Site icon InMarathi

इंग्लिशमधील Z अक्षराची युक्रेन युद्धात एवढी दहशत का आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या गोष्टीचं मूळ स्वरूप अगदी लहानखुरं असेल, पण ती गोष्ट जेव्हा विचारपूर्वक एखाद्या विशिष्ट संदर्भासाठी वापरली जाते तेव्हा त्या बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीलाही अचानक वजन प्राप्त होतं. बुद्धिबळात नुसत्या प्याद्याला फारसं महत्त्व नसतं, पण तेच प्यादं विरोधी स्पर्धकाकढून मारलं न जाता जेव्हा शेवटपर्यंत पोहोचतं तेव्हा त्याचं महत्त्व वेगळंच असतं.

कुठलंही एखादं मुळाक्षर आपण सुटं पाहिलं तर वरकरणी ते आपल्याला बिनमहत्त्वाचं वाटतं, पण या एका छोट्याश्या मुळक्षरातून अनेक शब्द तयार होतात, अमर्याद अर्थांच्या शक्यता निर्माण होतात. राजकीय अर्थाने या मुळाक्षरांचा वापर केला जातो तेव्हा ते वापरणाऱ्यांना त्यातून एक खूप मोठा अर्थ सूचित करायचा असतो. अशा वेळी ते केवळ एक मुळाक्षर न राहता एक महत्त्वाचं चिन्ह होऊन जातं.

इंग्रजीतील ‘z’ या अक्षराची एका वेगळ्याच कारणाकरता सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून जगभरात भीतीचं सावट परसरलंय. युक्रेनमध्ये सध्या असलेल्या भयाच्या तीव्रतेची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही.

 

 

 

युक्रेनच्या सीमेवर तैनात करण्यात आलेल्या रशियन रणगाड्यांचे फोटो जेव्हा समोर आले तेव्हा त्यावर ‘z’ हे अक्षर असल्याचं पहिल्यांदा निदर्शनास आलं. ‘z’ हे अक्षर युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचं समर्थन करणाऱ्यांसाठी ‘सिम्बॉल ऑफ वॉर’ ठरल्याचं समजतंय. युक्रेन युद्धात या अक्षराची एवढी दहशत का आहे?

रशियन सिरिलिक मुळाक्षरांमध्ये ‘z’ हे चिन्ह वापरलं जात नाही. ‘झेड’ या उच्चारासाठी त्याऐवजी З हे चिन्ह वापरलं जातं. पुतीन यांनी हल्ला केल्यापासून १५ दिवसांतच ‘z’ हे चिन्ह सगळीकडे पोहोचलं.

पुतीन यांचे समर्थक, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला पाठिंबा ठेणारे लोक, राजकारणी लोक या चिन्हाचा वापर करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. सर्बियातही रशियाचं समर्थन करणाऱ्या एका रॅलीत हे अक्षर दिसलं होतं. रशियन रणगाड्यांवरील आणि शस्त्रास्त्रांवरील या अक्षराचा अर्थ काय असावा याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

 

 

२२/०२/२०२२ ला रशियाने युक्रेनच्या दॉन्येस्क आणि लुहांस्कय प्रांतांचा सार्वभौमत्वाचा दावा मान्य केला आणि त्यांच्याशी मैत्री, सहकार्य आणि मदतीचा करार केला होता. ‘z’ म्हणजे 2 हा आकडा असून हे अक्षर या तारखेचं प्रतीक असावं असा अंदाज आधी बांधण्यात आला होता, पण रशियाच्या फौजा आपल्या सैनिकांना ओळखण्यासाठी आता या चिन्हाचा वापर करत असल्याचं समजतंय.

रशियाच्या सरकारी माध्यमातील चॅनेल -१ वर प्रेक्षकांना दाखवण्यात आलेल्या बातम्यांनुसार आणि पुतीन यांचं समर्थन करणाऱ्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माच्या पाठिराख्यांच्या ‘झारग्रँड’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रशियन सैन्याला एकमेकांची ओळख पटायला मदत व्हावी आणि आपल्याच रणगाड्यांवर रशियन लष्कराने हल्ला करणं टाळावं यासाठी ‘z’ या अक्षराचं चिन्ह काढलं गेलं आहे.

रशियातील विशेष सैन्यदलातले माजी अधिकारी सर्गेई कुव्हकीन यांनी रशियातील लाईफ मासिकाच्या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार सैन्यातील वेगवेगळ्या दलांची ओळख व्हावी म्हणून अशी चिन्ह वापरली जातात.

ते म्हणतात, “चौरसातलं Z अक्षर, वर्तुळातला Z, फक्त नुसताच Z आणि चांदणीतला Z अशी वेगवेगळी अक्षरं वापरली जात आहेत. जे सैनिक थेट संपर्कात नाहीत, त्यांचा ठावठिकाणा नेमका काय आहे, हे ओळखता यावं, यासाठीही अशी अक्षरं वापरली जात आहेत.”

रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट (RUSI) मध्ये रशिया आणि युरेशियावर संशोधन करणाऱ्या एमिली फेरीस सांगतात की, Z हे चिन्ह लगेच ओळखता येणारं आणि प्रभावशाली आहे. त्या म्हणतात, “अनेकदा प्रोपोगँडा (प्रचार) करणाऱ्यांमध्ये अशा साध्या चिन्हांची लोकप्रियता वेगानं वाढते. हे थोडं घाबरवणारं आणि विरोधाभासी आहे. पण सौंदर्यशास्त्राचा किंवा चिन्ह म्हणून विचार केला, तर हे एक प्रभावी चिन्ह आहे.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

“रशियात या चिन्हाचा प्रसार केवळ सोशल मीडियामुळे आणि उत्फुर्तपणे झालेला नाही तर रशियन सरकारनेही या चिन्हाचा प्रसार केला आहे.”, असं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये स्लाव्होनिक आणि पूर्व युरोपियन देशांविषयीच्या तज्ज्ञ असलेल्या अगाल्या स्नेतकोव्ह सांगतात.

पुढे त्या म्हणतात, “पण हे चिन्ह फॅसिस्ट चिन्ह आहे असा अर्थ काढू नये. अनेक मिम्समध्ये या झेड चिन्हाची तुलना नाझी स्वस्तिकाशी होते आहे, पण प्रामुख्याने पुतीन यांच्या विरोधातले लोकच हे करत आहेत.”

 

 

यासंदर्भात जे फोटो समोर आलेत त्यावर सोशल मीडिया युजर्सने कमेंट्स केल्या आहेत. “दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या हातून उध्वस्त झालेल्या देशासाठी आता रशियाची त्याच मार्गावर जाताना दिसत आहेत. त्यांच्या शर्टवरील ‘z’ कडे पाहा….. ही फक्त वाहनावरील ओळख नाही, हे नवं स्वस्तिक आहे. युरोपने आता जागं व्हावं !!”, असं एका युजरने म्हटलंय.

Z या अक्षराप्रमाणेच V हे अक्षरसुद्धा चर्चेत आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर Z आणि V अक्षरांचे ग्राफिक्सही पोस्ट केले आहेत. त्याखाली ‘Za PatsanoV’ (आपल्या मुलांसाठी), ‘Sila V pravde’ (सत्यात ताकद आहे) अशी टिप्पणीही केली गेली आहे.

रशियाच्या सिरिलिक मुळाक्षरांमध्ये Z प्रमाणेच V हे अक्षरही नाही. मात्र Z आणि V या अक्षरांसंदर्भात वेगवेगळे सिद्धांत समोर आले आहेत. V हे अक्षर Vostok म्हणजे पूर्व तर Z हे अक्षर Zapad म्हणजे पश्चिम किंवा Za pobedy म्हणजेच विजयासाठी या अर्थाने वापरलं जात असावं असं एक सिद्धांत सांगतो.

 

 

युक्रेनियन सैन्याच्या मते, Z हे रशियाच्या पूर्वेकडील फौजांचं चिन्ह आहे, तर V हे त्यांच्या नौदलाचं चिन्ह आहे अशीही चर्चा सोशल मीडियावर होतेय. Z या अक्षराचा अर्थ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की आणि V या अक्षराचा अर्थ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आहे असाही एका सिद्धांताचा दावा आहे.

सद्यस्थितीत युक्रेन-रशिया या दोन्ही राष्ट्रांपासून खूप लांब असलेल्या आपल्याकडे केवळ रोज समोर येणाऱ्या अशा नव्यानव्या माहित्यांवर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. पण एका साध्या मूळाक्षराचं चिन्ह झालं की केवढी उलथापालथ घडू शकते, एका सबंध राष्ट्राला घाबरवून टाकण्याची ताकद त्याच्यात येऊ शकते हे आपल्याला ही सगळी परिस्थिती पाहता नक्कीच लक्षात येतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version