Site icon InMarathi

लोकलमधून दिसणाऱ्या ‘दादु हाल्या पाटील’ इमारतीच्या नावामागे नेमकं आहे काय?

dadu halya patil image im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – चंदन विचारे, (लेखक, ऐतिहासिक वास्तू-वस्तू संवर्धक)

===

लोण्यावळ्याजवळच्या राजमाची गड परिसरात उगम पावणारी एक नदी म्हणजे उल्हास नदी. पुणे – रायगड जिल्ह्यातील कोंडिवडे, कर्जत नेरळ, शेलू ते पुढे ठाणे जिल्ह्यातील वांगणी , बदलापूर , शहाड आणि कल्याण असा १२२ किलोमीटर अंतराचा लांबवरचा प्रवास करत, वाटेत वालधुनी आणि काळू नदीला सोबत घेऊन पुढे वसई खाडीस मिळते. ज्या गावापासून पुढे उल्हास नदीचे नामकरण वसईची खाडी असे होते ते उल्हास नदीच्या खाडीकिऱ्यावर वसलेले अन् कांदळवनाची नैसर्गिक संपत्ती लाभलेले दिवा गाव होय.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाहून कल्याणच्या दिशेने जाताना मुंब्रापुढील स्थानक म्हणजे दिवा जंक्शन. इथूनच पुढे एक रेल्वे मार्ग दातिवली स्थानकामार्गे कोकणात जातो. दिवा स्थानकाच्या पश्चिमेस दिवा गाव आणि पूर्वेस आगासन, दातिवली, बेतावडे आणि म्हातार्डे अशी गावे आहेत. कल्याणच्या दिशेने जाताना पश्चिमेस एक सुंदर असे महादेवाचे मंदिर नेहमीच रेल्वे प्रवाशांचे लक्ष वेधून घेते ते मंदिर म्हणजे म्हातार्डेश्वर मंदिर.या मंदिराविषयीची अधिक माहिती मी याआधीच्या एका लेखात दिली असल्याने लेखविस्तारभयास्तव ती येथे देत नाही.

तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तिविषयी जी दिवा स्थानकाची ओळख बनून राहिले आहेत.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला मोबाईलद्वारे रेल्वेत बसल्या ठिकाणी पुढील येणारे स्थानक कोणते हे कळते. मोबाईलप्रमाणेच हल्ली रेल्वेत प्रत्येक डब्ब्यात छोट्या स्थानकदर्शक प्रणाली ( इंडिकेटर) बसवल्या गेल्या आहेत ज्यातून होणाऱ्या उद्घोषणेद्वारे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधून आपल्याला पुढील येणाऱ्या स्थानकाची माहिती दिली जाते. पण पूर्वी असे नव्हते. पूर्वी रेल्वेने तिन्ही मार्गांवर रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या स्थानकांची नावे तोंडपाठ असत आणि त्याखेरीज एखादे स्थानक ओळखण्यासाठी अमुक तमुक लँडमार्क ठरलेला असायचा. जसं कि एखादी प्रसिद्ध कंपनी, एखादी नदी, एखादी खाडी, एखादी वसाहत , एखादी टेकडी , एखादी इमारत वगैरे वगैरे.. उदाहरणच द्यायचं झालं तर हार्बर मार्गावरचे मुंबईहून पनवेल दिशेने मानखुर्द स्थानक सोडले कि एक मोठी खाडी लागते ती खाडी ओलांडली कि प्रवासी आपले सामान अंगाखांद्यावर घेऊन पुढील वाशी स्थानकात उतरण्यासाठी दारात उभे रहातात.

 

 

मानखुर्द आणि वाशी स्थानक दरम्यानची हि खाडी म्हणजेच या दोन स्थानकांदरम्यानचे लँडमार्क. अशी बरीच उदाहरणे देता येतील पण आपण या एकाच उदाहारण घेऊन पुढे जाऊ.

वर नमूद केल्याप्रमाणे दिवा स्थानकाची ओळख म्हणजेच लँडमार्क बनून राहिलेली ही सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणजे दादू हाल्या पाटील होय. मुंबई ते कल्याण- पुढे कर्जत वगैरे आणि कल्याण ते मुंबई असा अप – डाऊन प्रवास करणाऱ्यांना दादू हाल्या पाटील हे नाव अगदी तोंडपाठ! दिवा स्थानक येण्याआधी अगदी थोड्याच अंतरावर दिवा गावात रेल्वेमार्गालगत पश्चिम दिशेस असलेले एक टुमदार दुमजली वाडा आणि त्या वाड्याच्या रेल्वे मार्ग

दर्शनी दिशेस ठळक अक्षरात रंगविलेले नाव – दादू हाल्या पाटील हि खरी आणि दिवा स्थानकाची परिचित अशी ओळख.

 

 

लहानपणापासून माझाही प्रवास या मार्गावरून बरेचदा होत असे आणि तेव्हा हे नाव नजरेस पडत असे पण त्यावेळी या नावाविषयी आजच्याइतके प्रश्न पडत नसत. आज मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची संशोधक वृत्ती मला माझा मित्र राकेश मोरे याच्यासोबत दिव्यातील पाटलांच्या या वाड्यावर घेऊन गेली.

या वाड्यात आमच्या स्वागतासाठी आणि आमच्या माहितीत भर घालण्यासाठी हजर होत्या कै. दादू हाल्या पाटील यांची पत्नी गं. भा. दुर्गाबाई दादू पाटील आणि त्यांची सून सौ. वैशाली साईनाथ पाटील.

कौटुंबिक माहिती

दादू हाल्या पाटील हे दिवा गावातील, आगरी समाजातील एक सुप्रसिद्ध आसामी. शनिवार पाटील हे दादू हाल्या पाटील यांच्या आजोबांचे नाव. दादूंचा जन्म, लग्न तारीख आणि वर्षाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी अंदाजे १९४२ सालचा त्यांचा जन्म असावा असे त्यांच्या पत्नीने सांगितले.

त्यांचे शिक्षण फार झाले नव्हते पण त्यांना व्यवहारज्ञान बऱ्यापैकी होते. दादूंच्या लहानपणीच त्यांच्या आईवडीलांचे निधन झाल्याने त्यांचे चुलता- चुलती यांच्या देखरेखीखाली आणि चुलतभावंडांच्या समवेतच दादूंचे संगोपन होत गेले. त्यांचा दादूंना बराच पाठींबा लाभला. दादूंना ५ बहिणी होत्या ज्या आता हयात नाहीत.

 

 

दिवा गावातील पाटील घराणे हे मोठे नावाजलेले. ब्रम्हा पाटील, भीम पाटील, बाबाजी पाटील , यशोदा भगत हि दादूंची चुलत भावंडे. दादूंचे दोन पुतणे श्री. शैलेश पाटील आणि श्री. अमर ब्रम्हा पाटील हे आता दिव्याचे नगरसेवक पद भुषवित आहेत तसेच ते आजही दादूंच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहेत.

दादूंना दोन मुलगे आणि दोन मुली. त्यांची नावे – श्री. साईनाथ दादू पाटील, श्री. गुरुनाथ दादू पाटील , अनिता पाटील, रंजना पाटील. यापैकी मुली सासरी असतात. चार मुले आणि नातवंड असा दादूंचा हसता खेळता परिवार. दादूंच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्याशी बरीच मित्रमंडळी जोडली होती.

 

 

आवड आणि सामाजिक कामे

दादूंच्या वडीलांना सामाजिक कामांची , रंजले गांजलेल्यांच्या मदतीला धावून जायची सवय. वडीलांचा हाच गुण नेमका दादूंच्या अंगात जसाच्या तसा उतरला.

दादूंना देशविदेशात चाललेल्या घडामोडी जाणून घेण्याची आवड म्हणूनच ते कुणाकरवी तरी रोजच्या रोज लोकमत हे वर्तमानपत्र मागवून वाचून घेत असत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे यादोघांविषयी त्यांना प्रेम आणि आदर. ठाण्यात गेले कि दादू आवर्जून आनंद दिघेंची भेट घेत असत.

दिवा गावातील अनेक सामाजिक कार्यांत , शाळा, मंदिर उभारणी , स्मशान दुरुस्ती वगैरे कार्यास ते आपल्या परीने आर्थिक हातभार लावत. सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यात त्यांचा विशेष पुढाकार! गावातील कातकरी, ठाकूर मंडळींना रोजगार मिळवून देण्यासाठी, शेतीसाठी तसेच मुंब्र्यातील ठाकूरपाडा येथे घरे बांधून देण्यासाठी त्यांनी मदत केली. गावात वादविवाद होऊ नयेत यासाठी ते प्रयत्नशील असायचे, प्रसंगी मध्यस्थी करायचे.

दिवा गावाचा विकास व्हावा यासाठी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत ते पाठपुरावा करत. गाव हगणदारीमुक्त व्हावा यासाठी त्यांनी त्यांच्या शेतातील जागेत गावकीसाठी शौचालय बांधले. दिव्यात एमएससीबीचे कार्यालय आधी नव्हते. त्यासाठी दादूंनी त्यांच्या वाड्यालगतची एक खोली एमएससीबीला दिली होती. कित्येक वर्षे अधिकृत कार्यालय होईपर्यंत याच खोलीतून एमएससीबीचा कारभार चालत असे. या अधिकाऱ्यांच्या चहापाण्याची व्यवस्थादेखील पाटील वाड्यातूनच होत असे. दारी आलेल्या गरजवंतास शक्य ती मदत करुनच माघारी पाठवायचे, आपल्या दारातून रित्या हाती कुणी जाता कामा नये असा दादूंच्या घरचा नियम.

२००५ साली आलेल्या पुरात दिवे गावातील बऱ्याच पूरग्रस्तांच्या ३ दिवसांच्या निवाऱ्याची तसेच जेवणखाण्याची सोय दादूंनी आपल्या वाड्यावर केली होती. समाजकार्याची आवड असणाऱ्या दादूंनी दिवा गावात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, शिवजयंती साजरी करणे असे बरेच उपक्रम राबवले.

अशा या दादूंना राजकारणात उतरावेसे अजिबात वाटले नाही किंबहुना ते प्रसिद्धीपासून दूरच असत. दिनांक – २६ जून २००९ रोजी दादूंचे दुःखद निधन झाले.

व्यवसाय आणि घर बांधणी

पूर्वी दिवा हे गाव असल्याने येथील स्थानिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि मासेमारी. दादूंची वडीलोपार्जित गावात बरीच जमीन होती ज्यातून तांदळाचे पीक घेऊन ते तळोजा येथे विक्रीसाठी जात असत.

पूर्वी गावात बरीचशी घरे ही कुड्यांची असत अशावेळी दिवा बंदरातून रेती वगैरै सामान आणून बांधलेले पक्के घर हे दादूंचे होते. पूर्वी हे घर पाहाण्यासाठी लोकं येत असत असे त्यांचे कुटुंबिय सांगतात. आधी छोट्या स्वरुपात असलेले हे घराचे कालांतराने १०-१२ खोल्यांच्या वाड्यात रुपांतर करण्यात आले. आधी त्यांची २२ खोल्यांची चाळ आणि जमीन अशी बरीच मालमत्ता होती. नंतर रेल्वे विकास प्रकल्पात अल्प मोबदल्यात त्यांची चाळ आणि अधिकची जमीन रेल्वेने ताब्यात घेऊन तेथे विकास प्रकल्पास सुरुवात केली.

 

 

आजही दिवा, दातिवली गावात दादूंची वडीलोपार्जित जागा असून सध्या तेथे शेती वगैरे केली जात नाही. दादूंची मुले आता ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात.

योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी,एखाद्या जागेची वगैरे चौकशी वगैरे करण्यासाठी पूर्वीपासूनचे हक्काचे ठिकाण म्हणजे दादूंचा पाटील वाडा. या वाड्यात दरवर्षी दिड दिवसांचा गणपती उत्सव तसेच पारंपारीक होळी साजरी केली जाते.

या घराला नाव देण्याविषयीची एक छोटी गोष्ट त्यांच्या पत्नी दुर्गाबाई यांनी सांगितली ती अशी कि, एके दिवशी रेल्वेचा एक पेंटर त्यांच्या घरी आलेला असताना त्याने दादूंना घराच्या दर्शनी भागात नाव रंगवून देण्याविषयी सुचवले असता दादूंनी स्वकर्तृत्वावर बांधलेल्या या दुमजली वाड्याच्या रेल्वे मार्गिकेच्या दर्शनी भागावर स्वतःचे दादू हाल्या पाटील असे नाव लिहून- रंगवून देण्याविषयी सांगितले तसेच पैसे देऊन करवून घेतले. तेव्हापासून हा पाटील वाडा दादू हाल्या पाटील यांच्या नावाने अधिकच प्रसिद्धीस पावला.

 

 

दिवा गावात पूर्वीपासून पाटील, भगत, म्हात्रे, केणे अशी मूळ स्थानिक आगरी समाजाची मंडळी गुण्यागोविंदाने नांदतात. पूर्वी येथे १ हजारच्या आसपास घरे होती परंतु आज दिव्यात पूर्व आणि पश्चिमेस बरीच बांधकामे आणि लोकसंख्या वाढ होताना दिसत आहे.

निरोप घेताना बीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या दादूंची सूनबाई सौ. वैशाली साईनाथ पाटील यांनी आम्ही संपूर्ण पाटील कुटुंबिय दादूंचा समाजसेवेचा वारसा असाच पुढे निरंतर सुरु ठेवणार आहोत असा संदेश दिला.

एका रेल्वे प्रवाशाने या दादू हाल्या पाटील वाड्याविषयी अशीही एक आठवण शेअर केली कि, मध्य रेल्वेने कल्याण डोंबिवलीला येणारी मंडळी ” ट्रेनने आताच दादू हाल्या पाटील यांचे घर क्राॕस केले आहे , ट्रेन दिवा स्थानकात पोहोचत आहे.” त्याहिशेबाने मग कल्याण डोंबिवलीची मंडळी आपल्या नातेवाइक अथवा पाहुणे मंडळींना स्थानकावर घ्यायला यायची.

काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक मिम वायरल झाले होते ज्यात अंबानींची अँटालिया इमारत, दादरची कोहिनूर स्क्वेअर, शाहरूख खानचा मन्नत बंगला आणि त्यासोबत दादू हाल्या पाटील यांच्या वाड्याविषयी भाष्य केले होते. ते असे कि, या अलिशान वास्तूंसोबतच दिव्याच्या दादू हाल्या पाटील यांचा हा वाडा आजही आपला वेगळा फॕनबेस म्हणजेच एक आगळीवेगळी ओळख टिकवून आहे.

खरंच दिव्यात आज या वाड्यासभोवती सुरु असलेल्या इमारतींची बांधकामे कितीही उंच आणि लांबी रुंदी- स्क्वेरफूटाच्या बाबतीत मोठी असली तरी त्यांना दादू हाल्या पाटील यांच्या वाड्याची सर यायची नाही

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version