Site icon InMarathi

RRR फाईल्स : बदलत्या भारताचे चलचित्र!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : डॉ.अभिराम दीक्षित

===

RRR आणि काश्मीर फाईल्स हे दोन्ही सिनेमे नुकतेच पाहिले. त्यातला RRR सिनेमा हिंदू मानसिकता दाखवतो. काश्मीर फाईल्स सिनेमात इस्लामी आणि कम्युनिस्ट मानसिकतेकडे भाजप समर्थक कसे पाहतात याचे प्रदर्शन आहे. भारताचा सिनेमा बदलला आहे. कलाकृती हा लोकजीवनाचा आरसा असतो.

बदललेली अभिरुची, सरकारे, प्रेक्षकांचा चॉईस, कलाविष्कार या सगळ्याचा परिणाम कलाकृतीवर होतो. सिनेमावर होतो. त्यामुळे हा बदल टिपणे सामाजिक शास्त्रांच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षाच्या छोट्याश्या काळात हा झालेला हा बदल महाप्रचंड आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

RRR सिनेमा वेळेत सुरु झाला नाही म्हणून चाहत्यांनी तोडफोड केल्याची बातमी ताजी आहे. हा RRR सिनेमा पाहून पिटातले पब्लिक अतिउत्साहात स्क्रीनची फाडाफाडी करेल – या भीतीने अनेक चित्रपटगृहात स्क्रीनसमोर जाळ्या आणि खिळे लावले आहेत.

या सिनेमातले हिरो शुदध देशी हिंदू आहेत. सावळ्या काळ्या रंगाचे, दाढीमिशा राखणारे आणि तालमीत कसलेले त्यांचे भक्कम देशी शरीर आहे. जिम मधल्या सिक्स प्याक आणि पाश्चात्य पद्धतीच्या लुक्स ना शिस्तीत फाट्यावर मारले आहे.

 

 

या नायकांची नावे राम आणि भीम अशी आहेत. त्यातला राम भगव्या वस्त्रात धनुष्य बाणाने इंग्रजाशी लढतो – ते सीन जितके उत्तेजक आहेत तितकी उत्तेजना किक कोणते औषध तरी देऊ शकेल काय? याबद्दल मला शंका आहे.

उत्सवप्रिय हिंदू समाजची नस RRR ने पकडली आहे. महाराष्ट्रातला गणपती, गुजराथेतली नवरात्र, बंगालातली देवीपूजा यात जो जल्लोष उत्साह असतो. बेभानपणा असतो. तोच बेभानपणा, शुद्ध देशी हिंदू प्रतिकासह आणि संस्कृत गाणी वापरून RRR मध्ये तळपला आहे.

आमच्या लहानपणी चांदोबा किंवा अमर चित्रकथात ज्या पौराणिक कथा असत त्याचा – हजारपट भव्य दिव्य उत्सव म्हणजे राजामौलीचे सिनेमे. मग ते बाहुबलीचे दोन भाग असोत अथवा आजचा RRR! हे सिनेमे नाहीत : रंगाचे , संगीताचे आणि भावनांचे उत्सव आहेत.

बहुसंख्य हिंदू मन जसे उत्सवप्रिय आहे तितकेच ते सर्वधर्म समभावी आहे. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी वाट्टेल ती किंमत देण्याची बहुसंख्य हिंदूंची तय्यारी असते. राजामौली या दिगदर्शकाने RRR च्या आधी बाहुबली सिनेमा काढला होता. सिनेमा काल्पनिक आणि पौराणिक काळावर बेतलेला होता. या सिनेमात मुस्लिम पात्र एकच आहे.

 

 

अर्थात पौराणिक काळात इस्लाम धर्माचा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे चांदोबाच्या गरुडपुराणाच्या कथात अब्दुल दाखवणे अपेक्षित नव्हते . पण पुरोगामी टोळीने बाहुबली सिनेमावर आक्षेप घेणे अपेक्षित होतेच ! बाहुबली सिनेमात मुस्लिम पात्रे पुरेशी नाहीत. फक्त हिंदू धर्माचाच उदोउदो आहे असे “अनेक” “आक्षेप” पुरोगामी टोळीने तेव्हा घेतले होते.

त्याचे पापक्षालन म्हणून की काय पण राजामौलीच्या या RRR सिनेमात मुख्य नायकालाच थोडावेळ अब्दुल बनवले आहे. मग एका ताटातले बिस्मिल्लाह, प्यारी अम्मी , इमानी अब्बूजान सारे ओघानेच येते. असा बाळबोध सर्वधर्म समभाव दाखवणे ही बहुसंख्य हिंदू मनाची सुद्धा गरज आहे हे नीट समजून घेतले पाहिजे.

हिंदूंच्यातली पुरोगामी टोळी मानसिकतेने शुद्ध हिंदूच आहे. कोणत्याही आधुनिक मूल्यांचा अंगीकार या टोळीने केलेला नाही . आधुनिक पाश्चात्य जगतात इस्लाम धर्माची चिकित्सा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. रेटून खोटे बोलून इस्लाम धर्माचे रक्षण करणे ही हिंदू पुरोगाम्यांची रीत आहे. बाहुबलीवर सर्व धर्म समभावी पुरोगाम्यांनी असेच इस्लामप्रेमी आक्षेप घेतले होते .

RRR मध्ये नायक थोडावेळ अब्दुल दाखवल्याने पुरोगामी टोळीचे पोट भरेल याची खात्री नाही. संस्कृत मध्ये रामाचे गाणे का दाखवले? अल्लाचे पण गाणे दाखवा असा पुरोगामी आक्षेप उद्या उभा राहील. किंवा RRR मधल्या राम आणि भीम पैकी एकाचे नाव अब्दुल ठेवा.

 

 

समतावादी असाल तर रामाचेच नाव अब्दुल ठेवा , भीमाचे भीमच राहूद्या असाही पुरोगामी सल्ला मिळू शकतो! हा माझा कल्पनाविलास नाही . पुरेसे भाजप विरोधक तुमच्या फेसबुक लिस्टीत असतील तर दोन स्क्रोल मध्ये हे सल्ले दिसतील .

इस्लाम धर्माची चिकित्सा राहूदे या धर्माचे जुजबी ज्ञान सुद्धा पुरोगामी टोळीला नाही. सिनेमा हा कलाविष्कार असतो. दुसर्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. मुसलमानांचे सतत लांगुलचालन केले तर हिंदू समाज आपल्याला काडीची किंमत देणार नाही इतकी साधी समज पुरोगाम्यांना आलेली नाही.

हिंदूंची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव याला मनुवाद म्हणून हिणवले आणि इस्लाम धर्मापुढे शेपूट हलवले तर यापुढे भारतात तुमचा द्वेषच केला जाईल हे वास्तवदेखील पुरोगाम्यांना समजलेले नाही.

भाजप मोदी याबद्दल सुद्धा जराही सम्यक भूमिका न घेता फक्त टोकाचा द्वेष इतकेच पुरोगामीत्व असेल तर ते टिकणारे नाही हेसुद्धा समजलेले नाही.

नेमक्या याच पुरोगामी मानसिकतेविरुद्ध उभा असलेला सिनेमा म्हणजे काश्मीर फाईल्स. भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच इस्लामी दहशतवादाचा स्पष्ट उल्लेख या सिनेमात आहे. जिहाद, काफीरद्वेष, इतर धर्माप्रती तुच्छता आणि इस्लामचे राज्य आणायची मानसिकता रोजच्या व्यवहारात सतत दिसत असते.

बॉलिवूड सिनेमात मात्र पाच वेळेचा नमाजी अब्दुल हा नेहमीच सद्गुणांचा पुतळा असतो. ती मानसिकता काश्मीर फाईल्स ने तोडली आहे. रलीव, गलीव या चलीव. मुसलमान व्हा , इथून पळा नाहीतर मरा असे तीन ऑप्शन काश्मिरी जिहाद्यांनी हिंदूंना दिले होते.

 

 

इस्लामी काश्मीर बनेल ते हिंदूंच्या स्त्रियांसह आणि पुरुषाशिवाय असेही मशिदी मशिदीच्या लाऊडस्पिकर वरून सांगितले जात होते. या जिहाद मध्ये मुख्यतः हिंदू मेले. बलात्कारित झाले. हे वास्तव कधी पुरोगाम्यांनी कधीही मांडले नाही. जो मांडेल त्याला प्राणपणाने विरोध केला.

विश्वंभर चौधरी या पक्षनिरपेक्ष पुरोगाम्याने काश्मीर फाईल्स बद्दल लिहिलेली पोस्ट अवश्य वाचण्यासारखी आहे. या सिनेमाचा भाजपला फायदा होईल म्हणून पुरोगाम्यांचा या सिनेमाला विरोध आहे . सत्य कुठे आहे? न्याय कुठे आहे? माणुसकी कुठे आहे? आधुनिक पुरोगामी मूल्ये कोणती आहेत? याचे पुरोगामी टोळीला देणे घेणे नाही.

भाजप विरोध हा पुरोगामी टोळीत राहण्याचा एकमेव क्रायटेरिया आहे. भाजपला विरोध करण्यासाठी जहाल द्वेष पसरवणे हा पुरोगाम्यांच्या नेतृत्वाचा क्रायटेरिया आहे. सरंजामी जातीवादी अतिश्रीमंत कुटूंबाच्या मालकीच्या राजकीय पक्षाची नोकरी करणे ही पुरोगामी रोजीरोटी आहे.

या डाव्या मानसिकतेवर काश्मीर फाईल्स मध्ये निर्णायक हाथोडा मारला आहे. हे बदलते वास्तव फक्त या सिनेमापुरते नाही. मोदीकाळात हिंदी मीडियाने सुद्धा पलटी मारली आहे. झी न्यूजवर रोजच्या टॉकशो मध्ये एखादा मंदबुद्धी इस्लामी मौलवी शोधून बोलावला जातो आणि त्याची पिसे काढली जातात.

हे भारतीय मीडियाचे बदललेले वास्तव आहे. पुरोगामी टोळीला इस्लाम धर्मापुढे शेपूट हलवूद्या. भाजप द्वेष हा स्वतःचा क्रायटेरिया बनवूद्या. हिंदुत्ववाद्यातला एक मोठा गट हा मानसिकतेतून बाहेर पडला आहे. स्वतःची वैचारिक शस्त्रास्त्रे आणि नरेटिव्ह घेऊन उघडपणे बोलू लिहू लागला आहे.

काश्मीर फाईल्स ही त्याची फक्त सुरवात आहे . तानाजी पावनखिंड सारखे सिनेमे प्रेक्षक देखील उचलून धरत आहेत. हिंदुत्ववाद हा हजार तोंडाचा रावण आहे. उत्सवप्रिय हिंदूंना आवडेल असेही ते बोलतील आणि इस्लाम बद्दल राजकीय जागृती सुद्धा करतील.

 

 

काय बरोबर आणि काय चूक? हा लेखाचा मुद्दा नाही . भारतीय समाजाचे चलचित्र एका लेखात चित्रित करणे हा मुद्दा आहे.

सिनेमाचा इतिहास पाहिला तर सुरवातीला कृष्णधवल मूकपटाचा जमाना होता. हिंदू आता मुका राहणार नाही. त्याला काळे पांढरे समजू लागले आहे. हिंदूंचा धर्मप्रचार नेहमी उत्सवातून होतो. धर्मान्तर करून नाही.

RRR सिनेमा हा त्या अर्थाने धर्म प्रचारक आहे. हिंदूंची राजकीय जागृती ही नेहमी इस्लाम धर्माच्या अभ्यासातून होते . काश्मीर फाईल्स हा सिनेमा याच राजकीय अर्थाने जागृतीचा सिनेमा आहे. दोन्ही सिनेमांना त्यांच्या अपेक्षेबाहेर यश मिळेल.

पुरोगामी टोळीकडून “अपेक्षित” मुद्द्यावर “आक्षेप” घेतले जातील.. हिंदूंची राजकीय समज वाढत जाईल . पुरोगामी टोळी स्वतःच्या कोशात मूकबधिर होत जाईल… हे भारताचे चलचित्र आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version