Site icon InMarathi

‘यारा सीली सीली बिरहा की…’ गाण्यातील ‘सीली सीली’ शब्दांचा अर्थ तुम्हाला ठाऊकच नसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तहज़ीब हाफ़ीची एक गझल आहे, त्यात तो म्हणतो ,

न जाने कब उसकी आँखें छलकेंगी मेरे गम में,
न जाने किस दिन मुझे ये बर्तन भरे मिलेगे
तुझे ये सड़कें मेरे तबस्सुत से जानती हैं,
तुझे हमेशा ये सब इशारे खुले मिलेंगे…

ही गझल आठवण्याचे कारण म्हणजे मानवी भावभावना आणि त्या भावनेसोबत कळत नकळत होणारी मनाची फरपट. आपल्या इच्छा-आकांक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण केलेली धडपड, ही सर्वश्रूत आहे, पण कधीकधी असे होते की कोणत्या ना कोणत्या कारणाने या गोष्टी अधुर्‍या राहून जातात आणि शेवटी उरते त्या इच्छा पूर्ण करण्यामागे नशिबात आलेली भरकट.

असे म्हणतात मानवी आयुष्य हे त्रिमितीय असते, पण या तीन मितींच्या पलीकडे ही एक चौथी मिती अस्तित्वात असते. ज्यात ही अधुर्‍या राहिलेल्या गोष्टींमुळे होणारी फरपट दिसून येते. घटनांची वलये असतात. एका घटनेतून दुसर्‍या घटनेत जाताना ही वलये पार करण्याचा प्रवास करावा लागतो प्रत्येकाला.

मित्रांनो अशीच भरकट दाखवणारा एक संयत चित्रपट ‘लेकीन’ १९९० साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लक्षात राहिला तो त्याच्या अवीट अशा गाण्यांनी, अलौकिक अशा संगीताने आणि कलाकारांच्या अविस्मरणीय अभिनयाने.

 

 

चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही, पण चित्रपटातील गाणी मात्र रसिकांच्या मनावर आजही राज्य करतात. त्यातही या चित्रपटाची थीम सांगणारे गुलजार लिखित ‘यारा सिली सिली ‘ हे तीच ती मानवी मनाची भरकट शब्दाशब्दातून प्रतीत करणारे अजरामर गाणे आजही अस्वस्थ करून जाते.

मित्रांनो तुम्ही देखील कधी ना कधी हे गाणे नक्की ऐकले असेलच, पण या गाण्याचा खास करून ‘सिली सिली’ या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चला माहिती करून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गाण्यातला प्रत्येक शब्द थेट काळजावर वार करणारा. खोलवर दडवलेला सल पुन्हा उघडा करणारा. जगण्या मरण्याच्या धूसर अशा सीमारेषेवर अडकलेल्या जीवाची व्यथा सांगताना गुलजार जेव्हा लिहितात, यारा सिली सिली बिरहा की रात का जलना.. हे जे जळणे आहे ते इतके आतल्याआत आहे की त्याने सारे आयुष्यच धुमसते आहे अशी भावना दाटून येते.

‘ये भी कोई जीना है..ये भी कोई मरना..’या गाण्याच्या पुढच्या ओळी गाण्याच्या आधीच्या ओळीमधले आर्त रसिकांच्या मनात रुजवतात. यातील ‘सिली सिली’ हा शब्द गाण्यात अशा नजाकतीने आणला आहे की हे फक्त आणि फक्त गुलजारच करू शकतात.

न जाणे किती जन्मांपासून ही भरकट आहे, जी संपतच नाही. कधी संपेल हे माहिती नाही. हा जो अविरत वेदना सोबत घेवून सुरू झालेला प्रवास आहे त्यात आजवर किती वळणे येवून गेली, किती ठिकाणे येवून गेली याची गणतीच नाही. तरी शेवटचा मुक्काम काही सापडत नाही.

 

 

या दिशाहीन भरकटीची सुरुवात तर झालीय पण त्याचा अंत काही केल्या होत नाही, या जाणिवेमागची वेदना सतत मंदपणे जळत आणि जाळत ठेवते ती सिली सिली या शब्दातून.

विरहाची प्रत्येक रात्र ही अश्रूंमध्ये भिजूनच पूर्णत्वाला जाते. ते एकटेपण इतके प्रचंड आहे की त्यात स्वत:ची सावली देखील सोबत नाही. आतून दाटून आलेल उजाडलेपण आणि बाहेरचे शुष्क ओसाड भावनाहीन वाळवंट यांनी सारे आयुष्य व्यापले आहे.

‘सिली’ या शब्दाचा शब्द्श: अर्थ हळूहळू जळणे, ओलं लाकूड जसं जळतं  तसा होतो,  पण गीतात गुलजारांनी त्याला एक वेगळेच परिमाण दिले आहे. न संपणारी विरहाची, दुराव्याची रात्र अश्रूंमध्ये भिजून आणखीनच ओलसर, सर्द झाली आहे. अशी रात्र अनुभवणे म्हणजे धड जगणे ही नाही आणि मरणेही नाही. भावनांचा ओलावा असला, तरी मन मात्र विरहात जळतच राहिले आहे.

गुलजारांच्या लेखणीतून उतरलेली ही नज्म मनात एक हुरहूर निर्माण करते. लता मंगेशकरांनी हे गीत गाताना प्रत्येक आणि प्रत्येक शब्दाला न्याय दिला आहे, तर हृदयनाथ मंगेशकरांच्या अद्वितीय संगीताने सजलेले गाणे अभिनेत्री डिंपल कपाडिया हिच्यावर चित्रित केले गेले आहे.

उजाड वाळवंटाचा आभास करून देणारे हे गाणे म्हणजे वैराण झालेल्या आयुष्याचे प्रतिबिंबच जणू… म्हणूनच गाणे कधीही ऐकले तरी त्यातील ‘सिली सिली’ हे शब्द ठसत जातात आतात,खोलवर… मित्रांनो काहुरत्या संध्याकाळी अस्ताला जाणारा सूर्य डोळे ओले करतो,तसेही ओल्या लाकडाचे आतल्या आत धुमसणे डोळ्यात पाणी आणतेच…यारा सिली सिली…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version