Site icon InMarathi

तब्बल ३ जन्माच्या आठवणी उराशी बाळगून जगणाऱ्या स्वर्णलता मिश्रा यांचा अविश्वसनीय अनुभव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यातले असे फार कमी जण असतील जे ‘पुनर्जन्मा’ची शक्यता पूर्णतः अमान्य करतात. आपला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे गूढच असतं. कदाचित म्हणूनच आपल्या मनात या दोन्ही संकल्पनांविषयी प्रचंड कुतूहल असतं.

भग्वदगीतेसारख्या ग्रंथात मृत्यूसमयी आपण केवळ आपलं शरीर सोडून जातो, आपला आत्मा अमर आहे हे सांगितलेलं आहे. आपल्याकडच्या अशा धर्मग्रंथांमुळे आपला कर्मसिद्धांतावर विश्वास असतो. आपण गेल्या जन्मी केलेल्या कर्माची फळं या जन्मी भोगतो आणि या जन्मी केलेल्या कर्माची फळं पुढच्या जन्मी भोगू हे आपल्या मनावर बिंबलं गेलेलं असतं.

 

 

आपल्याला काही आपला पूर्वजन्म आठवत नाही. पण अशा काही दुर्मिळ व्यक्ती आहेत ज्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो. विज्ञानालाही बुचकळ्यात पाडणाऱ्या घटना आहेत या.

ज्या व्यक्ती आपला हा पुनर्जन्म आहे असा दावा करतात आणि पूर्वजन्माविषयी केवळ माहितीच नाही तर दाखलेही देता अशा व्यक्तींच्या जन्मरहस्यांवर सध्या बरंच संशोधन सुरू आहे.

स्वर्णलता मिश्रा यांच्या दोन पूर्वजन्मांच्या कहाण्या हे असंच एक अद्भुत उदाहरण. स्वर्णलता यांनी स्वतःहूनच आपल्या आधीच्या दोन जन्मांविषयी सांगितलं होतं. मध्य प्रदेशात १९४८ साली जन्माला आलेल्या या व्यक्तीच्या पूर्वजन्मांविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मध्यप्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यातील शाहपूर गावात जन्म झालेली स्वर्णलता ही अवघ्या साडेतीन वर्षांची मुलगी एक दिवस आपल्या वडिलांसोबत प्रवास करता असताना आपल्या गावापासून जवळपास १०० मैल अंतरावर असलेल्या कटणी या शहरात आली आणि तिने चक्क आपली गाडी ‘तिच्या’ घराकडे वळवायला सांगितली.

त्यानंतर तिला आपला पूर्वजन्म आठवला आणि आधीच्या जन्मी आपण कोण होतो, आपलं नाव काय होतं, आपण कुणासोबत राहायचो हे सगळं तिने सांगायला सुरुवात केली.

आपली मुलगी हे काय बडबडतेय असं वाटून तिचे पालक तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी ती मानसिकदृष्ट्या अगदी फिट असल्याचं सांगून तिला खरंच तिचा पूर्वजन्म आठवतोय असं सांगितलं.

आश्चर्याची गोष्ट ही की तिने तिच्या पूर्वजन्माविषयी जे जे सांगितलंय त्या सगळ्याचे खरंच पुरावे मिळाले आहेत.

 

 

आपलं पूर्वजन्मीचं नाव बिया/ विद्या पाठक होतं असं ती म्हणाली. आपल्या पूर्वजन्मी आपण कटणी या गावातल्या बंगल्यात राहायचो. तिथे तिचे आई वडील आणि चार भावंडं राहतात असं तिने आपल्या वडिलांना सांगितलं. बंगल्याला पांढरा रंग होता आणि काळे दरवाजे होते, तळमजल्यावर चार खोल्या होत्या, बंगल्याच्या चार खोल्या पक्क्या होत्या आणि बाकी बंगल्याचं बांधकाम सुरू आहे असं तिने आपल्या बंगल्याचं वर्णन केलं.

बंगल्याच्या पुढ्यात रेल्वेस्टेशन आणि कटुलिंबाचं झाड होतं आणि मागच्या बाजूला मुलींची शाळा होती असं सांगितलं. तिचे वडील जमीनदार होते आणि त्यांच्याकडे मोटार कार होती असंही तिने पुढे सांगितलं.

तिने केलेल्या खाणाखुणांवरून काही तासांत खरंच तिच्या वडिलांना तिने जसं वर्णन केलं होतं तसं घर सापडलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण १९३९ साली तिचा मृत्यू झाला होता आणि आता ते घर बरंच मोठं झालं होतं.

 

 

तिला ते त्या घरात घेऊन गेले आणि आपण सहजच आलोय असं त्यांनी तिच्या आईवडिलांना सांगितलं. पाठक यांचा परिवार एक समृद्ध व्यावसायिक परिवार होता. नंतर आपल्या मुलीने सांगितलेल्या नावाची चौकशी त्यांच्याकडे करत असताना आपल्या मुलीने जी माहिती सांगितली ती सगळी खरी असल्याचं त्यांच्यासमोर उघड झालं.

पाठक आणि मिश्रा कुटुंबीयांनी चर्चा करून या सगळ्याविषयी स्वर्णलताला पूर्णतः मौन पाळायला सांगितलं. याविषयी कुणाला काही सांगितलंस तर लोक तुला वेड्यात काढतील असं ते तिला म्हणाले. स्वर्णलतानेही घाबरून बरीच वर्ष या सगळ्याविषयी कुणाला काही सांगितलं नाही.

मात्र ३-४ वर्षांनी शिक्षण अधिकारी मिश्रा यांची छतरपुरला बदली झाल्यानंतर तिने आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला हा आपला पुनर्जन्म असून पूर्वजन्मी आपला गळ्याच्या दुखण्याच्या त्रासामुळे मृत्यू झाला होता असं सांगितलं.

जबलपुरचे डॉ. एस. सी भ्राबत यांनी तिच्यावर उपचार केले होते. स्वर्णलता १० वर्षांची असताना मध्य प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा यांच्या कानावर तिच्या पुनर्जन्माची बातमी गेली तेव्हा त्यांनी तिला बोलावलं आणि काही प्रश्न विचारून ती बोलतेय ते बरोबर आहे हा हे पडताळून पाहिलं.

त्यानंतर त्यांनी राजस्थानमधले प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि राजस्थान विद्यापीठात ‘पॅरासायकॉलॉजी’चे हेड असलेले प्रोफेसर एच. एन. बॅनर्जी यांना या सगळ्यात अधिक खोलवर लक्ष घालायला सांगितलं.

प्रोफेसर बॅनर्जी स्वर्णलताशी आणि तिच्या वडिलांशी बोलले आणि तिच्या पूर्वजन्मीच्या पतीला आणि वडिलांना भेटले. त्यानंतर आणखी बरीच माहिती त्यांच्या समोर आली आणि सगळ्याचा उलगडा झाला.

१९३९ साली गळ्याला गाठ आल्यामुळे वयाच्या ३९ व्या वर्षी विद्या/ बिया पाठकचा मृत्यू झाला. तिला त्या जन्मी पती, दोन मुलं आणि ४ भावंडं होती. स्वर्णलता ११ वर्षाची असताना तिला न सांगताच तिच्या पूर्वजन्मीचे पती चिंतामण पांडे, तिचा मुलगा आणि मोठा भाऊ तिला भेटायला गेले. तिने पटकन आपल्या पूर्वजन्मीच्या भावाला ‘बॉब’ या टोपणनावाने हाक मारली आणि आपल्या पूर्वजन्मीच्या नवऱ्याच्या समोर आल्यावर ती चक्क लाजली.

आपले पूर्वजन्मीचे पती तहसीलदार होते असं तिने सांगितलं. ११ व्या वर्षी तिला तिच्या पूर्वजन्मीच्या माहेरी आणि सासरी नेण्यात आलं. तिथे बरीच अनोळखी माणसंही मुद्दाम थांबवली होती. त्यातून एकेक करत तिने बरोबर आपल्या सगळ्या नातेवाईकांची ओळख पटवून दिली. ज्या खोलीत बियाचा मृत्यू झाला होता ती खोलीही तिने ओळखली.

या सगळ्यावर कळस म्हणजे स्वर्णलता ६ वर्षांची असताना एक दिवस ती आसामी गाणी गाऊ लागली तेव्हा तिने १९३९  बिया पाठक म्हणून मृत्यू झाल्यानंतर आसाममधील सिल्ह्टमध्ये (जे आता बांग्लादेशात आहे) १९४० साली आपला पुनर्जन्म झाला असल्याचं सांगितलं.

 

 

या जन्मी ती गोस्वामी कुटुंबात जन्माला आली होती आणि या जन्मातलं तिचं नाव कमलेश होतं. पण वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी १९४७ साली तिचा सिल्ह्टमध्ये रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाला आणि त्यानंतर १९४८ साली ती स्वर्णलता म्हणून जन्माला आली असं तिने सांगितलं. याचा अर्थ या जन्माआधीच्या दोन जन्मांविषयी तिला सगळं काही आठवलं.

स्वर्णलता बरीच वर्षं कटणी मधल्या पाठक कुटुंबियांना भेटायच्या. त्या सगळ्यांनी स्वर्णलता म्हणजे बियाचाच पुनर्जन्म आहेत असं मानलं. त्यांचे पाठक कुटुंबातले भाऊ आणि त्या रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करायच्या. स्वर्णलता एकदा रक्षाबंधनाला येऊ शकल्या नाहीत म्हणून त्यांचे पाठक कुटुंबातले भाऊ त्यांच्यावर नाराज झाले होते कारण मिश्रा कुटुंबियांपेक्षा आपला त्यांच्यावर जास्त हक्क आहे असं त्यांना वाटायचं.

स्वर्णलताच्या वडिलांनीही हे सगळं सत्य मान्य केलं आणि बियाच या जन्मी त्यांची मुलगी आहे हे स्वीकारलं. जेव्हा त्यांच्या लग्नाचं बघायचं ठरलं तेव्हा पाठक कुटुंबातल्या त्यांच्या भावांनाच त्यांनी यात पुढाकार घ्यायला सांगितला.

स्वर्णलता यांनी बॉटनी मध्ये उच्चशिक्षण घेतलं. पाठक कुटुंबियांच्या संमतीने स्वर्णलता यांचं लग्न झालं. लग्नानंतरचं त्यांचं नाव स्वर्णलता तिवारी. डॉ. स्वर्णलता तिवारी या भोपाळमधील ‘नवीन कॉलेज’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘गव्हर्मेंट आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज’च्या प्रिन्सिपल होत्या.

 

 

त्यांचे पती डॉ. तिवारी हे आयएएस ऑफिसर आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. स्वर्णलता आपल्या या जन्मीच्या कुटुंबियांसोबत आनंदाने आयुष्य जगत असताना कटणी मधल्या आपल्या पूर्वजन्मीच्या नातेवाईकांशीही त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत.

तब्बल तीन जन्मांच्या आठवणी मनात ठेवून जगणाऱ्या स्वर्णलता यांचं आयुष्य चित्रपटाच्या कथानकालाही मागे टाकेल इतकं नाट्यमय आणि तरीदेखील अगदी खरं आहे. स्वर्णलता यांना लहानपणी या सगळ्याचा त्रास झाला असेल का? त्या आणि त्यांचे कुटुंबीय कुठल्या कुठल्या मानसिक अवस्थांमधून गेले असतील?

असे सगळे प्रश्न त्यांच्या पूर्वजन्मांविषयी जाणून घेतल्यावर पडतात. आपल्याला आपले मागचे जन्म आठवत नाहीत म्हणून वाईट वाटून घ्यावं की यासाठी ईश्वराचे आभारच मानावेत हे कळत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version