आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यानंतरचे सुरवातीचे दिवस अगदी गुलाबी असतात. त्यातही जर ती पहिलीच डेट असेल तर बघायलाच नको.
आपण ज्या व्यक्तीकडे आकर्षित झालोय त्या व्यक्तीविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता या पहिल्या डेटमध्ये असते, पण या पहिल्याच भेटीत मुलीवर आपली छाप पाडण्याच्या नादात पुरुष आपण प्रत्यक्षात आहोत त्यापेक्षा अधिक उत्तम असल्याचं भासवत असतात. पहिली भेट मनाजोगती होण्यावरच पुन्हा भेटायचं की नाही हे ठरणार असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पहिल्या भेटीत एकदा समोरच्या मुलीचं मन जिंकलं, की आपण अर्धी लढाई जिंकलो असं बहुधा पुरुषांना वाटत असावं, पण आज मुलीही काही इतक्या भाबड्या, दुधखुळ्या राहिलेल्या नाहीत. असं असूनदेखील या पहिल्या भेटीत काही गोष्टी बऱ्याच पुरुषांकडून अतिशय सफाईदारपणे खोट्या बोलल्या जातात ज्यांचा डेटिंग जसंजसं पुढे सरकतं तसा मुलींना उलगडा होत जातो. अर्थात ते तसं पुढे सरकलं तर!
कुठल्याही पुरुषाला पहिल्यांदा भेटताना त्याच्यावर लगेच भाळून न जाता मुलींनी काही महत्त्वाच्या ‘रेड फ्लॅग्स’कडे लक्ष द्यायला हवं. सुरुवातीच्या दिवसांत कदाचित ते समजून घेतले नाहीत तर काही फरक पडणार नाही, पण जसजसे दिवस जातील तसंतसं वेळीच सावध न राहिल्याचं शल्य वाटू शकतं.
—
- तुम्हाला समोरच्याबद्दल वाटणारी भावना प्रेम आहे, की फक्त आकर्षण? ‘असं’ तपासून घ्या
- नात्यात गोंधळ टाळायचा असेल तर या ‘७’ गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या!
—
पहिल्या भेटीतून पुरुषांना केवळ टाईमपास म्हणून डेट करायचंय की ते गांभीर्याने या सगळ्याकडे पाहत आहेत हे आपल्याला कळेलच असं नाही. सरसकट सगळेच पुरुष असे असतात असं नाही आणि पहिल्या भेटीत मुलाला इम्प्रेस करायला मुलीही खोटं बोलू शकतात.
पहिल्या भेटीतच जर समोरचा पुरुष आपण फार भारी असल्याचा आविर्भाव अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आणत असेल, तर त्या गोष्टी आपल्या निरीक्षणातून सुटता कामा नयेत. पहिल्या भेटीत या ५ गोष्टींच्या बाबतीत पुरुष हमखास खोटं बोलतात.
१. दारू पिण्याचं प्रमाण –
कुठलाही पुरुष आपल्या पहिल्या भेटीत मुलीसमोर आपण किती दारू पितो, रोज पितो की कधीतरीच पितो हे उघड करत नाही. जर पुरुष खरोखरच निर्व्यसनी असेल तर प्रश्न नाही, पण पहिल्या भेटीत हे कळेलच असं नाही.
ज्याला तुम्ही पहिल्यांदाच भेटताय त्याला कदाचित रोज दारू पिण्याचीही सवय असू शकते. कुठल्याही मुलीला रोजच्या रोज दारू पिणारा पुरुष आपला जोडीदार म्हणून आवडणार नाही याची पुरुषांना पूर्ण कल्पना असते. पहिल्या भेटीतून समोरचा पुरुष किती दारू पितो हे मुलीला नक्कीच कळणार नाही. जसाजसा अधिक वेळ जाईल तसं ते तिच्या लक्षात येईल.
२. नोकरीची स्थिती –
आपण ज्या मुलाला डेट करतोय तो व्यवस्थित कमावता असावा अशी मुलीची अपेक्षा असते. मुलांचीही मुलींच्या बाबतीत ही अपेक्षा असते. त्यात काहीच चुकीचंही नाही, पण पहिल्या भेटीत पुरुष आपण कसे फार उत्तम ठिकाणी काम करतो, आपल्याला कसा घसघशीत पगार मिळतो, आपण महागड्या खरेद्या करतो असं चुकीचंही भासवू शकतात.
पुढे जाऊन तो फारसं कमावत नाही किंवा त्याच्या डोक्यावर कर्ज आहे असं जरी तुमच्या लक्षात आलं तरी आश्चर्य वाटायला नको. पहिल्याच भेटीत समोरचा त्याच्या नोकरीधंद्याविषयी जे सांगतोय त्यावर पटकन विश्वास ठेवू नका.
३. व्यायाम करण्याची सवय –
आज सुदृढ असण्याला मुलं-मुली सगळेच महत्त्व देतात. त्यामुळे पहिल्या भेटीत आपल्याला व्यायामाची सवय आहे की नाही याविषयीची खरी माहिती पुरुष उघड करत नाहीत, पण आपण नियमित जिमला जातो, वर्कआउट करतो असा आभास मात्र ते मुलीसमोर निर्माण करू शकतात.
आता तुला भेटायला येताना जिममधूनच आलोय किंवा भेटून झाल्यावर जिमलाच जाणार आहे असं खोटंही ते बोलू शकतात. प्रत्यक्षात ते आठवड्यातून, पंधरवड्यातून एकदाच व्यायाम करत असतील किंवा करतही नसतील. त्यामुळे पुरेसा वेळ घालवल्यावरच त्यांना व्यायामाची खरंच सवय आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल.
४. त्यांचं शेवटचं ब्रेकअप आणि आधीच्या कमिटमेंट्सचा रेकॉर्ड –
तुम्ही ज्या मुलाला पहिल्यांदा भेटताय त्याने एखाद्या मुलीला फसवलेलंही असू शकतं. किंवा त्या मुलीनेही त्याच्याशी ब्रेकअप केलेलं असू शकतं, पण पहिल्या भेटीत जर तो मुलगा त्याच्या शेवटच्या ब्रेकअपविषयी तुम्हाला सांगत असेल, तर तो तुम्हाला खरी घडलेली परिस्थिती जशीच्या तशी न सांगण्याची शक्यताच जास्त असू शकते.
सगळी परिस्थिती तो त्याच्या बाजूने सांगू शकतो. आपण त्या परिस्थितीत बरोबर होतो असं प्रत्यक्षात कदाचित तसं नसतानादेखील चुकीचं भासवू शकतो. याआधी तो मुलगा जर बऱ्याचदा रिलेशनशीपमध्ये असेल तर तीच मुळात धोक्याची घंटा आहे.
ज्या ज्या वेळी तो रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा त्याने ती नाती गांभीर्याने घेतलेली नसू शकतात. तो प्लेयरही असू शकतो. पहिल्या भेटीत तो याविषयीची खरी माहिती नक्कीच उघड करणार नाही. त्यामुळे त्याच्या हावभावांवरून जर तो खोटं बोलतोय असं तुम्हाला जरा जरी जाणवलं तरी सावध व्हा.
५. त्यांचा मित्रपरिवार –
पहिल्याच भेटीत पुरुष त्यांच्या मित्रांविषयी खरी माहिती तुम्हाला देतीलच असं नाही. आपल्या काही वात्रट मित्रांविषयी सांगितलं तर समोरची मुलगी आपल्याबद्दल वाईट मत बनवून मोकळी होईल अशी भीती पुरुषांना पहिल्या भेटीत वाटू शकते.
आपण चुकीच्या मित्रांसोबत आहोत असं तिला वाटेल आणि तिचा आपल्यातला रस कमी होईल असं त्यांना वाटू शकतं. आपण जिच्यासोबत पहिल्यांदा डेटवर आलोय ती आपल्याच काही मित्रांमुळे इम्प्रेस होऊ शकते अशीही असुरक्षिततेची भावना मनात येऊन मुलं पहिल्या भेटीत उगीचच त्या मित्रांविषयीचं चुकीचं मत मुलीच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
तर मुलींनो, पहिल्या भेटीनंतर तुम्हाला त्या मुलाला पुन्हा भेटायला आवडेल की नाही इतकंच ठरवा. लगेचच रिलेशनशिपची स्वप्नं मनात रंगवू नका. पुरेसे दिवस जाऊ द्या. गोष्टींकडे केवळ भावनिकदृष्ट्या न पाहता व्यावहारिक दृष्टीकोनातूनही पाहा. तुम्हाला योग्य ते प्रश्नही लवकर पडतील आणि त्यांची उत्तरंही वेळेत सापडतील.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.