Site icon InMarathi

जगातलं एकमेव असं युद्ध जे अवघ्या काही मिनिटात संपलं!!!

zin im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात की युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. पण हे फक्त म्हणण्यासाठी आहे हो. काही युद्धांमध्ये एवढी हानी होते की काही केल्या त्यातल्या कोणत्याच कृत्याला माफी मिळत नाही. संपूर्ण जगाने २ भलीमोठी महायुद्धं बघितली. निम्म्या जगाने ती अनुभवलीसुद्धा…! या युद्धांमध्ये न भरून येणारी किती आणि कशी हानी झाली ते सगळ्यांना ठाऊक आहे. याशिवाय भारतातल्या प्रत्येकाला १८ दिवस चाललेलं महाभारतातलं युद्ध माहित आहेच.

 

 

(महाभारतात एकूण बरीच युद्धं झाली पण १८ दिवस चाललेलं मोठं आणि शेवटचं युद्ध एकच) सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातही युद्ध सुरु आहे. ते का आणि कसं सुरु झालं, त्याला जबाबदार कोण यात सध्या आपण पडायला नको.

मात्र या दोन देशांमधल्या युद्धामुळे तिसरं जागतिक युद्ध सुरु होतं की काय अशी भीती आहे.

युद्ध म्हंटलं की प्रचंड विध्वंस, अनेक दिवस चालणारं अशी आपली कल्पना असते. किंवा निदान ऐकून, वाचून तरी माहित असतं. पण या जगाच्या पाठीवर काही मिनिटांत संपलेलं युद्धही आहे. हे युद्ध केवळ ३८ मिनिटात संपलं होतं. होय! फक्त ३८ मिनिटात. चला नक्की कोणकोणतं हे युद्ध झालं होतं आणि एवढ्या लवकर संपलं तरी कसं ते आपण जाणून घेऊया.

 

 

८ मिनिटांत संपलेलं युद्ध…!

१८९६ मध्ये फार कोणाला माहित नसलेलं अँग्लो-झांझिबार युद्ध झालं. हे युद्ध फक्त ३८ मिनिटात संपलं. याबद्दल नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊन पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल. ब्रिटन आणि जर्मनी या दोन देशांमध्ये १८९० साली हेलिगोलँड-झांझिबार करार झाला.

 

 

या करारानुसार ब्रिटिशांना पूर्व आफ्रिकेतलं झांझिबार हे क्षेत्र मिळालं तर जर्मनीला मुख्य टांझानियाचा भाग मिळाला. त्यामुळे ब्रिटिशांनी झांझिबारचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या हातातली बाहुली म्हणजे हमाद बिन थुवैनी या त्यांच्या समर्थकाला १८९३ मध्ये झांझिबारचा सुलतान बनवलं.

नेमकं युद्धाचं कारण काय होतं?

ब्रिटिशांनी बनवलेल्या सुलतानाने ३ वर्षं व्यवस्थित राज्य केलं. मात्र एके दिवशी अचानक म्हणजे २५ ऑगस्ट १८९६ ला त्याचा मृतदेह त्याच्याच राहत्या महालात सापडला. त्याच्या मृत्यूचं नक्की कारण कळू शकलं नाही. पण त्याचा भाऊ म्हणजे खालिद बिन बरघश याने त्याला विष देऊन मारल्याची चर्चा होती. पण हमादच्या मृत्याला काही तास लोटतात न लोटतात तोवर खालिदने राजवाड्यात शिरून ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय सुलतानपदाची सूत्रं हातात घेतलीसुद्धा. यामुळे सुरु असलेल्या चर्चांना बळकटी मिळाली.

हा कारभार ब्रिटिशांना अजिबात आवडला नाही आणि त्यामुळे त्यांनी खालिदला पद तात्काळ सोडण्याचा आदेश दिला. पण तो आदेश खालिदने फेटाळलाच शिवाय महालाभोवती सैन्य जमवायला सुरुवात केली. तो २५ ऑगस्टचा दिवस संपायच्या आतच खालिदने महालाभोवती ३००० सुसज्ज सैनिक, तोफखाना आणि मोजकी शस्त्रास्त्रं असलेली एक यॉटही बंदरात उभी केली होती.

 

 

त्याचवेळी दुसरीकडे ब्रिटिशांनीही जवळच्याच बंदरात २ युद्धनौका आणून उभ्या केल्या होत्या. शिवाय आणखी एका युद्धनौकेकडे मदत मागितली होती जी २५ तारखेच्या संध्याकाळी हजर झाली. पण शेवटी ते पडले ब्रिटिश. परवानगीशिवाय त्यांचं काही चालत नाही. (आपल्याकडं नाही एका सरकारी कामासाठी गेलो आणि एखादा बारका कागद नसेल तरी परत पाठवतात आणि नंतर या म्हणून सांगतात ना तसंच.

ब्रिटिशांनीच सवय लावली असणार आपल्याला, दुसरं काय! असो!) त्यामुळं बेसिल केव्ह या अधिकाऱ्यानं परवानगी मागणारी तार केली आणि त्याच्या उत्तराची वाट बघत बसला पण त्याचवेळी खालिदला वॉर्निंग देणं थांबवलं नाही. पण खालिद काही दाद देत नव्हता. पुढच्या दिवशी त्याला आणखी दोन युद्धनौकांची कुमक मिळाली आणि त्याबरोबर केलेल्या तारेचं उत्तरही आलं.

 

त्यात लिहिलं होतं की, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा, “तुम्हाला त्यासाठी पाठिंबा असेल. मात्र जे काम तुम्हाला तडीस नेणं जमणार नाही त्याची सुरुवातही करू नका.” झालं. केव्हला हिरवा कंदील मिळाला. मग त्याने खालिदला शेवटची ताकीद दिली की २६ तारखेच्या सकाळी ९ वाजेपर्यंत महाल रिकामा कर. पण वॉर्निंग संपायच्या केवळ १ तास आधी म्हणजे सकाळी ८ वाजता खालिदने केव्हसाठी निरोप पाठवला ज्यात लिहिलं होतं की, “आम्ही काही आमचा झेंडा उतरवणार नाही. शिवाय तुम्ही आमच्यावर गोळीबार कराल असेही आम्हाला वाटत नाही.” त्याला केव्हने खास ब्रिटिश स्टाईमध्ये उत्तर पाठवलं की, “आम्ही सांगतोय तसं तुम्ही करणार नसाल तर आम्ही नक्कीच करू.”

कारण तर समजलं; पण युद्धात खालिदचं काय झालं?

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर ९ वाजून २ मिनिटांनी ब्रिटिशांनी बॉम्ब डागण्यास सुरुवात केली. तोपर्यंत त्याच्या तोफखान्याचा बराचसा भाग कोसळला होता, त्याचे ३००० सैनिक पडणाऱ्या वाड्यात होते. पण खालिद बॉम्बफेक सुरु होताच मागच्या बाजूने एकटाच बाहेर पडून पळून गेला.

 

 

९ वाजून ४० मिनिटांनी या सुलतानाचा ध्वज खाली आला आणि ३८ मिनिटांचं ऐतिहासिक युद्ध संपलं. या केवळ ३८ मिनिटांच्या युद्धाच्या तुलनेत खालिदचे ५०० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले, जखमी झाले. याउलट ब्रिटिशांकडचा केवळ एक सैनिक गंभीर जखमी झाला जो नंतर बराही झाला. खालिद सोडून गेल्यामुळे ब्रिटिशांनी परत एकदा त्यांच्या मर्जीतल्या हमूद नावाच्या सुलतानाला गादीवर बसवलं आणि त्याने ६ वर्षं राज्य केलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version