Site icon InMarathi

धोनीच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट करून देणारा युवराज… आता आपल्याला मैदानात दिसणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंग याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधू निवृत्ती जाहीर केली आहे. या बातमीनंतर युवराजच्या चाहत्यांनी त्याच्याबद्दलच्या अनेक अविस्मरणीय क्षणांना, आठवणींना उजाळा दिला.

युवराजच्या प्रत्येक चाहत्याला आजही त्याने T-20 विश्वचषकात ६ चेंडूत  मारलेले ६ षटकार आठवतात.

एवढंच काय, ज्या  इंग्लंडच्या ब्रॉडची त्याने धुलाई केली होती, त्याला देखील ते आजही स्वप्नात आठवतात म्हणे! फ्लींटॉपने दिलेल्या रागामुळे हा पंजाबचा पुत्तर खूपच भडकला आणि त्याने तो राग त्या ६ षटकारांनी ब्रॉड वर काढला होता.

 

bestoft20.com

२००७ चा T२० चा विश्वचषक असो वा २०११ चा वन-डे चा विश्वचषक असो, दोन्ही विश्वचषकात विजय मिळवून देण्यात युवराजचा सिंहचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

२०११ च्या ऑस्ट्रेलिया बरोबर असलेल्या क्वाटर फाइनल मध्ये जेव्हा भारत संकटात सापडला तेव्हा युवराजने संकटमोचक बनून त्या परिस्थितीतून भारताला बाहेर काढून विजय मिळवून दिला होता.

ऑस्ट्रेलियाला हरवल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

२८ वर्ष कडक तपश्चर्या केल्यानंतर भारताला विश्वचषक जिंकण्यात यश आले आणि क्रिकेटच्या देव सचिन तेंडूलकरला भारतीय टीमने अविस्मरणीय भेट दिली. या विश्वचषकात युवराज मालिकावीर ठरला.

या विश्वचषकात त्याने अजून एक पराक्रम केला. आयर्लंड बरोबर झालेल्या सामन्यात त्याने अर्धशतक तर मारलेच पण ५ बळी सुद्धा घेतले. या स्पर्धेत त्याने फक्त बॅटनेच नाही तर बॉलने सुद्धा कमाल करून दाखवली.

जेव्हा जेव्हा कर्णधार धोनीने त्याला चेंडू दिला तेव्हा तेव्हा त्याने धोनीला विकेट मिळवून दिल्या.

 

cricbuzz.com

१२ डिसेंबर १९८१ मध्ये चंदीगढमध्ये जन्मलेला हा खेळाडू लहानपासूनच खूप खोडकर होता. युवराजचे वडील हे देखील भारतासाठी क्रिकेटसाठी खेळले आहेत त्यामुळे साहजिकच युवराजला लहानापासून क्रिकेटचे शिक्षण मिळत गेले.

युवराजने आपल्या क्रिकेट करियरची सुरुवात रणजीमधून पंजाबचे प्रतिनिधीत्व करत केली.

३ ऑक्टोबर २००० मध्ये तो भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. १६ ऑक्टोबर २००३ रोजी तो भारताकडून पहिली कसोटी खेळला आणि १३ सप्टेंबर २००७ मध्ये तो भारतासाठी पहिला T-20 सामना खेळला.

४० कसोटी सामन्यात त्याने ३३.९२ च्या सरासरीने एकूण १९०० धावा केल्या आहेत आणि ३०० एकदिवसीय सामन्यात ३६.७७ च्या सरासरीने ८६२२ धावा केल्या आहेत.

 

 

युवराज याने आपले शिक्षण चंदीगढच्या DAV पब्लिक शाळेमधून पूर्ण केले. लहान असताना त्याने छोटेसे दोन रोल चित्रपटात केले होते.

हे देखील वाचा : सिक्सर किंग युवराजने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे, विश्वास बसत नाही? मग हे वाचाच!

आई आणि वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर युवराजने आईकडे राहण्यास पसंती दाखवली. २०११ मध्ये युवराजच्या डाव्या फुफ्फुसात कर्करोगाची गाठ असल्याचे निदान करण्यात आले.

उपचार करण्यासाठी युवराज बोस्टनला गेला. मार्च २०१२ मध्ये त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण हा काळ युवराजसाठी खूप नाजूक होता.

 

youtube.com

तरीही धीर खचू न देता त्यातूनही तो बाहेर आला. त्याबद्दल त्याच्या धैर्याला दाद द्यावीच हवी. मृत्युच्या दाढेतून परत येऊन दाखवत त्याने आपल्यासमोर  प्रेरणादायी आदर्श उभा केला.

या दीर्घ  आजारातून बरा झाल्यावर पुन्हा एकदा त्याने क्रिकेटचे मैदान गाजवले. पुन्हा एकदा भारतासाठी विजयश्री खेचून आणली.

क्रिकेटमधला हा प्रवास संपवत असल्याची त्याची घोषणा झालीय, आता तो उत्तुंग षटकार ठोकणारा, मैदानाच्या चारही बाजूंना सामान न्याय देत तुफान फटकेबाजी करणारा युवराज आपल्याला पुन्हा मैदानात दिसणार नाही.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट करून देणारा युवराज आता आपल्याला मैदानात दिसणार नाही. पण तो आपल्या आठवणीत कायम राहील हे मात्र खरं!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version