समजते. उधळलेल्या बैलाला शांत करत त्याला पुन्हा गाड्याला जुंपण्याचा पराक्रम दिक्षा ने केला आहे.

समाजाच्या सर्व स्तरातून तिचे कौतुक होते आहे. मुलगा, मुलगी भेद न करता जर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सारखी संधी दिली तर नक्कीच दिक्षा सारख्या अनेक हिरकण्या आपल्याला गवसतील हे नक्की … तोवर ‘बादल पे पांव है, या छुटा गांव है… आब तो भई चल पडी अपनी ये नाव है…’ असे सध्या म्हणणार्‍या दिक्षाचे आपण कौतुक करूया.

लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि इनमराठी वरील असेच नवनवीन विषय वाचत रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version