Site icon InMarathi

एखादा पदार्थ तळल्यानंतर तेल साफ कसं करावं? या घ्या, ५ सोप्या टिप्स

oil im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या काही गोष्टी थोड्या मजेशीर असतात. एकीकडे आपल्याला डाएट करायचं असतं त्यामुळे कमीत कमी तेलात केलेले पदार्थ खाण्यावर आपला भर असतो तर दुसरीकडे आपल्याला आपल्या जिभेचे चोचलेही पुरवायचे असतात.

पदार्थ चमचमीत व्हायला हवा असेल तर जास्त तेलात तो करावा लागतो. अगदीच कमी तेल पोटात जाऊ द्यायचं किंवा फारच जास्त तेलकट खायचं अशी दोन्ही टोकं न गाठता आपल्या परीने आपण या दोन्हीतला सुवर्णमध्ये साधायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण, अतिरिक्त तेल जसं आरोग्याला हानिकारक असतं तसंच गरजेपेक्षा कमी तेल पोटात जाणंही योग्य नसतं.

एकदा वापरलेलं तेल जसंच्या तसं पुन्हा वापरण्याची सवय बऱ्याचजणांना असते. स्ट्रीटफूडच्या बाबतीत तर बोलायलाच नको. दिवसभर एकाच तेलात तळलेले वडे, भजी, सामोसे आपण मिटक्या मारत खातो.

 

 

 

घरी स्वयंपाक करताना एकदा वापरलेलं तेल तसंच्या तसं पुन्हा वापरणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं ही गोष्टच बऱ्याच जणांना माहीत नसते. आपण जेव्हा मोठ्या प्रमाणावर पदार्थ तळतो तेव्हा हमखास बरंच तेल बाकी उरतं आणि इतकं सगळं तेल काही आपण टाकून देऊ शकत नाही.

आपण जेव्हा असे पदार्थ तळतो तेव्हा त्यांचा चुरा, त्यांचे कण तेलात उरलेले दिसतात. त्या कणांसकट दुसऱ्या पदार्थासाठी तेच तेल पुन्हा वापरलं तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घटक ठरू शकतं. त्यामुळे उच्चरक्तदाबासारखे बरेच धोके उद्भवू शकतात. मग काय करायचं?

एखादा पदार्थ तळून झाल्यानंतर ते तेल साफ करून पुन्हा कसं वापरता येऊ शकतं याची आपल्यातल्या बहुतेकांना कल्पना नसेल. तर जाणून घेऊया याविषयीच्या काही सोप्या टिप्स.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. त्यात लिंबं घाला –

 

 

वापरलेलं तेल स्वच्छ करून पुन्हा वापरायचं असेल तर अगदी साधासोपा उपाय म्हणजे ते तेल गरम करायचं आणि लिंबांचे छोटेछोटे तुकडे करून ते त्या तेलात टाकायचे.

तेलात उरलेले अन्नपदार्थांचे कण त्या लिंबांच्या फोडींना चिकटतात आणि त्यानंतर तेलातून त्या फोडी बाहेर काढून, ते तेल गाळून आपल्याला पुन्हा वापरता येऊ शकतं.

२. जाळीतून तेल गाळून घेणे –

 

 

आपण जेव्हा एखादा पदार्थ तळल्यानंतर ते तेल जसंच्या तसं वापरतो तेव्हा त्यात असलेल्या आधी तळलेल्या पदार्थाच्या उरलेल्या कणांमुळे तेल जळू शकतं. त्यामुळे हे कण तेलातून आधी कसे काढून टाकता येतील हे पाहणं गरजेचं असतं.

तेल गाळून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. तेल गरम किंवा कोमट असताना गाळू नका. ते व्यवस्थित थंड होऊ द्या आणि मग एखाद्या सुती कापडातून, जाळीच्या गाळण्यातून, पेपर कॉफी फिल्टरमधून किंवा अगदी पेपर टॉवेलवरही ते व्यवस्थित गाळून घ्या.

३. तेलात कॉर्न स्टार्च मिसळा –

वापरलेल्या तेलात कॉर्न स्टार्च मिसळून ते मिश्रण गॅसवर मंद आचेवर गरम करत ठेवा. ते तापणार नाही याची काळजी घ्या.

हीटप्रूफ स्पॅट्युलाने ते मिश्रण सतत ढवळत राहा. दहा मिनिटांत हे कॉर्न स्टार्चचं मिश्रण घट्ट होईल. त्यानंतर ते गाळून घ्या. वापरलेलं तेल साफ होऊन तुम्हाला ते पुन्हा वापरता येईल.

४. विस्तवापासून दूर ठेवा –

 

 

तेल कधीही स्टोव्हपाशी/गॅसपाशी ठेवू नका. तुम्ही जर तेल गॅसपाशी ठेवलंत तर बाकी पदार्थ शिजत असताना त्याची धग त्या तेलापर्यंत पोहोचत राहील. तुम्ही तेल फ्रीजमध्येही ठेवू शकता. ते घट्ट झालं तरी नंतर तुम्ही ते पुन्हा वापरू शकता.

५. लाईटपासून दूर ठेवा –

केवळ अन्न शिजवल्यामुळेच तेल खराब होतं असं नाही. तुम्ही तेल कुठे ठेवताय यावरही तेल चांगलं राहील की खराब होईल हे अवलंबून असतं.

तुम्हाला जर तेल अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यायोग्य अवस्थेत राहू द्यायचं असेल तर ते धगीपासून, लाईटपासून आणि ओलसर जागांपासून कटाक्षाने दूर ठेवा. लाईट आणि धगीजवळ तेल ठेवलंत तर ते खराब होईल आणि तुम्हाला त्याचा पुनर्वापर न करता येण्याची शक्यता वाढत जाईल.

त्यामुळे, यापुढे जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ तळाल, तेव्हा कंटाळा करून ते तेल तसंच पुन्हा वापरू नका. तेल स्वच्छ करून का वापरायचं यामागचं गांभीर्य आणि कारणं वेळीच लक्षात घ्या.

तुम्हाला फार काही करायचं नाहीये. अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत वापरलेलं तेल साफ होऊन पुनर्वापर करण्यासाठी  तयार असेल. तेव्हा हे   सोपे आणि स्वस्त उपाय नक्की ट्राय करून बघा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version