Site icon InMarathi

सावधान, या अॅप्स वरून कर्ज घेणं पडेल महागात, हे अनुभव वाचा आणि शहाणे व्हा

apps im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला जर कोणी मागेल तितके पैसे उसने देत असेल तर? ही रक्कम जर तुम्हाला १०-१५ दिवसात किंवा हवी तर महिन्याभरात परत करण्याची मुभा असेल तर? अशी असे हे पैसे बँकेसारखी कोणतीही झंझट मागे न लागता केवळ एका क्लिकवर मिळत असतील तर? वेळीच सावध व्हा. अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नका.

तुम्हाला हवे तेवढे पैसे, हवे तेव्हा मिळण्याची सोय आहे. हे पैसे तुम्हाला इझी कॅश, रिच मनी, स्मार्ट लोन अशा नावाने उपलब्ध असलेल्या अ‍ॅपद्वारे मिळू शकतात. या सारख्याच नावांची खूप अ‍ॅप्स सध्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत.

पूर्वीही असा प्रकार चालत होताच पण यांचा सुळसुळाट लॉकडाउनच्या काळात वाढला. अनेक लोकांच्या डोक्यावर कर्ज होतं. त्यात नोकरीही गेली होती. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी बऱ्याच लोकांनी अशा अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे कर्जाऊ घेतले आणि त्यांच्या कचाट्यात ते सापडले.

नक्की काय असतात ही अ‍ॅप?

 

 

भारतातल्या अनेक लोकांकडे अजूनही बँक अकाउंट नाही. त्यामुळे अशांना जर कर्ज घ्यायचं असेल तर ते सावकार, ओळखीचे लोक अशा अनौपचारिक पद्धतीने कर्ज घेतात. याची डिजिटल आवृत्ती म्हणजे ही अ‍ॅप्स म्हणता येतील.

सगळ्या लोकांकडे सध्या मोबाईल आहे आणि कोणालाही बँकांसारख्या सरकारी, कागदपत्रांच्या कचाट्यात अडकण्याची इच्छा नाही हे अशा अ‍ॅप बनवणाऱ्या लोकांनी ओळखले आहे.

आपल्याला डिजिटल कर्ज मिळणार या भावनेने लोक हुरळून जातात. आपण फक्त हे अ‍ॅप डाउनलोड करण्याचा अवकाश की ते आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढतात. हवे तसे पैसे देण्याची तयारी तर दाखवतात पण त्याबद्दल पूर्ण माहिती कधीच देत नाहीत.

कर्ज परतफेडीच्या ठरलेल्या मुदतीपेक्षा एक दिवस जरी उशीर झाला तरी यांची पेनल्टी १००-२०० नसते, ती जाते १० ते १५ हजारांच्या घरात. आपण जी रक्कम कर्जाऊ घेतो त्या रकमेपेक्षा व्याजाचा एक हप्ताच मोठा असतो. आपण जरी पैसे फेडले तरीही ते पैसे मिळाले नाहीत असे सांगून धमक्या देतात. अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.

दिनेशचा अनुभव त्याच्याच शब्दात…

 

 

“काही दिवसांपूर्वी मी ‘रिच कॅश’ नावाचं एक अ‍ॅप डाउनलोड केलं होतं. मला कर्ज हवं होतं. मला केवळ १० दिवसांकरता पैसे हवे होते, पण मी ७ दिवसातच सगळे पैसे आणि त्याचं व्याज भरलं.

असं असूनही मला त्यांचा ११ व्या दिवशी तुम्ही पैसे भरले नाहीत असा फोन आला. मी त्यावेळी त्यांना पैसे दिले आहेत हे सांगितलंच शिवाय त्याचा स्क्रीनशॉटही पाठवला. तरीही त्यांचे फोन दररोज यायला लागले. त्यावरून मला ते शिवीगाळ करायचे, धमक्या द्यायचे.

मी वैतागून त्यांना म्हणालो की पोलिसात तक्रार करेन. त्यावेळी आमचं कोणी काहीही बिघडवू शकत नाही असं धक्कादायक उत्तर त्यांच्याकडून मिळालं. शिवाय त्यांच्याकडं माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या सगळ्यांचे नंबर होते. त्यांनी प्रत्येकाला फोन करून माझी बदनामी करायला सुरुवात केली. त्यांना आणि मला दिलेल्या धमक्या आणि शिव्या तर मी कोणालाही सांगू शकत नाही.”

उघड उघड घडणाऱ्या अशा गोष्टींवर बँक, पोलीस किंवा सरकारचे काय म्हणणे आहे?

 

 

आरबीआयला विचारल्यानंतर त्यांचं असं उत्तर होतं की केवळ नियमन केलेल्या संस्थांवर ते देखरेख करू शकतात. पण अशा प्रकारच्या अनियंत्रित लोकांवर ते नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. तरीही स्वस्थ न बसता त्यांनी या अ‍ॅप्सवर कारवाई करण्याच्या दिशेने पावलं उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआय सगळ्या बँका किंवा इतर रजिस्टर्ड संस्थांवर लक्ष ठेऊ शकते. पण या प्रकारच्या लोकांवर शक्यतो कोणाला कारवाई करता येत नाही असंच दिसलं आहे. गेल्या वर्षी प्ले स्टोअरवर एकूण ११०० अ‍ॅप्स होती, त्यातली ६०० अ‍ॅप्स तर बोगस निघाली. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे प्रकरण दिसतं तेवढं साधं आणि सोपं नाही.

प्ले स्टोअर अशी अ‍ॅप्स हटवत असतंच. पण जितकी अ‍ॅप्स हटवली जातील तितकीच ती नवीन तयारही होत राहतात. या बाबतीत अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही अशा तक्रारी घेऊन गेलो तर पोलीस त्याला फार सिरियसली घेत नाहीत. ते म्हणतात तुम्ही आधी असा पैसा घेतलातच कशाला?

 

 

“आम्ही तक्रार जरी दाखल करायचं ठरवलं तरी त्याला काही मर्यादा येतात. आरोपी समोर असेल तर त्याला पकडता येऊ शकतं. पण अशा अ‍ॅप्सचं ना रजिस्ट्रेशन असतं ना त्यांचा सर्व्हर भारतात असतो. अज्ञात व्यक्तीविरोधात जरी गुन्हा दाखल करायचा ठरवला तरी त्याच्या कलामांनाही मर्यादा आहेत”, असं एका पोलिसानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये आपलीच चूक जास्त आहे. शेवटी गुन्हेगार तर गुन्हा करणार. आणि तो असा अज्ञात असला म्हणजे झालंच. आपल्यालाच थोडं सावध राहण्याची गरज आहे. आपण प्रत्येक गोष्टीसाठी कळ काढू शकतो. मग पैसे मिळवण्याच्या बाबतीतच आपण एवढे उतावळे का होतो? आपण स्वतःवर ताबा का ठेऊ शकत नाही?

केवळ काही कागदपत्रांच्या कचाट्यातून सुटणं आणि आपला आळस आपल्याला नडतो. दररोज बातम्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कोणाला ना कोणालातरी ऑनलाईन गंडा घातलेला आपण वाचतो.

कोणाला फुकट गिफ्टचं आमिष, कोणाला स्वस्तात गाडी देण्याचं आमिष अशा एक ना दोन कितीतरी बातम्या आपण वाचतो. काहींना ओटीपी मागतात, काहींना लिंकवर क्लिक करा म्हणतात तर काहींना बँकेचे डिटेल्स द्या म्हणतात आणि इथं आपण कोणीही काहीही न मागता स्वतःच समोरच्याला सगळे डिटेल्स देऊन मोकळे होतो. आजकालच्या जगात आपल्यालाच फार सावध राहण्याची गरज आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version