' ह्या देशांमध्ये ट्रिपल तलाकवर आहे बंदी, यात आपले शेजारी देखील आहेत बरं का! – InMarathi

ह्या देशांमध्ये ट्रिपल तलाकवर आहे बंदी, यात आपले शेजारी देखील आहेत बरं का!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तलाक हा शब्द एका अरबी आयतामधून तयार झाला आहे ज्याचा अर्थ “बंधनातून मुक्त होणे” असा होतो. जो विवाहातून मुक्त होणे याच्याशी निगडीत आहे. तर इस्लाम धर्मामध्ये पतीने आपल्या पत्नीसमोर केवळ तीनदा तलाक हा शब्द उच्चारला की असे समजले जाते की दोघांमधील पती-पत्नीचे नाते संपुष्टात आले असून पतीने पत्नीला आपल्या नात्याच्या बंधनातून मुक्त केले. ही प्रथा वरकरणी जरी साधी वाटत असली तरी ती मुळात किती अन्यायकारक आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

हे देखील वाचा : ट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला

सध्या ट्रिपल तलाकचा मुद्दा ऐरणीवर आहे. स्वत: मुस्लीम समाजातील महिला पुढे येऊन ही पद्धत बंद करण्याची मागणी करत आहे, पण अर्थातच धर्माशी निगडीत असल्याने त्याने धार्मिक आणि हळूहळू राजकीय रंग देखील मिळाला आहे. आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. भारतात सध्या ट्रिपल तलाकवर कायद्याने बंदी घालावी अशी मागणी होत आहे आणि त्याच मुद्द्याशी निगडीत हा लेख आहे. येथे आम्ही तुम्हाला जगातील अश्या काही देशांविषयी सांगणार आहोत, जेथे कायद्याने ट्रिपल तलाकवर बंदी आहे.

 

triple-talaq-marathipizza01
jagranjosh.com

 

१. पाकिस्तान

१९५६ मध्ये विवाह आणी कुटुंब कायद्यासाठी पाकिस्तान सरकारने स्थापीत केलेल्या ७ सदस्यीय आयोगाच्या शिफारसीनुसार ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्यात आला. आणि इजिप्त देशाप्रमाणे विवाह आणि तलाकवर नवीन कायदा तयार करण्यात आला. ज्या नुसार तलाक पद्धतीवर प्रतिबंध घालण्यात आला.

 

२. इजिप्त

 

कुराणानुसार तलाकच्या पद्धतीमध्ये  सुधारणा करणारा इजिप्त हा पहिला देश होता. या सुधारणा १९२९ मध्ये करण्यात आल्या होत्या.

 

३. ट्युनिशिया

 

ट्युनिशियाच्या पर्सनल स्टेटस कोड १९५६ च्या कायद्या नुसार, लग्न नामक प्रथा राज्य आणि न्यायपालिकेच्या क्षेत्रात येते, त्यामुळे पती केवळ तोंडाने तलाक शब्द उच्चारून आपल्या पत्नीशी फारकत घेऊ शकत नाही, मुळात त्याला तसा अधिकारच नाही.

 

triple-talaq-marathipizza02
dnaindia.com

४. श्रीलंका

 

श्रीलंका हा मुस्लीमबहुल देश नाही, परंतु काही इस्लामिक विद्वान श्रीलंकेच्या लग्न आणि तलाक (मुस्लिम) अधिनियम,१९५१ च्या कायद्याला ट्रिपल तलाक वरील जगातील सर्वात आदर्श कायदा मानतात. या अधिनियमात अशी तरतूद केली आहे की, नवऱ्याला जर आपल्या बायकोपासून तलाक पाहिजे असल्यास तर त्याने आपली इच्छा काझीकडे (मुस्लिम न्यायाधीश) व्यक्त करावी. त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये बायकोच्या नातेवाईकांना आणि घरातील वयोवृद्ध आणि जवळच्या सल्लागार व्यक्तीला सहभागी करून घ्यावे, हे यासाठी जेणेकरून सर्वजण मिळून यावर पुन्हा एकदा चर्चा करतील आणि त्यातून कदाचित पती पत्नीमधील भांडण मिटले जाईल.

 

५. बांग्लादेश

 

बांग्लादेश मध्ये तलाक घेण्याची प्रक्रिया खूप सोप्पी आहे. ज्या जोडप्यांना तलाक घ्यायचा आहे त्यांना फक्त तीन चरणांच्या प्रक्रियांमधून जावे लागते.

१. लिखित स्वरुपात सूचना देणे.

२. मध्यस्थी बोर्डासमोर आपले म्हणणे मांडणे, त्यांच्या प्रश्नांची योग्य आणि पटणारी उत्तरे देणे.

३. ९० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर निकाह नोंदणी आयोगाकडून (काझी) नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र घेऊन जाणे.

 

triple-talaq-marathipizza03
economictimes.indiatimes.com

 

६. तुर्की

 

तुर्कीमध्ये तलाकची प्रक्रिया तेव्हाच सुरु होऊ शकते जेव्हा विवाहाची नोंदणी वाइटल स्टॅटीस्टिक कार्यालयात केलेली असेल. नोंदणी केलेली असल्यास तलाकची संपूर्ण प्रक्रिया नागरिक न्यायालयात होते.

 

७. इंडोनेशिया

या देशात प्रत्येक तलाक न्यायालयाच्या निर्णयानेच होऊ शकतो. नवरा- बायको यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीला तलाक मानले जात नाही, फक्त नायालयाचा निर्णयच जोडप्यांमध्ये तलाक करवून आणू शकतो. हा नियम इंडोनेशियाच्या १९७४ च्या विवाह कायद्यामधील कायदा क्रमाक १ मध्ये समाविष्ट आहे. तसेच हा नियम इंडोनेशियन सरकारच्या १९७५ चा नियम क्रमांक ९ द्वारे सुद्धा लागू आहे.

 

triple-talaq-marathipizza04
abplive.in

असे आहेत प्रत्येक देशाचे ट्रिपल तलाकविषयी निरनिराळे कायदे!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?