' शेतकऱ्याने केला लयभारी जुगाड आणि स्वतःच्या घरासाठी केली वीजनिर्मिती – InMarathi

शेतकऱ्याने केला लयभारी जुगाड आणि स्वतःच्या घरासाठी केली वीजनिर्मिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताची लोकसंख्या आणि खंडप्राय रचना, गाव आणि शहर असं नागरिकांचं राहणीमान यामुळे प्रत्येक वस्तू, सेवा ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे कोणत्याही सरकारसाठी एक आवाहन आहे.

स्वतंत्र भारताचं ७५ वं वर्ष साजरं होत असतांना कित्येक नवीन सरकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत, पण तरीही अशी कितीतरी गावं आजही आहेत जिथे हक्काचं पाणी, गॅस आणि वीज मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो.

उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात असलेल्या नागरी सुविधांचा अभाव हा सर्वश्रुत आहे, पण आयटी क्षेत्राचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्यात अशी परिस्थिती आहे हे वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कर्नाटक राज्यातील हुबळी येथील एका शेतकऱ्याला तिथल्या स्थानिक विद्युत निर्मिती बोर्डाने त्याचं घर गावापासून लांब आहे हे सांगून वीज नाकारली होती, पण ‘सिदप्पा’ नावाच्या एका शेतकऱ्याने हा नकार ऐकून हार मानली नाही आणि त्याने प्रयत्नांची शर्थ करून स्वतःच्या घरासाठी १५० वॉट्स इतकी वीजनिर्मिती केली आणि या समस्येवर मात केली.

जिथे प्रशासन कमी पडतं तिथे नागरिकांना सक्रिय व्हावं लागतं हे सिदप्पाने लोकांना आपल्या कार्यातून शिकवलं आहे. विजेचा तुटवडा हा नागरिक भरून काढू शकतात हे आपण ‘स्वदेस’ सिनेमात बघितलं होतं. २०२१ मध्ये ‘मोहन भार्गव’ प्रमाणे हुबळी गावाला वीज मिळवून देणाऱ्या सिदप्पाने काय जुगाड करून गावात वीज आणली? हे जाणून घेऊयात.

सिदप्पाच्या घरापर्यंत वीज का पोहोचली नाही?

सिदप्पा हुलजोगी हा शेतकरी २०१५ मध्ये नारगुंड या गावापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बंडेमन नगर इथे रहायचा. शेती करणारी या गावात एकूण १० घरं होती. ‘हेस्कॉम इंटरनॅशनल’ या वीज कंपनीकडे त्यावेळी हे कंत्राट होतं. इतक्या कमी घरांसाठी वीज पुरवठा करणं हे त्या कंपनीला शक्य नव्हतं.

तंत्रज्ञान काय वापरलं?

 

karnataka farmer im

 

सिदप्पाने तिथे पवनचक्कीच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्यासाठी लोखंडी शीट्स गोळा केल्या. कर्नाटक मधील हुबळी या गावात भरपूर पाऊस पडतो. सिदप्पा या शेतकऱ्याने आपल्या घराजवळ असलेल्या डोंगरावर पाण्याचा एक साठा तयार केला.

पाण्याचा साठा तयार करण्यासाठी सिदप्पाने प्लास्टिक टब्स आणि लाकडाचा वापर केला. कालव्याचं पाणी या प्लास्टिक टब्स मध्ये फिरतं, त्याला गती प्राप्त होते आणि त्याद्वारे वीजनिर्मिती होते. ‘पॉवर जनरेशन’ प्रकल्पसाठी येणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च वाचवून सिदप्पा याने हे काम केवळ ५ हजार रुपयात करून दाखवलं आहे.

सिदप्पाचं कार्य कधी प्रकाशात आलं?

 

karnataka farmer im1

 

सिदप्पा या शेतकऱ्याचं हे कार्य त्यावेळी प्रकाशात आलं जेव्हा माजी भारतीय क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मण याने फोटोसकट ट्विट करून सिदप्पाचं कौतुक केलं.

व्ही व्ही एस लक्ष्मण याने आपल्या ट्विट मध्ये लिहिलं आहे, की “कर्नाटक मधील या शेतकऱ्याने कोणत्याही संस्थेवर अवलंबून न राहता स्वतःच्या घरासाठी वीजनिर्मिती केली हे कौतुकास्पद आहे. या पद्धतीने पूर्ण गावासाठी वीजनिर्मिती केली जाऊ शकते. ज्या कॅनॉलचा वापर करून ही वीजनिर्मिती होत आहे तिथे बाराही महिने पाणी उपलब्ध नसतं. जर या कॅनॉलला बाराही पाणी असेल तर हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवला जाऊ शकतो आणि पूर्ण गावाचा विजेचा प्रश्न सोडवू शकला असता. कमीत कमी वस्तूंमध्ये चांगलं काम काम केलं जाऊ शकतं याचा आदर्श सिदप्पाने आपल्या कामातून ठेवला आहे.”

व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर सिदप्पा आणि त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचा फोटो खूप व्हायरल झाला. सिदप्पाच्या या प्रकल्पाची माहिती घेऊन कर्नाटक जिल्ह्यातील इतर शेतकरी सुद्धा वीजनिर्मिती करण्यासाठी ‘आत्मनिर्भर’ होण्याचा विचार करत आहेत.

 

karnataka farmer im2

 

सिदप्पाची ओळख ही त्याच्या निकटवर्तीय लोकांना ‘जुगाड करणारी व्यक्ती’ अशीच आहे. काहीही करणार, पण समस्येवर तोडगा काढणार ही वृत्ती सिदप्पाने मागील १५ वर्षांपासून शेती करतांना सुद्धा आमलात आणलेली आहे. आपल्याला ही कल्पना नारगुंड येथील पानचक्की बघून सुचल्याचं सिदप्पाने सांगितलं आहे.

नैसर्गिक पद्धतीने वीजनिर्मिती करण्याच्या या प्रकल्पाने ६० वॅट क्षमतेचे १० बल्ब आणि २ टीव्ही चालतील इतकी वीज सध्या उपलब्ध होत आहे.

 

led bulb inmarathi

 

आपलं काम बघून जर सरकारने या प्रकल्पावर खर्च करण्याची तयारी दर्शवली तर पूर्ण गावात ‘बिजली’ येऊ शकते असा दावा सिदप्पाने केला आहे. कर्नाटक राज्य सरकारपर्यंत त्याची ही हाक लवकरच पोहोचेल अशी आशा करूयात.

सिदप्पाच्या आधी २०१७ मध्ये केरळ राज्यातील कल्लादिकोडे या गावातील ‘हरी नारायण’ या शेतकऱ्याने सुद्धा हा प्रयत्न केला होता. पाण्याचा पंप आणि ‘डायनॅमो’ या यंत्रशक्तीचं रूपांतर विद्युतशक्तीत करणाऱ्या यंत्रणेचा वापर केला होता. आपल्या दुचाकीवर त्याने ही यंत्रणा उभी केली होती आणि त्याद्वारे घरासाठी वीजनिर्मिती केली होती.

‘हरी नारायण’ या शेतकऱ्याने वापरलेली दुचाकी ही १९८२ मध्ये तयार करण्यात आलेली डिझेल बाईक होती. एका दिवसाची वीजनिर्मिती करण्यासाठी त्याला एक तास बाईक एका ठिकाणी पार्क करून चालू ठेवावी लागायची.

‘रँचो’ हे पात्र बघितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. पण, प्रत्यक्ष आयुष्यात त्या आधीपासूनच कित्येक लोक विज्ञानाच्या सहाय्याने आपलं जीवन सुसह्य करत आहेत हे बघून प्रत्येकाला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे.

“बदल घडवण्यासाठी आधी तीव्र इच्छा असावी लागते” हे सिदप्पा सारखे लोक आपल्या कार्यातून नेहमीच सांगतात आणि म्हणूनच ते कौतुकास पात्र असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?