Site icon InMarathi

कधीकाळी सुपरमार्केटमध्ये दादा असलेले बिग बझार आज रिलायन्स घेऊ पाहतंय

big bazar im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकेकाळी सुपरमार्केट म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर यायचं, ते म्हणजे बिग बझार! अगदी सुरुवातीला तर, सर्वसामान्य मंडळी नेहमी जात नाहीत अशा मॉलसारख्या ठिकाणी बिग बझार पाहायला मिळत असे. हळूहळू मग इतरही अनेक सुपरमार्केट्स अस्तित्वात आली आणि या स्पर्धेत अनेकांनी उडी मारली असं म्हणायला हवं.

मोर, रिलायन्स, डी-मार्ट, हे आणि असे अनेक स्पर्धक समोर उभे ठाकले आणि तरीही बिग बझार अनेकांना पुरून उरत होतं. आपलं अस्तित्व कायम ठेवत, सुपरमार्केटच्या स्पर्धेत नवनवीन क्लृप्त्या वापरून, नवनवीन ऑफर्सचा भडीमार करून, ग्राहकांना आकर्षित करत राहणं बिग बझारला जमत होतं. मात्र कालांतराने त्यांची ही दादागिरी संपू लागली.

 

big-bazar-inmarathi

इतर सुपरमार्केटकडे वळलेली मंडळी आता बिग बझारला पाठ दाखवू लागली. आधी निव्वळ बिग बझारसाठी मॉलचा रस्ता धरणारी मंडळी आता मॉलमध्ये जाऊनही, बिग बझारकडे कानाडोळा करू लागली. आता तर बिग बझारची अवस्था इतकी वाईट झाली आहे, की रिलायन्स त्याला विकत घेऊ पाहतंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फ्युचर ग्रुपचा प्रवास…

बिग बझारची स्थापना केली ती फ्युचर ग्रुपने. मुंबईमधील एच आर कॉलेजचे विद्यार्थी असणारे किशोर बियानी हे फ्युचर ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत. व्यवसायाची परंपरा त्यांच्याकडे पिढीजातच होती असं म्हणायला हवं. त्यामुळेच सुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची त्यांची इच्छा होती. कपड्यांच्या व्यवसायात उतरत त्यांनी या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं.

१९८७ साली सुरु झालेला हा १९९७ साली पहिल्या रिटेल आउटलेटच्या माध्यमतून अधिक बहरू लागला कलकत्त्यामधील पँटालूनचे पहिले दुकान ही बियानी यांची पहिली मोठी झेप ठरली. बेअर, जॉन मिलर, पँटालून असे फ्युचर ग्रुपचे ब्रँड्स भारतीय बाजारात मोठ्या शानसे दिसू लागले.कपड्यांच्या व्यवसाय क्षेत्रात मोठं नाव कमावल्यावर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, २००१ साली एका नव्या क्षेत्रात फ्युचर ग्रुपने नवं पाऊल टाकलं. हीच होती, बिग बझारची सुरुवात!

 

 

पाश्चिमात्य शैलीत सुपरमार्केटची सुरुवात करत, संपूर्ण देशभरात बिग बझारची अनेक आउटलेट उभारून फ्युचर ग्रुपने भारतीयांच्या बाजार या संकल्पनेचा चेहरामोहरा बदलून टाकला. १०० हुन अधिक संख्येने असणाऱ्या बिग बझार आउटलेटला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

याचं फलित म्हणून फर्निचर, एका छताखाली अनेक ब्रँड्स, इलेक्ट्रॉनिक दुकानं अशा अनेक रिटेल चेन्स सुरु करत त्यांनी स्वतःचं साम्राज्य मोठं करायला सुरुवात केली. नंतरच्या काळात मात्र युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रँड्सना भारतात आणण्याचा चंग बांधला आणि बियानी यांच्या साम्राज्याला धक्का बसायला सुरुवात झाली असं म्हणता येईल.

ऱ्हासाची कारणं…

उत्तमरीत्या व्यवसाय करणाऱ्या फ्युचर ग्रुपच्या ऱ्हासाला केवळ आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची उपस्थिती हा एकच मुद्दा कारणीभूत ठरला नाही. त्यांच्या काही चुका, भवतालची परिस्थिती याचाही विपरीत परिणाम फ्युचर ग्रुपवर आणि परिणामी बिग बझारवरही झाला. ही कारणं नेमकी काय काय होती, ते समजून घेऊयात.

१. व्यवसाय वृद्धी करण्याच्या नादात

इतर व्यवसायिकांप्रमाणेच फ्युचर ग्रुपला सुद्धा व्यवसाय वृद्धी करण्याची इच्छा होती. मात्र यासाठी निवडलेला मार्ग त्यांना महागात पडला असं म्हणायला हवं. देशभरात सगळीकडे, अगदी योग्य नसेल अशा ठिकाणी सुद्धा बिग बझारचं अस्तित्व असावं रस्ताही बियानी प्रयत्नशील होते. दक्षिणेकडे इझीडे, निलगिरीज असे ब्रँड्स विकत घेत त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला.

 

 

कुठलीही गोष्ट अति झाली, की त्याची माती होते, तसंच काहीसं फ्युचर ग्रुपचं झालं. इतकी मोठी गुंतवणूक आणि न फळलेला व्यवसाय त्यांच्यासाठी बुमरँग ठरला. अविचारीपणे करण्यात आलेले काही फेरबदल हेसुद्धा फ्युचर ग्रुपच्या ऱ्हासाचं महत्त्वाचं कारण ठरलं. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायात एकाचवेळी, फारशा तयारीविना पाऊल टाकणं ही मोठी चूक ठरल्याचं स्वतः बियानी यांनी सुद्धा मान्य केलं आहे.

२. कर्जाचा डोंगर

वर्षानुवर्षे व्यवसायात पाय रोवून असणाऱ्या फ्युचर ग्रुपचा पाय खोलात जाण्याचं एक कारण हे त्यांच्यावरील कर्जाचा मोठा डोंगर हेदेखील आहे. व्यवसायाचा पसारा जसा मोठा होता, तशीच कर्जाची व्याप्ती सुद्धा मोठी होती. २०१९ च्या वर्षात तर, या कर्जावरील व्याजाची परतफेड करणं सुद्धा अशक्य ठरू लागलं होतं. व्यवसायाच्या वृद्धीसाठी घेतलेलं कर्जच नंतरच्या काळात अस्तित्वासाठी प्रश्नचिन्ह उभं करू लागलं.
बिग बझारचं यश आणि त्यातून निर्माण झालेली नवी महत्त्वाकांक्षा या भल्यामोठ्या कर्जाचं कारण ठरली.

 

 

 

ऑनलाईन व्यवसाय, फायनान्शियल सर्विस, इन्शुरन्स अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा बियानी यांच्या मनात होती. यातून कर्जाची गरज वाढत गेली. एकाक्षणी हे कर्ज अशा स्थितीला पोचलं, की ते फेडणं अशक्य होऊ लागलं. या कर्जाच्या डोंगराखाली दबलं जाणं, फ्युचर ग्रुपच्या ऱ्हासाचं एक महत्त्वपूर्ण कारण मानलं गेलं पाहिजे.

३. ऑनलाईन रिटेलिंग क्षेत्रातील मोठं अपयश

फ्युचर ग्रुपने २००७ साली ऑनलाईन रिटेलिंगच्या क्षेत्रात पाऊल तर ठेवलं होतं, मात्र त्यात यशस्वी होणं त्यांना कधीही जमलं नाही. फ्युचर बझार डॉट कॉम, बिग बझार डायरेक्ट, अशा नावांनी ऑनलाईन क्षेत्रात शिरणाऱ्या बियानी यांना तिथे नफा झाला नाहीच, उलट बरीच रक्कम गमावण्याची नामुष्की आली.

 

 

२०१६ साली या सगळ्या प्रयत्नांना तिलांजली देत त्यांनी ऑनलाईनचा नाद सोडला. मात्र याच काळात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केटसारख्या स्पर्धकांनी ऑनलाईन क्षेत्रात भक्कम पाय रोवायला सुरुवात केली.
ऑनलाईन क्षेत्रात आलेल्या अपयशाने पैशांचा तुटवडा भासू लागला होता. एवढंच त्यातच इतर स्पर्धकांनी ऑनलाईन क्षेत्रात प्रगती करत बिग बझारचा रिटेल व्यवसाय सुद्धा धोक्यात आणला.

४. व्हायरसने केला अखेरचा वार

कोरोना व्हायरसमुळे जगभरात पसरलेल्या महामारीने अनेक व्यवसाय उध्वस्त केले. लॉकडाऊन, निर्बंध, आणि कोरोनाची भीती या सगळ्याच बाबी याला कारणीभूत होत्या. मुळातच नाजूक स्थितीत असणाऱ्या बिग बझार आणि फ्युचर ग्रुपसाठी टिकाव धरणं अधिकाधिक कठीण होऊ लागलं.

 

the economic times

 

कोविड काळातील पहिल्या ३-४ महिन्यातच जवळपास ७००० करोड रुपयांचा फटका बियानी यांच्या व्यवसायाला बसला. अशा स्थितीत फ्युचर ग्रुपसमोर कुठलंही भविष्य दिसत नव्हतं. अशा स्थितीत रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगसमूहाला सारं काही विकून, स्वतःचा अधिक ऱ्हास थांबवणं हा एकच पर्याय बियानी यांच्यासमोर उरला होता. त्यांनी अखेरीस हाच निर्णय घेतला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version