Site icon InMarathi

एकीकडे पद्मभूषण, तर दुसरीकडे FIR.. या व्यक्तीने का केलीये सुंदर पिचाईंविरोधात तक्रार?

sundar pichai im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधीकाळी गुगलशिवायही आपलं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं ही गोष्टही आता आपल्या विस्मरणात गेली आहे. गुगल, युट्युब, एकूण इंटरनेटच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे आणि राहणार आहे, पण आपल्या या वापरामागे एक प्रचंड मोठं आर्थिक गणित असतं याची बऱ्याचदा आपल्याला कल्पनाही नसते.

आपण टाकलेल्या चित्रपटांमधून, गाण्यांच्या व्हिडियोजमधून गुगल, युट्युब प्रचंड प्रमाणात कमाई करत असतात. पण यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो कॉपीराइट्सचा म्हणजेच मालकी हक्कांचा! आपण जी गाणी, जे चित्रपट अपलोड करतो आहोत त्याचे कॉपीराइट्स गुगल, युट्युबकडे असावे लागतात. अन्यथा, त्यांचं ते कृत्य बेकायदेशीर ठरू शकतं आणि परिस्थिती गंभीर वळण घेऊ शकते.

असाच काहीसा प्रकार गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्यासोबत घडला आहे. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक हसीना थी एक दिवाना था’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या म्हणण्यानुसार आपण कुठलेही कॉपीराइट्स विकलेले नसतानादेखील हा चित्रपट युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे.

याच धर्तीवर सुनील दर्शन यांनी केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि युट्युबच्या ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२५ जानेवारीला कॉपीराइट्सचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्याखेरीज गौतम आनंद, जो गियर, नम्रता राजकुमार, पवन अग्रवाल आणि चैतन्य प्रभू या ५ यूट्यूबच्या अधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार दाखल केली गेली आहे.

 

 

कॉपीराइट्स विकलेले नसतानादेखील हा चित्रपट अपलोड केल्यामुळे चित्रपटाला मिळणाऱ्या हिट्सचा फायदा युट्युबला आणि दुसऱ्याच व्यक्तींना होत आहे. एक निर्माता म्हणून मला त्यातून एकही पैसा मिळत नाहीये असं निर्माते-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी म्हटलंय.

गेले अनेक महिने ते युट्युब आणि गुगलविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची तक्रार नोंदवून घ्यायलादेखील कुणी तयार नव्हतं. शेवटी त्यांना सेशन कोर्टाची पायरी चढावी लागली. कोर्टाने पोलिसांना कॉपीराईटच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या सगळ्यांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल जाबही विचारण्यात आला आहे.

निर्माते -दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘श्री कृष्णा इंटरनॅशनल’ या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत सुमारे २० चित्रपटांचे कॉपीराइट्स त्यांच्याकडे आहेत. असं असूनही ‘एक हसीना थी एक दिवाना था’ हा चित्रपट वगळता त्यांचा जवळपास प्रत्येक चित्रपट आणि त्यांची गाणी युट्युबवर अपलोड करण्यात आली होती.

 

 

२०११ साली याबाबत गुगल आणि यूट्यूबच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस २०१९ साली न्यायालयाने सुनील दर्शन यांच्या बाजूने निर्णय दिला, पण २०१९ मध्ये या निर्णयानंतर गुगल आणि युट्युबने चंदीगढ उच्च न्यायालयात अपील केलं होतं. हे जुनं प्रकरण तिथे अजूनही सुरूच आहे अशी माहिती सुनील दर्शन यांनी दिली.

गेली ११ वर्षे आपण हा लढा देतो आहोत असं ते म्हणाले. सुनील दर्शन म्हणाले की, “मी काही काळ फक्त हेच युद्ध लढत आहे. याआधी मी एका वर्षात १-२ चित्रपट करायचो, पण मला वाटायचं की इतरांना असा फायदा होत असेल, तर मग आधी हे युद्ध का लढू नये.”

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version