आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खरं तर मनाचे सौंदर्य हे शारीरिक सौंदर्यापेक्षा खूप महत्वाचे असते. भलेही तुम्ही दिसायला कितीही सुंदर असा, पण तुमचे मन जर वाईट असेल, त्यात इतरांसाठी केवळ विषच असेल तर त्या बाह्य सौंदर्याचा काहीही फायदा नाही. पण या दिखाऊ जगात बाह्यरूपालाच आत्यंतिक महत्व दिले जाते. म्हणून एखादी व्यक्ती दुर्दैवाने जगाच्या दृष्टीने दिसायला सुंदर नसेल तर ती जगाच्या दृष्टीने कमी महत्वाची ठरते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जग अशा लोकांशी कठोरतेने वागते आणि त्यामुळे अश्या व्यक्तींच्या मनात स्वतःच्या रूपाविषयी न्यूनगंड तयार होतो. या जगात बाह्यरूपाला इतके अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे की जगाने आखून दिलेल्या सौंदर्याच्या व्याख्येत बसण्यासाठी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आटापिटा करत असते. त्यासाठी अगदी ऑपरेशन करून घेण्याइतके लोक बाह्यरूपाला महत्व देतात.
जर एखाद्या आजारामुळे एखाद्याचे सौंदर्य बाधित झाले तर त्या व्यक्तीला किती मानसिक त्रास होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. जगात सगळीकडेच सौंदर्यस्पर्धा घेऊन सर्वात सुंदर स्त्री/पुरुष कोण हे ठरवले जाते. हा ‘किताब जिंकणाऱ्या स्त्री/पुरुषांबद्दल आपण बातम्यांमध्ये नेहेमीच ऐकतो व वाचतो. पण जगातील सर्वात कुरूप स्त्रीबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिला ‘जगातील सर्वात कुरूप महिला’ म्हणून निवडले गेले पण तिचे मन मात्र तितकेच सुंदर होते.
१८७४ मध्ये लंडनमधील न्यूहॅम येथे जन्मलेल्या मेरी ऍन बेवनचे नाव जगातील सर्वात कुरूप महिला म्हणून इतिहासात नोंदवले गेले आहे. पण मेरीची कहाणी ज्याने ज्याने ऐकली त्याने हेच म्हटले की मेरीचे मन खूप सुंदर होते त्यामुळे तिला कुरूप म्हणून तिची अवहेलना करू नये. मेरी एक सर्वसामान्य मुलगी होती. ती जन्मली तेव्हा दिसायला छानच होती.
इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणे मेरीनेही तिच्या भावी आयुष्यासाठी काही स्वप्ने बघितली होती. काही वर्षे तिने सामान्य जीवनही व्यतीत केले. मोठी झाल्यावर तिने नर्सिंगचे शिक्षण घेऊन नर्सचे काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर तिचे थॉमस बेव्हन नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले. तिला व थॉमसला चार मुले झाली. आता आयुष्यात सगळे सुरळीत सुरु आहे असे वाटत असतानाच लग्नानंतर काही वर्षांनी मेरीला एका विचित्र आजाराने ग्रासले.
मेरीला (acromegaly) ऍक्रोमेगॅली नावाचा आजार झाल्याचे निदान झाले, ज्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. ह्या विचित्र आजाराच्या साईड इफेक्टमुळे तिच्या चेहेऱ्याची पुरुषांसारखी वाढ होऊ लागली आणि तिला पुरुषांसारखी दाढीही येऊ लागली. या आजाराने ग्रस्त लोकांचे हार्मोन्स वेगाने वाढू लागतात. त्यामुळे तिच्या चेहेऱ्यात व शरीरात असे बदल झाले.
या आजाराचा परिणाम मेरीवर दिसू लागला आणि हळूहळू तिचे सौंदर्य नष्ट होऊन ती कुरूप होऊ लागली. तसेच आजारामुळे तिला शरीरात खूप वेदना होत होत्या. इतकेच नव्हे तर मेरीला मायग्रेनचा देखील त्रास होता. त्यामुळे तिला कायम डोकेदुखीचा खूप त्रास होत असे.
शारीरिक त्रासाला सामोरे जात असताना मेरीच्या आयुष्यात आणखी एक दुःख आले. लग्नानंतर केवळ ११ वर्षांनी तिच्या नवऱ्याचा अकाली मृत्यू झाला.पतीच्या निधनानंतर चार मुलांची जबाबदारी सर्वस्वी मेरीवर पडली. मेरीची कमाई इतकी कमी होती की ती तिच्या कुटुंबाचा खर्च भागवू शकत नव्हती. अखेर तीव्र आर्थिक टंचाईमुळे तिने १९२० साली झालेल्या जगातील सर्वात कुरूप स्त्रीच्या स्पर्धेत भाग घेतला.
–
- “त्याकाळी” सुकुमार, सुंदर स्त्रियांच्या शोषणाचा सिस्टिमॅटिक धंदा झाला होता…
- खिल्ली उडवल्या जाणाऱ्या, या फोटोतील तरुणाच्या संघर्षाची कहाणी थक्क करणारी आहे!
–
तिला वाटले की ही स्पर्धा जिंकल्यास तिला खूप पैसे मिळतील आणि ती तिच्या मुलांना पोटभर अन्न खाऊ घालू शकेल आणि त्यांच्या सर्व गरजा भागवू शकेल. तिला पूर्ण खात्री होती की या आजारामुळे तिचा चेहेरा इतका विद्रुप झाला आहे की ती ही स्पर्धा नक्कीच जिंकेल. तिचा हा विश्वास कामाला आला आणि मेरी त्या स्पर्धेची विजेती ठरली.
एके दिवशी वर्तमानपत्र चाळत असताना तिला एक जाहिरात दिसली ज्यात लिहिले होते: “वाँटेड: सर्वात कुरूप स्त्री. तिरस्करणीय, अपंग किंवा विकृत नको. यशस्वी अर्जदारासाठी चांगल्या पगाराची हमी आणि दीर्घ प्रतिबद्धता. अलीकडील फोटो पाठवा.”
दुसरा कुठलाही विचार न करता, मेरीने तिचे छायाचित्र पाठवले आणि ताबडतोब क्लॉड बार्टरामचे ( बार्नम आणि बेली ह्या अमेरिकन सर्कसचे युरोपियन एजंट) लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला, मेरीला स्वतःचे प्रदर्शनात करण्याची कल्पना आवडली नाही. ती लाजाळू होती आणि तिला तिच्या मुलांपासून वेगळे व्हायचे नव्हते. पण प्रश्न पैश्यांचा होता आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा होता.
ते तिला एका वर्षासाठी दर आठवड्याला £10 देणार होते. शिवाय प्रवासाचा खर्च आणि स्वतःच्या चित्र पोस्टकार्डच्या विक्रीतून आलेले सर्व पैसेही तिला मिळणार होते जेणेकरून ती तिच्या मुलांच्या शिक्षणाची तरतूद करू शकेल.
तिला आधी खूप संकोच वाटला केला पण शेवटी कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी असल्याने तिने होकार दिला. लवकरच तिला खूप प्रसिद्धी मिळाली. लोक लांबून लांबून जगातील सर्वात कुरूप महिला कशी दिसते हे बघण्यास यायचे. त्या काळातील आघाडीचे न्यूरोसर्जन हार्वे कुशिंग यांनी तिच्या आजाराबद्दल बोलून जगाला तिच्या त्रासाची कल्पना दिली. त्यांनी १९२७ मध्ये टाईम मॅगझिनला पत्र लिहून आपल्या रुग्णाच्या कुरूपतेची खिल्ली उडवल्याबद्दल तक्रार केली होती.पण तरीही तो शो चालला. मेरीने पुढील दोन वर्षांत £20,000 (जे आज सुमारे £500,000 असतील) कमावले असल्याचे सांगितले जाते.
ही रक्कम तिच्या चार मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये घालण्यासाठी पुरेशी होती आणि जरी तिला त्यांची खूप आठवण येत असली तरी ती नियमितपणे त्यांना पत्र लिहित असे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित आहे हे तिच्या मनात असल्याने तिने तिच्या आजारालाच तिची शक्ती बनवले आणि सतत होत असलेल्या अपमानाचा स्वतःच्या मनावर परिणाम होऊ दिला नाही.
कोनी आयलँड ड्रीमलँड सर्कसमध्ये काम करत असताना लोक तिला बघायला यायचे आणि खूप हसायचे. आपला विद्रुप झालेला चेहरा जगाच्या हास्याचे कारण बनवणाऱ्या मेरीने अखेर १९३३ साली या जगाचा निरोप घेतला.
आज acromegaly ह्या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. त्याकाळी जर मेरीला हे उपचार मिळाले असते तर तिला इतक्या त्रासाला सामोरे जावे लागले नसते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.