भारतातील ‘या’ कंपन्यांमधील महिलांना मासिक पाळीदरम्यान मिळते हक्काची सुट्टी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘मासिक पाळी’ या विषयावर अजूनही आपल्याकडे उघडपणे चर्चा होत नाही. ‘पॅडमन’ चित्रपटातून हा विषय उत्तमरीत्या हाताळला गेला आणि सॅनिटरी पॅड्स वापरण्याचं महत्त्व गावातल्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कसं लक्षात यायला हवं हे दाखवलं गेलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘स्वच्छता राखणे’ हा झाला एक भाग. पण मासिक पाळीच्या दिवसांमध्ये, विशेषतः पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी स्त्रियांना प्रचंड वेदना होतात. पूर्वीसारखं आता मुलींना, बायकांना पाळी आली की घरात वेगळं बसवलं जात नाही, “हे शिवायचं नाही, तिथे हात लावायचा नाही.”, असं केलं जात नाही ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र पूर्वी बायकांना त्या चार दिवसांत आराम मिळायचा तो काही आता बायकांना मिळत नाही.
पाळी असली तरी रोजच्या घरकामातून, ऑफिसच्या कामातून, इतर जबाबदाऱ्यांतून बाईची सुटका नसते. पण आता हळूहळू का होईना, स्त्रियांचा हा दर महिन्याचा असह्य त्रास घरी आणि कामाच्या ठिकाणीही समजून घेतला जाऊ लागलाय. वेगवेगळ्या कंपन्यांनी मासिक पाळीच्या दिवसांत महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायला सुरुवात केली आहे.
फक्त भारतातच नाही, तर जपान, दक्षिण कोरिया आणि इटलीसारख्या देशांमध्येही त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत रजा दिली जाते. आज ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने मासिक पाळीदरम्यान आपल्या महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देणाऱ्या भारतातल्या कंपन्यांची माहिती करून घेऊ.
१. कल्चर मशीन
‘कल्चर मशीन’ या मुंबईतील मीडिया स्टार्टअपने जुलै २०१७ पासून आपल्या कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांना पिरीएड्सच्या पहिल्या दिवशी रजा घेण्याची परवानगी दिली. स्त्रियांच्या समस्या आणि सक्षमीकरणावर भर देणाऱ्या आपल्या ‘ब्लश’ या व्हिडियो चॅनलवरून हे धोरण स्वीकारायची प्रेरणा कंपनीला मिळाली.
२. माथृभूमी
२०१७ साली मुंबईतील ‘कल्चर मशीन’ या स्टार्टअपनंतर ‘माथृभूमी’ या मल्याळम मीडिया संस्थेने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी घरी राहण्याची परवानगी दिली.
‘माथृभूमी’च्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी सांगितलं की, ‘कल्चर मशीन’ ने घेतलेल्या निर्णयामुळे अशी पॉलिसी काढण्याचं आम्हाला सुचलं.
३. मॅगझ्टर
‘कल्चर मशीन’च्या पावलांवर पाऊल टाकत चेन्नईतील मॅगझ्टर या डिजिटल मॅगझीन प्लॅटफॉर्मने जुलै २०१७ मध्ये आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी दर महिन्याला पिरीएड्सच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यावी असं जाहीर केलं. या सुट्टीचा पगार कापला जात नाही.
४. वेट अँड ड्राय
स्त्रियांसाठी गरजेची असलेली स्वच्छतेसाठीची प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या दिल्लीतल्या ‘वेट अँड ड्राय पर्सनल केअर’ या कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान २ दिवस सुट्टी द्यायला सुरुवात केली.
५. झोमॅटो
२००८ साली स्थापन झालेली ‘गुरुग्राम’ मधली ‘झोमॅटो’ ही कंपनी भारतातल्या प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे.
५,००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेली ही कंपनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना पिरिएडसाठी वर्षाला १० दिवस सुट्टी देते. या १० दिवसांच्या सुट्ट्यांचा पगार कापला जात नाही.
६. iVIPANAN
मासिक पाळीभोवती असलेला कलंक हटवण्यासाठी ‘झोमॅटो’च्या पावलांवर पाऊल टाकत सुरतमधील iVIPANAN या डिजिटल मार्केटिंग कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना पिरीएड्ससाठी वर्षाला १२ सुट्ट्या दिल्या जातील असं २०२० साली सांगितलं.
७. इंडस्ट्री एआरसी
IndustryArc या हैद्राबादमधील ‘मार्केट रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग’ स्टार्टअपने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान १ किंवा २ दिवसांची पगार न कापता रजा देण्याची पॉलिसी सुरू केली आहे.
मात्र या महिला कर्मचाऱ्यांना नंतर आपल्या या सुट्टीची भरपाई करून बाकी उरलेलं काम पूर्ण करावं लागतं.
८. गोझूप ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड
‘गोझूप’ ही डिजिटल मार्केटिंग संस्था आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगार न कापता सुट्टी देते. हे धोरण अवलंबणाऱ्या भारतातल्या पहिल्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.
मुंबईतील डिजिटल एंटरटेनमेंट मशीन ‘कल्चर मशीन’ने याची सुरुवात केली होती. नंतर ‘गोझूप’ने हे सुरू केलं.
९. फ्लायमायबीझ
कलकत्त्यातील ‘फ्लायमायबीझ’ या डिजिटल मीडिया कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१९ पासून मासिक पाळीसाठी दर महिन्याला एक सुट्टी घेण्याची परवानगी दिली.
बाकीच्या सुट्ट्यांबरोबर वर्षाला त्यांना या १२ अधिक सुट्ट्या मिळतात आणि मासिक पाळीसाठी दिलेल्या या १२ सुट्ट्यांचे पगार कापले जात नाहीत.
१०. बायजु
भारतातलं आघाडीचं शैक्षणिक ऍप ‘Byju’ हे आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीसाठी वर्षाला १२ सुट्ट्या घेऊ देतं.
Byju च्या ब्लॉगनुसार, महिला कर्मचारी दर महिन्याला पिरीएड्ससाठी १ सुट्टी घेऊ शकतात किंवा २ हाफ डेज घेऊ शकतात.
११. हॉर्सेस स्टेबल न्यूज
बंगलोरमधील ‘हॉर्सेस स्टेबल न्यूज’ या स्टार्टअपमध्ये ६०% महिला कर्मचारी तर ४०% पुरुष कर्मचारी आहेत. या स्टार्टअपतर्फे महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून २ दिवसांची पगार न कापता नुसती सुट्टीच दिली जात नाही तर त्याबरोबरीने त्यांचा पाळीच्या काळातला ताण कमी करण्यासाठी मदत व्हावी म्हणून २५० रुपयांचा भत्ताही दिला जातो. त्याला ‘नाय टू याय’ असं म्हटलं जातं.
‘हॉर्सेस प्रॉडक्शन्स’च्या सह-संस्थापिका सलोनी अगरवाल म्हणाल्या, “मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना प्रचंड दुखतं आणि कळा येतात यात नाकरण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे या काळात महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काम करणं फार कठीण जातं. पाळीच्या दिवसांत सुट्टी देण्याच्या धोरणाच्या अंमलबजावणीकडे एक ‘भेट’ म्हणून पाहिलं जाता कामा नये. स्त्रिया आणि पुरुष दोघांच्याही विकासासाठी समान संधी पुरवणे हे आमचं धेय्य आहे.”
१२. स्विगी
‘स्विगी’ या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीने आपल्या महिला फूड डिलिव्हरी पार्टनर्सना पिरीएड्ससाठी महिन्याला २ दिवस सुट्टी दिली जाईल असं जाहीर केलं.
–
- जाणून घ्या, मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म!
- स्त्रियांनी periods चालू असतांना काय करावे, काय टाळावे, ५ महत्वाचे मुद्दे!
–
या कंपन्यांबरोबरच बाकीही कंपन्यांमध्ये आणि इतर कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत अशी एकतरी सुट्टी दिली जावी. स्त्रीला मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासाची तीव्रता लक्षात घेऊन तिच्या घरच्यांनी आणि कामाच्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी तिच्याबाबतीत थोडं अधिक संवेदनशील व्हावं. स्त्रियांचा हा दर महिन्याचा त्रास थोडा तरी कमी करणारी ही हक्काची विश्रांती त्यांना निश्चितच मिळायला हवी.
भारतातील खाजगी कंपन्यांमध्येही अशा प्रकारची सुट्टी मिळावी का? तुमचं मत नक्की कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.