Site icon InMarathi

मी चंद्रशेखर आझाद बोलतोय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक- तुषार दामगुडे

===

मला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जायचे, त्यातील काही नावं म्हणजे quick silver, बलराज..

मला अजून तो प्रसंग आठवतो जेव्हा मला पहिल्यांदा अटक झाली होती. अटक करून मला मॅजीस्ट्रेट समोर उभं केलं, माझं वय होतं पंधरा पण मनात ध्येय स्पष्ट होतं त्यामुळे कसलाही पश्चाताप मनात नव्हता. मॅजीस्ट्रेटने विचारलं,

नाव काय तुझे ?

मी तितक्याच बेफिकीरीने उत्तर दिले,

आझाद

पुन्हा त्याने विचारले.

वडलांचे नाव काय ?

मी उत्तर दिले,

स्वतंत्रता

त्याने मला पत्ता विचारला आणि मी उत्तर दिले,

तुरुंग …

 

 

मला नग्न करून माझी चामडी सोलण्यात आली. माझ्या वयाची ना त्यांना चिंता होती आणि माझ्या ध्येयापुढे माझ्या जखमांची मला चिंता नव्हती. वाचन मला कधी आवडत नव्हते. मला ऐकायला आवडत असे.

रामप्रसाद बिस्मिलांची H.R.A. जॉईन केली तेव्हा रामप्रसाद या कवी मनाच्या देशभक्तिपर कवनांची आणि भगतसिंग या समवयस्क मित्रांची वेगवेगळ्या विषयांवरील मतांची मेजवानी ऐकायला मला आवडत असे.

महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरीत होऊन बालवयातच मी कुटूंब आणि वैयक्तिक आयुष्याला तिलांजली देऊन स्वतःला राष्ट्राप्रती अर्पण करुन टाकले होते.

 

 

अनेक नवससायास केल्यानंतर जन्म झालेला मुलगा भलत्याच नादी लागून जीव धोक्यात घालतो आहे हे माझ्या पापभीरू सामान्य कुटूंबाला कसं पचावं पण माझं रक्ताचं कुटूंब पहावं तर दारिद्र्य आणि गुलामगीरीच्या पाशात अडकलेल्या माझ्या हिंदूकुश ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या कुटूंबाच्या स्वातंत्र्यासाठी झगडांव तरी कुणी?

असहकार आंदोलन ज्या प्रकारे गांधींनी मागे घेतले ते माझ्या सारख्या अनेक तरुणांना रूचणारे नव्हते .

आम्ही आमचा वेगळा मार्ग पत्करला “सशस्त्र क्रांतीचा” कारण स्वातंत्र्य रक्त मागते आणि माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब अर्पण करून मी स्वातंत्र्य मिळवणार होतो.

 

मी एकटा न्हवतो. रामप्रसाद बिस्मिल, शचिंद्रनाथ सन्याल, अश्फाकउल्ला खान यांसारखे मार्गदर्शक आणि मी, भगतसिंग, शिवराम, सुखदेव असे अनेक अनुयायी बरोबर होते.

सशस्त्र क्रांती करायची तर शस्त्र हवीत आणि शस्त्रांसाठी पैसा हवा. पैसा हवा म्हणुन आम्ही एका गावात दरोडा घातला आणि एक अनावस्था प्रसंग माझ्या समोर ओढवला.

एक भगीनी माझ्या समोर आडवी येऊन उभी राहिली व स्त्री वर कधीही हात उचलणार नाही ही तर मी शपथ घेतलेली होती. वेळ जाऊ लागला आणि गाव जमा होऊ लागले. प्रसंग बाका होता, रामप्रसादांना कळताच त्यांनी पुढे होऊन त्या भगीनीला मागे ढकलून एक शिवी हासडत खाडकन मला थोबाडीत ठेवून दिली व पुढील प्रसंग नियंत्रणात आणला.

तिथून पुढे नागरी वस्ती लुटायची नाही हे आम्ही ठरवून टाकले आणि पुढील योजना आखली ती काकोरी कटाची.

 

अत्यंत योजनाबद्ध रितीने आम्ही सरकारी खजिना लुटला परंतु त्या गडबडीत एक चादर मागे राहिली आणि त्या चादरीवरील खुणांच्या आधारे माझे रामप्रसाद बिस्मिल, शची दा, अश्फाकउल्ला असे कितीतरी साथिदार पकडले गेले.

हे घडत असताना लालाजींच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी मी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी स्कॉटच्या खुनाची योजना आखली परंतु नजर चुकीने सॉंडर्सची हत्या घडली.

भगतसिंग तेजतर्रार मुलगा, आमच्या संघटनेचा कमांडर, मला गुरूस्थानी मानणारा…………अखेर पकडला गेला. आपल्या सगळ्याच साथिदारांसहीत. ब्रिटिश सरकार मला पकडण्यासाठी सुद्धा जंगजंग पछाडत होतंच. पण वेषांतर करण्याची माझी खुबी आणि धाडस मला साथ देत असे.

 

मी वेषांतर करून सरकारी जेल मधील साथिदारांपासुन जवाहरलाल नेहरुंपर्यंत सगळ्यांना भेटत होतो.

मला पकडणे अवघड होते असे नाही परंतु मला जिवंत पकडणे मात्र अशक्य होते कारण माझे नाव आझाद होते आणि जे आझाद असतात त्यांना साखळदंडात घालता येत नाही…….

माझे सहकारी तुरुंगात होते त्यांना सोडवण्याच्या योजना मी आखल्या परंतु नियती आमच्या बाजूनेच नव्हती कि काय कुणास ठाऊक कारण प्रत्येक योजना अपयशी ठरली. माझ्या सहकाऱ्यांच्या तुरुंगातील बित्तंबातम्या मला मिळत, त्यापैकी एक म्हणजे रामप्रसाद बिस्मिलांनी रचलेली काव्यं आजदेखिल माझ्या ओठांवर खेळत आहे. –

सरफ़रोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है। देखना है ज़ोर कितना, बाज़ु-ए-कातिल में है?

याशिवाय

मेरा रंग दे बसन्ती चोला । इसी रंग में गांधी जी ने, नमक पर धावा बोला । मेरा रंग दे बसन्ती चोला । इसी रंग में वीर शिवा ने, माँ का बन्धन खोला । मेरा रंग दे बसन्ती चोला ।

या तुरुंगात रचलेल्या काव्यांनी उर अभिमानाने फुलून आला. वयाची विशी बावीशी गाठलेले हे तरुण न्यायालया समोर

जज साहब हम जानते हैं कि आप हमें क्या सजा देंगे । हम जानते है कि आप हमें फांसी की सजा देंगे, और हम जानते है कि यह ओठ जो अब बोल रहे है वह कुछ दिनों बाद बन्द हो जायेंगे । हमारा बोलना, सांस लेना और काम करना यहां कि हिलना और जीना सभी इस सरकार के स्वार्थ के विरूद्ध है । न्याय के नाम पर ‘शीघ्र ही मेरा गला घूंट दिया जायेगा ? मैं जानता हूं कि मैं मरूंगा मरने से नहीं घबराता । किन्तु क्या जनता और इससे सरकार का उदेश्य पूर्ण हो जायेगा ? क्या इसी तरह हमेशा भारत मां के वक्षस्थल पर विदेशियों का तांडव नृत्य होता रहेगा ? कदापि नहीं, इतिहास इसका प्रमाण है । मैं मरूंगा किन्तु कब्र से फिर निकल आउंगा और मातृभुमि का उद्धार करूंगा ।….- रामप्रसाद बिस्मिल !

 

म्हणत हसत हसत फासावर चढले. बोहल्यावर चढायच्या वयात “मेरा रंच दे बसंती चोला” मध्ये स्वतःची भर घालत भगतसिंग आणि राजगुरु, सुखदेव वयाच्या विशीत फासावर चढले. या तिघांना फाशी ऐवजी जन्मठेपेची सजा सुनावण्याची रदबदली ब्रिटिश सरकारकडे करा हेच सांगण्यासाठी मी जवाहरकडे गेलो होतो आणि त्याची असमर्थता ऐकून “साल्ला” हा माझा नेहमीचा शब्द उच्चारून मी माझ्या सायकलला टांग मारली होती.

 

 

स्वतःच्याच विचारात मी नियोजित ठिकाणी म्हणजे आल्फ्रेड पार्क मध्ये पोहचलो व भेटी साठी येणाऱ्यांची वाट पाहू लागलो, परंतु दगा झाला होता, मी पोहचताच काही क्षणात पोलिसांनी पार्कला वेढा टाकला आणि शरण येण्यासाठी फर्मावलं परंतु हि त्यांची चुक होती.

आझाद कुणाला शरण गेला आहे का? भिल्लांच्या पोरांसोबत नेमबाजी शिकलेला आझाद जिवंत पकडणे काळालाही शक्य नव्हते. माझी माउजर काढून मी वेध घेतला आणि पहिल्याच गोळीत एक इंस्पेक्टर यमसदनी पोहचवला. पोलीसांनी अंदाधुंद फायरींगला सुरुवात केली आणि मी देखील प्रत्त्युत्तर सुरू केले. पुढच्या चार गोळ्यांनी चार पोलीस यमसदनी पोहचले…

 

 

वेळ आणि काळ अत्यंत विपरीत होती. अत्यंत असहाय अवस्थेत मी सापडलो होतो. समाजवादी तत्वांवर आधारित सर्वांना समान न्याय आणि संधी देणाऱ्या हिंदुस्थानची निर्मिती करण्याचे कार्य भगतसिंग, सुखदेव, रामप्रसाद, अशफाकउल्ला माझ्या वयाच्या २४ व्या वर्षी विश्वासाने सोपवून पुढे गेले होते, परंतु मलाच काळाचा वेढा पडला होता.

 

 

काळीज तिळतीळ तुटत होते. आसेतूहिमाचल गुलामगीरीच्या खाईत पडलेला माझा भारतीय आशेने बघत होता कि कधीतरी मलाही समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान मिळेल परंतु ते कार्य अर्धवट असताना “चंद्रशेखर आझाद”ला परिस्थितीने खिंडीत गाठले होते.

मी मॅगझीन तपासले फक्त एक गोळी शिल्लक होती. आणखी एक शत्रू कि …………… एक युग लोटलं कि काय असं मला वाटलं परंतु निर्णय माझ्या मनाने दिला होता. रिव्हॉल्वर शांतपणे मी कानाजवळ पकडण्याआधी मुठभर माती उचलून कपाळावर लावली होती.

या जन्मात जे जमले नाही ते पुढील जन्मी पुर्ण करण्याचे वचन देऊन त्या पवित्र हिंदुस्थानच्या भुमीचे मी चुंबन घेतले. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती परंतु आझाद शेवटपर्यंत आझाद राहणार होता. ” धाड…”

 

 

यदि देश हित मरना पड़े मुझको सहस्त्रों बार भी, तो भी न मैं इस कष्ट को निज ध्यान मैं लाउं कभी । हे ईश, भारतवर्ष में ‘शतबार मेरा जन्म हो, कारण सदा ही मृत्यु का देशोपकारक कर्म हो ।। मरते बिसमिल रोशन, लहरी, अशफाक, अत्याचार से, होंगे पैदा सैकड़ों उनके रूधिर की धार से ।। उनके प्रबल उद्योग से उद्धार होगा देश का, तब नाश होगा सर्वथा दुख ‘शोक के लवकेश का ।।

(अलाहाबादला गर्दीच वावडं कधीच न्हवतं ………. परंतु ती गर्दी काही वेगळीच होती. भारतमाता कि जय, इंकलाब जिंदाबाद चे नारे देत डोळ्यात अश्रूंचा पुर घेऊन लोक बाहेर पडले होते. कदाचीत माझ्या जिवंतपणी मला जे जमलं न्हवतं ते माझ्या मृत्युने घडवलं)

===

लेखक- तुषार दामगुडे

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version