वयाची तिशी गाठण्यापुर्वी काहीही करा, पण “हा” अनुभव घ्याच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जवळ बाईक असेल तर प्रवास करणे आणि नवनवीन प्रदेशांना भेटी देणे अगदी सहज शक्य होते.
पण बहुतेक जण जवळ बाईक असून देखील त्याचा वापर केवळ कामावरून घरी परतण्यासाठी आणि पुन्हा सकाळी घरून कामाला जाण्यासाठी करतात.
त्यांच्याही मनात असतं की रोड ट्रीप वर जावं, एक रोमांचकारी प्रवास अनुभवावा, पण काही कारणांमुळे ते शक्य होत नाही.
“जाऊ, जाऊ” करत ते कधीच जात नाही.
मग एकदा का वयाची ३० वर्षे पूर्ण झाली, माणूस संसारात अडकला की सगळेच प्लान फसतात. त्यानंतर मात्र कधीही ही रोड ट्रीपची मज्जा अनुभवता येत नाही.
म्हणून तुम्हाला सांगतोय, जर अजूनही तुम्ही विशीत असाल आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!
१. मनाली ते लेह
अंतर – ४८० किमी
देशातील सर्वात सुंदर नजारा तुम्हाला या हायवेवर बघायला मिळेल. जवळपास ४८० किलोमीटरचे हे अंतर तुम्हाला रोमांचकारी अनुभव देईल.
जर तुमच्याकडे बुलेट नसेल तर तुम्ही दिल्ली किंवा मनालीवरून ती भाड्याने सुद्धा घेऊ शकता.
हि जवळपास दोन दिवसाची ट्रिप असेल फक्त तुम्ही जास्त आराम करू नका.
या रस्त्यावर हवामानानुसार काही ठिकाणी चिखल, बर्फाचा रस्ता आणि नाले येतील, त्यांना न घाबरता फक्त ट्रिपची मज्जा घ्या.
या ट्रिपसाठी मे किंवा जून सर्वात चांगला कालावधी आहे.
२. चेन्नई ते पुडुचेरी, इस्ट कोस्ट रोड मार्गाने
अंतर – १६० किमी
ही ट्रीप तुम्हाला भारताच्या पूर्व तटावरून घेऊन जाते. सोबत डोंगर आणि नद्याही तुमच्यासोबत पळतील.
याव्यतिरिक्त मार्गात कितीतरी ऐतिहासिक पर्यटन स्थळे सुद्धा तुमच्या स्वागतासाठी तयार असतात. जसे की, महाबलीपुरम, कल्पक्कम, मुदलीकरूपम आणि मारककनम.
ट्रिपच्या शेवटी तुम्ही आणि तुमची बाईक सुंदर समुद्री तट आणि किनाऱ्यावरून सूर्यास्ताचा नजारा घेत उभे असाल. ही ट्रीप कोणत्याही मोसमात उत्तम आहे.
३. मुंबई ते गोवा
अंतर – ५९१ किमी
या ट्रिप बद्दल तुम्हाला वेगळ्याने विशेष काही सांगायची गरज नाही. तुम्हा सर्वांनाच या मार्गाबद्दल माहिती असेल. या ट्रीपला ‘फादर ऑफ रोड ट्रिप्स’ पण म्हटले जाते, कारण ही ट्रीप आहेच तितकी साहसी!
तुम्ही NH १७ आणि NH ४८ ने मस्तपैकी निसर्गाच्या वेगवगेळ्या रंगांचा आस्वाद घेत जवळपास १० तासांत ही ट्रिप पूर्ण करू शकता. पावसाळ्याची वेळ ह्या ट्रिपसाठी योग्य आहे.
४. गुवाहाटी ते तवांग
अंतर – ५१० किमी
जर तुम्ही रोड ट्रिप भन्नाट अनुभवासाठी करत असाल, तर ही ट्रिप तुमच्यासाठीच आहे.
फक्त त्यासाठी तुम्ही शरीराने सुदृढ (फिट) असणे गरजेचे आहे आणि तेवढेच मानसिकरीत्या सक्षम असला पाहिजेत.
कारण उत्तर-पश्चिमी रस्ता आणि जोरात वाहणारी हवा चांगल्या-चांगल्या लोकांच्या साहसीपणाची येथे परीक्षा घेते.
संपूर्ण मार्गावर ढग आणि धुके तुमच्या सोबत असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त बिनधास्त ट्रक चालक तुम्हाला प्रत्येक वळणावर भेटतील.
इथे जाण्यासाठी तुमच्याकडे ILP(Inner Line Permit) असणे गरजेचे आहे कारण तुम्ही अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश करणार आहात.
या ट्रिपसाठी एप्रिल पासून जून पर्यंतचा कालावधी योग्य आहे.
पावसाळ्यात हा रस्ता खूप धोकादायक आहे आणि थंडीमध्ये तर धुकं इतकं असतं की समोरचं काहीही दिसत नाही.
५. बँगलोर ते उटी नॅशनल पार्क मार्गे
अंतर – २८० किमी
बांदीपूर नॅशनल पार्क भारतातील काही अशा पार्कमधील एक आहे जिथून तुम्ही रोड ट्रिप करू शकता.
तुम्हाला रस्त्यात हरीण, हत्ती किंवा चित्ता दिसले तर दचकून जायचं कारण नाही. हि ट्रीप अतिशय आरामदायक आणि सुंदर आहे.
सोबतीला असणारे डोंगर, ढग, आकाश आणि हिरवाई यांचे बदलते रंग आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही.
इथे तुम्ही जानेवारी ते एप्रिलच्या मध्ये कधीही जाऊ शकता, याव्यतिरिक्त पावसाळ्यात एक वेगळीच मज्जा आहे.
६. जयपूर ते जैसलमेर
अंतर – ५६८ किमी
राजपुतांचे राज्य राजस्थान स्वत:मध्ये इतिहास सामावून आहे.
जयपूर ते जैसलमेरच्या मार्गामध्ये तुम्हाला कितीतरी किल्ले, मंदिरे आणि असंख्य उंट दिसतील. रंगीत फेटा, सफेद कुर्ता आणि हातात सारंगी घेऊन कोणी दिसलाच तर त्याच्याकडून राजस्थानी गाणे ऐकत पुढे जावे.
या ट्रिपसाठी उत्तम वेळ डिसेंबर ते फेब्रुवारी ही आहे. बाकी महिन्यांचे ऊन कदाचित आपण सहन करू शकणार नाही.
७. श्रीनगर ते लेह
अंतर – ४३४ किमी
बुलेट चालवणाऱ्यांसाठी हिमालयीन रोड ट्रिप सर्वात साहसी प्रवास असतो. बर्फाचे डोंगर, हवा, एकांत, तुम्ही आणि तुमची बुलेट! हा अनुभव अवर्णनीय आहे.
या ट्रिपमध्ये तुम्हाला खडकाळ रस्त्यांमधून सुंदर निसर्ग डोळ्यात साठवत प्रवास सुरु ठेवायचा असतो.
रस्त्यात तैनात असलेले सैन्य, त्यांचे कॅम्प आणि तुमच्या पुढे चालत असलेले त्यांचे ट्रक असा अनुभव तुम्हाला इतर कोणत्याही रोड ट्रीप मध्ये मिळणार नाही.
हवामानाच्या दृष्टीने श्रीनगर ते लेह हायवे मे ते ऑक्टोंबर पर्यंत चालू असतो. तरीही सर्वोत्तम वेळ म्हणून तुम्ही तुमचा प्लान जून ते जुलैच्या मध्ये बनवा.
८. मुंबई ते रन ऑफ कच्छ
अंतर – ६२० किमी
हा रस्ता एका गजबजलेल्या शहरापासून तुम्हाला एका शांत प्रदेशात घेऊन जातो.
मुंबईमधील उंचचउंच इमारतींनंतर दिसणारा निळा समुद्र तट आणि नंतर सफेद वाळवंट तुम्हाला निशब्द करून सोडेल.
कच्छच्या प्रचंड मोठ्या खुल्या मैदानासमोर तुम्ही स्वतःला नगण्य समजाल. इथे सूर्य तुम्हाला थोडे उन्हाचे चटके देईल पण नंतर तुम्ही मांडवी बीचवर आराम करू शकता.
पण लक्षात ठेवा की तुमच्याकडे Dhordo च्या डीएसपीची परवानगी असली पाहिजे. इथेही तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्ये गेलात तर उत्तम, नाहीतर उन्हाने तुमची हालत खराब होईल. डिसेंबरमध्ये गेलात तर येथील प्रसिद्ध रण उत्सवचा अनुभव घेता येऊ शकेल.
९. शिमला ते मनाली, किन्नौर आणि स्पिटी व्हॅली मार्गे
अंतर – १००० किमी पेक्षा जास्त
ही रोड ट्रिप भारतातील सर्वात धोकादायक रोड ट्रिप पैकी आहे.
NH२२ ह्या जुन्या भारत-तिबेट रोडची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. पण या मार्गावर रस्ता फक्त हाच आहे.
जेव्हा किन्नौर व्हॅली मधून तुम्ही जाता तेव्हा काहीतरी वेगळाच अनुभव येतो. इथे तुम्ही निसर्गाच्या अजून जवळ येता.
कृपया येथे गेलात तर मोठ्या ग्रुप बरोबरच जा, कारण हा मार्ग खूप निर्जन आहे. थंडीच्या महिन्यापासून जून पर्यंत तुम्ही कधीही येथे जाऊ शकता.
१०. दार्जीलिंग ते सिक्कीम
अंतर – NH १९ पासून १२६ किमी
या रस्त्याला सिल्क मार्ग म्हटले जाते. तुम्ही दार्जीलिंग ते सिक्कीम, सिल्क मार्गाच्या त्या जुन्या रस्त्यावरून प्रवास कराल जो कधी भारत-चीन मधला महत्त्वाचा दुवा होता.
या मार्गावर तुम्ही सीमा पार करणार आहात, त्यामुळे तुमच्याकडे लिखीत परवानगी असणे गरजेचे आहे.
हिमालयाचे टोक आणि चहाचे बगीचे इथे तुमची वाट पाहत असतील जे तुमच्या मनाला स्वर्गीय सुख देतील.
या ट्रिपसाठी सर्वात चांगली वेळ नोव्हेंबर ते जून आहे. पावसाळ्यात येथे जाऊ नका कारण त्यावेळी येथील खूप रस्ते बंद असतात आणि तुम्ही येथे फसू शकता.
महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्ही अनेक रोड ट्रीप केल्या असतील, पण खऱ्या रोड ट्रीप काय असतात ते पाहायचे असेल तर चाकोरीबाहेरचे हे मार्ग नक्की अनुभवा, पण ते देखील संपूर्ण सुरक्षिततेसहच बरं का!
हे देखील वाचा : बाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.