काश्मीर फाईल्स वाद आहेच, मात्र एकीकडे या मुस्लिम कुटुंबाने घेतलाय एक मोठा निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देशात सध्या सर्वत्र ‘द काश्मीर फाईल्स’चं वारं आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाच्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला या चित्रपटाद्वारे वाचा फोडण्यात आली आहे. देशभरात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. “काश्मिरी हिंदूंवर झाला तसाच काश्मिरी मुसलमानांवरही त्या काळात अन्याय झाला.
तो या चित्रपटात का दाखवला गेला नाही?” अशी टीका सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर केली जातेय. हा वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. हा वाद तूर्तास बाजूला ठेवू. या सगळ्या परिस्थितीमुळे देशातल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये दरी निर्माण होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र बिहारमधल्या एका मुस्लिम कुटुंबाने आपल्याला सहजासहजी कल्पना करता येणार नाही अशी एक गोष्ट केलीये.
या मुस्लिम कुटुंबाने आपली तब्बल २.५ करोड रुपयांची जागा एका मंदिराच्या बांधकामासाठी दान करून धार्मिक एकोप्याचा एक उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर ठेवला आहे. आपल्या देशाला विविध प्राचीन मंदिरांचा देदीप्यमान वारसा लाभला आहे. पण सध्या बिहारमध्ये जगातल्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या हिंदू मंदिराचं बांधकाम सुरू आहे.
तब्बल २.५ रुपयांची जागा दान करणाऱ्या या इसमाचं नाव इश्तियाक अहमद खान असून ‘विराट रामायण मंदिर’ या जगातल्या सगळ्यात मोठ्या हिंदू मंदिरासाठी त्यांनी ही जागा दिली आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया या भागात या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. इश्तियाक अहमद खान हे पूर्व चंपारणमधल्या गुवाहाटीमधले व्यावसायिक आहेत. इतकी किंमती जागा दान करण्याविषयी ‘इंडिया टुडे’शी बोलताना ते म्हणाले, “मंदिराला या जागेची गरज होती.
या जागेशिवाय या मंदिराचं बांधकाम शक्य झालं नसतं.” इश्तियाक अहमद खान म्हणाले की या जागेतली बरीचशी जागा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची असून मंदिराच्या बांधकामासाठी काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे असं त्यांना वाटलं. सध्याच्या परिस्थितीत जातधर्माच्या खरोखरच पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीच्या मनात अशी भावना मनापासून येणं हे किती सुखद आहे.
“ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे.” असं त्यांनी ANI ला सांगितलं. पाटण्याच्या ‘महावीर मंदिर ट्रस्ट’चे प्रमुख असलेल्या आचार्य किशोर कुणाल यांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे. कुणाल हे माजी आयपीएस अधिकारीही होते. जागेच्या दानासंबंधीच्या सगळ्या फॉरमॅलिटीज खान यांनी पूर्ण केल्या असल्याची माहिती कुणाल यांनी दिलीये.
ते म्हणाले, “मंदिराच्या बांधकामासाठी त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या जागेची देणगी देण्यासंबंधीच्या सगळ्या फॉरमॅलिटीज त्यांनी पूर्व चंपारणच्या केशरीआ उपविभागाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पूर्ण केल्या आहेत.” ‘महावीर मंदिर ट्रस्ट’चे प्रमुख म्हणाले की इश्तियाक अहमद खान यांनी केलेलं दान हा हिंदू आणि मुस्लिम समुदायातील सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभावाचा उत्कृष्ट नमुना आहे. ते पुढे म्हणाले की, मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा ‘ड्रीम प्रोजेक्ट साकार करणं कठीण होतं.
–
- काबूलमधला ‘शेवटचा हिंदू पुजारी’ जीव धोक्यात घालून तिथेच थांबलाय, कारण…
- या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!
–
अल्पसंख्यांक समुदायापैकी कुणीतरी मंदिरासाठी देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दोन वर्षात उत्तर प्रदेशमधील प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामासाठी मुस्लिम समुदायाने देणग्या दिल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. गेल्या वर्षी मे मध्ये डब्ल्यूएस हबीब या चेन्नईतल्या मुस्लिम व्यावसायिकाने अयोध्येतल्या राम मंदिरासाठी १ लाख रुपयांची देणगी दिली होती.
‘महावीर मंदिर ट्रस्ट’ने आतापर्यंत विराट रामायण मंदिराच्या बांधकामासाठी १२५ एकर्सची जागा मिळवली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, या ट्रस्टची या भागात अजून २५ एकर जमीन मिळवायची बाकी आहे. कंबोडियामधील १२ व्या शतकातील २१५ फूट उंचीच्या जगप्रसिद्ध आंग्कोर वट कॉम्प्लेक्सपेक्षाही हे मंदिर उंच असणार आहे आणि हे विराट रामायण मंदिर जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर ठरणार आहे.
पूर्व चंपारणच्या आवारांमध्ये उंच शिखरं असलेल्या १८ मंदिरांची स्थापना होईल आणि त्यातल्या भगवान शंकराच्या मंदिरात जगातलं सगळ्यात मोठं शिवलिंग असेल. एकूण बांधकामाचा अंदाजे खर्च साधारण ५०० करोड आहे. या मंदिराचा प्रकल्प हाती घेतलेली संस्था लवकरच नवी दिल्लीतील संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्या तज्ञांचा सल्ला घेणार आहे.
सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणारा धार्मिक द्वेष पाहता या मुस्लिम कुटुंबाची ही कृती निश्चितच कुणालाही थक्क करणारी आहे. खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणजे काय हे दाखवून दिलं आहे. कोण कुठल्या धर्मात जन्माला आला आहे यावरून ती व्यक्ती चांगली आहे की वाईट हे ठरवण्यापेक्षा कुठलीही व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे आधी पाहिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच त्या माणसाविषयी आपल्या मनात मत तयार केलं पाहिजे याचीच हे मुस्मिल कुटुंब आपल्याला नव्याने आठवण करून देतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.