Site icon InMarathi

विराटनंतर संघाचा कर्णधार कोण, काय आहे या कठीण प्रश्नाचं उत्तर?

virat final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

काल भारतीय संघ सामना हरला. फार थोडक्या फरकाने, दक्षिण आफ्रिकेने निसटता विजय मिळवला. खरं तर एका क्षणी परिस्थिती अशी होती, की भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी पात्रच वाटत नव्हता. ढेपाळलेली मधली फळी हे त्याचं महत्त्वाचं कारण मानलं गेलं पाहिजे. पण दीपक चहर आणि बुमराहने खेळलेले आततायी फटके हेसुद्धा या पराभवाचं फार मोठं कारण आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणं’ असा एक वाक्प्रचार मराठीत अगदी अनेकदा वापरला जातो. काल मात्र याहूनही वाईट काहीसं घडलं. हातात नसलेला सामना, दमदार कामगिरी करत खेचून आणायचा, विजयाचा घास तोंडाशी नाही, तर चक्क घशापर्यंत न्यायचा आणि स्वतःच ओकून द्यायचा, असं काहीसं झालं काल भारतीय संघाचं… सतत कॅमेऱ्यासमोर दिसणाऱ्या दीपकच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होतं.

 

 

वनडे मालिकेत ०-३ ने पराभव पत्करावा लागला आणि या अपयशात राहुलच्या कर्णधारपदाचा सुद्धा सहभाग आहे, अशी चर्चाही सुरु झाली आहे. यात अगदीच चुकीचं सुद्धा काही नाही. त्याला कर्णधारपदाची खास छाप पाडता आलेली नाही. सध्याचा संघाचा उपकर्णधार आणि रोहितच्या अनुपस्थितीत बदली कर्णधार म्हणून काम पाहणाऱ्या राहुलची अवस्था पाहून, कसोटीचा नवा कर्णधार नका कोण असेल, हा प्रश्न अधिक कठीण झालाय हे मात्र खरं…

सध्याचा मर्यादित षटकांच्या सामन्याचा कर्णधार रोहित, उपकर्णधार राहुल, रोहितच्या गैरहजेरीत उपकर्णधारपदाची धुरा वाहणारा बुमराह आणि कसोटी संघात जागा कायम असणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक असणारा रिषभ पंत, या खेळाडूंची नावं भावी कसोटी कर्णधार म्हणून चर्चेत आहेत. पण यापैकी नक्की कर्णधार कोण असावं? हा प्रश्न सोडवणं फार कठीण आहे.

 

 

विराटने अवेळी कर्णधारपद सोडणं भारतीय क्रिकेटसाठी किती भयावह आणि त्रासदायक ठरू शकतं याचा प्रत्यय यायला लागलाय, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, असं मला तरी वाटतं.प्रत्येक खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर, त्यांना कर्णधार करणं नेमकं का धोक्याचं किंवा फायदेशीर नाही, हे लक्षात येईल. सुरुवात रोहितपासून करूयात.

रोहित शर्माचा सध्याचा फिटनेस लक्षात घेता त्याला कसोटी खेळणं व्हाइट बॉल क्रिकेट खेळण्यापेक्षा कठीण जाणार आहे, हे नक्की! फलंदाजाला सातत्याने हॅमस्ट्रिंग इंज्युरी होणं हे काही चांगलं लक्षण ठरत नाही. आता ज्या खेळाडूचं स्थानच संघात निश्चित आहे की नाही, हे त्याच्या फिटनेसमुळे सांगता येत नाही, त्याला संघाचा कर्णधार करणं सामंजस्याचं ठरेल का, याचा विचार करावाच लागेल. याशिवाय रोहितच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचं झालं, तर तो मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जितका प्रभावी वाटतो, तितकासा पाच दिवसांच्या सामन्यांमध्ये ठरेल का? हादेखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

 

Times Now

 

कर्णधार खेळाडू म्हूणनही त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये उशिराने संधी मिळाली. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार म्हणून पाहावं की नाही, हादेखील प्रश्न आहेच. विराट आणि रोहितमधून विस्तवही जात नाही, अशीदेखील चर्चा आहे. अशावेळी इतक्या महत्त्वाच्या आणि सिनियर खेळाडूशी वाकडं असणारा रोहित संघाचा कर्णधार होणं कुणाच्याही फायद्याचं ठरणार नाही.

अर्थात या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, यावर हा मुद्दा महत्तपूर्ण ठरतो हे मात्र खरं आहे.राहुलचा विचार करायचा झाला, तर विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात, त्याने ही जबाबदारी पार पाडली. असं असूनही, तो फारसा प्रभावी वाटला नाही.खरं तर विराट इतका मोठा निर्णय घेणार आहे, हे त्यावेळी कुणालाही ठाऊक नव्हतं.

 

 

तरीदेखील राहुलला विशेष छाप पाडता आली नाही. त्याचे निर्णय चुकले, त्याला कर्णधारपदाची तणाव सहज पेलता येत नाहीये, हे जाणवलं. त्यामुळे तो कर्णधार म्हणून फारसा परीपक्व नाही, अशी चर्चा सुरु झाली. वनडे मालिकेदरम्यान ती वाढत गेली. व्यंकटेश अय्यर संघात असतानाही त्या गोलंदाजी न देणं, कधी फिरकीपटूंची षटकं नीट वापरता न येणं, असा गोष्टींकडे बोट दाखवण्यात आलं.

एकीकडे दक्षिण आफ्रिकेचे फिरकीपटू चांगली कामगिरी करत असताना, राहुल भारतीय फिरकीपटूंना चांगल्या पद्धतीने वापरू शकला नाही. शार्दूलला १० षटकांत ७२ धावांचा मार पडत असताना, व्यंकटेशने मात्र गोलंदाजीसाठी चेंडू हाती घेतला नाही. हे मुद्दे राहुलच्या कप्तानीच्या मर्यादा दाखवणारे आहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

 

 

आता भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहबद्दल बोलूया थोडं. रोहितच्या गैरहजेरीत, यावल संघाचा उपकर्णधार करण्यात आलं. म्हणजे राहुलनंतर बुमराहकडे विराटचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जाऊ शकतं. मात्र गोलंदाजाला ही जबाबदारी पेलवेल का? हा प्रश्न आहेच. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी गोलदांज मंडळी यात यशस्वी झाली आहेत.

सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना, संघाच्या कप्तानीची जबाबदारी सांभाळणं सोपं काम नाहीच. बुमराहने मारे ऐटीत ‘अंगावर पडेल ती जबाबदारी स्वीकरायला तयार आहे’ असं म्हटलं असलं, तरी त्याचा कालचा बेजबाबदार फटका यावर शिक्कामोर्तब करण्यात अडचण ठरतो. एका गोलंदाजाकडून फलंदाजीत फार अपेक्षा केल्या जाऊ नयेत, हे खरं असलं तरी काल त्याला सामना जिंकवून देणं शक्य होतं. अर्थात, हे तेवढ्यापुरतं असलं, तरी एकूणच बुमराहचा स्वभाव कर्णधारपदासाठी परफेक्ट नाही, असं मला वाटतं.

 

ESPNcricinfo.com

 

आता बोलूया शेवटच्या पर्यायाबद्दल; हा पर्याय म्हणजे रिषभ पंत! गेल्या काही वर्षात कसोटी संघाचा अविभाज्य घटक बनलेला, काही सामने जबरदस्त कामगिरी करत अविश्वसनीयरित्या जिंकवून देणारा, काही विश्वविक्रम आपल्या नावे करणारा, तरुण वयातच स्वतःची वेगळी छाप पाडू लागलेला पंत ‘विराटचा उत्तराधिकारी का होऊ नये?’, असा प्रश्नही एकीकडे विचारला जात असलेला पाहायला मिळतोय.

सुनील गावस्कर, युवराज सिंग अशा दिग्गज माजी खेळाडूंनी रिषभच्या नावाला भावी कर्णधार म्हणून पसंती दिली आहे. या खेळाडूमध्ये चांगला कर्णधार होण्याची क्षमता नाही, असं म्हणता येणार नाही, पण ‘ही ती वेळ नाही’ असं राहून राहून वाटतं.

तो एक चांगला खेळाडू आणि संघातील अविभाज्य सदस्य झालेला असला, तरी त्याचा खेळ अजूनही शंभर टक्के जबाबदारीपूर्ण वाटत नाही. अनेकदा बेजाबदार फटका खेळून बाद होण्याची त्याची सवय अजूनही गेलेली नाही. अगदी कालचं उदाहरण घेतलं, तरी हे लक्षात येतं.

 

सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता असली, तरी तो असं करेलच याची खात्री कधीच वाटत नाही. चांगल्या सुरवातीनंतर सुद्धा बेजबाबदारपणे बाद होऊन तो परतल्याचं पाहिलं की त्याच्यात परिपक्वता आलेली नाही हे जाणवतं. डीआरएस घेण्याच्या बाबतीत असलेला त्याचा अतिउत्साह सुद्धा त्याने कर्णधार नसावं याकडे इशारा करणारा आहे. “अरे चिकू भैय्या ले लो” असं म्हणत विराटला नेहमीच डीआरएस घेण्यासाठी उद्युक्त करणारा रिषभ स्वतःच कप्तान झाला, तर त्याला कुणालाही विनवणी करण्याची गरजच भासणार नाही.

भारतीय संघाला डीआरएसच्या संधी गमवाव्या लागतील आणि याचा तोटा संघाला होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिषभ जबाबदारीने खेळायला लागेल, त्यानंतर त्याचा विचार कर्णधार म्हणून व्हायला हरकत नाही. न जाणो, यष्ट्यांमागे आणखी एक उत्तम कप्तान भारताला सापडेल. पण, ही ती वेळ नाहीच…

या सगळ्यात श्रेयससारखा एक उत्तम कप्तान भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ सदस्य नाही ही बाब सुद्धा विचार करण्याजोगी आहे. श्रेयस असता, तर कदाचित विराटचा उत्तराधिकारी म्हणून त्यानेच काम पाहिलं असतं. मात्र सध्या तरी असं काही घडेल असं वाटत नाही. एकुणात काय, तर ‘उत्तराधिकारी कोण?’ हा प्रश्न अधिकाधिक गहन होत चाललाय…तुम्हाला काय वाटतं?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version