कुठल्याही भाषेतलं गाणं रसिकांच्या काळजाचा ठाव घ्यायचं; खुद्द दीदींनीच सांगितलेलं रहस्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेक भाषांवर प्रभुत्व असणार्या लतादीदी शाळेतच गेल्या नव्हत्या हे कळलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हे वास्तव आहे. लता दीदींचं बालपण सांगलीत गेलं. त्या जिथं रहायच्या तिथल्या एका शाळेत त्या बिगरीत जाऊ लागल्या.
पहिल्या दिवशीच मास्तरांनी लहानग्या लताचं कौतुक केलं. दुसर्या दिवशी लतादिदी आपल्यासोबत सात आठ महिन्यांच्या आशाला घेऊन शाळेत गेल्या. मास्तर आदल्या दिवशीचेच होते, ज्यांनी लतादीदींचं तोंड भरून कौतुक केलं होतं, मात्र कडेवरचं बाळ बघून त्यांनी शाळेत लहान बाळं आणायला परवानगी नसल्याचं निक्षून सांगितलं.
दीदींना याचा राग आला, त्यांनी लहानग्या आशाला कडेवर घेतलं आणि तडक घर गाठलं. घरी पोहोचल्यावर फणकार्यानं माईंना सांगितलं, की मी शाळेत जाणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
माईंनी शांतपणे बरं, हरकत नाही असं सांगितलं. अशा रीतीने दीदींची शाळा एका दिवसातच बंद झाली, पण अक्षरओळख तर झाली पाहिजे. मग घरातच कामाला असणार्या विठू नोकराकडून त्यांनी बाराखडी वगैरे शिकायला सुरवात केली. एकप्रकारे दीदींनी होमस्कूलिंग केलं.
कालांतराने जेव्हा त्या सिनेजगतात आल्या, तेव्हा गाण्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक भाषा शिकल्या. अगदी त्या काळात जिला वाघिणीचं दूध समजलं जात असे ती इंग्रजीसुध्दा त्यांनी शिकली. आपल्याला इतक्या भाषा येतात याचा त्यांना अभिमानही वाटत असे.
तमिळ भाषेबाबतचा एक गंमतीशीर किस्सा त्या नेहमी सांगत. शांता आपटेंसोबत लतादीदी गात होत्या, तेव्हा शांता आपटे म्हणाल्या, की ‘मी तमिळ सिनेमात काम केलंय.’
यावेळेपोवेतो लतादीदींना तमिळ ही एक भाषा असते हे देखील माहित नव्हतं. त्यांनी निरागसपणे विचारलं की, ते कुठं असतं? यावर शांताबाईंनी सांगितलं की मद्रासकडचे लोक तमिळ भाषा बोलतात आणि याशिवाय मी पंजाबी भाषेतही काम केलं आहे. यामुळे लतादीदी भारावून गेल्या आणि आपणही असंच विविध भाषांत काम केलं पाहिजे असं त्यांच्या मनानं घेतलं.
एकदा लोकलमधे अनिल विश्वास आणि दिलीप कुमार दीदींना भेटले. अनिल विश्वास ओळख करून देत दिलीप कुमारला म्हणाले, की, ‘युसुफ ही लता. खूप छान गाते. आडनाव ऐकून दिलिप कुमार म्हणाले, की तू मराठी आहेस का? लता दीदीं हो म्हणल्यावर ते म्हणाले, की ‘मराठी लोकांच्या उर्दूत थोडा मराठीपणा डोकावतो.’
ही गोष्ट लतादीदींना खूप लागली. त्यांनी तडक मौलाना मेहबुब यांची भेट घेतली आणि अस्खलित ऊर्दू शिकल्या. हिंदी शिकलेलं असल्यामुळे ऊर्दू कानाला अनोळखी नव्हतीच, मात्र ऊर्दूवर त्यांनी इतकं प्रभुत्व मिळवलं की त्या ऊर्दू उच्चार करत असत तेव्हा भलेभले थक्क होत असत.
—
- मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से
२० दिवस फोनवर दीदींनी ऐकवलं गाणं, मृत्युशय्येवरील दिग्दर्शकासाठी आवाज ठरला संजीवनी
—
यानंतर सलील चौधरींनी दीदींना बंगाली भाषेत गाणं गायला लावलं. सुरवातीला लता दीदी जरा बिचकत होत्या, मात्र सलील चौधरींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना गायला लावलं आणि हे गाणं सुपरहिट झालं.
ज्या भाषेत दीदी गात त्या भाषेचे बारकावेही त्यांच्या गायनात असत. यामागचं गुपित सांगताना त्यांनी एकदा सांगितलं होतं, की जेव्हा त्या एखाद्या वेगळ्या भाषेतलं, माहित नसलेल्या भाषेतलं गाणं गात, तेव्हा त्या गीतकार किंवा संगीतकाराला गाण्यातल्या शब्दांचे अर्थ, भावार्थ विचारत असत. ते गाणं नव्हे तर त्यातला भाव समजून घेत असत आणि मग त्या त्या विशिष्ट शब्दांचा वापर का झाला असेल हे जाणून घेत.
इतकंच नाही तर पडद्यावर हे गाणं कसं चित्रीत होणार आहे? नायिकेचे भाव काय असणार आहेत याची चर्चा त्या दिग्दर्शकाशी करत. यामुळे गीताच्या तळाशी जायला मदत होत असे.
यामुळेच कोणत्याही भाषेतलं गाणं असो, ते गाताना लता दीदींची ती मातृभाषाच असावी असं वाटायचं. आजवर अनेक गायिका झाल्या आणि होतीलही, पण लता मंगेशकर एकमेवाद्वितीय असण्यामागचं कारण त्यांची ही तपस्या आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.