जनतेने आशावादी असावे
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
देशात अनेक लोकांचे आडाखे बांधले जात असताना भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊन मोठा धक्का दिला आहे. दलीत हा असंसदीय शब्द आहे आणि तो वापरणे चूक आहे. संविधानीक स्तरावर सर्व लोक समान असे आहेत असे असताना, त्याच समाजाचे नेते हा शब्द स्वतःच्या फायद्यासाठी वापरताना दिसत असताना सत्ताधाऱ्यांनी ही याच शब्दाचा वापर केला, तर त्याला चूक म्हणता येणार नाहीये. केंद्र स्तरातील अनेक राजकीय पदवीधर यांच्या पदव्या पाहील्या तर त्या कायद्याच्या दिसून येतात. कोविंद हे सुद्धा कायद्याचे पदवीधर असून त्यांचा प्रशासकीय सेवेतला अनुभव पाहता त्यांची निवड योग्य आहे हे म्हणण्याशिवाय जनतेसमोर उपाय तो काय आहे?
महाराष्ट्रात पवार साहेबाना राष्ट्रपती केले जाईल अशी अनेकांना आशा होती पण तसे झाले नाही. महाराष्ट्रातील लोकांना पवार साहेबांना पंतप्रधान वा राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले पहायचे होते. फेसबुक व इतर सोशल मीडिया मधून ही साहेबांच्या आशेचे नारे घुमत होते. अजूनही जनता शेवटपर्यंत याबाबत आशावादी राहिली होती, पण उत्तरेचे वर्चस्व किती आहे याची जनतेला काय कल्पना? पवार साहेबाना पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय सन्मान देऊन भाजप ने काय साधले याबाबत अजून महाराष्ट्रात अनेक जण अभ्यास करत आहेत. खुद्द उजव्या विचारसरणीचे लोक याबाबत निरुत्तर झाले होते व डाव्या व पुरोगामी लोकांना या गोष्टीचा विरोधही करता येणार नव्हता. या सोबत भाजपने मुरली मनोहर जोशी यांची देखील वर्णी लावून घेतल्याचे बोलले गेले, पण चर्चा मात्र साहेबांच्या पुरस्काराची अधिक झाली.
अडवाणी साहेबानी उजव्या विचारांसाठी खस्ता खूप खाल्ल्या आहेत. रथ यात्रेपासून ते अनेक मोठ्या मोहिमांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यांची टेरर अशी प्रतिमा होती. ते मोदी साहेबांचे गुरू आहेत हे ही जगजाहीर आहे. वाजपेयी साहेब प्रकृती अत्यावस्थेमुळे बाजूला झाल्यावर अडवाणी साहेबांनी मेरूपर्वत सक्षम पेललेला असताना, त्यांच्या गळ्यात राष्ट्रपती पदाची माळ पडेल ही जनतेला आशा होती, पण जनतेनी आशा ठेवून कोणतीही राजकीय गणितं होत नसतात व कुठल्याही क्षेत्रात निवृत्तीचे वय असतेच.
देशात कधी सत्तांतर होईल याचा कोणी अचूक अंदाज बांधू शकत नाही. पण परिस्थिती बदलली नसताना देखील एकाच आशेवर जनता खुश आहे की रटाळ घराणी व त्यांची नावं वारंवार येत नाहीत. दौऱ्यावर आलेल्या नेत्यांच्या सध्या कोणी चपला उचलत नाहीत. क्रिकेट हरलो तरी सीमेवर जोरदार फिल्डिंग लागलेली दिसते आहे. आंदोलने दबलेली वा त्यांचे नेते ही शांत होत आहेत. नोटबंदी नंतर नक्की काय झाले याचे विश्लेषण अजून सुरू आहे. जीएसटी वर अभ्यास होतोय आणि रेरा सारखे कायदे आलेत. खुद्द स्वामीनाथन यांनी शेतकरी वर्गाबाबत आपल्या सूचना केंद्र पाळत आहे असे वक्तव्य केल्याचे चर्चेत आलेय. अनेक महत्त्वाच्या विषयाचा येथे उल्लेख करता येणार नसला तरी इतके सांगता येऊ शकेल राज्यसभेत बहुमत आल्यावर व भाजप प्रणीत राष्ट्रपती विराजमान झाल्यावर व्यवस्थेला दणके बसल्यास आश्चर्य मानू नये. आधीच काही लोक घटनाबदल होणार याबाबत आवई उठवून मोकळे झालेत.
राष्ट्रपती यांचे अधिकार तपासले असता मोठ्या मोठ्या विधेयकांबाबत त्यांची भूमिका व अधिकार कक्षा तपासली असता, भाजपचे लोक याच वेळेची संयमाने वाट पाहत होते हे नक्की म्हणता येईल. देशात 180 दिवसात बांधलेल्या पुलाच्या दर्जा वा कामापेक्षा गो रक्षकांकडून झालेल्या हत्येचा किंवा वेमुल्लाच्या आत्महत्येचा विषय मोठा होतो. अजूनही देश स्वतंत्र झाल्यावर देखील देशातील लोकांवर बमणवाद से आझादी या विषयाचे नारे लागतात. संविधानीक व्यवस्था मागे पडत असल्याचे खोटे चित्रच जनतेसमोर उभे केले जाते, किंबहुना मागील शासनाच्या घोटाळ्यासम कोणतेही मोठे घोटाळे बाहेर पडत नाहीत याचीही दखल घेणे जनतेला जाणवू दिले जात नाही. कन्हैया कुमार सारखे युवक आज सातत्याने सोशल विषयावर बोलणे व छोट्या छोट्या व्हिडियो मधून येणारे जातीय वा धार्मिक ट्रोल चालणे ही एकूणच व्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. जागतिक पातळीवर आर्थिक मंदी असताना देशाला सर्व स्तरावर पुढे नेण्याचे आवाहन शासनासमोर आहे. त्याला नव्या कायद्यांची जोड मिळून नवी धोरणे अवलंबली गेली तर जनतेचे भले होऊ शकेल.
राष्ट्रपती निवडणूक होऊन कोविंद हेच देशाचे राष्ट्रपती होतील यात आता शंका नाहीच, पण आता होणाऱ्या देशातील सर्व स्तरावतील बदलांकडे देशांचे लक्ष लागून राहीले आहे. कोणाचा कितीही कोणालाही विरोध असला तरी कालानुरूप कुठल्याही शासनाकडून देश बदलला पाहीजे व कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आले पाहीजे या बाबत आशावादी व ऊर्जावादी राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page