आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या प्रत्येकाचं आपण जिथे लहानाचे मोठे झालेले असतो त्या घराशी दृढ नातं असतं. त्या घरात आपण शिकलेल्या गोष्टी, जपलेली नाती, आजूबाजूचा परिसर, तिथले लोक हे सगळं आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. आपण पुढे दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी राहायला गेलो तरी या आठवणी आपल्या मनातून पुसल्या जात नाहीत.
आपण अशीही काही घरं बघितलेली असतात जिथल्या वातावरणाने आपल्याला भारावून टाकलेलं असतं. अशा घरांमध्ये कलासक्त माणसं बघायला मिळतात. थोरामोठ्यांचं वरचेवर येणंजाणं तिथे असतं. या अशा घरांविषयी ऐकणं किंवा तिथे प्रत्यक्षात जाता येणं ही गोष्ट आपल्याला खूप भारी वाटते. तो अनुभव शब्दांतून व्यक्त करता येत नाही.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचं दिल्लीतलं घर हे अशाच समृद्ध घरांपैकी एक होतं. नुकतंच त्यांनी साऊथ दिल्लीमधील ‘गुलमोहर पार्क’ या पॉश ठिकाणी असलेलं त्यांचं ‘सोपान’ हे घर २३ कोटींना विकल्याची बातमी समोर आली आहे. बच्चन कुटुंबीयांचं हे पाहिलंच घर असल्याचं समजतं. त्यामुळे या घराशी त्यांचं फार विशेष नातं होतं.
अमिताभ बच्चन यांच्या मुंबईत ते बरीच वर्षे राहत असलेल्या ‘जलसा’ या आलिशान बंगल्याविषयी आपण ऐकून असू. याखेरीज बच्चनजींचे मुंबईत आणखीनही ४ बंगले आणि इतरही प्रॉपर्टी आहे. पण जिथे बिग बी लहानाचे मोठे झाले त्या ‘सोपान’ घराविषयी आपल्याला फारशी माहिती नसेल.
बिग बी मुंबईत राहत असल्यामुळे दिल्लीतल्या घराची देखरेख करणं कठीण जात असावं आणि त्यामुळे त्यांनी हे घर विकलं आसपासच्या असं आसपासच्या लोकांचं म्हणणं आहे. पण या ‘सोपान’ घराचा एक समृद्ध इतिहास आहे.
बच्चनजींनी आपल्या ब्लॉगमधून दिल्लीतल्या या घराचा उल्लेख बऱ्याचदा केला आहे. बच्चनजींचे आईवडील तेजी बच्चन आणि हरिवंशराय बच्चन यांचं हे सुंदर दुमजली घर त्यांची आई ‘तेजी बच्चन’ यांच्या नावावर होतं. १९८० सालापर्यंत जोवर हरिवंशराय बच्चन तिथे राहत होते तोपर्यंत त्या घरात कवितांचे कार्यक्रम आणि ज्वलंत विषयांवर चर्चा रंगायच्या.
कवितांच्या कार्यक्रमांमध्ये बच्चनजी स्वतःदेखील त्यांच्या प्रसिद्ध कवितांचं वाचन करायचे. विष्णू प्रभाकर, रामनाथ अवस्थी, डॉ. महीप सिंग, डॉ. राजिंद्र अवस्थी, कुसुम अन्सल, डॉ. नरेंद्र मोहन अशी हिंदी साहित्यसृष्टीतली अनेक मातब्बर मंडळी या वाङमयीन सोहळ्यांमध्ये नेहमीच सहभागी व्हायची. कवी, लेखक, बुद्धिवादी आणि शिक्षक फार मोठ्या संख्येने वादविवादांना हजेरी लावायचे.
तेजी बच्चन या सगळ्यांचा उत्तम पाहुणचार करत असत. सगळ्यांच्या चर्चा आणि कवितावाचन झालं की त्या पाहुण्यांसाठी नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करायच्या आणि ते सगळं त्यांना आवडतंय की नाही याकडे जातीने लक्ष द्यायच्या. गुलमोहर पार्क हाऊसिंग सोसायटी ही पूर्णवेळ काम करणाऱ्या पत्रकारांसाठी होती. मात्र तेजी बच्चन फ्रिलान्स जर्नलिस्ट असूनही त्या या सोसायटीच्या सदस्य झाल्या. त्यावेळी फारसं कुणी त्या भागात जागा घेत नसे.
कुठलाही बडेजाव न करता इतर कुठल्याही रहिवाशांसारखेच हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन त्या सोसायटीत राहायचे अशा आठ्वणीदेखील गुलमोहर पार्क मधल्या जुन्या रहिवाशांनी सांगितल्या आहेत. १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा गुलमोहर पार्क आणि सोपानचं बांधकाम होत होतं तेव्हा अमिताभ बच्चन कुणी मोठे स्टार नव्हते.
बच्चन कुटुंबीय उच्च मध्यमवर्गीय होते आणि त्यांचे फार घट्ट राजकीय संबंध होते. आपल्या घराचं बांधकाम कसं चाललंय आणि किती पुढे गेलंय हे बघायला हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन अनेकदा यायचे. गुलमोहर पार्कमधले बच्चन कुटुंबियांचे शेजारी आणि दिल्लीतल्या हिंदी भवनचे सचिव डॉ. गोविंद व्यास सांगतात, “बच्चन जी माझे वडील पत्रकार गोपाल प्रसाद यादव यांना भेटायला बऱ्याचदा येत असत. कुठल्याही विषयांवर त्यांच्या गप्पा रंगायच्या.”
१९७९साली ‘डॉन’ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अमिताभ बच्चन यांना आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घ्यायची होती म्हणून मुलासोबत राहण्यासाठी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांनी ‘सोपान’चं घर सोडलं आणि ते मुंबईत राहायला आले. मात्र त्यानंतर बऱ्याचदा ते आपल्या दिल्लीच्या घरी राहायला जायचे आणि मित्रमैत्रिणींना घरी बोलवून कवितांचे कार्यक्रम आणि चर्चा करायचे. त्या दोघांना जरी दिल्लीतल्याच घरी राहायची इच्छा असली तरी अमिताभ बच्चन यांना ते त्यांच्यासोबत मुंबईला राहायला हवे होते.
ते दोघे मुंबईला राहायला गेले मात्र दरवर्षीं सगळ्या कुटुंबीयांनी मिळून ‘सोपान’मध्येच दिवाळी साजरी करायची असा त्यांनी नियम केला. अमिताभ बच्चन, त्यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन आणि त्यांचे आईवडील हे सगळेच दिवाळीच्या दिवसांमध्ये फार आनंदात असायचे.
“सोपान बाहेर एकदा अनार लावत असताना अमिताभ बच्चन यांना जखम झाली होती.”, अशी आठवण गुलमोहर पार्कमध्ये राहत असलेले कवी आणि शिक्षक डॉ. सुभाष वशिष्ट यांनी सांगितली. याबरोबरच एक रंजक किस्साही त्यांनी सांगितला.
हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारायला जायचे तेव्हा एक सुरक्षा रक्षक नेहमी त्यांच्यासोबत असायचा. कुणीतरी त्यांना यामागचं कारण विचारलं तेव्हा हरिवंशराय बच्चन म्हणाले,”मुन्नाला (अमिताभ बच्चन यांना) भीती वाटते की आम्हा दोघांना कुणीतरी पळवून नेईल.”
सुरवातीला जिथे काही पत्रकार राहायचे त्या ‘गुलमोहर पार्क’मध्ये काळाच्या ओघात बरेच बदल झाले. आता तिथे मोठमोठे बिझनेसमन, पत्रकार आणि वरिष्ठ वकील राहतात. ‘सोपान’च्या घराशी अमिताभ बच्चन यांचा फार घट्ट भावनिक बंध होता. एका मुलाखतीत बच्चनजींनी ‘सोपान’मधल्या त्यांच्या अभ्यासाच्या खोलीविषयीची आठवण सांगितली होती.
“मी दिल्लीत असताना माझ्या वडिलांच्या डेस्कवर बसायचो. आजूबाजूला त्यांची खूप पुस्तकं असायची. याच डेस्कवर बसून त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचं शेवटचं प्रकरण लिहिलं होतं आणि तिथेच बसून बऱ्याच कविताही लिहिल्या होत्या.”
७ मार्च २०१६ला लिहिलेल्या आपल्या ‘सोपान’विषयीच्या ब्लॉग पोस्ट मध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं होतं,”सोपान म्हणजे जिना. माझे वडील हरिवंशराय बच्चन जेव्हा सरकारी नौकरीतून आणि राज्य सभेतून निवृत्त झाले तेव्हा हे घर बांधलं गेलं. माझ्या वडिलांनी जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहिलं तेव्हा इथल्या जिन्यांना प्रचंड प्रमाणात पायऱ्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सबंध घर अशा जिन्यांनी भरलेलं होतं म्हणूनच त्यांनी या घराला ‘सोपान’ हे नाव दिलं.”
१९८७मध्ये लोकसभेतून राजीनामा दिल्यांनतर अमिताभ बच्चन ‘सोपान’मध्येच मीडियाच्या कर्मचाऱ्यांना भेटले होते. इव्हिनिंग न्यूजचे माजी राजकीय संपादक अमिताभ श्रीवास्तव सांगतात,”इव्हिनिंग न्यूज (हिंदुस्तान टाइम्स ग्रुप मधून आता जो इव्हिनिंग पेपर रद्दबातल झाला आहे) चे संपादक बीएम सिन्हा आणि मी अमिताभ बच्चन यांनी संसदेतून राजीनामा दिल्यावर त्यांना ‘सोपान’मध्येच भेटलो होतो.
आम्ही तिघं तासन् तास वेगवगेळ्या कॉंट्रोव्हर्सीजवर चर्चा करायचो. या सगळ्या चर्चांमुळे आणि इंडियन एक्सप्रेसने काही कागदपत्रं प्रसिद्ध केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी राजीनामा दिला. आम्हला न्यायला ते हिंदुस्तान टाइम्सच्या ऑफिसपाशी त्यांची कार पाठवायचे. ‘दिल्ली टेलिफोन डायरेक्टरी’मध्ये हरिवंशराय आणि तेजी जींचा नंबर नव्हता. त्यामुळे त्या दिवसांमध्ये त्यांना भेटणं फार कठीण व्हायचं.”
तिथल्या शेजाऱ्यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन सोपानच्या घरी कधीतरीच यायचे. जया बच्चन मात्र तिथे अनेकदा यायच्या. बच्चन कुटुंबियांच्या आयुष्यात फार मोलाची भूमिका बजावलेल्या ‘सोपान’च्या घरामुळेच ‘गुलमोहर पार्क’ मुख्यत्वे ओळखलं जातं. वरील माहिती quint मध्ये विवेक शुक्ला यांनी सोपानवर लिहलेल्या लेखावरून घेतली आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.