आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेले बरेच दिवस रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला त्यानंतर रशियावर दबाव यावा यादृष्टीने पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लावले. वेळ पडली तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असं पुतीन यांनी सांगितल्यामुळे तर भयाची तीव्रता आणखीनच वाढली आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पुतीन यांचा इतका दरारा असूनही बलाढ्य रशिया युक्रेनला युद्धात अद्याप हरवू शकलेलं नाही. हे युद्ध थांबावं या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आधीच या भीषण परिस्थितीमुळे अनेकांचं अपिरिमित नुकसान झालंय. हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची तर नांदी नाही ना अशीही भीती व्यक्त केली गेली आहे.
याच पार्श्वभूमीवर एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. पुतीन यांची दहशत इतकी आहे की या इतक्या भयानक परिस्थितीत बाकी राष्ट्रं त्यांच्या विरोधात जायचा प्रयत्न करणार नाहीत. मात्र रशियातलीच काही बडी मंडळी पुतीन यांच्या विरोधात कट रचत असल्याचं समजतंय.
आपल्याला विष दिलं जाईल की काय अशी पुतीन यांना भीती वाटते आहे. या भीतीपायी त्यांनी फेब्रुवारीत चक्क आपल्या पर्सनल स्टाफ मधल्या सुमारे १००० जणांना काढून टाकून त्याजागी नव्या व्यक्तींची नेमणूक केल्याचं समजतंय.
नेमका काय आहे हा सगळा प्रकार? जाणून घेऊ.
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेचं म्हणणं आहे की, मॉस्कोतील काही उच्च अधिकारी पुतीन यांना विष देऊन हा अपघात असल्याचं दाखवण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे, विष दिलं जाण्याची भीती पूर्णतः खोटी नाही.
युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने सांगितलं की, रशियातील काही प्रभावशाली व्यक्तींच्या गटाने राष्ट्राध्यक्षांना कार्यालयातून काढून टाकण्याची योजना आखायला सुरुवात केली असल्याचं समजतंय. कोण उत्तराधिकारी असेल हेही त्यांच्या डोक्यात आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर लावलेले निर्बंध रशियाच्या अर्थव्यवस्थेला महागात पडत आहेत हे या योजनेमागच्या कारणांमधलं एक मुख्य कारण आहे.
या सगळ्यामुळे पुतीन घाबरले असून त्यांनी फेब्रुवारीत आपल्या पर्सनल स्टाफमधल्या जवळपास १००० जणांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक केली आहे.
‘डेली बिस्ट’च्या वृत्तानुसार, कामावरून काढून टाकलेल्या या हजार जणांमध्ये आचारी, धोबी आणि अंगरक्षकांचा समावेश आहे. पुतीन यांनी हे पाऊल त्यांच्या आदेशावरून रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्याच्या आधी की नंतर उचललं होतं हे स्पष्ट झालेलं नाही.
—
- पुतीन यांचा उजवा हात चालताना का हलत नाही?
- राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतिनचं प्रेमप्रकरणही तितकंच वादग्रस्त आहे
—
‘फेडरल सेक्युरिटी सर्व्हिस (FSB) चे डायरेक्टर अलेक्झॅन्डर बोर्टनिकोव यांचा पुतीन यांच्या बदल्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी विचार केला जातोय. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेच्या मुख्य संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, “बोर्टनिकोव आणि रशियातील खास लोकांच्या वर्गातले काही प्रभावशाली प्रतिनिधी पुतीन यांना सत्तेवरून काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत असं कळलंय. विशेषतः, विषप्रयोग, अचानक झालेला आजार किंवा अन्य कुठला ‘योगायोग’ही यात वगळण्यात आलेला नाही.”
बोर्टनिकोव आणि पुतीन हे दोघेही ‘केजीबी’ या गुप्तचर संस्थेसाठी काम करायचे. मात्र रशिया-युक्रेन युद्धांनंतर रशियाच्या सैनिकांचे युक्रेनमध्ये गेलेले बळी पाहिल्यावर बोर्टनिकोव यांनी पुतीन यांच्याशी असलेले त्यांचे संबंध तोडले असल्याचं समजत आहे.
मात्र, ‘आर. पॉलिटिक’ या राजकीय विश्लेषण संस्थेच्या संस्थापक असलेल्या टाटीआना स्टॅनोवाया यांनी या संदर्भात काहीसं वेगळं मत मांडलं आहे. “सत्ताधारी वर्गामध्ये फूट पडल्याचं कुठलंही चिन्ह दिसून आलेलं नाही. कुठले डावपेच आखायचे याबद्दलची त्यांची मतं वेगवगेळी असल्याची शक्यता असली तरी त्यांच्यात पूर्णतः एकमत आहे.”
स्टॅनोवाया यांनी असं म्हटल्याचं ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने नमूद केलं आहे. स्टॅनोवाया यांचं म्हणणं आहे की, आक्रमण करावं की नाही असं वाटणे आणि आक्रमण करण्याच्या तयारीत असणे यातला फरक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्या म्हणाल्या, “लोकांना धक्का बसला आहे आणि हे चुकीचं आहे असं अनेकांना वाटतंय. पण कुणीही काही करू शकत नाहीये. या परिस्थितीत तग धरू कसं राहायचं यावर प्रत्येकाने आपलं लक्ष केंद्रित केलंय.”
कदाचित या अफवाच असून सध्याच्या संकटावर परिणाम करण्याच्या दृष्टीनेही त्या पसरवल्या जात असतील. पण पुतीन यांचं वैयक्तिक आयुष्य हा नेहमीच एक गूढ विषय राहिला आहे. युद्धाच्या या पार्श्वभूमीवर अनेक विश्लेषकांनी पुतीन यांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर शंका उपस्थित केली आहे.
‘केजीबी’चे माजी सदस्य असलेले पुतीन हे काही गंभीर आजारांतून जात असल्याचा दावाही काहींनी केला आहे. या सगळ्या दरम्यान, पुतीन यांची कथित प्रेयसी असलेल्या अलिना काबाएवा या जिम्नॅस्टच्या विरोधात ‘change.org’ या वेबसाईटने तिला शिक्षा केली जावी अशी याचिका दाखल केली आहे.
हिटलरची सहचर इवा ब्राऊन हिच्याशी तिची तुलना करून पुतीन यांच्या शासनाला सहकार्य करणाऱ्यांना स्वित्झर्लंड का आसरा देतंय अशी विचारणा या याचिकेत करण्यात आली आहे.
असे प्रयत्न जर खरंच केले जात असतील तर आताच्या संहाराचं आपल्याला दिसतंय त्यापेक्षाही अधिक भीषण चित्र आहे असं म्हणावं लागेल.
जुलूमाचं राजकारण समोर उभ्या ठाकलेल्या प्रतिस्पर्ध्याला एकवेळ भीती घालेल. पण हीच गोष्ट आपल्याच माणसांमध्ये आपले विरोधक निर्माण करायला कारणीभूत ठरू शकते आणि आपला सर्वनाश होण्याची शक्यता निर्माण करू शकते हेच वरच्या या बातम्यांवरून आपल्या लक्षात येतं.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.