आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी जीवाचं रान करणारा मुंबईचा इंजिनियर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या मनात कधी ना कधीतरी हे जीवन संपावं असा विचार येऊन गेलेला असतो. आत्महत्येचा विचार कुठल्याही वयोगटातल्या माणसाच्या मनात कधीही येऊ शकतो. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र काही जण दुर्दैवाने या विचारावर मात करू शकत नाहीत आणि आत्महत्येचा प्रयत्न करतात.
या आत्महत्या कशा रोखता येतील याचा मुलुंडमध्ये राहणाऱ्या शरद अशानी या इलेक्ट्रिकल इंजिनीयरने गांभीर्याने विचार केला आणि नुसत्या विचारावरच न थांबता आत्महत्या रोखणाऱ्या पंख्यांच्या रॉड्सची निर्मिती केली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आपल्या ‘गोल्ड लाईफ’ या कंपनीद्वारे त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधल्या, हॉटेल्समधल्या, जेलमधल्या आणि सरकारी क्वार्टर्समधल्या पंख्यांमध्ये आत्महत्या रोखणारे सुमारे ५०,००० रॉड्स आजवर बसवले आहेत.
‘शार्क टॅंक’च्या एका एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना तब्बल ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.
२००४ साली नफिसा जोसेफ या मॉडेलने मुंबईत आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर हे रॉड्स तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. ‘द बेटर इंडिया’शी बोलताना ते म्हणाले, ” नफीसाची ही बातमी वाचल्यावाचल्या पहिल्यांदा मी पंख्याकडे नुसताच एकटक बघत बसलो. ती हे करत असताना पंखाचा का पडला नाही किंवा ओढणी का सैल झाली नाही असं माझ्या मनात आलं. त्यानंतर काही दिवसांनी एका तरुण मुलीच्या अशाच आत्महत्येची बातमी मला कळली. या घटनेनंतर एका महिन्याने ‘द नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’ (NCRB) ने एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यात १.१३,००० मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याची नोंद होती. त्यातल्या ३०% आत्महत्या पंख्याला लटकून केल्या गेल्या होत्या.”
आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून त्यानंतर दरवर्षी शरद यांनी हा अहवाल पाहायला सुरुवात केली. त्यांच्या असं लक्षात आलं की २०२० मध्ये पंख्याला लटकून आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण ३० टक्क्यांवरून थेट ५७% टक्क्यांवर पोहोचलं आहे.
त्यांनी महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या आत्महत्येमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरही लक्ष ठेवलं. २०१० ते २०१४ च्या दरम्यान ३८,००० विद्यार्थी आत्महत्या करून मरण पावले होते.
मात्र २०१५ ते २०१९च्या दरम्यान हा आकडा ४८,०००च्याही वर गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणतात, “कुठलाही अभ्यास असं सिद्ध करत नाही की पंखा हा आत्महत्या करण्याच्या दृष्टीने सहज शक्य असलेला पर्याय आहे. पण बातम्यांच्या अहवालांवरून मी जे ताडलं त्यानंतर असं सांगता येईल की विष किंवा ओव्हरडोस घ्यायचा झाला तर त्यासाठी पैसे आणि प्रिस्क्रिप्शन लागतं. बाकी पर्यायांसाठी प्रचंड धैर्य लागतं.
पंखे न काढून टाकता त्यात जर हे रॉड्स बसवले तर त्यामुळे नक्कीच फार मोठा बदल होऊ शकतो. आत्महत्येचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर असा प्रयत्न करणारी व्यक्ती आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करू शकते किंवा कमीतकमी आत्महत्या करण्याचा निर्णय पुढे ढकलू शकते.”
–
- हे गाणं ऐकून १०० पेक्षा जास्त लोकांनी चक्क स्वतःचा जीव गमावला…
- कुत्रे या गूढ पुलावरून उडी मारून एका झटक्यात संपवतात आपले आयुष्य!
–
या रॉड्सच्या उपयुक्ततेवर सुरवातीला अनेकांनी शंका घेतली. पण आपल्या या रॉड्सचा आत्महत्या रोखण्यासाठी नक्की उपयोग होईल असा अशानी यांना दृढ विश्वास होता. हे रॉड्स तयार करण्यावर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. एडिसनने दिव्याचा लावलेला शोध त्याच्या हजाराव्या प्रयत्नात यशस्वी झाल्याची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहितीये.
याच चिकाटीने असानी यांनी दशकभराच्या कालावधीत हे उपकरण बनवण्याचे ५०० प्रयोग केले. याचं डिझाईनदेखील त्यांनी स्वतःच केलं आहे. हे रॉड्स तयार करताना ते बऱ्याच तज्ज्ञांशी बोलले. व्यक्तीच्या वयानुसार आणि वजनानुसार व्यक्तीच्या मानेचा पंख्यावर किती दाब येऊ शकतो याचा त्यांनी हिशोब केला.
मुंबईच्या चोर बाजारातून सेकंड हॅन्ड पंखे, पाईप्स आणि स्प्रिंग्ज खरेदी केल्या. अशाप्रकारे त्यांनी वेगवगेळे रॉड्स तयार केले. एका प्रयत्नात तर पंखाच त्यांच्या डोक्यावर पडला.
पण सुदैवाने त्यांनी हेल्मेट घातलं होतं. हा रॉड बसवलेल्या पंख्याना लटकून जर एखाद्याने जीव द्यायचा प्रयत्न तर स्प्रिंगद्वारे तो रॉड पंख्यापासून वेगळा होतो आणि माणसाला सुरक्षितपणे जमिनीवर आणून ठेवतो. पंख्यावरती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त भार आला की लगेचच हा रॉड काम करतो.
‘द बेटर इंडिया’शी बोलताना अशानी म्हणाले, “साधारण गेल्या दशकभराच्या कालावधीत आमची कंपनी ‘आयआयएम अहमदाबाद’, ‘एआयआयएमएस जोधपूर’, कोटामधली हॉटेल्स, अंबाला जेल अशा वेगवेगळ्या संस्थांसोबत पंख्याला लटकून आत्महत्या केल्या जाण्याच्या समस्येवर एकत्रितपणे काम करते आहे.
२००४ साली जो रॉड बनवायला मी सुरुवात केली होती तो रॉड ‘शार्क टॅंक’ या रिऍलिटी शो च्या माध्यमातून देशभरात पोहोचतोय हे बघून मला फार छान वाटतंय.”
MNC मध्ये ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःचं असं काहीतरी उभारायचं ठरवलं. २०११ साली त्यांनी महिंद्राच्या स्पार्क द राईज स्पर्धेमध्ये ‘सामाजिक कल्पक उपक्रम’ या श्रेणीअंतर्गत भाग घेतला आणि त्यांना ४ लाखांचं अनुदान मिळालं. आपल्या निवृत्तीनंतर या ४ लाखांतून त्यांनी आपलं हे उपकरण लाँच करायचं ठरवलं.
काही वर्षं थांबून त्यांनी २०१७ साली या कामाला पुन्हा सुरुवात केली. मर्यादित निधी उपलब्ध असल्यामुळे त्यांनी या रॉड्सच्या मार्केटिंगवर खर्च न करता २०० रॉड्ससाठी हा निधी वापरला. या उपकरणाचं कव्हरेज केलं जावं असं त्यांनी एका वृत्तपत्राला लिहून पाठवलं. लवकरच बऱ्याच प्रसारमाध्यमांनी या उपकरणाचं वार्तांकन केलं.
त्यानंतर त्यांना ऑर्डर्स मिळू लागल्या. फरिदाबादची ‘एअरफोर्स’ ही शाळा त्यांची पहिली ग्राहक होती. कोटा हॉस्टेलनंतर या शाळेने ३०० रॉड्स ऑर्डर केले. आजच्या तारखेला ८०% हॉस्टेल्समध्ये हे रॉड्स पोहोचले आहेत. पंख्याच्या आकारानुसार या रॉड्सची किंमत ३०० ते ४०० रुपयांच्या अधेमधे असते.
‘आयआयएम काशीपूर’चे माजी ‘स्टोअर अँड पर्चेस ऑफिसर’ श्रीवांशीस त्रिपाठी ‘द बेटर इंडिया’शी बोलताना म्हणाले, “आमच्या हॉस्टेलमध्ये आम्ही ५०० पेक्षा जास्त रॉड्स बसवले आहेत. माणसांचे जीव वाचण्याच्या दृष्टीने हे उपकरण अतिशय फायदेशीर आहे. काहीतरी घडल्यानंतर नुकसान दुरुस्ती करण्यापेक्षा गोष्टी आधीच घडायच्या थांबवणं केव्हाही चांगलं.” शरद अशानी ‘शार्क टॅंक’ कडून मिळालेल्या निधीची रॉड्सच्या उत्पादनाकरता गुंतवणूक करणार आहेत.
इतके इंजिनियर्स असतात. पण आपली स्वतःची नाविन्यपूर्ण कल्पना आणि आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण याची उत्तम सांगड घालून अनेकांचा जीव वाचवणाऱ्या रॉड्सची यशस्वीरित्या निर्मिती करणारे शरद अशानी हे खऱ्या अर्थाने बुद्धिमान ठरतात. एका भारतीयाने हा शोध लावणं ही बाब आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.