Site icon InMarathi

१९९० साली ज्या पंडितांनी काश्मीर सोडलं नाही, त्यांच्यासमोर उभं ठाकलं भयंकर संकट

kashmiri pandit im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या देशभरात ज्या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सातत्याने नवे रेकॉर्ड्स करतो आहे, पण चित्रपटाला इतकी अमाप लोकप्रियता मिळूनदेखील हा चित्रपट आणि चित्रपटाचे दिग्दर्शक वादातून सुटलेले नाहीत.

या चित्रपटाच्या निमित्ताने १९९० साली काश्मीरमध्ये घडलेली एक अत्यंत भीषण घटना आपल्या समोर आली. घराघरांतून रातोरात बाहेर पडलेल्या काश्मिरी पंडितांना आपल्याच राज्यातून कसं पलायन करावं लागलं, जीव मुठीत धरून पळून गेलेल्या आणि विस्थापित झालेल्या या काश्मिरी पंडितांचे किती हाल झाले, किती प्रकारच्या अमानुष छळांना त्यांना तोंड द्यावं लागलं हे पाहून जो तो हळहळतो आहे.

 

 

चित्रपटासारख्या अवघ्या २-३ तासांच्या कलाकृतीतून जेव्हा अशी एखादी ऐतिहासिक घटना आपल्या समोर येते तेव्हा पडद्यावर दिसणाऱ्या या घटनेला इतरही अनेक कंगोरे असतात जे आपल्याला चित्रपटातून दिसलेले नसतात ही बाब सहजासहजी आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. मात्र त्या निमित्ताने काही लोक पुढे यायची हिंमत दाखवतात आणि त्यांनी भोगलेल्या मात्र आपल्यापर्यंत न पोहोचलेल्या त्रासांविषयी सांगतात.

१९९० साली काश्मीरमधून पलायन केलेल्या काश्मिरी पंडितांचं भीषण वास्तव ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून आपल्या समोर आलं खरं, पण १९९० साली ज्या पंडितांनी काश्मीर सोडलं नाही त्यांना काश्मीरमध्ये कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं याची आपल्याला कल्पना नाही.

त्यावेळी ज्या लाखो पंडितांनी काश्मीर सोडलं नाही त्यातले एक असलेल्या मखन लाल यांचा अनुभव थोडक्यात जाणून घेऊया. बीबीसीशी बोलताना त्यांनी हा अनुभव सांगितला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही अपरिहार्य कारणांमुळे आणि आपल्या घरावर आणि देशावर असलेल्या प्रचंड प्रेमामुळे १९९० साली मखन लाल काश्मीर सोडून गेले नाहीत. काश्मीरमध्ये त्यावेळी प्रचंड भयाचं वातावरण असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला.

हा निर्णय घेताना आपल्याला या निर्णयाची किती जबरदस्त किंमत चुकवावी लागणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती, पण असा एक प्रसंग घडला ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वतःजवळ शस्त्रं बाळगलेल्या काही अज्ञात लोकांनी गोळी झाडून त्यांच्या पत्नीची हत्या केली.

कुठलाही सामान्य माणूस गलितगात्र होईल अशी घटना होती ही!  या घटनेमुळे ते प्रचंड घाबरले आणि २००१ साली काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या आपल्या आकुरा गावातून पळून गेले. आपल्या पत्नीची हत्या नेमकी कोणी केली याचा थांगपत्ता त्यांना आजतागायत लागलेला नाही. या गोष्टीचा त्यांना प्रचंड त्रास होतो.

 

 

आपण काश्मीर सोडायला हवं होतं. आपण जर तेव्हाच काश्मीर सोडलं असतं तर आपली बायको वाचली असती असा पश्चात्ताप त्यांना होतो. ते म्हणतात, “ज्या दिवशी माझ्या पत्नीची हत्या झाली त्यादिवशी मी स्वतःला विचारलं की जर मी काश्मीर सोडलं असतं तर माझ्या बायकोची हत्या झाली नसती. पण त्यानंतर मी काळजावर दगड ठेवून हा देवाचा निर्णय आहे असं समजलो आणि आयुष्यात पुढे गेलो.”

आपल्या बायकोच्या हत्येनंतर मखन लाल काश्मीर सोडून महिन्याभरासाठी जम्मूला निघून गेले. मात्र जम्मूला गेल्यावर कुठेही भाड्याने राहायला घर न मिळाल्यामुळे त्यांना पुन्हा काश्मीरला परतावं लागलं. आपल्या पत्नीच्या हत्येनंतर वर्षभराने त्यांनी दुसरं लग्न केलं.

मखन लाल हे सरकारी कर्मचारी आहेत. आपल्या दोन मुलांसोबत ते जवळच्या मट्टन या गावात राहतात. इथे त्यांना सुरक्षित वाटतं. मखन लाल जरी काश्मीर मध्ये राहत असले तरी त्यांचे नातेवाईक जम्मू मध्ये राहतात.

आपल्यात आणि आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारे दुरावा निर्माण झाल्यामुळे मखन लाल यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. बऱ्याच धार्मिक प्रसंगी नेमके आपलेच पंडित लोक काश्मीरमध्ये नसतात आणि त्यांना जम्मूहून बोलवावं लागतं असं ते सांगतात.

 

 

त्यांच्या इथे जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी त्यांना जम्मूवरून लोकांना बोलवावं लागतं. कुणाचं लग्न असतं तेव्हाही अशाच प्रकारच्या समस्यांना त्यांना समोरं जावं लागतं. एखादा मोठा सण असतो तेव्हा त्यांना काश्मीरबाहेर जावं लागतं याचंही त्यांना फार वाईट वाटतं.

मखन लाल आणि त्यावेळी काश्मीरमधून पळून न गेलेल्या त्यांच्यासारख्या इतरांना केवढ्या मानसिक यातनांतून सतत जावं लागत असेल ते आपल्याला कळू शकणार नाही. आपल्यावर दोन प्रकारे घाव झालेत असं मखन लाल सांगतात. पहिला घाव अर्थातच आपल्या पत्नीची हत्या होणे हा. तर आपल्या घरात राहूनही बेघर असल्याचा अनुभव येणे हा दुसरा घाव आपल्यावर झाल्याचं ते सांगतात.

ते राजकारण्यांवर प्रचंड नाराज आहेत. आजपर्यंत एकही राजकारणी नेता आपलं कसं चाललंय याची साधी विचारपूसही करायला आला नाही असं ते सांगतात. आमच्या घरांचे भग्नावशेष झालेत तरी सरकारने या गोष्टीची अजूनही दखल घेतलेली नाही अशी खंत मखन लाल व्यक्त करतात.

काश्मीरमधून पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांचं काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याचा भारत सरकारचा हेतू आहे. याविषयी विचार करताना मखन लाल यांनी यासंदर्भात आपलं रोकठोक मत मांडलं आहे.

 

 

पळून गेलेल्या पंडितांचं काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याआधी जे काश्मिरी पंडित इतक्या संकटांशी झुंजत काश्मीरमध्ये राहत आहेत त्यांच्या राहण्याची नीट व्यवस्था भारत सरकारने आधी करावी असं त्यांचं म्हणणं आहे.

काश्मीरमधून पळून गेलेल्या पंडितांच्या वेदना चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचल्या. मात्र याच्या अलीकडे पलीकडेही आणखी बरंच काही घडत होतं.

काश्मीरवर भयाचं इतकं सावट असताना मखन लाल आणि त्यांच्यासारखे जे अनेक जण तशा परिस्थितीतही काश्मीरमध्ये राहिले त्यांच्या जगण्याची झालेली दैना आपल्याला अजूनही माहीत नाहीत हे वास्तव सुन्न करणारं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version