Site icon InMarathi

पुष्पा डोक्यावर घेतलात, पण तेवढंच प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे!

pawankhind featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

खरंतर तान्हाजीचा प्रयोग बघून ऐतिहासिक सिनेमाविषयी मनात जी धडकी भरली होती ते पाहता मी कुठलाही ऐतिहासिक सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये जाऊन बघेन असं वाटलं नव्हतं, कारण भारतीय चित्रपटसृष्टीत अशी फार कमी लोकं आहेत जी ऐतिहासिक सिनेमा निर्मळ मनाने सादर करतात.

तुम्ही कोणताही फिल्ममेकर घ्या अगदी राजकुमार संतोषी, आशुतोष गोवारीकरपासून संजय लीला भन्साळीपर्यंत, तो दिग्दर्शक जेव्हा ऐतिहासिक सिनेमा करतो तेव्हा तो त्यातून त्याला समजलेला इतिहास आणि कथानक मांडत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेमॅटिक लिबर्टी सगळेच घेतात पण हीच सिनेमॅटिक लिबर्टी योग्य पद्धतीने वापरणारे दिगपाल लांजेकरसारखे काही प्रयोगशील दिग्दर्शक आहेत जे शक्य होईल तितका फॅक्टशी जोडलेला इतिहास दाखवायचा प्रयत्न करतात.

फर्जंद, फत्तेशिखस्तनंतर या सिरीजमधला दिगपाल यांचा पावनखिंड हा सिनेमा प्रदर्शित झालाय, लोकांचा उदंड प्रतिसाद त्याला मिळतोय, शिवजयंतीच्या मुहूर्तावर तर सिनेमाने चांगलीच ओपनिंग केली आहे!

 

 

तरी सिनेमा म्हंटलं की त्यात चांगली आणि कमकुवत बाजू दोन्ही आल्या, त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण सिनेमाच्या उत्कृष्ट गोष्टींकडे येऊयात. मुळात ज्या घोडखिंडीची गोष्ट, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलसेनेच्या पराक्रमाविषयी आपण शाळेपासून शिकत आलोय ती गोष्ट एवढ्या मोठया पडद्यावर मांडणं यातच अर्धी लढाई दिगपालने जिंकली आहे, त्यामुळे विषयाच्या बाबतीत नक्कीच हा सिनेमा लोकांना थिएटरकडे खेचून आणण्यात यशस्वी होईल.

शिवाय या सिनेमात इतर बॉलिवुड सिनेमाप्रमाणे गाण्यांचे प्रमाण कमी असल्याने सिनेमाशी अपन कनेक्टेड राहतो, अर्थात तरी सुरुवातीचं गाणं टाळता येऊ शकलं असतं पण ठिके तेवढं चालून गेलं!

 

 

तिसरी गोष्ट म्हणजे या सिनेमाचं प्रेझेंटेशन, ज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.

सिनेमात तांत्रिक त्रुटी आहेत त्याविषयी आपण पुढे बोलूच पण साऊथच्या सिनेमांना टक्कर देण्याची मराठी सिनेमाची तयारी आहे हे या सिनेमाच्या माध्यमातून दिसून येतं.

लोकांना पुष्पाच्या झोनमधून बाहेर खेचून प्रेक्षकांना मराठी सिनेमाकडे वळवण्यात या सिनेमाला चांगलं यश मिळालं आहे याबद्दल काहिच दुमत नाही, तब्बल २ ते ३ दिवसाचे शोज आत्ताच हाउसफुल आहेत यावरून तुम्ही अंदाजदेखील लावू शकता.

सिनेमाच्या काही कमकुवत बाजूदेखील आहेत, किंबहुना दिगपाल यांच्या इतर सिनेमांपेक्षा सर्वात जास्त त्रुटी मला पावनखिंडमध्ये आढळल्या, अर्थात या त्रुटी कुठेही तुमचा सिनेमा बघायचा experience खराब करत नाहीत, पण सध्याचा प्रेक्षक हा चांगलाच स्मार्ट झाला आहे त्यामुळे या बेसिक गोष्टी तेसुदधा अचूक ओळखतात.

तान्हाजीप्रमाणे या सिनेमातही शत्रूला पुन्हा कॅरीकेचरीश दाखवलं गेलं आहे, सिद्दी जोहर हे पात्र जेव्हा सुरुवातीला येतं तेव्हा काही ठिकाणी ते बघून हसू आवरत नाही, पण नंतर त्या पात्राची सवय होते पण तरीही सिद्दी जोहर नेमका कोण होता? त्याची पार्श्वभूमी काय होती? त्याने पन्हाळाला वेढा कसा घातला? या बेसिक गोष्टी सिनेमात येणं अपेक्षित होतं!

 

 

शिवाय अस्ताद काळे याने केलेली भूमिका तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला irritate करते, समीर धर्माधिकारीने सिद्दी जोहर उभा करायचा प्रयत्न केलाय पण लिखाणात मात्र खूप मार खाल्ला आहे, शिवाय इतरही आदिलशाहीचे म्होरके खूप उथळपणे सादर केले आहेत, खरंतर दिगपालसारख्या जाणकार दिग्दर्शकाच्या सिनेमातून हे असं अपेक्षित नाहीये पण पावनखिंडच्या बाबतीत ते झालंय हे मात्र खरं!

बाकी इतरही कलाकारांची कामं ठीक ठाक झाली आहे, आदिलशाही सलतनतची बडी बेगम साकारणारी क्षिती जोग प्रचंड लाऊड वाटते, जिजाऊ साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी या उगाच आव आणल्यासारखं बोलतायत असंच वाटत होतं, शिवाय प्राजक्ता माळीलासुद्धा म्हणावा तसा स्क्रीन टाईम नव्हता.

चिन्मय मांडलेकरने साकारलेले शिवाजी महाराज काहींना आवडतील, काहींना आवडणार नाही, पण स्वराज्य आणि सुराज्य यांच्यातला फरक सांगणारे आणि इंटर्व्हलच्या आधी येणाऱ्या सिनमध्ये मोहिमेला सुरुवात होण्याआधी मावळ्यांच्या मनात साहस निर्माण करणारे शिवाजी महाराज बघताना काही क्षण आपण विसरतो की त्या भूमिकेत एक नट काम करतोय!

 

हे दोन सीन्स सोडले तर बाकी सगळ्या ठिकाणी चिन्मय मांडलेकर महाराजांची भूमिका वठवताना वाटतो!

सर्वात जास्त लक्षात राहतात ते शिवा काशीद साकारणारा अजिंक्य ननावरे आणि राया हे पात्र साकारणारा अंकित मोहन, या दोघांची कामं लाजवाब झाली झालीच आहेत शिवाय दोघांचे शेवटही मनाला चटका लावून जाणारे आहेत!

बाजीप्रभू देशपांडे साकारणाऱ्या अजय पुरकर यांनी तर निव्वळ कमाल केली आहे. त्यांचा तो मोठा पॉज घेऊन “चल….” म्हणण्याच्या swag पासून घोडखिंडीत मावळ्यांना लढण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या भाषणापर्यंत सगळ्याच सीन्समध्ये अजय पुरकर यांनी सिद्ध केलंय की बाजीप्रभू हे अगदी असेच असावेत!

 

 

फक्त शरीरयष्टीच नाही तर वयाचा विचार करतासुद्धा अजय पुरकर यांनी अगदी अचूक बाजीप्रभू साकारले आहेत, खासकरुन तोफा डागण्याआधी ज्या पद्धतीने बाजीप्रभू लढताना दाखवले आहेत ते बघताना लतादीदी यांच्या आवाजातल्या ‘सरणार कधी रण..’ चे शब्द अन शब्द डोळ्यासमोर येत होते, त्या गाण्यातून उभं केलेलं चित्र हे काहीसं असंच असावं अशी आपली मनोमन खात्री पटते.

पावनखिंडची सर्वात मोठी कोणती कमकुवत बाजू असेल तर ती या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट, इथे या सिनेमाने मात्र सपशेल मार खाल्ला आहे. अर्थात या सिनेमाचं बजेट बघता जो सिनेमा आपल्यासमोर मांडलाय तो चांगलाच आहे पण आणखीन बराच उत्तम बनू शकला असता!

काही काही सीन्समध्ये स्पेशल इफेक्ट किंवा VFX इतके गंडलेत की त्या सिनची मजाच निघून जाते, स्टंट सीन्स किंवा तलवारीचे action scenes चांगले घेतले आहेत पण घाव झाल्यावर उडणारं रक्त किंवा पाऊस हे इतकं विचित्र आहे की या लेव्हलचं ऍनिमेशन सध्याच्या कार्टून्समध्येसुद्धा बघायला मिळत नाही ते आपल्याला या सिनेमात दाखवल्याने प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो.

शिवाजी महाराजांचा किंवा इतर महापुरुषांचा  इतिहास खरंतर बाहुबलीसारख्या pan india लेव्हलवर मांडणं अपेक्षित आहे पण त्यासाठी मराठी निर्मात्यांनी त्यांचे खिसेसुद्धा हलके करणं तितकंच महत्वाचं आहे.

 

 

अर्थात या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी पावनखिंडचा शेवटचा अर्धा तास पैसा वसूल ठरतो, पहिला दीड तास थोडा खेचलेला वाटतो पण सिनेमाचा सेकंड हाल्फ तुम्हाला खिळवून ठेवतोच शिवाय तुम्हाला इमोशनलसुद्धा करतो!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आणि त्यांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याकरता धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या शौर्यासाठी हा सिनेमा तुम्ही नक्कीच बघू शकता, काही गोष्टी खटकत असल्या तरी मराठी सिनेमांना आणि खासकरुन ऐतिहासिक सिनेमांना आपणच पाठिंबा द्यायला पाहिजे!

जेवढं प्रेम आपण पुष्पाला दिलंय तेवढंच प्रेम या सिनेमालाही मिळायला हरकत नाही, पुष्पा तरी काल्पनिक पात्रं आहे पण हा तर आपण लहानपणापासून ऐकत आलेला इतिहास आहे, तो आपणच जपला पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version