हास्यजत्रेतील या कलाकाराचा अनुभव रिक्षेतून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचा आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दिवसभर काम करून थकल्याभागलेल्या आपल्याला घरी पोहोचवणारं हवं ते वाहन मिळालं की आपण सुटकेचा निःश्वास टाकतो. “हुश्श! घरी पोहोचणार आता एकदाचे!” असं आपल्याला होऊन जातं. पण वाहनचालक त्यावेळी जर आपल्याला आपल्या घरच्या रस्त्याकडे न नेता भलत्याच रस्त्यावर घेऊन जात असेल तर?
असाच काहीसा भीतीदायक प्रकार सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातल्या पृथ्वीक प्रताप या कलाकारासोबत घडलाय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एका रिक्षावाल्याने त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी पोलीस वेळेत पोहोचल्यामुळे काहीही विपरीत घडलं नाही आणि पृथ्वीक आपल्या घरी सुखरूप पोहोचला. पृथ्वीक प्रतापने फेसबुकवरून घडलेली ही भयानक घटना सविस्तरपणे शेअर केली आहे.
गेल्या शुक्रवारी म्हणजेच २१ तारखेला रात्री ही घटना त्याच्यासोबत घडली. प्रवास करताना सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही त्याने या पोस्टमधून केलंय. २१ तारखेला रात्री ९ च्या दरम्यान मीरारोडच्या काशिमीरा इथल्या ‘ग्रीन वॅली स्टुडियोज’ मधून तो त्या दिवसाचं शूटिंग संपवून घरी जायला निघाला.
त्यादिवशी नेमकी त्याची स्वतःची गाडी त्याच्याजवळ नव्हती म्हणून तो ओला-उबर बुक करण्याचा प्रयत्न करत होता. पण नेटवर्क वीक असल्यामुळे ते काही शक्य होत नव्हतं. शेवटी वैतागून तो चालत स्टुडियो गेट मधून बाहेर पडला आणि रिक्षावाल्याला हात दाखवून त्याने “ठाणे?” असं विचारलं.
त्याबरोबर त्यानेही लगेचच गाडी वळवली. पृथ्वीक रिक्षात बसला. मीटर पडलं आणि ते निघाले. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून रिक्षावाल्याने रिक्षा कांदिवलीच्या दिशेने वळवली. “थांब, आपल्याला ठाण्याला जायचंय. गाडी घोडबंदरने घे.”, असं पृथ्वीकने वाहनचालकाला सांगितलं.
त्यावर रिक्षावाला “इधर से भी जाता है गाडी ठाणे को”, असं म्हणाला आणि आपल्या मनाविरुद्ध त्याने ‘फाउंटन’ हॉटेलच्या दिशेने रिक्षा वळवली. पण मग तो रिक्षावाला घोडबंदरच्या दिशेने रिक्षा नेण्याऐवजी वसईच्या दिशेने नेऊ लागला.
पृथ्वीकने त्यावर त्याला पुन्हा सांगितलं की, “घोडबंदर मागे आहे. ‘फाउंटन’च्या रस्त्याने जायचंय आपल्याला. त्यावर रिक्षावाला पृथ्वीकवर अकारणच चिडत “मेरे को मत सिखा किधर क्या है, चुपचाप बैठ”, असं त्याला म्हणाला.
गाडी थांबव असं सांगूनदेखील गाडी न थांबवता तो वसईच्या दिशेने नेऊ लागला. असं काहीतरी घडत असेल तर कुणीही घाबरेल. तसंच काहीसं पृथ्वीकचंही झालं असेल. पण तश्या अवस्थेतही पटकन पोलिसांना संपर्क करावा हे डोकं त्याने चालवलं.
त्याने तडक ‘१००’ नंबरवर फोन करून त्याच्यासोबत घडत असलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पृथ्वीक रिक्षाचा नंबर पोलिसांना सांगतोय हे कळताच रिक्षावाल्याने शिस्तीत रिक्षा पुन्हा ‘फाउंटन’च्या दिशेने वळवली.
आपण अजिबात घाबरलेलो नाही असं दाखवत अगदी सहजपणे त्याने पृथ्वीकला “पोलीस को क्यू फोन कर रहे, गल्तीसे ये रस्ते पे गाडी डाला मैने”, असं सांगितलं. ‘फाउंटन’ हॉटेलजवळ रिक्षावाल्याने गाडी थांबवल्यावर पृथ्वीक तडक गाडीतून उतरला आणि त्याने रिक्षावाल्याचा फोटो काढला.
“तेरा आयकार्ड, परमिट जो कूछ होगा दिखा” असं तो रिक्षावाल्याला म्हणाला. त्यावर उसनं अवसान आणत पृथ्वीकशी हुज्जत घालत रिक्षावाला म्हणाला, “तू आरटीओ वाला है क्या? तेरेको क्यू दिखाऊ, पोलीस को क्यू फोन लगाया? मेरी भी पुलिस में पहचान है, २० साल से है इस धंदे में, बोहोत देखे है पुलिस वाले.”
पृथ्वीक त्यावर त्याला शांतपणे म्हणाला, “थांब आता जे पोलीस येतील त्यांच्याशी पण ओळख करून घे म्हणजे नंतर काठीची साईज किती हवी ते तू त्यांना सांगू शकशील.” इतकं सगळं झाल्यावरही पुढची १० मिनिटं रिक्षावाला त्याच्याशी हुज्जत घालत बसला.
मात्र काही पोलीस तिथे येत आहेत हे दिसल्यावर त्याची भीतीने गाळण उडाली आणि त्याने धूम ठोकली. पोलिसांच्या तत्परतेलाही मानायला हवं! सुदैवाने त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटात ४ पोलीस पृथ्वीकच्या मदतीला हजर झाले.
“काळ आला होता पण वेळ आली नव्हती”अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणेच त्या रात्री काहीतरी बरं-वाईट घडता घडता टळलं. पृथ्वीक या सगळ्याचं श्रेय सिनियर पोलीस वसंत लब्दे आणि बाळू आव्हाड यांना देतो. त्यांनी तातडीने मदत पाठवली म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो अशी कृतज्ञता त्याने व्यक्त केली आहे.
पृथ्वीकचे बरेच मित्रमैत्रिणी मीरारोडमध्येच शूटिंग करतात. बऱ्याचदा शूटिंग संपायला मध्यरात्र उलटते. पृथ्वीकने ही पोस्ट लिहिण्यामागचं हेच मुख्य कारण होतं. त्यांनी काळजी घ्यावी आणि महाराष्ट्र पोलिसांवर निर्धास्त राहावं असं पृथ्वीक लिहितो.
पोस्टसोबत त्याने रिक्षावाल्याचं नाव, गाडीचा नंबर आणि त्याचा फोटो जोडलाय. जेणेकरून कुठल्या रिक्षात आपल्याला बसायचं नाहीये हे लोकांना कळेल.
रिक्षाने अगदी सहज प्रवास करणाऱ्या कुणालाही पृथ्वीक प्रताप या कलाकारासोबत घडलेली ही घटना हादरवून टाकणारी आहे.
देव न करो, पण आपल्या कुणावरही अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे वाहनचालक जर आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातोय याची साधी कुणकुण जरी लागली तरी त्याच्याशी वादही न घालता शांतपणे त्याला वाहन थांबवायला सांगून बाहेर पडायला हवं.
रात्रीच्या वेळी असं करणं नक्कीच धोकादायक वाटू शकतं. पण पृथ्वीकसाठी धावून आले तसे आपल्यासाठीही पोलीस धावून येतीलच याची शाश्वती देता येत नाही.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.