आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘सात अजुबे इस दुनिया में, आठवीं अपनी जोडी’ असं म्हणणारे जय-वीरू आठवत असतील. कधीतरी मित्रमंडळींना टोमणा मारताना ‘हो तू तर आठवं आश्चर्यच ना’ असंही तुम्ही म्हणाला असाल.
पण तुम्हाला हे माहित आहे का, की जगात खरोखरंच आठवं आश्चर्य होतं?
सध्या जगात केवळ सातच आश्चर्यं आहेत. वगळलेलं हे आठवं आश्चर्य न्यूझीलंडचं उत्तरी बेट रोटोमाहना तलावावर होतं.
रोटोमाहनावरील चकाकणाऱ्या, सफेद आणि गुलाबी थराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलं होतं.
आणि पुढे हे जागतिक आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलं. पर्यटकांची तिथे जाण्यासाठी रीघ लागायची.
परंतु दुर्दैवाने, जून १८८६ मध्ये ज्वालामुखी पर्वत माउंट तारावेरा फुटला. ज्वालामुखीच्या या स्फोटामुळे ते आश्चर्य नामशेष झालं.
या जागतिक आश्चर्याला पिंक व्हाईट टेरेस म्हटलं जायचं.
दोन संशोधकांचा असा दावा आहे की, त्यांनी गाडल्या गेलेल्या त्या गुलाबी आणि सफेद थराचे योग्य स्थान शोधून काढले आहे.
या दोन्ही संशोधकांनी ही गोष्ट जर्मन ऑस्ट्रियन भूशास्त्रज्ञ Ferdinanad Von Hochstetter यांच्या संशोधनाच्या आधारावर केली आहे.
या शास्त्रज्ञाने, १८५९ साली या जागेचे सर्वेक्षण केले होते. Hochstetter ला न्यूझीलंडच्या भूविज्ञानचे जनक म्हटलं जातं.
पिंक व्हाईट टेरेसचा सुंदर नजारा रोटोमाहना तलावाच्या किनाऱ्यावर दिसत असे. तिथे गरम पाण्याच्या दोन झऱ्यातून सिलिका एकत्र होत असे.
मात्र १० जून १८८६ मध्ये माउंट तारावेरा फुटला. जवळपास ४० किलोमीटरचा परिसर राखेत मिळाला. या दुर्घटनेत जवळपास १२० लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्या घटनेनंतर, पिंक व्हाईट टेरेस गायब झालं ते कायमचंच!
ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हा त्याच ठिकाणी पसरला. तो थंड झाल्यानंतर, त्यात पाणी साठायला सुरुवात झाली.
मूळ रोटोमहाना तलावाहून तब्बल दहापट अधिक खोल आणि मोठा असणारा तलाव अस्तित्वात आला. सध्या हाच तलाव, रोटोमहाना तलाव म्हणून ओळखला जातो.
न्यूझीलंडच्या ‘जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी’मध्ये संशोधक रेक्स बन आणि डॉ. साशा नोल्डन यांनी दिलेल्या अहवालानुसार, पिंक व्हाईट टेरेस तलावाच्या तळाशी नसून तलावाच्या किनाऱ्याच्या १० ते १५ मीटर खाली आहे.
या संशोधकांना २०१० मध्ये नवी माहिती हाती लागली. पूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची सविस्तर माहिती त्यांच्या हाती लागली होती.
त्यांनी त्या पूर्ण सर्वेक्षणाचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जिथे पिंक व्हाईट टेरेस दबलेलं आहे असं मानलं जातं, त्या ठिकाणी ते अस्तित्वात नाही. ते जवळपास ३५ मीटर अधिक खोल गाडलं गेलं आहे.
२०११ मध्ये वैकाटो विद्यापीठ आणि द वूड्स ओशनग्राफिक संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलं की, त्यांना या गुलाबी सफेद थराचे (पिंक व्हाईट टेरेस) अवशेष मिळाले आहेत.
परंतु GNS सायन्स, न्यूझीलंड यांनी केलेल्या पाच वर्षाच्या संशोधनानंतर असं समजलं आहे की, ज्वालामुखीच्या विस्फोटाने हा पूर्ण थर नष्ट झाला होता.
रेक्स बन आता GNS शी याच विषयाबद्दल चर्चा करत आहेत. रेक्स बन यांचा दावा आहे की, आतापर्यंत शास्त्रज्ञ चुकीच्या माहितीवर काम करत होते. योग्य नकाशा त्यांच्याकडे नव्हता.
नवीन माहितीच्या आधारे, नवं संशोधन सुरु झालेलं आहे. संशोधनाची नवी दिशा, कदाचित आणखी नवी माहिती देण्यात उपयुक्त ठरेल.
जर त्यांचा हा दावा आणि ते करत असलेले संशोधन यशस्वी ठरलं तर जगाला तत्याचं नष्ट झालेलं आठवं आश्चर्य पुन्हा मिळू शकेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.