Site icon InMarathi

मराठीतला ‘नवा’ प्रयोग, जाणून घ्या, का बघावा ‘झोंबिवली’?

zombi 2 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – देविका जोशी 

====

गेल्या दोन वर्षांपासून सगळेच घरी अडकले होते, या काळात मनोरंजनासाठी आपण छोट्या पडद्याचा आधार घेतला. आता आता जरा कुठे नाकावरचा मास्क खाली येऊन लोक सुटकेचानिःश्वास घेत आहेत. मनोरंजन सृष्टीदेखील पुन्हा नव्याने लोकांना रिझवण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदी- साऊथ सिनेमांमध्ये नवनवीन प्रयोग होत असतातच, पण आपली मराठी चित्रपटसृष्टीदेखील यात मागे नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या मराठीतही नवनवीन प्रयोग होत असतात. असाच एक प्रयोग म्हणजे ‘झोंबिवली’. आज २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कसा आहे हा चित्रपट? जाणून घेऊया.

 

DNA india

 

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ या चित्रपटाचं कथानक नावावरूनच लक्षात येतं. डोंबिवलीसारख्या शहरात झॉम्बी येतात, आणि पुढे जी काही गंमत, लढाई घडते ती बघण्यासारखी आहे. चित्रपटाची कथा मूळ सुरु होते, ती हॉस्पिटलमधून. डोंबिवलीच्या झोपडपट्टीवजा असलेल्या जनता नगर भागात एक विचित्र साथीचा रोग पसरलेला दिसतो.

हळूहळू हा आजार वाढतच जातो आणि सगळेजण विचित्र अशा ‘झॉम्बी’ सारखे वागू लागतात. चित्रपटातील मुख्य कलाकार आणि इतर काही माणसं या ‘झॉम्बी’पासून स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यांची धावपळ, जगण्यासाठी सुरु असलेली लढाई या गोष्टी बघण्यासारख्या आहेत.

 

 

‘झॉम्बी’शी केलेला सामना एवढंच या चित्रपटाचं कथानक नाही, वरकरणी दिसताना हे कथानक दिसत असलं, तरीही चित्रपटाचा मूळ विषय सामाजिक आहे. उच्च मध्यमवर्गीय लोकांचा इतर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची मानसिकता, स्वतःला वाचवण्यासाठी माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम चित्रण या चित्रपटात आढळतं.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इतरांचा जीव धोक्यात घालणारी माणसं, स्वतः मोठं होण्यासाठी इतरांची पर्वा न करणारे व्यावसायिक आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या व्यक्ती अशा तीन प्रवृत्ती आपल्याला या चित्रपटात दिसतात. हा विषय वाचताना गंबीर वाटत असला, तरीही संपूर्ण चित्रपटात त्याला विनोदाची किनार लाभली आहे.

या चित्रपटाला कसदार अभिनयाची साथ लाभली आहे. अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांच्या अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लागले आहेत. अमेय- वैदेहीची जोडी चित्रपटात भाव खाऊन जाते. पुण्यातून डोंबिवलीला कामानिमित्त आलेला ‘सुधीर जोशी’ अमेयने उत्तम सादर केला आहे.

 

 

पुण्यातुन आलेला, साधा सरळमार्गी, सत्याची कास धरणारा असा हा सुधीर आहे. त्याला आपल्या बायकोची, होणाऱ्या बाळाची काळजी आहे हे पदोपदी जाणवतं. सामाजिक काम करणारा ललित त्याच्या स्वभावामुळे नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांसाठी झटण्याची त्याची वृत्ती आहे.

झॉम्बी किंवा हॉरर चित्रपट म्हटला, की मुली तो बघायला घाबरतात, पण हा चित्रपट त्याला अपवाद ठरेल. महिलांचं सशक्त चित्रीकरण या चित्रपटात दिसतं. वैदेही परशुरामी हिने सुधीरच्या बायकोची म्हणजचे सीमा जोशीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ती गरोदर असते, तरीही झॉम्बीशी दोन हात करताना ती मागे पुढे बघत नाही. तिच्यासोबत तिच्या घरात काम करणारी मालती आणि एक रिपोर्टर या सुद्धा शेवट्पर्यंत ‘झॉम्बी’शी लढतात.

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याचे विशेष कौतुक केले पाहिजे. असा चित्रपट मराठीत पहिल्यांदा होत असल्यामुळे एक प्रयोग म्हणून हा चित्रपट नक्की बघावा. असा विषय निवडण्यासाठी सुद्धा धाडस करावंच लागतं. जमेची बाजू अशी, की चित्रपटातील व्हीएफक्स, मेकअप या गोष्टी उत्तम जमलेल्या आहेत. झॉम्बी बघताना कुठेच हास्यास्पद वाटत नाहीत, त्यांचं चालणं -वागणं या गोष्टी उत्तम जमलेल्या आहेत. चित्रपटाचं संगीतही खिळवून ठेवतं.

 

असं असलं तरी चित्रपटात काही छोट्या खटकतात. चित्रपटाचा उत्तरार्ध थोडा लांबल्यासारखा वाटतो. कथानकाचे धागे पूर्ण जोडल्यासारखे वाटत नाही. ते जोडून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट लक्षपूर्वक बघावा लागेल.

केवळ हसवणूक नाही, तर ऍक्शन, खिळवून ठेवणारं कथानक, लोकांची मानसिकता या सगळ्याच गोष्टी या चित्रपटात आहेत.सामाजिक संवेदना जपणारं कथानक, योग्य मांडणी, कसदार अभिनय आणि मराठीतला पहिलाच प्रयोग म्हणून हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version