Site icon InMarathi

घोटाळ्यांमुळे ललित मोदी कुप्रसिद्ध, मात्र त्यांच्या आजोबांनी भारतात उभारलं उद्योगाचं साम्राज्य

gujarmal modi 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘गुजरमल मोदी’ हे नाव ऐकलंय का ? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येण्याची जास्त शक्यता आहे. कारण, आपल्याकडे चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींची चर्चा ही नेहमीच मर्यादित प्रमाणात होत असते. १९६० च्या दशकात भारतात उद्योजकतेचा पाया रचणारी ही व्यक्ती कधीच प्रसिद्धीत आली नाही.

‘गुजरमल मोदी’ हे आयपीएल मध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे कुप्रसिद्ध झालेल्या ललित मोदी यांचे आजोबा आहेत. ‘मोदी ग्रुप’ या भारतीय उद्योग समूहाचे ते संचालक आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यातील व्यवसाय कौशल्य जाणून गुजरमल मोदी यांनी १९३३ मध्ये ‘मोदी इंटरप्राईझेस’ची स्थापना केली होती.

 

 

आज ‘मोदी ग्रुप’ची वार्षिक उलाढाल ही २८०० कोटी रुपये इतकी आहे. दिल्लीत मुख्यालय असलेल्या या उद्योग समूहाची स्थापना करतांना गुजरमल मोदी यांना त्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता? आज ‘मोदी ग्रुप’ या उद्योग समूहाच्या कोणत्या वस्तू आजही लोक वापरतात? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गुजरमल मोदी यांचा जन्म ९ ऑगस्ट १९०२ रोजी पटियाला जिल्ह्यातील महेंद्रगढ येथे झाला होता. त्यांचे वडील मुलतानीमल मोदी हे एक व्यापारी होते.

आपल्या मुलाने व्यवसायात कमी वयात सहभागी व्हावं अशी मुलतानीमल यांची इच्छा होती आणि झालंही तसंच. गुजरमल हे काही कारणांमुळे दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरू शकले नाहीत ज्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जाणार होतं. गुजरमल मोदी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच वडिलांच्या ‘ट्रेडिंग’ व्यवसायात त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. पण, त्यात फार काही घडत नव्हतं.

१९३२ मध्ये गुजरमल मोदी हे केवळ ४०० रुपये घेऊन दिल्लीला गेले होते. बेगमगड हे गाव त्यांनी राहण्यासाठी निवडलं होतं. ‘साखर कारखाना’ हा आपला पहिला उद्योग निवडून त्यांनी उद्योजक होण्याकडे वाटचाल सुरू केली.

१९४१ मध्ये गुजरमल मोदी यांची एका बंगाली माणसासोबत भेट झाली, ज्याने त्यांना साबणनिर्मिती करण्याचा उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला. त्या व्यवसायाला ‘वनस्पती मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ हे नाव देण्यात आलं. हा त्यांचा सर्वात यशस्वी व्यवसाय ठरला.

त्यानंतर गुजरमल मोदी यांनी ‘मोदी ऑईल मिल्स’, ‘पेन्ट्स’, ‘टेक्सटाईल मिल्स’, ‘स्टील मिल’, ‘रबर मिल’ सारख्या कंपन्यांची सुरुवात करून ‘मोदी ग्रुप’ या उद्योग समूहाला त्यांनी आकार दिला.

 

 

सोनू भसीन यांनी लिहिलेल्या ‘गुजरमल मोदी’ यांच्या आत्मचरित्रात एक किस्सा सांगितला आहे, की एका इंग्रज अधिकाऱ्याने गुजरमल मोदी यांना बघून त्यांना ‘द डर्टी इंडियन’ असं संबोधन केलं होतं. हे नाव गुजरमल मोदी यांना इतकं खटकलं होतं की त्यांनी या नावाचा बदला घेण्याचं ठरवलं आणि तसं त्यांनी करूनही दाखवलं.

एका कंपनीच्या खरेदीसाठी गुजरमल मोदी हे त्याच इंग्रज अधिकाऱ्यासमोर लिलावात सहभागी झाले होते. मिस्टर टर्नर हे त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं. गुजरमल मोदी यांनी लिलावात असलेली कंपनी टर्नरला हरवून लिलावात विकत घेतली आणि आपल्या अपमानाचा बदला घेतला होता.

लायसन्स राज:

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्री. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘लायसन्स राज’ प्रत्येक राज्यात लागू केला. या कायद्यातील नियम व अटी इतक्या जाचक होत्या की, लोकांनी याची तुलना ‘ब्रिटिश राज’ सोबत केली होती.

एका राज्यातील व्यापाऱ्याला दुसऱ्या राज्यात आपला माल विकण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याची परवानगी आणि अधिकृत परवाना असणं बंधनकारक होतं. या कारणामुळेच भारतात भ्रष्टाचाराला सुरुवात झाली असंही सांगितलं जातं.

गुजरमल मोदी यांना देखील ‘लायसन्स राज’मुळे आपल्या मालाची वाहतूक करणे, उत्पादन केलेल्या वस्तूची नोंदणी करणे आणि परदेशातून कोणतंही उपकरण भारतात आणणे ही कामं स्वतंत्र भारतात अधिक महाग झाले होते. पक्के रस्ते उपलब्ध नव्हते, आज सहज उपलब्ध होतं तसं सुशिक्षित मनुष्यबळ हे त्या काळात उपलब्ध व्हायचं नाही.

गुजरमल मोदी यांनी हे या सर्व प्रश्नांवर तोडगा काढत गेले आणि त्यांनी सिस्टीम ‘मॅनेज’ कशी करायची हे त्यांनी लोकांना शिकवलं. गुजरमल मोदी यांचा व्यवसायाचा वाढता आवाका बघून तत्कालीन भारत सरकारने आर्थिक धोरण ठरवतांना त्यांचं मत घेण्यास सुरुवात केली.

 

 

गुजरमल मोदी यांच्या ‘मोदी ग्रुप’ने कालांतराने देशाचा सिगरेट आयात खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सिगरेट तयार करण्याचा भारतातील पहिला कारखाना सुरू केला.

१९६० चं दशक हे ‘मोदी ग्रुप’साठी सुवर्ण काळ म्हणून मानलं जातं. या दशकात त्यांनी टायर्स, नायलॉन, सुती कापड सारख्या वस्तूंच्या निर्मिती व्यवसायात पदार्पण केलं आणि आपला व्यवसाय कैकपटीने वाढवला. गुजरमल मोदी यांचं व्यवसाय कौशल्य आणि यश बघून उत्तरप्रदेश मधील एका गावाला ‘मोदीनगर’ हे नाव देण्यात आलं होतं.

भारत पारतंत्र्यात असतांना असे मोजकेच व्यवसायिक होते ज्यांनी ‘ब्रिटिश आर्मी’ला आपल्या वस्तू किंवा सेवा विकून भारताच्या उत्पन्नात वाढ केली होती. ‘मोदी ग्रुप’ हा त्या व्यवसायांपैकी एक होता ज्याने ही कामगिरी करून दाखवली होती.

 

 

दुसरं महायुद्ध सुरू असतांना त्यांनी ब्रिटिश आर्मीला विकलेल्या फूड प्रोसेसिंग युनिटमुळे ब्रिटिश सैनिकांना अन्नधान्याची कधीच कमी भासली नाही. गुजरमल मोदी यांच्या या मदतीसाठी १९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘राय बहादुर’ ही पदवी दिली होती आणि मेरठ येथे त्यांचा जाहीर सत्कार देखील केला होता.

गुजरमल मोदी हे त्यांच्या वडिलांचे सर्वात मोठे पुत्र होते आणि ते आपल्या वडिलांच्या व्यवसायात सक्रिय राहून उत्तरप्रदेश मध्येच आयुष्य काढू शकले असते, पण त्यांनी तसं न करता ते आपलं ध्येय गाठण्यासाठी दिल्लीला आले आणि त्यांनी एक इतिहास रचला ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.

गुजरमल मोदी यांनी आपल्या उत्तरार्धात शिक्षणसंस्था उभारणे, वैद्यकीय सेवा कमीत कमी खर्चात सामान्य माणसाला उपलब्ध करून देणे, कारखान्यातील कामगारांना घर बांधून देणे, प्रत्येक प्रभागात उद्यान उभारणे अशा समाजोपयोगी कामासाठी आपल्या अतिरिक्त उत्पन्नाचा विनियोग केला होता.

१९३२ मध्ये ४०० रुपये घेऊन घरातील निघालेल्या एका तरुणाने आपल्या नावाची उद्योगनगरी उभी करणे आणि एका देशाला कोणत्याही शिक्षणा शिवाय उद्योगाची धोरणं शिकवणे ही गोष्ट कायमच कौतुकाची असणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version