USपेक्षा भारी भारतीय डॉक्टर; अमेरिकन महिलेच्या डोळ्यातील 3 जिवंत बॉटफ्लाय काढल्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
विकसित देशांकडे असलेल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाविषयी आणि तितक्याच कौशल्यनिपुण तज्ज्ञमंडळींविषयी आपण ऐकून असतो. त्यात काही खोटंही नाही. पण यापेक्षा काहीतरी वेगळं सांगू पाहणारी घटना नुकतीच घडलेली आहे. अमेरिकेची नागरिक असलेल्या एका महिलेला झालेला एक रोग तिच्या देशात बरा न झाल्यामुळे तिला थेट दिल्ली शहर गाठावं लागलं…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
आणि इथल्या डॉक्टरांना तिचा हा आजार बरा करण्यात अखेरीस यश आलं. इतकंच नव्हे, तर हे नेमकं काय आहे याचं निदानही अमेरिकेत होऊ शकलं नाही. जर ती वेळीच बरी झाली नसती तर तिच्या नाकाची, चेहऱ्याची, डोळ्याच्या खाचांची खूप झीज झाली असती. कदाचित तिला मेनिंजायटीसही झाला असता किंवा तिला तिचे प्राणही गमवावे लागले असते.
नवी दिल्लीतल्या वसंत कुंजमधील फोर्टिस रुग्णालयातल्या डॉक्टरांनी अमेरिकेची नागरिक असलेल्या एका ३२ वर्षीय महिलेच्या शरीरातून ३ मानवी बॉटफ्लाईज यशस्वीरित्या काढल्या आहेत. कुठलीही भूल न देता या बॉटफ्लाईज काढण्यात आल्या. जर या बॉटफ्लाईज काढता आल्या नसत्या तर तिच्या शरीरातल्या टिशूंना हानी पोहोचली असती आणि त्यामुळे तिच्या नाकाची, चेहऱ्याची, डोळ्याच्या खाचांची मोठया प्रमाणावर झीज झाली असती.
इतके गंभीर परिणाम झाले असते की तिला मेनिंजायटीस रोगाला सामोरं जावं असतं किंवा तिचा मृत्यूदेखील होऊ शकला असता.
ही महिला रुग्ण भारतात येण्यापूर्वी अमेरिकेतल्या रुग्णालयांमध्ये गेली होती जिथल्या डॉक्टरांनी केवळ जी लक्षणं दिसत होती त्यानुसार तिला औषधं देऊन तात्पुरतं बरं केलं होतं. पण हे नेमकं का होतंय याचं निदान अमेरिकेतले वैद्य करू शकले नाहीत. जेव्हा ती नवी दिल्लीतल्या फोर्टिस रुग्णालयात आली तेव्हा गेल्या ४-६ आठवड्यांपासून आपल्या उजव्या डोळ्याच्या वरच्या पापणीपाशी सूज आल्याचं, तिथे लालसरपणा आल्याचं आणि तो भाग खूप नाजूक झाला असल्याचं तिने दाखवलं.
ही अमेरिकन महिला रुग्ण दोन महिन्यांपूर्वी अमेझॉनच्या जंगलात गेली होती. तिथून आल्यावर मागल्या ४-६ आठवड्यांपासून तिच्या पापण्यांमध्ये काहीतरी हलत असल्याचं तिला जाणवत होतं असं तिने फोर्टिस रुग्णालयातल्या डॉक्टरांना सांगितलं. या रुग्णालयात डॉ. मोहम्मद नदीम यांनी, शस्त्रक्रिया विभागाचे इआर फिजिशियन डॉ. धीरज आणि डॉ. नरोला यंगर यांनी तिला नेमकं काय झालंय याचं निदान केलं आणि तिच्यावर उपचार केले.
शरीराच्या नाजूक त्वचेत हे बॉटफ्लाईज बीळ करतात आणि आतल्या भागात वाढतात. मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका यांसारख्या उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय भागांमध्ये यापूर्वीही अशा केसेसची नोंद झाली आहे. भारतातल्या ग्रामीण भागांमध्ये प्रामुख्याने अशा केसेसची नोंद झाल्याचं आढळून आलं आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये नाकावाटे आणि त्वचेला झालेल्या जखमांवाटे या बॉटफ्लाईजने शरीरात शिरकाव केल्याचं दिसून आलंय.
डॉ. मोहम्मद नदीम म्हणाले, “मियासीसची ही फार दुर्मिळ केस होती. अशाप्रकारे अडकलेल्या या बॉटफ्लाईज निरोगी त्वचेत शिरकाव करू शकतात आणि त्या अतिशय घातक ठरून त्यामुळे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.”
“त्यामुळे अशा केसेसची तातडीने तपशीलवार तपासणी होणं गरजेचं असतं. ही अमेरिकन महिला रुग्ण प्रवासी असून दोन महिन्यांपूर्वी ती अमेझॉनच्या जंगलात गेली होती. तिने प्रवास केला त्यावेळी तिच्यात बॉटफ्लाईजने प्रवेश केला असावा असा तर्क लावून आणि तिच्या त्वचेत होत असलेली हालचाल पाहून नेमकं काय झालंय याचं निदान केलं गेलं.”
“डॉ. नरोला यंगर यांना साधारण २ सेंटीमीटर लांबीच्या या मानवी बॉटफ्लाईज महिलेच्या शरीरातून सक्रियपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. एक बॉटफ्लाय वरच्या पापणीतून, दुसरी मानेच्या मागच्या भागातून आणि तिसरी तिच्या उजव्या हाताच्या मनगटापासून कोपरापर्यंतच्या भागातून काढण्यात आली आहे. सगळी स्वच्छता राखून आणि कुठलीही भूल न देता १०- १५ मिनिटांत ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. इआरने लक्षणांनुसारऔषधं लिहून दिल्यानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.”
डॉ. राजीव नय्यर म्हणाले, “डॉ. मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्त्वाखाली डॉक्टरांच्या टीमने उपचाराचा अतिशय सुयोग्य मार्ग अवलंबत अमेरिकन महिलेच्या शरीरातून सक्रियपणे बॉटफ्लाईज काढल्या. फोर्टिस रुग्णालयातल्या आमच्या डॉक्टरांच्या टीमने कायमच त्यांचं सर्वोत्तम दिलं आहे आणि ते नेहमी रुग्णांशी बांधील राहिले आहेत.
बरी झालेली अमेरिकन महिला रुग्ण म्हणाली, “मी अमेझॉनच्या जंगलात गेले होते आणि तिथून जेव्हा मी परतले तेव्हा माझ्या उजव्या डोळ्याच्या वरच्या पापणीच्या वर काहीतरी चावलं असल्याचं माझ्या लक्षात आलं. ते मोठं होत गेलं आणि त्यातून रक्त यायला लागला. एखादा विषारी कोळी चावला असावा असं मला वाटलं. जिथे चावलेलं होतं त्याच्या मध्ये एक छोटं छिद्र होतं. त्या छिद्रातून काहीतरी बाहेर येत असल्याचं मला दिसलं.”
“अमेरिकेतले डॉक्टर ते बाहेर काढू शकले नाहीत आणि म्हणून मी फोर्टिस रुग्णालयात आले. भूल न देता इथले डॉक्टर बॉटफ्लाईज बाहेर काढू शकले. डॉक्टरांच्या सक्रियतेचं आणि त्यांच्या प्रयत्नांचं मला खरंच कौतुक वाटतं.”
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या काही वर्षांपासून दर्जेदार आणि खिश्याला परवडणाऱ्या आरोग्य सेवांसाठी जगाचं लक्ष्य म्हणून भारत देश उदयाला येतोय. भारतीय रुग्णालयांमधून आणि प्रस्थपित आरोग्य सेवा संस्थांमधून उच्च प्रतीचं, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत अवघ्या एक दशांश इतक्या खर्चात वैद्यकीय बुद्धिमत्ता, भाषा दुभाषी आणि वैयक्तिकृत वैद्यकीय सेवा या तिन्ही बाबतीतली आपली क्षमता भारताने दाखवून दिली आहे.
जे निदान आणि उपचार अमेरिकेसारख्या विकसित देशात होऊ शकले नाहीत ते भारतासारख्या सद्यस्थितीत विकसनशीलअसलेल्या राष्ट्रातील रुग्णालयातून होणं ही बाब भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या भारताच्या उन्नतीचा चढता आलेख पाहता विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गातलं भारताचं हे पुढचं पाऊल आहे असं म्हणता येईल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.