आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गानसम्राज्ञी लता दीदी आता आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही आपल्या स्वरांच्या माध्यमातून त्या कायमच आपल्या सोबत असतील. लता मंगेशकर यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व हे अद्वितीय का असतात? हे त्यांच्या कार्याबद्दलची निष्ठा, साधेपणा आणि व्यक्तिगत आयुष्य जगण्याची पद्धत यामधून नेहमीच अधोरेखित होतं. कधीच स्वराला न सोडलेल्या लतादिदींमध्ये लहानपणीपासूनच एक शिस्त, आदर्श वागण्याची इच्छा ही पदोपदी त्यांच्या निकटवर्तीयांना नेहमीच दिसून यायची.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कमी वयातच गायिका होण्याचं ध्येय सापडलेल्या लता मंगेशकर यांनी नेहमीच गायन कलेप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा तितकंच प्रेम केलं. आपल्या आयुष्यात त्यांनी ३६ भाषांमध्ये गाणं गायलेल्या लतादीदींनी शाळेची पायरी देखील चढलेली नव्हती सांगितलं तरीही खरं वाटणार नाही. लतादीदींनी आपल्या भावंडांसोबत घेऊन शाळा शिकायची होती. शिक्षकांनी ही परवानगी नाकारली आणि लतादीदींनी शाळेचा त्याग केला. कोणत्या परिस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला? आणि त्यांनी आपलं भाषेचं शिक्षण कुठून घेतलं ? जाणून घेऊयात.
लता मंगेशकर यांचा आवाज गाण्यात जितका गोड होता तितकाच गोड तो त्या साधं बोलतांना वाटायचा. आपल्या साधनेतून साक्षात् सरस्वती देवीचा आशीर्वाद मिळवलेल्या लतादीदींनी ७० वर्ष संगीतक्षेत्राची सेवा केली आणि त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. आजच्या गायिकांचा सुद्धा आदर्श असलेल्या लतादिदींना लहानपणी मात्र डॉक्टर किंवा शिक्षक होण्याची इच्छा होती असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं.
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर येथे झाला होता. त्यांचे वडील ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ हे त्यावेळी एक प्रस्थापित कलाकार, संगीतकार आणि गायक म्हणून काम करायचे. दिनानाथ मंगेशकर यांनी काम केलेल्या ‘भाव बंधन’ या नाटकातील पात्र ‘लतिका’ या नावावरून जन्मल्या तेव्हा ‘हेमा’ असं बारसं झालेल्या दिदींचं नाव ‘लता’ हे ठेवण्यात आलं होतं. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांसोबत संगीत नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती.
गायन कला जोपासण्यासाठी १९४५ मध्ये मुंबईत आलेल्या दीदींचं बालपण हे सांगलीत गेलं होतं. लतादीदींना मीना, आशा, उषा या तीन बहिणी आणि हृदयनाथ हे भाऊ अशी भावंडं होती. हे सर्वच आज संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.
शिक्षण घेण्याची प्रचंड आवड असलेल्या लतादीदी या लहानपणी घराजवळच असलेल्या एका शाळेत गेल्या होत्या. शिक्षकांनी लतादीदींना “श्री गणेशाय नमः” हे लिहायला सांगितलं होतं. दीदींनी शिक्षकांना ते योग्य पद्धतीने लिहून दाखवलं. दुसऱ्या दिवशीपासून शाळेत जाण्याचं ठरलं. दीदींनी ही गोष्ट घरी येऊन आपल्या आईला सांगितली. त्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला होता.
लतादीदी या जेव्हा ५ वर्षांच्या होत्या. त्यांची लहान बहीण आशा या तेव्हा केवळ ८ महिन्याच्या होत्या. आपल्या लहान बहिणीला घरी एकटं सोडून शाळेत जाणं हे काही लतादीदींना मान्य नव्हतं. त्यांनी एक दिवस शाळेत जातांना आशा (भोसले) यांना आपल्यासोबत कडेवर घेऊन गेल्या.
सांगलीतील त्या शाळेसाठी आणि शिक्षकांसाठी ही फार आश्चर्याची गोष्ट होती. त्यांनी लतादीदींना आपल्या लहान बहिणीला शाळेत आणायची परवानगी दिली नाही. आपल्या लहान बहिणीवर प्रचंड प्रेम असलेल्या लतादीदींना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. आपण ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांची मुलगी आहोत आणि आपल्याला कोणी कसं एखादी गोष्ट नाकारू शकतो हा बालिश विचार सुद्धा ५ वर्षांच्या लतादीदींच्या मनात तेव्हा आला होता. त्या घरी आल्या आणि त्यांनी आपल्या आईला सांगितलं, “मी उद्यापासून शाळेत जाणार नाही.”
लता मंगेशकर यांच्या आईंनी या विचारा मागचं कारण विचारलं. लतादीदींच्या मनातील शाळेबद्दलचा राग आणि बहिणीबद्दल असलेलं हे प्रेम बघून त्यांच्या आईला भरून आलं आणि त्यांनी लतादीदींना त्यांच्या मनासारखं करू देण्याचं ठरवलं.
वयाच्या ८३व्या वर्षी जेव्हा लतादीदींनी हा किस्सा सांगितला तेव्हा त्यांनी हा त्यांचा वेडेपणा होता हे मान्य केलं होतं.
बालपणापासूनच लता दीदी आणि आशाताई हे समीकरण ठरलेलं! काळ सरला तरी दोघींमधील प्रेम, जिव्हाळा तसुभरही कमी झाला नाही.
—
- मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से
- लता दीदी, मुंबई दर्शन आणि मी…कधीच विसरू शकणार नाही असा दिवस!
—
लतादीदींनी शाळेत जाण्याचं सोडलं. पण, त्यामुळे शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा काही कमी झाली नव्हती. आपल्या घरी काम करायला येणाऱ्या विठ्ठल नावाच्या गडी कडून त्यांनी मुळाक्षरं, बाराखडी, वाक्य रचना यांचं शिक्षण घेतलं. विठ्ठल हे स्वतः जितके शिकले होते आणि जितकं ते शिकवू शकत होते तितकं लतादीदींनी शिकून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रयत्नात त्या बऱ्याच अंशी यशस्वी देखील झाल्या. पण, मुंबईत येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत संवाद साधण्यासाठी त्यांना अजून शिक्षण घेणं हे क्रमप्राप्त होतं.
१९४५ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी इंग्रजी शिक्षकांना घरी येऊन शिकवण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. इंग्रजी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली अशा कित्येक भाषांचं प्रशिक्षण घेतलं. सुरुवातीच्या काळात लता मंगेशकर यांनी अभिनय क्षेत्रात सुद्धा काम केलं होतं. एका गाण्याच्या त्यांच्या सहगायिका शांता आपटे यांच्यासोबत बोलतांना त्यांच्या हे लक्षात आलं होतं की, आपण तामिळ, पंजाबी या भाषांमध्ये सुद्धा गाणं गायलं पाहिजे. अशा कोणत्या भाषा अस्तित्वात आहेत हेसुद्धा त्यावेळी लतादीदींना त्यावेळी माहीत नव्हतं.
लता मंगेशकर या उर्दू का शिकल्या ? हा किस्सा देखील फार लोकप्रिय आहे. दिलीप कुमार यांच्या सोबत झालेल्या पहिल्याच भेटीत लतादीदींचे उर्दूचे उच्चार अपेक्षित असे स्पष्ट नसावेत असा अंदाज त्यांनी बोलून दाखवला.
लतादीदींना ही गोष्ट फार खटकली होती. त्यांनी दिलीप कुमार यांचं हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी ‘मौलाना मेहबूब’ यांच्याकडून उर्दूचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
उर्दूचे कित्येक पुस्तकं, शायरी त्यांनी वाचली आणि काही वर्षांनी दिलीप कुमार यांच्या मनात असलेल्या शक्यतेचं उत्तर त्यांनी आपल्या हिंदी गाण्यांमधून दिलं.
कोणत्याही भाषेत गाणं गाण्यापूर्वी लतादीदी या त्या गाण्याच्या गीतकार, कवी यांच्याकडून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायच्या. गाण्यातून काय अपेक्षित आहे? हे दिग्दर्शकांना विचारायच्या. गाण्यातील शब्द हे त्यांनी कधीच त्यांचा अर्थ न समजता गायले नाहीत आणि म्हणून प्रत्येक भाषेतील लोकांना लता मंगेशकर यांचा आवाज हा आपल्या भाषेतील व्यक्तीचा वाटतो.
लता मंगेशकर यांना संगीताचं विद्यापीठ म्हणून का संबोधतात? हे आपल्याला त्यांच्या कलेबद्दल, कामाबद्दल असलेल्या आत्मीयतेतून आपल्याला लगेच लक्षात येतं.
आपल्या या शिकण्याच्या इच्छेमुळेच त्या आपल्या गाण्यात उत्तमोत्तम होत गेल्या आणि पद्मश्री, पद्मभूषण, भारत रत्न, ‘व्हॉईस ऑफ मिलेनियम’ सारख्या पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या पहिल्या आणि एकमेव गायिका ठरल्या.
कोणतीही शाळा न शिकलेल्या लतादीदींनी कमावलेलं यश हे शब्दात मांड्ण्या पलीकडचं आहे. आज त्यांच्या जाण्याचं दुःख होत असतांना त्यांच्यातील चांगले गुण शिकणे, आत्मसात करणे हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.