Site icon InMarathi

एकेकाळी दुष्काळात अडकलेल्या मुंबईची तहान भागवणारा दानशूर माणूस

drought IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – चंदन विचारे

===

इ.स १८२२ मध्ये मुंबईत मोठा दुष्काळ पडला होता. पाण्याविना खूप हाल होत होते. विहीरी व तळ्यातील पाणी तळापर्यंत आटले होते. खूप प्रयत्न करुनही पाण्याचा प्रश्न काही सुटत नव्हता. त्यावेळी आताच्यासारखा नळ, पाईप लाईन, वाॕटर कनेक्शन वगैरे प्रकार नव्हता. त्यावेळी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे विहीरी, तळी किंवा तलाव! गिरगावकर, कामाठीपुऱ्यातील लोकांचे पाण्याविना बरेच हाल होत होते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इ.सन १७७५ मध्ये कावसजी पटेल नामक व्यापाऱ्याने कांपाच्या मैदानात सार्वजनिक तळे बांधले होते. या तळ्याला कावसजी पटेल तळे किंवा गोडे पाणी लागले म्हणून साखर तळे असे संबोधले जात होते. या तळ्यावर धोबी कपडे धूत म्हणून यास साखर तळे, कावसजी पटेल तळे हे नाव मागे पडून धोबी तळे हेच नाव रुढ झाले. कावसजी पटेल तळ्यातील पाणी आटल्याने डंकन रोडवरील तलावात पाणी टंचाई निर्माण झाली.

त्यावेळी डंकन रोडवर पाणी पुरवठा करण्यासाठी दोन तलाव बांधण्यात आले होते व तेथे कावसजी पटेल नामक तळ्यातून कालव्याद्वारे पाणी पुरवले जात असे. डंकन रोडचा तलाव बांधणारी हुलसाजी सुभानजी नामक मुस्लिम व्यक्ती होती अन् साल होते इ.सन १८२३!

 

 

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पारशी व्यापारी फ्रामजी कावसजी बानाजी पुढे आले आणि त्यांनी १८३१ मध्ये गिरगावातील मुगभाट वाडी ब्रिटीशांकडून विकत घेतली व तेथे तीन मोठ्या विहीरी खणल्या. त्या विहीरींतले पाणी वर ओढण्यासाठी एक वाफेचे इंजिन आणि चार रहाट बसविले तसेच बैलांनी ओढण्याची चारचाकी गाडीही आणली.

आधी तयार असलेल्या कालव्यांच्या सहाय्याने त्या विहीरीतले पाणी डंकन रोडवरील तलावात सोडण्यात येऊ लागले. यातूनच गिरगाव, डंकन रोड येथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले.

 

 

या कामासाठी कावासजी बानाजी यांना २५ – ३० हजार रुपये खर्च आला. वाफेचे इंजिन चालविण्यासाठी व इतर व्यवस्थेसाठी त्यांना महिन्याला दोनशे रुपये खर्च येत होता तो फ्रामजी स्वतः करीत होते. या सार्वजनिक कार्याचा मोबदला म्हणून ब्रिटीश सरकारने मुगभाट वाडीतील नारळांच्या झाडावरील कर गोळा करण्याचा अधिकार त्यांना दिला. फ्रामजी कावसजी १८५१ साली वारले पण मुगभाटातील विहीरीतील पाणी पुढे कित्येक वर्षे डंकन रोडवरील तळ्यांना पुरविले जात होते.

बॉम्बे मॅंगोचे प्रणेते

फ्रामजी कावसजी बानाजी हा पारशी व्यापारी ब्रिटीश काळात पवईचा मालक होता. त्यांनी पवईच्या १३३४ एकर जागेत एक लाख आंब्याची झाडं लावली. हाच पवईचा आंबा पुढे बाॕम्बे मँगो म्हणून ब्रिटीशांमध्ये लोकप्रिय झाला.

 

 

१८३३-३४ मध्ये तर तो रत्नागिरीच्या हापूसपेक्षाही महाग असे. १८ मे १८३८ रोजी फ्रामजींनी या प्रसिद्ध बाॕम्बे मँगोची एक करंडी इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया हिस पाठवली. असं म्हटलं जातं कि इंग्लंडच्या राणीला भारतातला आंबा पाठवणारा फ्रामजी हा पहिला भारतीय.

फ्रामजी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पवईत मलबेरीची झाडं लावली. त्या झाडांवर रेशमाचे किडे वाढतात म्हणून शेकडो रेशीम किडे पाळले. त्यातून उत्तम दर्जाचं रेशीम मिळू लागलं. याशिवाय नीळीचं उत्पादन, चिनी लिंबे, संत्री, सफरचंद ,छोटा साखर कारखाना, उसाच्या मळीतून दारु गाळणारी डिस्टीलरी , चहा, काॕफी, अफूचे उत्पादन असे बरेच उपक्रम राबविले.

३ डिसेंबर १८३० मध्ये मुंबईचे गव्हर्नर जाॕन माल्कम यांनी स्वतः फ्रामजींच्या पवई फार्मला भेट देत सर्व उपक्रम पाहिले अन् त्यावर खुश होऊन आपल्या हातातलं सोन्याचं घड्याळ फ्रामजींना भेट दिलं. पुढे पुढे बरेच ब्रिटीश अधिकारी पवई फार्मला भेट देऊ लागले. त्यांच्या सोयीसाठी एक वेगळा बंगला पवई तलावाकाठी फ्रामजींनी बांधला.

 

 

तेव्हाची जी.आय.पी ( आताची सेंट्रल रेल्वे) चे सर्वात जास्त शेअर्स फ्रामजी यांनी विकत घेतले होते. त्यांचं सुलेमान नावाचं एक जहाजही होतं. नंतर ते बुडालं. ते बोर्ड आॕफ एज्युकेशनचे सदस्य होते.

शिक्षणासाठी त्यांनी मोठ्या देणग्या दिल्या. १८३८ मध्ये गलिच्छ झालेल्या धोबीतलावातील गाळ काढून खोल खणून त्याला फ्रामजींनी तट बांधून दिला. त्याची कृतज्ञता म्हणून धोबीतलावाचे नाव फ्रामजी कावसजी टँक असे केले. पवई तलावालाही त्यांचेच नाव देण्यात आले.

वयाच्या ८५ व्या वर्षी १२ फेब्रुवारी १८५१रोजी अल्पशः आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या शोकसभेत दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकरशेठांसारखी मोठी कर्तृत्ववान लोकं उपस्थित होती.

आज फ्रामजींचं नाव फारसं कुणाला माहित नसेल ते माहित व्हावं म्हणून हे संकलन.

संकलन संदर्भ साहित्य –

१. मुंबईचे वर्णन – गोविंद नारायण माडगावकर (साकेत प्रकाशन)
२. मुंबई नगरी – न.र. फाटक (बृहन्मुंबई महानगरपालिका शताब्दी प्रकाशन )
३. सफर ऐतिहासिक मुंबईची – संभाजी भोसले ( स्नेहल प्रकाशन)
४.मुंबई ब्रिटीशांची होती तेव्हा – माधव शिरवळकर (ग्रंथाली)

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version