Site icon InMarathi

‘MeToo’ चे आरोप ते मोहम्मद नावावरून धमक्या; वादग्रस्त विवेक अग्निहोत्रींचा प्रवास

vivek agnihotri im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘गंगुबाई काठियावाडी’, ‘झुंड’ यांसारखे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असताना तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक चर्चा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची होतेय.

काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय हा या चित्रपटाचा विषय आहे. बऱ्याच अडचणींना सामोरं गेल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. केवळ ७०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झालेला असूनही प्रेक्षकांच्या विलक्षण प्रतिसादामुळे या चित्रपटाची कमाई रोज नवेनवे उच्चांक गाठतेय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एकीकडे या चित्रपटावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मात्र बॉलिवूडच्या बाकी चित्रपटांचं जसं दणक्यात प्रमोशन केलं जातं तसं या चित्रपटाचं प्रमोशन झालं नाही. बॉलिवूडमधली कुठलीही बडी स्टारमंडळी नसूनही उत्तम अभिनेते-अभिनेत्रींची भट्टी या चित्रपटात चांगलीच जमून आल्याचं दिसतंय.

 

 

या निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आलंय. विवेक अग्निहोत्री यांना इथवर पोहोचेपर्यंत करावा लागलेला संघर्ष आणि आजवर ते ज्या ज्या कारणांसाठी वादग्रस्त ठरले ते वाद यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

या चित्रपटाच्या कथेमुळे या चित्रपटावर बंदी आणली जावी म्हणून लोकांनी मुंबई हायकोर्टाकडे याचिका दाखल केली होती पण कोर्टाकडून ही याचिका फेटाळून लावण्यात आली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काश्मीरमध्ये निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला होता, पण या सगळ्या विघ्नांवर मात करत अखेरीस ११ मार्चला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

विवेक रंजन अग्निहोत्री हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, लेखक आणि कार्यकर्ते आहेत हे तर आपल्याला माहीत झालंय. पण ते किती हालाखीच्या परिस्थितीतून वर आलेत याची आपल्याला कल्पना नाही.

बालपण :

विवेक अग्निहोत्री यांनी मंगळवारी आपल्या फेसबुक पेजवर एका वर्तमानपत्रात आलेली एक बातमी शेअर केली, ज्यात त्यांचं बालपण जिथे गेलं त्या घराचा फोटो होता. फोटोत आपल्याला केवळ छप्पर असलेलं, पण दारं नसलेलं घर दिसतं.

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधील धन्यौरा या गावात हे घर होतं. ही बातमी शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, “हे आमचं वडिलोपार्जित घर आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो. आमच्याकडे काहीच नव्हतं. आमच्या घराला तर दरवाजेही नव्हते, पण माझ्या आजोबांनी आमच्याकडून देवी सरस्वतीची पूजा करून घेतली. माझे वडील कुलपती झाले आणि कालिदासाच्या सगळ्या कवितांचा आणि वेदांचा त्यांनी अनुवाद केला. देवी सरस्वतीच्या कृपेमुळेच मी ‘द काश्मीर फाईल’ बनवू शकलो.”

 

 

पुढे त्यांनी लिहिलंय, “हा तोच #NewIndia आहे ज्याचं मी स्वप्न पाहिलं होतं, जिथे वंचित भारतीय सशक्त आहेत आणि माझ्या जीवनकाळात मी हे होताना बघू शकतोय याचा मला आनंद आहे. जेव्हा आपल्याकडे दूरदर्शी आणि वचनाला जागणारं नेतृत्त्व असतं तेव्हा सगळ्यात वंचित असलेल्यांनाही सामर्थ्यवान बनवलं जातं.”

धन्यौरा या गावातल्या घरात त्यांच्या वडिलांचा जन्म झाला होता. मात्र, नंतर हे घर विकून ते मुंबईला राहायला गेले. एका वृत्तानुसार, विवेक अग्निहोत्री यांचा जन्म या घरात झाला नाही, मात्र आपल्या बालपणी ते आपल्या वडिलांसोबत धन्यौरा आणि तिथल्या काही गल्ल्यांमध्ये खेळले होते.

विवेक अग्निहोत्री यांचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला होता. मात्र त्यांनी आपलं मूळ निवासस्थान शाहजहांपुरच्या तिलहरमधील धन्यौरा या गावी होतं अशी माहिती इतक्यातच एका ट्विटमधून दिली होती.

करियरचा प्रवास :

 

 

विवेक अग्निहोत्री यांना बॉलिवूडमध्ये आपलं स्थान सहजासहजी निर्माण करता आलं नाही. त्यामागे एक अतिशय खडतर प्रवास आहे. एका जाहिरात एजन्सीमधून त्यांनी आपल्या करियरची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.

२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘चॉकलेट’ या क्राईम-थ्रिलर चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मात्र त्यातले कुठलेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत.

२०१९ साली त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद’ या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

लग्न :

 

 

विवेक अग्निहोत्री यांचं लग्न मराठीतील लोकप्रिय सूत्रसंचालिका आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्याशी १९९७ साली झालं. पल्लवी जोशी यांनी कुणाशी लग्न केलंय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असेल तर आता त्यांना उत्तर मिळेल.

पल्लवी जोशी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले आहेत. पण त्या ‘सारेगमप’ या रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालिका म्हणून खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचल्या. या दांपत्याला २ मुलं आहेत.

विवेक अग्निहोत्री आणि वाद :

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत येण्यापूर्वी विवेक अग्निहोत्री काही वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

१. ‘मी टू ‘ चळवळ – मिस इंडिया आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने या वर्षाच्या सुरुवातीला विवेक अग्निहोत्री यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

‘चॉकलेट’च्या शूटिंगदरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी तिला कपडे काढून डान्स करायला सांगितलं होतं असं तिने म्हटलंय. मात्र विवेक यांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले असून हे खोटं असल्याचं सांगत त्यांनी अभिनेत्रीवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

 

 

२. ‘मोहम्मद’ शब्दावरून धमकी – २०१८ साली विवेक यांनी दावा केला होता की त्यांच्या ‘मोहम्मद और उर्वशी’ या शॉर्टफिल्ममध्ये ‘मोहम्मद’ हा शब्द वापरल्याबद्दल त्यांना धमक्या मिळाल्या होत्या.

३. ‘ते’ वादग्रस्त ट्विट – ‘नन रेप’ प्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्कर विरोधात ट्विट केल्यामुळे विवेक अग्निहोत्री वादात सापडले होते. दोघांमध्ये ट्विटरवर बराच काळ वाद जुंपल्यानंतर ट्विटरने विवेक अग्निहोत्री यांचं ट्विटर अकाउंट डिलीट केलं.

‘द काश्मीर फाईल’ या चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी निश्चितच एका महत्त्वाच्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या विषयाला वाचा फोडली आहे. या चित्रपटाचं कास्टिंग त्यांनी कसं केलं असेल असा विचार राहून राहून मनात येतो.

पल्लवी जोशींसकट चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी हे मराठी कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत ही बाब मराठी रसिक प्रेक्षकांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती हे दिग्गज आणि चित्रपटातल्या इतरही कलाकारांच्या अभिनयाचं सध्या खूप कौतुक होतंय.

 

 

चित्रपट हे अतिशय प्रभावी माध्यम असल्यामुळे आजवर वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी अनेक गंभीर विषय पडद्यावर दाखवले आहेत. आपल्याला न शिकवला गेलेला, माहीत नसलेला इतिहास अशाच चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने पुढे येत राहो आणि लोकांच्या उदंड प्रेमाबरोबरीनेच मीडियाकडूनही अशा कलाकृतींना पाठिंबा मिळो, आता नाही तर निदान भविष्यात तरी!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version