Site icon InMarathi

डिप्रेशन, दारूच्या नशेत केलेलं ट्विट: नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारा ‘कॉमेडीयन’!

kapil sharma featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

नुकतंच I am not done yet – Kapil sharma हा स्टँड अप कॉमेडी अॅक्ट नेटफ्लिक्सवर पाहण्यात आला. खरं सांगायचं झालं तर मी कपिल शर्मा फॅन नाही, त्याचे कोणतेही शोज मी फॉलो करत नाही.

यामागचं एकमेव कारण म्हणजे माझी आवड, मी जेवढ्यावेळा कपिल शर्माचा कॉमेडी अॅक्ट बघितला आहे तेव्हा मला चेहेऱ्यावर हलकं हसू देखील आलेलं नाही. कोणा नातेवाईक किंवा मित्राच्या घरी ओझरता त्याचा शो बघितला होता, पण तेव्हाही मला किंचित हसूदेखील आलेलं नाही.

 

 

याचा अर्थ कपिल शर्मा हा वाईट कॉमेडीयन आहे का? तर नाही, पण मला तो कॉमेडीयन म्हणून कधीच पटला नाही किंवा रुचला नाही. असंख्य लोकं त्याच्या विनोदावर लोटपोट होऊन हसतात पण मला कधीच त्याच्या कॉमेडीमध्ये तेवढं काहीच जाणवलं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कारण मी कॉमेडीकडे फक्त ऑफिसमधून थकून भागून घरी आल्यावर जेवणाबरोबर टाइमपास म्हणून बघत नाही. माझ्यासाठी कॉमेडी ही सर्वात अवघड गोष्ट आहे, आणि ती परफॉर्म करणारे आर्टिस्ट म्हणून माझ्या डोळ्यासमोर काही बेंचमार्क आधीच सेट आहेत.

पू.ल, व.पू यांच्यापासून शिरीष कणेकर, दिलीप प्रभावळकर, जॉनी लिव्हर ते अगदी थेट सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला झाकीर खान यांच्यासारखे काही कॉमेडीयन आहेत ज्यांचा परफॉर्मन्स बघून मी लहानाचा मोठा झालो.

 

 

त्यामुळे सध्याच्या फास्ट फूड जनरेशनची कॉमेडी मला पचत नाही, याचा अर्थ असा अजिबात नाही की कपिल हा वाईट कलाकार आहे, त्याच्या स्ट्रगलसाठी आणि त्याने आज जे कमावलं आहे त्यासाठी जो आदर मनात आहे तो तसुभरही कमी होणार नाही.

उलट त्याने जनमानसात जे स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे आणि आज आपण त्याच्याच एका शोबद्दल बोलतोय यातच कपिल शर्मा या कलाकाराचं यश सामावलं आहे.

त्यामुळे कोणत्याही कपिल फॅनची आधीच माफी मागून हे सांगतो की मला कपिल हा कॉमेडीयन म्हणून पटला नाही. ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी सर्कस अशा काही शोजमध्ये त्याचे अॅक्ट प्रथम आवडले होते पण ते तेवढ्यापुरतंच!

 

 

कपिल जेव्हा पहिल्यांदा फेमस झाला तेव्हासुद्धा त्याच्या स्क्रिप्ट ह्या तशा सुमारच होत्या, तेव्हा एवढं एक्सपोजर नसल्याने त्या काळात ते चालून गेलं, पण सध्याच्या डिजिटल काळात कपिलचे विनोद हे अत्यंत बालिश आणि टुकार वाटू लागले आहेत.

त्याचा नेटफ्लिक्सवर आलेला तो ५० मिनिटांचा कॉमेडी अॅक्टसुद्धा खूप शिळा वाटला. बरेचसे जोक हे शाळेतल्या मुलांच्या PJ लेवलचे वाटले. सुरुवातीचा RTPCR आणि RTGS चा पंच ऐकल्यानंतर पुढे जाउच नये असं वाटत होतं, पण तरी कसाबसा हा अॅक्ट पूर्ण केला.

यानंतर कपिल आणि नेटफ्लिक्स मिळून त्यांच्या प्लॅटफॉर्मची जाहिरात करत होते असच वाटलं. कपिलने कोणते नेटफ्लिक्स शो पाहिले, त्याच्या ड्रायवरने कोणते शोज पहिले हेच या शोमध्ये सुरू होतं. नेटफ्लिक्सला भारतीय मार्केट काबिज करण्यासाठी कोणत्या थराला उतरावं लागतय हे या अशा विनोदावरून दिसत होतं.

बरं नेटफ्लिक्सचा ह कोड गैरसमज आहे की भारतीय फक्त मनी हाईस्टच बघतात, तर त्यांनी हा त्यांचा गैरसमज वेळीच दूर केला तर खूप बरं होईल असं मला खरंच वाटतं!

 

बरं पुढे जाऊनसुद्धा कपिल त्याच्या डिप्रेशन आणि अल्कोहोलीजमबद्दल जे काही बरळला आहे ते पाहता तो स्वतः ३ पेग लावून परफॉर्म करत आहे की काय असंच वाटत होतं!

बरं यानंतर कहर म्हणजे तेव्हा झाला जेव्हा अर्ध्याहुन अधिक विनोद हे त्याच्या alcoholism आणि पंतप्रधानांवर होते. नाव न घेता फक्त ‘पंतप्रधान’ असा उल्लेख करून काय सेफ गेम कपिल खेळला आहे हे तोच जाणे, यापेक्षा थेट नाव घेऊनच त्याने विनोद केले असते तर त्याच्या हिंमतीची नक्कीच दाद दिली असती.

पण त्याचे हे चिप विनोद ऐकून त्याने स्वतःची गणती मूनव्वर फारूकि, कुणाल कामरा आणि वरुण ग्रोवर यांच्यात करायला सुरुवात केली आहे असं प्रकर्षाने जाणवलं.

शिवाय दारूच्या नशेत केलेल्या ट्विटबद्दल बोलताना तर त्याने त्या गोष्टीचं इतकं समर्थन केलय की जणू काही याला एकट्यालाच त्याची किंमत चुकवावी लागली आहे.

 

 

वादग्रस्त ट्विटची किंमत सलीम खान, जावेद अख्तर, सलमान खानपासून ऋषि कपूरपर्यंत बड्याबड्या लोकांना मोजावी लागली होती, त्यांच्यासमोर कपिल शर्मा हे नाव अजूनही तसं छोटंच आहे.

आणि झेपत नसेल एवढी तर घेऊ नये, उगाच पंजाबी आहे म्हणून हवी तेवढी ढोसायची आणि मग अंगाशी आलं की त्याबद्दल हे असे स्टँड अप अॅक्ट करून पांघरूण घालायचं हे बरोबर नाही ना कपिल!

यापुढे सलमान खाननेसुद्धा त्याच्या पिण्याच्या सवयीचं असंच समर्थन केलं तर त्याने केलेल्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटका होणार आहे का?

दारूची नशा किती वाईट आहे आणि ती माणसाला किती उध्वस्त करू शकते हे बघायचं असेल तर सुप्रसिद्ध कवि, गायक आणि अभिनेता पीयूष मिश्रा यांची ‘अल्कोहोलीजम’वरची कविता एकदा कपिलने ऐकावी, ती ऐकली असती तर दारूसारख्या गंभीर व्यसनाचं आणि दारूच्या अंमलाखाली केलेल्या चुकीचं समर्थन करायची हिंमत झाली नसती!

 

 

कॉमेडीयन लोकांनी सिस्टिमवर किंवा तत्कालीन सरकारवर टीका करू नये का? तर असं नाही, पू.ल, व.पू, अत्रे यांनी त्यांच्या काळात तेव्हाच्या सरकारवर भाष्य करून त्यांच्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला होता, पण त्यांनी कधीच त्यात भेद केला नाही.

सरकार कुणाचंही असो तेव्हाच्या सिस्टिमवर, समाजावर त्यांनी भाष्य केलं. पण कपिल शर्मा या त्याच्या कॉमेडी अॅक्टमध्ये ज्या आदराने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी बोलला तितक्याच आदराने तो सध्याच्या पंतप्रधानांविषयी बोलू शकला असता,  हाच फरक आहे जुन्या आणि नव्या कलाकारांमध्ये.

राजकीय विचारधारा आणि कला यातच सध्या प्रचंड गल्लत होत असल्याने या अशा फास्ट फूड कॉमेडीयन्सचा सुळसुळाट आपल्याला दिसेल.

या गर्दीत झाकीर खानसारखा एक्का दुक्काच परफॉर्मर सापडेल जो खरंच खूप सच्च्या आणि प्रामाणिक मनाने कला सादर करतो.

 

 

कपिल शर्माच्या स्ट्रगलबद्दल नितांत आदर आहेच, शिवाय देशातल्या बहुतांश लोकांना तो ‘हसवतो’ आहे, पण जेव्हा एक कलाकार त्याच्या कलेपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जात असेल तेव्हा त्याच्या कलेत नक्कीच काहीतरी कमतरता असते, हे नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version