आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
निखळ आणि घनिष्ट मैत्री आपल्या प्रत्येकालाच हवीहवीशी असते. असं मैत्रीचं नातं दीर्घकाळ टिकणं यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही! वैयक्तिक आयुष्यात आपल्या आठवणींच्या कुपीत मैत्रीचे कधी हसवणारे तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे अनेक किस्से असतात.
मित्रांच्या मैफलीत किंवा अगदी एकटे असतानाही आपण या आठवणींना उजाळा देऊन स्वतःशीच हसतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
चित्रपटसृष्टीतल्या जीवघेण्या स्पर्धेत एकाच वेळी आघाडीवर असणाऱ्या नायकांच्यात चढाओढ बघायला मिळतेच. पण बॉलिवूडमध्ये छान मैत्री असलेल्या कलाकारांचीही काही कमतरता नाही.
स्मिता पाटील – शबाना आझमी यांच्या मैत्रीपासून ते शाहरुख- सलमानच्या मैत्रीपर्यंत अनेक उदाहरणं पटापट आपल्या डोळ्यांसमोर येतील. अशी घट्ट मैत्री पाहिली की आपल्यालाही छान वाटतं. व्यवसायापलीकडे जाऊन त्यांच्यात खरेखुरे भावनिक बंध जुळल्याचा संकेत असतो तो.
हे कलाकार त्यांच्या देखण्या रुपासाठी, नृत्य-गायन-अभिनयासाठी जसे प्रसिद्ध असतात तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबरच्या मैत्रीसाठीही प्रसिद्ध असतात.
दिलीप कुमार आणि राज कपूर या जोडगोळीची मैत्री अतिशय घनिष्ट आणि खास समजली जायची. त्यांच्या मैत्रीचे विलक्षण योगायोगही चेहऱ्यावर नकळत हसू आणणारे आहेत. जाणून घेऊया या अनोख्या मैत्रीची कहाणी.
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या मैत्रीमागे त्यांच्या कुटुंबियांमधल्या मैत्रीचाही एक रंजक इतिहास आहे. हे दोघेही मूळचे पेशावरचे असून पाश्तो भाषा बोलली जाणणाऱ्या कुटुंबांमध्ये त्यांची जडणघडण झाली आहे. दिलीप कुमार आणि राज कपूर यांचा जन्म अवघ्या दोन वर्षांच्या फरकाने झालाय.
पेशावरच्या किस्सागो गल्लीत ही दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या शेजारी शेजारी राहायची आणि या कुटुंबीयांमध्येही फार छान मैत्री होती. राज कपूर यांचे आजोबा बशेश्वरनाथ कपूर हे पेशावरमध्ये नागरी सेवक या पदावर कार्यरत होते. त्यांची दिलीप कुमार यांचे वडील अघाजी यांच्याशी मैत्री होती.
अघाजी हे पेशाने व्यापारी होते. बशेश्वरनाथ कपूर यांचे पुत्र पृथ्वीराज कपूर त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांचे विशेष लाडके होते.
१९३० च्या दशकात अधिक चांगल्या व्यावसायिक संधींच्या शोधात अघाजी मुंबईत आले आणि फळांच्या व्यापारात त्यांचा जम बसला. दरम्यान, राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हेही चित्रपट अभिनेता बनण्यासाठी मुंबईतच आले.
–
- रस्त्यावर सँडविच विकून बनला बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग – वाचा थक्क करणारा प्रवास!
- …आणि त्यांनी राज कपूरसाठी आपले दागिने विकले!
–
पुन्हा एकदा या दोन्ही कुटुंबीयांचा एकमेकांच्या संगतीत छान वेळ जाऊ लागला आणि त्यांच्यातली पाश्तोविषयीची रुची त्यांनी पुन्हा वृद्धिंगत केली.
दैवयोगाने जशी या दोन्ही कुटुंबियांची सुटलेली मैत्री पुन्हा बहरली तसंच बलवत्तर भाग्य दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्याही मैत्रीला लाभलं होतं असंच म्हणायला हवं.
हे कुटुंबीय एकमेकांच्या घरी भेटत असतं. मात्र दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यातलं मैत्रं फुललं त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत. हे दोघेही ‘खालसा महाविद्यालया’त शिकले. त्यांनी एकत्र अभ्यास केला.
दिलीप कुमार हे चांगले फुटबॉल खेळाडू आणि वाचनवेडे म्हणून सगळ्यांना माहीत होते. पण ते अतिशय मितभाषी होते. स्वतःहून एखाद्या मुलीशी बोलायचं धाडस ते करू शकायचे नाहीत. दिलीप कुमार आणि राज कपूर यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न होते तरीही किंवा कदाचित म्हणूनच त्यांच्यात गाढ मैत्री होती.
राज कपूर हे मुलींवर आपली सहज छाप पाडायचे. मुलींना पटवण्यात ते पटाईत होते. ते कॉलेजचे क्रिकेट प्लेयर होते. मुली आसपास असताना जेव्हा त्या त्यांना चिअर अप करायच्या तेव्हा ते खुशीत येऊन आणखीन छान खेळायचे. त्यांच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची अनेक मुलींशी मैत्री होती.
हे दोघेही समकालीन असूनही त्यांच्यात मत्सर असल्याचं कधीच दिसलं नाही. नियतीही एखाद्या हेवा वाटावा अशा नात्यात कधीकधी फार विचित्र पेच आणून नात्याची परीक्षा बघते. काही नाती या पेचांची बळी ठरतात. तर काही नाती त्यातून तावून सुलाखून निघत अधिक दृढ होतात.
या दोघांच्या मैत्रीवरही नियतीने असेच विचित्र फासे टाकले होते. पण ‘लव्ह ट्रँगल’ सारखं नाजूक वळण एकदाच नव्हे तर दोनदा आयुष्यात येऊनही त्यांच्या मैत्रीला कधी शत्रुत्त्व शिवलं नाही. त्या दोघांनीही जेव्हा त्यांच्या त्या प्रेयस्यांना गमावलं तेव्हा एकत्र भेटून हसून दुःख साजरं केलं.
एकमेकांवरच्या प्रगल्भ प्रेमाचं याहून अधिक चांगलं उदाहरण दुसरं कुठलं असेल! या दोघांच्या मैत्रीचे २ कमाल किस्से आहेत.
राज कपूर यांना कसंही करून दिलीप कुमार यांना त्यांच्या बुजरेपणाच्या कोशातून बाहेर काढायचं होतं. त्यासाठी त्यांनी नाना क्लुप्त्या लढवल्या. एका प्रसंगी एका मुलीकडे इशारा करत राज कपूर दिलीप कुमार यांना म्हणाले की त्या मुलीला तुझ्याशी बोलायचंय त्यामुळे तू तिच्यापाशी जा आणि तिच्याशी काहीतरी बोल.
दिलीप कुमार यांचं काही असं करण्याचं धैर्य झालं नाही. मग राज कपूर यांनी त्या मुलीला आपल्यासोबत यायला सांगितलं आणि दिलीप कुमार यांच्यासोबत ते कॅंटीनमध्ये गेले.
दिलीप कुमार आणि ती मुलगी आता एकाच टेबलावर बसले होते. ते तेव्हाही तिच्याशी काही बोलू शकले नाहीत. हा मुलगा आपल्याशी मैत्री करायला पुढाकार घेत नाही हे पाहून वैतागून ती मुलगी तिथून निघून गेली.
आणखी एका प्रसंगी राज कपूर दिलीप यांना टोंगा राईडवर घेऊन गेले. ‘गेटवे ऑफ इंडिया’पाशी त्यांना दोन सुंदर पारशी मुली उभ्या असलेल्या दिसल्या. अतिशय सभ्य आणि विनम्रपणे राज यांनी त्या दोघींना तुम्हाला कुठे सोडायचंय का असं विचारलं. त्या मुली म्हणाल्या की त्यांना रेडियो क्लबला जायचंय.
एक मुलगी राज यांच्या शेजारी बसली तर दुसरी दिलीप यांच्या समोरच्या सीटवर बसली. नेहमीप्रमाणेच राज कपूर त्या मुलीच्या अगदी जवळ बसून तिच्याशी गप्पा मारू लागले. दिलीप कुमार मात्र काहीसे संकोचलेले होते.
त्या दोघी रेडियो स्टेशनला उतरेपर्यंत ते एक शब्दसुद्धा बोलू शकले नाहीत. थोडक्यात, राज कपूर दिलीप कुमार यांना त्यांच्या बुजरेपणाच्या कोशातून कधीच बाहेर काढू शकले नाहीत.
समीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र राज कपूर यांनी अनेक वेळा विनवण्या करूनही ‘संगम’ या चित्रपटात दिलीप कुमार यांनी काम केलं नाही.
राज कपूर यांच्यातल्या अभिनेत्याविषयी त्यांना काही अडचण नव्हती. पण राज कपूर यांच्यातल्या दिग्दर्शकाची त्यांना भीती वाटायची.
गंमतीजमतींतून खुललेली ही मैत्री अखेरीस छान परिपक्व झाली. राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या तमाम चाहत्यांना त्यांच्या या मैत्रीविषयी वाचून आनंद होईलच. पण मैत्री झाल्यानंतरही ती टिकवावी कशी हे या दोन्ही कलाकारांकडून कुणीही शिकण्यासारखं आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.