Pangharun Movie Review : मानवी मनाचा ठाव घेणारी सांगीतिक प्रेमकहाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वश: |
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता …
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील हा श्लोक म्हणजे आदर्श जगण्याचा मार्ग. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आत ओढून घेते, त्याप्रमाणे मोहमायेपासून स्वतःला लांब ठेऊन स्थिर बुद्धीने राहावे असा याचा अर्थ. मोक्ष मिळवायचा असेल, तर मोहापासून स्वतःला लांब ठेवणेच योग्य, पण मनुष्याला हे जमणं कर्मकठीण!
आपल्याभोवती असलेले मायेचे पाश, अपेक्षा सोडून देणं हे अगदी मोजक्या लोकांना जमतं. शेवटी माणूस म्हटला, की त्याच्या गरजा, समोरच्यांकडून असणाऱ्या अपेक्षा, आकर्षण या गोष्टी ओघाने आल्याच. मायेच्या पाशात काळात नकळत माणूस गुरफटत जातो आणि जीवाची घालमेल सुरु होते.
नव्या नात्यात बांधले जाताना आपसूक येणारी उत्सुकता, अपेक्षा आणि यातून उलगडणाऱ्या मानवी छटा दाखवणारा चित्रपट म्हणजे ‘पांघरूण’. कसा आहे हा चित्रपट.. जाणून घेऊया.
बा.भ. बोरकर यांची ही मूळ कथा. संपूर्ण चित्रपटात आपल्याला एक गोष्ट खिळवून ठेवते, ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळातील कोंकण. कोंकणातील जी काही नयनरम्य दृश्ये चित्रपटात दिसतात, त्यांना तोड नाही. ही कथा लक्ष्मीची. लहान वयातच विधवा होण्याचं दुर्भाग्य तिच्या पदरी येतं. विधवा विवाहाला नुकतीच मान्यता मिळालेला हा काळ. पोर्तुगीजांकडे चाकरी करत असणारे लक्ष्मीचे वडील तिचा पुनर्विवाह करायचा ठरवतात.
अंतू गुरुजी या विद्वान माणसाशी तिचं लग्न लागतं. अंतू गुरुजींचादेखील हा दुसरा विवाह. पहिल्या पत्नीचे अकाली निधन झाल्यामुळे आईविना पोरक्या झालेल्या दोन पोरींना आणि घराला सांभाळण्यासाठी गुरुजी केवळ एक औपचारिकता म्हणून लक्ष्मीशी लग्न करतात.
आपल्या लाघवी स्वभावाने अल्पावधीतच लक्ष्मी नवीन घराला आपलंसं करते. मुलींना आईची माया देते. त्यांनाही तिचा लळा लागतो, पण एका गोष्टीमुळे ती कायम अस्वस्थ असते. अंतू गुरुजी पहिल्या पत्नीच्या कोषातून बाहेर आलेले नसतात. त्यांचा हा सततचा ‘दुरावा’ लक्ष्मीला समजेनासा होतो. शेवटी तिचं बालसुलभ वय लक्षात घेता तिला आकर्षण वाटणं स्वाभाविकच आहे.
एकीकडे गुरुजींचा दुरावा आणि दुसरीकडे गुरुजींचा प्रिय शिष्य माधवाच्या लक्ष्मीवर रोखलेल्या नजरा… या सगळ्यातून स्वतःच्या ‘सुखाचा’ मार्ग लक्ष्मी का, कसा शोधते हा प्रवास बघण्यासारखा आहे.
चित्रपटातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कथानक, दिग्दर्शन, संगीत, अभिनय आणि दृश्ये. या पाचही निकषांमध्ये हा चित्रपट अव्वल ठरतो. चित्रपटाचे कथानक शेवटापर्यंत खिळवून ठेवते. वरकरणी हे कथानक केवळ लक्ष्मीचे वाटत असले, तरीही प्रत्येक भूमिकेच्या भावनेचे कंगोरे त्यात गुंफलेले आहेत.
गणेश मतकरी यांच्या पटकथा आणि संवादांनी चित्रपटाला वेगळीच खोली प्राप्त करून दिली आहे. महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनात एकही धागा सुटलेला आढळत नाही. प्रत्येक दृश्य, प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक लावलेली दिसते. चित्रपट बघताना तुम्ही सजग राहिलात, तर महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून सरस का आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
हा चित्रपट म्हणजे एक सांगीतिक विलक्षण प्रेमकहाणी आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच असलेल्या भजनात आपण दंगून जातो. आनंद भाटे, केतकी माटेगावकर, विजय प्रकाश यांच्या स्वरातील ही गाणी म्हणजे चित्रपटाला लागलेले चार चांद आहेत. या सर्व गाण्यांना हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब यांचे संगीत लाभले असून यात संत तुकाराम आणि संत सावळा माळी यांचे अभंग आहेत.
गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांमधून देखील प्रेमाचा एक नवा रंग समोर येतो. ‘ही अनोखी गाठ कोणी बांधली… एक झाले ऊन आणि सावली’ या गाण्याचे शब्द काळजाला भिडतात. तुम्ही शास्त्रीय संगीताचे प्रेमी असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे.
गौरी इंगवले हिने लक्ष्मीची भूमिका योग्यप्रकारे पेलली आहे. अभिनय, नृत्य या दोन्ही गोष्टी तिने उत्तमरीत्या सांभाळल्या आहेत. अगदी नैसर्गिक, तरीही तिची अस्वस्थता समोरच्यापर्यंत पोहोचेल अशी लक्ष्मी तिने साकारली आहे.
—
- मराठीतला ‘नवा’ प्रयोग, जाणून घ्या, का बघावा ‘झोंबिवली’?
- नखरे नडले आणि -३ डिग्रीत वीणा जगताप पडली ‘दल लेक’मध्ये…
—
अमोल बावडेकरने सुद्धा विचारांची खोली असणारा, प्रगल्भ आणि ठेहराव असणारा अंतू गुरुजी साकारला आहे. जसजसा चित्रपट पुढे जातो, तसतसा अंतू गुरुजी ही भूमिकाही अधिक बहरत जाते. रोहित फाळके, सुलेखा तळवलकर, दीप्ती लेले, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे यांनी साकारलेल्या भूमिकांना देखील १०० टक्के न्याय मिळाला आहे.
चित्रपटाचा वेग काही ठिकाणी थोडा मंदावल्यासारखा वाटतो, पण त्याचवेळी कानावर पडणाऱ्या पखवाजामुळे आपण पुन्हा एकदा चित्रपटात जातो.
चित्रपटाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही एक सांगीतिक प्रेमकहाणी आहे. संपूर्ण चित्रपटात हे प्रेम भरलेले आहे. केवळ नायक- नायिकेचे नाही, तर इतरही नात्यांचे प्रेम या चित्रपटात पेरलेले दिसते. ‘क्षणिक मोह की आयुष्यभराची संगत या द्वंद्वात अडकलेल्या मानवी मनाचा ठाव घेणारा हा चित्रपट आवर्जून बघायला हवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.