युक्रेन पाठोपाठ आता कॅनडामधील भारतीय विद्यार्थी चिंतेत…कारण जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याच नातेवाईकांपैकी, कुटुंबीयांपैकी कुणी ना कुणीतरी हमखास अमेरिकेत, लंडनला शिकायला गेलेलं असतं. परदेशी जाऊन उच्चशिक्षण घेण्यामागे उत्तम शैक्षणिक दर्जा आणि त्यानंतर मिळणारी उत्तम पॅकेजची नोकरी ही दोन ध्येय अनेकांच्या डोळ्यांसमोर असतात. असेही विद्यार्थी असतात ज्यांना परदेशात शिकून झाल्यावर आपल्या देशात परतून काम करायचं असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर आता आधीपेक्षाही खूप जास्त काळजी घ्यावी लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ‘घोटाळे’ ही गोष्ट आपल्यासाठी नवी नाहीच. पण असे घोटाळे प्रचंड खर्च करून परदेशात शिक्षण घ्यायला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू लागले तर उज्ज्वल भविष्याचं स्वप्न उरी बाळगून विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला जायचं तरी कसं? कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय.
कॅनडातल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना, ज्यात जवळपास ७०० ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहणारे विद्यार्थी आहेत अशा सगळ्यांना कॅनडातल्या ३ महाविद्यालयांकडून फसवलं गेलंय. या महाविद्यालयांनी आपण कर्जबाजारी झाल्याचं जाहीर करून या विद्यार्थ्यांची हजारो डॉलर्सची बक्कळ फी बुडवली आहे. कॅनडातल्या भारतीय विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. नेमकं घडलंय काय? जाणून घेऊ.
कॅनडातील मॉन्ट्रियालमधल्या एम कॉलेजने, शेरब्रुक मधल्या सीइडी कॉलेजने आणि लॉंग्युइलमधल्या सीसीएसक्यू कॉलेजने कर्जबाजारी झालो आहोत असं जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून हजारो डॉलर्सची फी मागितली होती.’रायझिंग फिनिक्स इंटरनॅशनल इंक’तर्फे ही तिन्ही कॉलेजेस चालवली जातात.
ज्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांनी फी भरली त्यांचे सगळे पैसे बुडाल्यामुळे ते प्रचंड हवालदिल झाले आहेत. ‘मांट्रियाल युथ स्टुडंट ऑर्गनाझेशन’शी संबंधित विद्यार्थ्यांनी अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने या सगळ्याविरोधात १७ फेब्रुवारीला ब्रम्प्टममधील टोरोंटोच्या उपनगरात एक कार रॅली काढली होती. “हक्क मिळवायला आलो आहोत. हक्क मिळवूनच जाऊ.” अशा घोषणा या आंदोलनादरम्यान केल्या गेल्या.
या आंदोलनादरम्यान नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजेसमधून आपले कोर्सेस पूर्ण करता यावे, ज्यांचे कोर्सेस पूर्ण होत आलेत त्यांना त्यांच्या जुन्या क्रेडिट्सनुसारच कोर्स पूर्ण करण्याची परवानगी मिळावी अश्या मागण्या केल्या गेल्या. यापूर्वी २९ जानेवारीलादेखील विद्यार्थ्यांनी आपला विरोध दर्शवला होता.
पंजाबमधील लोंगोवालमधून आलेल्या मनप्रीत कौर या विद्यार्थिनीने ‘एम कॉलेज’मध्ये १४,००० डॉलर इतकी वार्षिक फी भरली होती. ‘बाल्यावस्था पूर्व शिक्षण’ या विषयावरचे आपले वर्ग कधी सुरू होतील याची ती वाट पाहत असताना जानेवारीत कॉलेजने अचानक कर्जबाजारी झाल्याचं जाहीर केलं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना ती म्हणाली, “९ ऑक्टोबरला जेव्हा मी कॅनडात उतरले तेव्हा मला असं सांगण्यात आलं की कॉलेजला अजून वर्ग सुरू करायला पुरेसे विद्यार्थी मिळाले नसल्याने जानेवारीत वर्ग सुरू होतील. ६ जानेवारीला अचानक कॉलेज कर्जबाजारी झालंय असा विद्यार्थ्यांना मेल आला. आम्ही घोटाळ्यात अडकले गेलो.”
मनप्रीतने कॅनडात येण्यापूर्वी भारतात कम्प्युटर्समध्ये मास्टर्स केलं होतं. कर्नलहून आलेला विशाल राणा हा विद्यार्थी ‘मेडिकल ऑफिस स्पेशॅलिस्ट’ होण्यासाठी ‘सीसीएसक्यू कॉलेज’मध्ये शिकत होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना तो म्हणाला, “माझ्या १६ महिन्यांच्या कोर्समधले केवळ चारच महिने बाकी उरले होते. मी कुठे जाऊ हे मला कळत नाहीये.” राणाने २४,००० डॉलर्सफी भरली होती. आठवड्याला २० तास नोकरी करण्याची कायदेशीर परवानगी नसल्याने आपल्याकडचे पैसे संपले तर आपण इथे कसे दिवस काढायचे या चिंतेत विद्यार्थी आहेत.
यानंतर भारतीय उच्च आयोगाने एका ऍडवायजरीत असं म्हटलंय की, “या तिन्ही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च आयोगाला संपर्क केला आहे.”ज्या भारतीय विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत करण्यासाठी उच्च आयोग कॅनडाचं सांघिक सरकार, क्युबेकचं प्रांतीय सरकार आणि भारतीय समुदायाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींसमवेत एकत्र मिळून काम करत आहे असं या ऍडवायजरीत म्हटलंय.
या ऍडवायजरीत उच्च आयोगाने असं आश्वासन दिलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे या विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. उच्च आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारात नुकसान झालेल्या या तीन महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांना या कॉलेजेसव्यतिरिक्त दुसऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला आहे.
भारतीय उच्च आयोगाच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान, नुकसान झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना आपले पैसे परत मिळवण्यात अडचणी येत असतील ते विद्यार्थी क्युबेक सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाकडे थेट तक्रार नोंदवू शकतात.
उच्च आयोगाने भारतीय विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की ज्या भारतीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी कॅनडात जायचंय त्यांनी जिथे प्रवेश घ्यायचा आहे त्या संस्थांमध्ये कुठलीही रक्कम भरण्यापूर्वी त्या संस्थांची प्रमाणपत्रं आणि योग्यता काळजीपूर्वक तपासावी.
उच्च आयोगाचे सल्लागार म्हणाले, “संस्थांकडून आपल्याला ओळखपत्र मिळावं अशी कॅनडा सरकारकडे किंवा प्रांतीय सरकारकडे कृपया मागणी करा आणि कॅनडा सरकारच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या नियुक्त शिक्षण संस्थांच्या यादीत आपण ज्या संस्थेत शिक्षण घेण्यास उत्सुक आहोत त्या संस्थेचं नाव आहे का याची खात्री करून घ्या.
–
- कॉर्पोरेट जॉबच्या पगाराला तोडीस तोड पैसे शेतीतून कमावणारा तरुण!
- ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्या’ हाच ध्यास घेतलेल्या २ भावांबद्दल…
–
कुठलेही पुरावे न दाखवता, आपली सत्यता सिद्ध न करता जर एखादी व्यक्ती किंवा संस्था तुम्हाला पैशांच्या मोबदल्यात व्हिसा देत असेल तर विद्यार्थ्यांनी अजिबात कुठलीही रक्कम भरू नये आणि आपली वैयक्तिक माहिती उघड करू नये.”
जिथे उच्चशिक्षण घ्यायचंय त्या विदेशी संस्थेची पुरेशी माहिती आता विद्यार्थ्यांनी करून घेतली नाही तर विद्यार्थ्यांना कदाचित अशाच एखाद्या अकल्पित परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. हे जर टाळायचं असेल तर आता विद्यार्थ्यांनी कमालीचं सजग राहायला हवं. कॅनडातल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळो!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.