' हिमालयातल्या योगीच्या तंत्राने देशाचे सर्वात मोठे Stock exchange चालवणाऱ्या चित्रा रामकृष्ण! – InMarathi

हिमालयातल्या योगीच्या तंत्राने देशाचे सर्वात मोठे Stock exchange चालवणाऱ्या चित्रा रामकृष्ण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नोकरी करत असतांना प्रत्येक व्यक्ती आपलं एक व्यक्तिगत आयुष्य सुद्धा जगत असतो. उदरनिर्वाह करण्यासाठी एक ठराविक वेळ देऊन आपण इतर वेळात आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यवसायिक आयुष्यात प्रत्येक व्यक्तीवर ‘गोपनीयता’ राखण्याची एक जबाबदारी असते.

“जसं घरातील गोष्टी घरातच रहाव्यात” असं म्हणतात तसं प्रत्येक कंपनी, संस्था यांचे काही नियम असतात. संस्थापक किंवा प्रशासक व्यक्तींना कामाचं नियोजन करतांना कोणत्याही व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण, हे मार्गदर्शन घेत असतांना कुठे थांबलं पाहिजे ? हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. ते नाही कळलं तर तुमच्या नावाच्या आधी ‘माजी’ हा शब्द वापरला जाणार हे निश्चित आहे.

 

family watching tv inmarathi

 

नुकताच हा ‘माजी’ शब्द नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्ष ‘चित्रा रामकृष्ण’ यांच्या नावाच्या आधी लागला आणि एका बहरत असलेल्या करिअरला पूर्णविराम लागला. चित्रा रामकृष्ण यांनी अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यावर एका अध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या नादात त्या आपलं कर्तव्य विसरल्या आणि आपलं पद, प्रतिष्ठा गमावून बसल्या. एखाद्या वेबसिरीजला साजेशी काय आहे चित्रा रामकृष्ण यांची स्टोरी ? जाणून घेऊयात.

 

 

१९८५ मध्ये चित्रा रामकृष्ण यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयडीबीआय बँकेत ‘प्रोजेक्ट फायनान्स’ या विभागात काम करून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही वर्षांनी आवश्यक ती स्पर्धा परीक्षा देऊन त्यांनी ‘सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)’ मध्ये काम करण्याची संधी मिळवली. दोन वर्ष सेबी सोबत काम केल्यानंतर त्यांनी परत आयडीबीआय बँकेसोबत काम करण्याचं ठरवलं.

 

chitra im

१९८९ मध्ये आयडीबीआय बँकेचे तत्कालीन चेअरमन एस एस नाडकर्णी यांच्यावर ‘नॅशनल सिक्युरिटी एक्सचेंज’ (एनएसई)ची स्थापना करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने सोपवली होती. चित्रा रामकृष्ण यांचा ‘सेबी’ सोबतचा काम करण्याचा अनुभव लक्षात घेऊन नाडकर्णी सरांनी त्यांची ‘एनएसई’ मध्ये काम करण्यासाठी निवड केली होती. त्यावेळी चित्रा या सेबीच्या काही समितींवर सदस्या म्हणून आपलं योगदान द्यायच्या.

एनएसई ची स्थापना झाली तेव्हा त्यांनी ‘स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग’ सारखे उपक्रम हाती घेतले ज्यामुळे भारतातील ‘रिटेल इन्व्हेस्टर’ हा शेअरमार्केट कडे आकर्षित झाला.  चित्रा रामकृष्ण यांच्यावर माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात सुधारणा आणि ट्रेडिंग मधील सुसह्यता वाढवणे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. ‘कॉर्पोरेट बॉण्ड्स’, ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ सारख्या आर्थिक गुंतवणूक करण्याची संधी त्यांनी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली.

आपल्या मौल्यवान योगदानासाठी त्यांची २०१३ मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज या भारतातील सर्वात मोठ्या आणि जगातील सातव्या क्रमांकावर असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ पदावर नेमणूक झाली होती.

 

nse im

 

चित्रा रामकृष्ण यांचं करिअर एकीकडे बहरत होतं आणि व्यक्ती म्हणून त्यांचा ‘टॉप वूमन इन बिजनेस वर्ल्ड’ सारख्या फोर्ब्ज मासिकाने दिलेल्या उपाधींनी त्यांचा मान वाढत होता. आशिया खंडातील त्या केवळ तिसऱ्या महिला आहेत ज्या राष्ट्रीय ‘स्टॉक एक्सचेंज’चं नेतृत्व करत होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘एनएसई’ ही संस्था आपल्या प्रत्येक व्यवहारात पारदर्शक झाली होती आणि आपला विस्तार त्यांनी भारतातील १५०० ठिकाणी आपल्या सेवाकेंद्रांची सुरुवात केली होती.

चित्रा रामकृष्ण यांनी २००९ मध्ये सुरुवात केलेल्या सुविधांपैकी ‘को-लोकेशन’ ही सेवा सर्वात जास्त चर्चेत राहिली होती. या सेवा अंतर्गत, विविध ट्रेडर्स ला ‘एनएसई’च्या डेटा सेंटर कार्यालयात आपलं सर्व्हर ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मार्केट मधील घडामोडींची, स्टॉक एक्सचेंजने जाहीर केलेली माहिती यांची त्वरित माहिती प्रमुख गुंतवणूकदारांना कमी वेळात मिळावी हा या परवानगी देण्यामागचा उद्देश होता.

‘को-लोकेशन’ ही सुविधा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीतच गुंतवणूकदारांना ‘टिक-बाय-टिक’ माहिती मिळू लागली आणि त्यांना या योजनेचा खूप फायदा होऊ लागला. ही माहिती पुरवण्यासाठी चित्रा रामकृष्ण यांनी खूप मोठा खर्च करून ‘टीसीपी/आय पी’ हे नेटवर्क उभं केलं होतं.

 

Stockmarket.marathipizza
cdn.moneycrashers.com

२०१५ पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण, त्या वर्षापासून चित्रा रामकृष्ण यांच्या करिअरला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. त्यावर्षी कित्येक गुंतवणूकदारांनी ‘सेबी’कडे अशी तक्रार केली की, ‘को-लोकेशन’ या सुविधेमुळे काही निवडक गुंतवणूकदारांकडे एनएसई विशेष लक्ष देत आहे आणि त्यांच्या संगनमताने शेअरमार्केट मध्ये उतार चढाव होत आहेत.

सेबीने केलेल्या चौकशीत त्यांना सुद्धा हेच आढळलं की, काही तगड्या ट्रेडर्स मंडळींना वेळेआधी लॉगिन करण्याची परवानगी, एका सेकंदापेक्षाही कमी काळात घडणाऱ्या घडामोडीचा तपशील मिळत असल्याने ठराविक ट्रेडर्स हे योग्य ती पाऊलं उचलून आपला नफा कित्येक पटीने वाढवत आहेत.

‘ओपीजी सिक्युरिटी’ ही कंपनी हा अवैध फायदा उचलण्यात सर्वात पुढे होती. चित्रा रामकृष्ण या चौकशी अहवालानंतर चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. पण, या घोटाळ्यात त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत रवी नारायण, आनंद सुब्रमण्यम आणि हिमालयातील एक कोणीही न बघितलेले ‘योगी’ यांचा समावेश होता.

 

ravi im

 

सेबीने चित्रा रामकृष्ण यांच्या २० वर्षांपेक्षा अधिक करिअरचा जेव्हा पूर्ण अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, चित्रा रामकृष्ण यांनी आजवर घेतलेले सर्वच निर्णय हे हिमालयात रहाणाऱ्या ‘योगी’च्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहेत. हा जरी चित्रा रामकृष्ण यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही, ” चित्रा रामकृष्ण यांनी त्या ‘योगी’ला ई-मेल द्वारे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कामाची दिलेली संपूर्ण माहिती देणं हे अनैतिक, नियमबाह्य आहे” असं सेबीने आपल्या अहवालात लिहिलं होतं.

‘योगी’च्या सल्ल्यावरूनच आनंद सुब्रमण्यम यांना अल्पावधीतच ‘ऑपरेटिंग ऑफिसर’ या पदावर पदोन्नती दिल्याची कुबुली स्वतः चित्रा रामकृष्ण यांनी चौकशी दरम्यान दिली होती.

चित्रा रामकृष्ण यांनी ‘योगी’ बद्दल सांगतांना ही माहिती दिली की, “ते सिद्धपुरुष मला २० वर्षांपूर्वी गंगेच्या काठी भेटले होते. त्या ‘परमहंस’ व्यक्तीकडून मी माझ्या आयुष्याचे सर्वच वैयक्तिक आणि व्यवसायिक निर्णय घेतांना मार्गदर्शन घेत असते.

मी त्यांच्यासोबत ई-मेल द्वारे संपर्क साधायचे. आमच्या प्रत्येक ई-मेल संभाषणात सुब्रमण्यम यांचा सुद्धा सहभाग असायचा. ‘योगी’ यांना कोणताही प्रश्न विचारतांना माझे मत असायचे, मी ते फक्त योगींच्या मताशी जुळतात की नाही हे तपासून घ्यायचे. जसं, खासगी क्षेत्रातील उच्च पदावरील व्यक्ती कोच, मेंटर यांचं मार्गदर्शन घेतात, तसंच मी ‘योगी’ यांच्याकडून मार्गदर्शन घेत असते.”

 

email marketing inmarathi

 

आनंद सुब्रमण्यम यांची सल्लागार पदी झालेली नियुक्ती ही ‘योगी’च्या सांगण्यावरूनच झाली होती. कोणत्याही कंपनी किंवा प्रशासकीय सेवेत असलेले एचआर चे सर्व नियम यासाठी चित्रा रामकृष्ण यांनी धाब्यावर बसवले होते. १५ लाख रुपयांच्या पॅकेजवर काम करणाऱ्या आनंद सुब्रमण्यम यांना आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा कोणताही अनुभव नसतांना १.६८ कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज देऊन ‘सल्लागार’ पदावर २०१३ मध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. २०१६ मध्ये हे पॅकेज ४ कोटी रुपयांवर नेऊन ठेवण्यात आलं होतं. इतकी वाढ क्वचितच एखाद्या नोकरीत मिळत असावी.

सेबी ने ही संपूर्ण माहिती मीडिया समोर आणली आणि त्यानंतर चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा दंड सुनावण्यात आला. त्यांच्यासोबत या सर्व अवैध कामांमध्ये साथ देणारे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी संचालक रवी नारायण आणि आनंद सुब्रमण्यम यांना ३ वर्ष शेअरमार्केट मध्ये कोणताही व्यवहार करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

 

sebi im

 

सेबीने जाहीर केलेल्या महितीनंतर चित्रा रामकृष्ण यांना आपल्या सर्व पदांवरून पायउतार व्हावे लागले. रवी नारायण, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि आनंद सुब्रमण्यम यांना वैयक्तिकरित्या २ कोटी दंड सुनावण्यात आला आहे.

आपली श्रद्धा ही एखाद्या व्यक्तीवर केंद्रित करण्यापेक्षा जर ती आपल्या कामावर ठेवली तर चित्रा रामकृष्ण यांच्या करिअरला लागली तशी उतरण ही नक्कीच टाळल्या जाऊ शकते. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया सध्या सगळेच या प्रकरणावर चर्चा करून तोंडसुख घेत आहेत. ‘कुठे थांबायचं ?’ हे जर माजी एनएसई संचालक चित्रा रामकृष्ण यांना लक्षात आलं असतं तर त्यांचं पद शाबूत राहीलं असतं आणि वैभवशाली एनएसईचं जगात हसं झालं नसतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?