Site icon InMarathi

गोंधळात गोंधळ; एका अस्वलामुळे अमेरिका टाकणार होती रशियावर अणुबॉम्ब

bear final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संहार म्हणजे काय याचा प्रत्यय  खऱ्या अर्थाने जगाला आला तो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या विकासाने माणसाचं आयुष्य आधीपेक्षा सुसह्य झालं हे खरं पण हीच गोष्ट आजच्या घडीला संपूर्ण मानवजातच नष्ट करण्याची भीतीही माणसात निर्माण करू शकतेय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

माणसाने अणुबॉम्बचा शोध लावला आणि हाच अणुबॉम्ब अगणित माणसांच्या विध्वंसाला कारणीभूत ठरला. राष्ट्राराष्ट्रांमधले राजकीय, आर्थिक तेढ, जीवघेणी चढाओढ आणि सामान्य माणसांच्या आकलनापलीकडे असणारे इतर हेतू अशी अनेक कारणं युद्ध होण्यामागे असतील. मात्र यात काहीच चूक नसलेल्या असंख्य माणसांचा यात नाहक बळी जातो आणि अपिरिमित नुकसान झालेल्या राष्ट्रांतल्या जनतेला पुढची कैक वर्षं एका भयंकर वास्तवाशी सतत दोन हात करत जगावं लागतं.

 

 

युक्रेन-रशियामधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरात सध्या भयाचं वातावरण आहे. जगातल्या सगळ्या देशांकडे अण्वस्त्रांचा साठा नाही. मात्र काही बलाढ्य राष्ट्रांकडे तो आहे आणि ती अण्वस्त्रं वापरण्याचे अधिकारही! गरज पडली तर आपण अण्वस्त्रं तयार ठेवली आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटल्यामुळे तिसरं महायुद्ध होणार की काय अशी भीतीदायक शक्यता सगळीकडून वर्तवली जातेय.

शीतयुद्धाच्या वेळीही तिसरं महायुद्ध होता होता टळलंय हे आपल्याला माहीत नसेल. हे व्हायला केवळ एक प्राणी कारणीभूत ठरला असता. एका अस्वलामुळे अमेरिका रशियावर अणुबॉम्ब टाकणार होती. नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊ.

 

interaztv.com

१९६२ साली २५ ऑक्टोबरला अमेरिका ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’मध्ये अडकलेली होती. क्युबाच्या बेटावर सोव्हिएत संघाने अमेरिकेच्या मुख्य भूभागांना रशियाला टार्गेट करता यावं यादृष्टीने आण्विक प्रक्षेपण साईट्स बांधायला सुरुवात केली होती. सोव्हिएतकडून हल्ला होईल याविषयी ही धोक्याची घंटादेखील होती.

अमेरिकेचं सरकार यामुळे संतप्त झालं आणि त्यांनी हे मिसाईल्स काढून टाकण्याची १३ दिवस मागणी केली. अमेरिकेचा पूर्वेतिहास पाहता त्यांच्या सरकारची ही प्रतिक्रिया थोडी विचित्र होती कारण, १९६१ पासून तुर्कीमधली क्षेपणास्त्रं सोविएत्सविरुद्ध वापरण्याचा रशियासारखाच डावपेच अमेरिकाही खेळली होती. नौदल क्युबाची नाकेबंदी करत होतं आणि सोव्हिएत जहाजं नाकेबंदी करण्यासाठी पुढे सरसावली होती. फार तणावाचं वातावरण होतं.

 

 

हे सगळं सुरू असताना अमेरिकेचं लष्कर DEFCON 3 ला होतं. याचाच अर्थ, हवाई दल अवघ्या १५ मिनिटांत तैनात व्हायला सज्ज होतं. स्ट्रॅटेजिक एअर कमांड आणि बहुसंख्य आण्विक शस्त्रागार DEFCON 2 ला म्हणजेच अणुयुद्ध होण्याच्या केवळ एक पायरी खाली होते.

२५ ऑक्टोबर, १९६२ च्या मध्यरात्री मिनेसोटामधील टुलूथ सेक्टर डायरेक्शन सेंटरच्या एका सुरक्षारक्षकाला एका सावलीची आकृती केंद्राच्या कुंपणावरून चढताना दिसली. सोव्हिएत संघ आणि क्युबाने एकत्र मिळून हवाई दलाच्या मालमत्तेवर क्षेपणास्त्रं हल्ला केला की काय असं सुरक्षा रक्षकाला वाटलं आणि ती आकृती दिसली त्या दिशेने त्याने गोळी झाडली. काहीतरी धोकादायक घडू शकतं असा संकेत तत्क्षणी सर्वत्र वर्तवण्यात आला आणि हा संकेत मिळाल्यावर त्या भागातल्या सगळ्या विमानतळांवर अलार्म वाजू लागला.

यावेळी अशी एक भलतीच गोष्ट घडली त्यामुळे अनर्थ घडू शकला असता. नेमकं त्याच वेळी तिथून नजीकच असलेल्या विस्कॉन्सिन येथील वोल्क फिल्ड एअरबेस विमानतळावर कोणीतरी हलगर्जीपणा करून चुकीचं बटण दाबलं आणि वैमानिकांना जी सूचना मिळायला हवी होती त्याऐवजी चुकीचीच सूचना मिळाली. खरंतर त्यांना सुरक्षेशी निगडीत प्रमाणित संकेत मिळणं अपेक्षित होतं. पण तसं न होता ‘युद्धासाठी सज्ज व्हा’ हे सुचवणारा आपत्कालीन सायरन त्यांच्या कानांवर पडला.

 

 

अमेरीकेला सोव्हिएतबरोबर युद्ध करावं लागलं असतं तर जो अलार्म वाजवला गेला असता तो अलार्म आता वाजवला गेला होता. एकमेकांशी झटापट करत जितक्या लवकर शक्य होईल तितक्या चपळाईने हे वैमानिक आपल्या विमानांमध्ये गेले आणि ‘तिसऱ्या महायुद्धासाठी’ आपली अण्वस्त्र घेऊन सज्ज झाले.

यात सगळ्यात महत्त्वाचा भाग हा होता की सुरक्षारक्षकाला दिसलेली ही आकृती माणसाची नसून एका मोठ्या काळ्या अस्वलाची होती. ही आकृती कोणाची हे ओळखण्यात सुरक्षारक्षकाचा पुरता गोंधळ झाला होता. विमानतळावरील एका अधिकाऱ्याला सुदैवाने  हा सगळा प्रकार लक्षात आला. वोल्क फिल्डमधलं पथक अजूनही या सगळ्या वस्तुस्थितीविषयी अनभिज्ञच होतं.

खरंच तिसरं महायुद्ध सुरू झालंय, ही आपली नेहमीच्या सरावाची कवायत नाही असा गैरसमज पथकातल्या सैनिकांच्या मनात निर्माण झाला होता. ज्या अधिकाऱ्याच्या हे लक्षात आलं होतं त्या अधिकाऱ्याने मात्र प्रसंगावधान राखत विमानं जिथून उड्डाण करतात त्या फ्लाईट लाईनवरूनच एक ट्र्क जितक्या वेगाने नेता येईल तितक्या वेगाने नेला आणि उड्डाणासाठी सज्ज असलेली, इंजिनही सुरू केलेली विमानं मोठ्या चतुराईने थांबवली. या अधिकाऱ्याच्या कृपेने एक प्रचंड मोठा विध्वंस घडायचा टळला.

 

 

ते सगळे दिवस अतिशय भयानक होते. जो तो डोळ्यात तेल घालून सतत दक्ष असायचा. हे घडायच्या अवघ्या ११ दिवसांपूर्वीच सोव्हिएत संघ अमेरिकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. हेरगिरी करणाऱ्या एका विमानाने केलेली एक गोष्ट याला कारण ठरली. क्युबात लपवून ठेवलेल्या ट्रकचे, क्षेपणास्त्रांचे, लॉन्चिंग उपकरणांचे फोटो या विमानाने काढले होते. एखाद्या गोळीचा जरी हल्ला या देशांपैकी एकाने दुसऱ्यावर केला असता तरी केवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली असती याची कल्पना त्यावेळी जगाला होता.

युद्ध जरी दोन राष्ट्रांमध्ये घडायचं असलं तरी त्या परिस्थितीचे पडसाद अख्ख्या जगावर उमटत असतात. आपण अर्थातच त्या काळच्या जगाचे साक्षीदार नव्हतो. पण सध्या युक्रेन- रशियामधली युद्धजन्य परिस्थिती आणि तिचे जगावर आधीच झालेले आणि अजूनही होत असलेले परिणाम आपण पाहतो आहोत.

 

 

माणसाची दृष्टीही कधीकधी कसा धोका देते आणि एखादी साधारण वाटणारी चूक युद्धसदृश्य परिस्थितीत किती मोठी ठरू शकते, वरकरणी लहान वाटणाऱ्या अशा चुकीमुळे किती भीतीदायक शक्यता निर्माण होऊ शकतात याचा प्रत्यय आपल्याला वरच्या प्रसंगातून नक्कीच येतो. त्या अधिकाऱ्याला वेळीच भान आलं हे जगाचं सुदैवच म्हणायला हवं. अण्वस्त्रांच्या बाबतीत त्या काळाच्या तुलनेत जगाची आता आणखी पुष्कळ प्रगती झाली आहे. आताची परिस्थितीही  ताणली न जाता लवकरात लवकर निवळू दे हीच प्रार्थना.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version