' सासू असावी तर अशी, मुलाच्या मृत्यूनंतर शिकवलं सुनेला, थाटात लावलं दुसरं लग्न! – InMarathi

सासू असावी तर अशी, मुलाच्या मृत्यूनंतर शिकवलं सुनेला, थाटात लावलं दुसरं लग्न!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात सासू आणि सून हे एक वेगळंच समीकरण आहे. ते तसं होण्यामागेही एक कारण आहे ते म्हणजे भारतातल्या टीव्ही सिरियल्स. या टीव्ही मालिकांमध्ये सासवा सुनांची भांडणं गेली अनेक दशकं चालू आहेत, पण या मालिकांनाही नावं ठेऊन काही उपयोग नाही.

अशाच मालिकांचा टीआरपी सगळ्यात जास्त असतो, कारण प्रेक्षकही अशाच मालिका बघण्याला प्राधान्य देतात. शिवाय ‘ती काय म्हणाली, आता हिने काय केलं पाहिजे’ अशा गप्पाही रंगवतात.

या गप्पा फक्त गृहिणीच नव्हे तर शाळकरी मुलींपासून ते वयोवृद्ध आजीबाईंपर्यंत सगळेच जण करतात. फक्त महिलांसाठी करमणूक म्हणून प्रामुख्यानं बनवलेल्या या मालिका पुरुषही तितक्याच आवडीनं बघतात. या मालिकांवर सोशल मीडियावर सातत्यानं टीका होत असते, पण तरीही अशा मालिका बंद काही पडत नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे सगळ्यांनाच माहित असलेलं रामायण सांगण्याचं कारण म्हणजे ‘परंपरागत टीव्ही सिरीयल’ छाप सासू सुनेच्या प्रतिमेला छेद देणारी एक घटना राजस्थानात घडली आहे.

राजस्थानातल्या ‘सिकर’ या शहरात एका सासूने तिच्या विधवा सुनेला शिकवलं आणि नंतर तिचं लग्नही लावून दिलं. या अशा घटना सहसा कुठं घडल्याच्या समोर येत नाहीत. बोटावर मोजण्याइतक्या प्रेमळ आणि समजूतदार सासू-सुनेची जोडी मिळणं खरंतर दुर्मिळच.

सासूने नेमकं केलं तरी काय

 

kamla devi im

 

सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या कमला देवींच्या शुभम या लहान मुलाशी सुनीताचे मे २०१६ मध्ये लग्न झाले. त्यानंतर शुभम किर्गिझस्तानला एमबीबीएस शिकण्यासाठी गेला, पण काळाला त्याचं सुख बघवलं गेलं नाही.

दुर्दैवाने केवळ सहा महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये शुभमचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. मात्र अशी दुर्दैवी घटना घडली तरीही खचून न जाता कमला देवींनी सुनीताचा सांभाळ केला. त्यांनी सुनीतावर आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करत, तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे ५ वर्षं जपलं. एवढंच नव्हे तर त्यांनी सुनीताला पुढं शिकायला लावलं.

कमला देवी स्वतः शिक्षिका असल्याने त्यांनी सुनीताला तिच्या पायावर उभं करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि तिला आधी मास्टर्स डिग्री तर त्यानंतर बी. एड. करायला लावलं.

सुनीताचं हे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला एका सरकारी शाळेत इतिहासाची शिक्षिका म्हणून नोकरीही लागली, पण कमला देवींकडून काहीतरी शिकून ही घेण्याची गोष्ट इथं थांबत नाही. त्यांनी एक चांगला मुलगा बघून सुनीताचा पुनर्विवाह करून दिला.

भोपाळमध्ये कॅग ऑडिटर म्हणून काम करणार्‍या मुकेशशी सुनीताचे लग्न कमला देवींनी लावले. कमला देवींचा हुंड्याला विरोध होता. कारण जेव्हा सुनीताचा शुभमशी विवाह झाला होता त्यावेळी कमला देवींनी तिच्या कुटुंबाकडून हुंडा घेतला नव्हता. त्यामुळे त्यांनी सुनीताचे मुकेशशी लग्न करून देतानाही हुंडा दिला नाही.

प्रत्येकाने शिकण्यासारखी गोष्ट….

 

kamla devi im1

 

कमला देवींचं हे वागणं आपल्याला सकारात्मकतेची नवी व्याख्या शिकवून जातं. हुंडाबळी, कौटुंबिक कलह अशा घटना आपल्याला भारतभरातून समजत असतात. मुलीने जर हुंडा दिला नाही तर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. तिला माहेरी पाठवून हुंडा आणेपर्यंत परत यायचं नाही अशी तंबी दिली जाते.

मुलाच्या लग्नानंतर जर काही कारणाने घरातल्या कोणाचा मृत्यू झाला तर नव्या नवरीला पांढऱ्या पायाची, कमनशिबी अशी कितीतरी घाणेरडी नावं दिली जातात. त्या मुलीला अशा घटनांनंतर कधीच सन्मानाची वागणूक मिळत नाही, पण कमला देवींच्या वागण्यातून हा नेहमीचा विचार बदलतोय असं एकंदरीत दिसतंय. हे कायम असंच राहिलं पाहिजे अशी आशा आहे.

आजकाल रक्ताची नातीसुद्धा नीट जपली जात नाहीत. पण इथं तर दुसऱ्या कुटुंबातून सून म्हणून आलेल्या एका मुलीचा सांभाळ कमला देवींनी स्वतःच्या मुलीप्रमाणे केला. अशीच सासू मला मिळाली पाहिजे असा जर विचार प्रत्येक तरुणीने केला तर त्यात चुकीचं काही ठरणार नाही. बरोबर ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?