हा झुंजार सेनापती नसता तर मराठ्यांच्या अनेक युद्धांमध्ये भगवा फडकला नसता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या अतुल्य शौर्याने मोहिमा फत्ते केलेल्या अनेक वीरांच्या कथा आपण ऐकलेल्या असतात. पण इतिहासात असेही अनेक योद्ध्ये आहेत ज्यांनी स्वातंत्र्यात फार मोठं योगदान दिलेलं असूनही त्यांच्या कर्तृत्वाची माहिती आपल्याला नसते. वेगवेगळ्या शिवकालीन, पेशवेकालीन बखरींमध्ये, शिलालेखांमध्ये त्यांचे उल्लेख आढळत असतीलही. मात्र कथा, कादंबऱ्या, चरित्रांमधून जरी आपल्यापर्यंत अनेक शौर्यगाथा पोहोचल्या असतील तरी अशीही अनेक व्यक्तिमत्त्वं आहेत ज्यांचं कर्तृत्व तर सोडाच पण नावंदेखील आपल्याला माहीत नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अभ्यासकांसमोरही ही अशी नावं आणि त्यांची कर्तृत्त्व प्रकाशझोतात आणणं हे नक्कीच मोठं आव्हान असावं. पण सुदैवाने काही एक काळानंतर आपल्याला माहीत नसलेल्या अशा काही महान वीरांबद्दल आपल्याला कळतं आणि ज्या भूमीत, ज्या संस्कृतीत आपण जन्मलो त्याचा आपल्याला अधिकच अभिमान वाटतो. पिलाजीराव जाधवराव हे असंच एक रणझुंजार व्यक्तिमत्त्व. हा सेनापती नसता तर मराठ्यांच्या अनेक मोहिमांत भगवा फडकला नसता.
बाजीराव पेशवे आणि चिमाजी आप्पा ही नावं माहिती नसतील असा मराठी माणूस आढळणार नाही. पण युद्ध शास्त्रात ज्या आसामीमुळे ते निपुण होऊ शकले त्या पिलाजीरावांबद्दल आपल्यातल्या अनेकांना माहिती नसेल. पिलाजीराव जाधवरावांनी छत्रपती शाहू महाराज्यांच्या काळात अनेक महत्त्वाच्या कामगिऱ्या बजावल्या आहेत. मग ते उत्तर हिंदुस्तानात दरवर्षी मुलुक आणि खंडणी मिळवण्यासाठी मराठे ज्या स्वाऱ्या करायचे त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणं असो की खुद्द शाहू महाराज आणि येसूबाई राणीसाहेबांना मुघलांच्या तावडीतून सोडवून आणणं असो.
मुघलांच्या तावडीतून आपल्या राजाराणीला सोडवून आणणं म्हणजे थेट सिंहाच्या जबड्यात हात घालण्याची जोखीम उचलणं! पिलाजीरावांनी दाखवलेल्या या धाडसासाठी गौरवोद्गार काढावेत तितके थोडेच! वेळोवेळी शाहू महाराजांना सर्वतोपरी मदत केलेले पिलाजीराव नेहमीच शाहू महाराजांच्या मर्जीत राहिले.
निरनिराळ्या मोहिमांमध्ये महत्त्वाचं स्थान बजावलेल्या पिलाजीरावांच्या असामान्य कर्तृत्त्वाला इतिहास साक्षी आहे. सन १७३० मध्ये वसईच्या झालेल्या मोहिमेत पिलाजीराव वरच्या स्थानावर होते. त्यांनी या मोहिमेचं नेतृत्त्वही केलं होतं. शत्रू नामोहरम होणारच याची आपल्याला संपूर्ण खात्री असेल इतका आपला स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास दृढ असला पाहिजे हे पिलाजीरावांच्या या लढतीतून दिसून आलं.
वसई जिंकल्याखेरीज ते मागे हटले नाहीत. सन १७४२ मध्ये त्यांनी बंगाल प्रांताची चौथाई शाहू महाराजांना मिळवून दिली. छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आले होते त्यावेळेसही पिलाजीरावांनी त्यांना खूप मदत केली.
–
- इंग्रज असो वा मुघल, शस्त्रांनी नव्हे, कुशाग्र बुद्धीने शत्रूशी लढणारा पेशवाईतील चाणक्य
- मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!
–
पिलाजीराव जसे शाहू महाराजांच्या मर्जीत होते तसेच पेशव्यांच्याही होते. जेत्यापेक्षाही पराभूताच्या पाठीशी जो खंबीरपणे उभा राहतो तो अधिक मोठा माणूस. पिलाजीरावांच्या बाबतीतही काहीसे असेच म्हणावे लागेल. सन १७११ मध्ये पांडवगडाच्या लढाईत सेनापती चंद्रसेन जाधव यांच्याकडून बाळाजी विश्वनाथ यांचा पराभव झाला त्यावेळी पिलाजीरावांनी बाळाजी आणि त्यांच्या कुटुंबियांना या बिकट परिस्थितीतून सहीसलामत सोडवलं.
हे सगळं वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी आपल्या डोळ्यांदेखत पाहिलं होतं. त्यामुळे तेव्हापासून पिलाजीरावांबद्दल जी आपुलकी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या मनात निर्माण झाली ती अगदी शेवटपर्यंत तशीच राहिली.
दक्षिणेत विस्कळीत झालेली मराठा साम्राज्याची घडी बसवण्यातही पिलाजीरावांचं महत्त्वाचं योगदान आहे. पेशवे आणि निजाम यांच्यात काहीतरी बिनसलं असताना खुद्द बाजीराव पेशव्यांना औरंगाबाद जिंकता आलं नव्हतं पण हेदेखील पिलाजीरावांनी शक्य करून दाखवलं. वेळोवेळो आपण दाखवलेल्या कर्तृत्त्वासाठी अनेक राजेमहाराजांकडून पिलाजीरावांना अनेक गावे बक्षीस म्हणून मिळाली. जहागिऱ्या मिळाल्या.
पिलाजीरावांचा एकूणच फार दबदबा असल्याचं आणखी एका प्रसंगातून दिसतं. त्यांनी औरंगाबादवर जरब बसवून वसुलीची कायमची व्यवस्था लावून दिली. मोगलांविरुद्ध निजाम आणि मराठे यांनी एकत्रितपणे लढत दिली होती. त्यात पिलाजीरावांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांचा जलादत्त इन्कलाब म्हणजेच रणशूर किंवा शौर्य क्रमाचे मर्मज्ञ म्हणून गौरव झाला.
पिलाजीराव जाधवरावांचं स्थान आपल्या इतिहासात इतकं महत्त्वाचं आहे की छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांच्या तब्बल तीन पिढ्यांच्या कारकिर्दीत पिलाजीरावांनी सतत पन्नास वर्षे अनेक युद्ध मोहिमांमध्ये मराठ्यांचं नेतृत्त्व केलं. युद्ध असेल तेव्हा शाहू महाराज पिलाजीरावांसोबत सल्लामसलत करायचे यातून त्यांच्या मताला केवढं वजन होतं हे आपल्या लक्षात येईल.
प्रखर राज्यनिष्ठा, स्वराज्यप्रेम, मुत्सद्देगिरी, असामान्य शौर्य, अध्यात्त्मवृत्ती हे पिलाजीरावांमधले अतिशय महत्त्वाचे म्हणावेत असे गुण होते. या अशा कर्तृत्त्ववान पिलाजीरावांचा मृत्यू सन ३ जुलै १७५१ रोजी झाला. पुणे जिल्ह्यात वाघोली येथे त्यांची समाधी आहे.
आपल्याला ठाऊक असलेल्या इतिहासातून आजवर आपल्याला शाहू महाराज, शिवाजी महाराज, पेशव्यांच्या कर्तृत्त्वाची ओळख झालीच. पण तशाच प्रकारचं शौर्य गाजवलेले पिलाजीराव मात्र ना कधी आपण शाळेतल्या धड्यांमधून वाचले ना चित्रपटांमध्ये पाहिले.
शाहू महाराज्यांच्या काळात मराठी राज्याचा जो विस्तार झाला त्यात महत्त्वाचं योगदान दिलेल्यांच्या यादीत पिलाजीरावांचा उल्लेख न करून चालणारच नाही. मराठ्यांच्या इतिहासात पिलाजीराव जाधवरावांचं नावही बाकी योध्यांप्रमाणेच सोनेरी अक्षरांत उमटलं गेलंय. आपल्या देदिप्यमान इतिहासातले असे कित्येक मावळे, कित्येक योध्ये आपल्याला अद्याप माहीत करून घ्यायचेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.