आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘ययाती’ ही वि. स. खांडेकर यांची कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल. एका मनमौजी राजाची ही कथा आहे. ज्याच्यासाठी प्रजेच्या कल्याणापेक्षा स्वतःचं ‘चैनीचं’ आयुष्य हे जास्त महत्वाचं होतं. सर्व सुखं आहेत, पण तरीही मन शांत नाही असं या राजाचं पात्र आहे.
‘आपल्या इच्छांना अंत नसतो. इच्छांचा अंत हा आपल्यासोबतच होत असतो’ हे कळण्यासाठी ययाती राजाला पूर्ण आयुष्य वेचावं लागलं, असं हे कथानक आहे.
हस्तिनापूरमध्ये राहणारा हा राजा वासनांध होता. तो प्रत्येक स्त्रीकडे फक्त काम वासनेने बघायचा. वि. स. खांडेकर यांनी महाभारतातून ‘ययाती’ राजाच्या पात्राची प्रेरणा घेतली होती आणि त्यात काही बदल करून लोकांसमोर कादंबरी स्वरूपात सादर केले होते.
‘ययाती’ मधील राजाचं पात्र हे आजच्या जगातील काही सुखवस्तूंची सतत अपेक्षा करणाऱ्या लोकांसारखं आहे, असं मत कित्येक समीक्षकांनी मांडलं होतं. देवयानी हे पात्र अति स्वाभिमानी आणि शर्मिष्ठा हे पात्र स्वभावाने ‘अति गरीब’ असे रेखाटले आहे. ही दोन्ही पात्र सुद्धा समाजातील स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी होती असं समीक्षकांचं मत होतं.
‘ययाती’ हा विलासी राजाच्या प्रत्यक्षात असण्याच्या फारश्या पाऊलखुणा इतिहासात अस्तित्वात नाहीत. पण २० व्या दशकांत पटियालामध्ये ‘भूपिंदर सिंघ’ नावाचा एक राजा होऊन गेला आहे, ज्याचं आयुष्य हे असंच भोगविलासी होतं असं म्हणता येईल.
‘भूपिंदर सिंघ’ या राजाने आपल्या आयुष्याचा किती तरी वेळ हा केवळ स्त्रियांसोबतच घालवला आहे अशी इतिहासात नोंद आहे. या राजाला ८८ मुलं होती आणि किती तरी राण्या होत्या. उंची गाड्यांची सुद्धा ‘भूपिंदर सिंघ’ला प्रचंड आवड होती. त्यांच्याकडे रॉल्स रॉईस या जगातील सर्वात महागड्या अशा ४० गाड्या होत्या.
‘भूपिंदर सिंघ’ या राजाकडे कित्येक पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती होती. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हा राजा फक्त स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यात धन्यता मानायचा.
स्त्रियांचा जिथे नेहमीच सन्मान होतो, अशा आपल्या भारत देशात हा राजा मात्र त्यांच्याकडे केवळ एक ‘वस्तू’ म्हणून बघायचा.
राजमहालातील त्याच्या कक्षात येतांना कोणत्याही स्त्रीने विवस्त्रच यावे असा त्याचा नियम होता. महालातील तो भाग जिथे पोहोण्याचा तलाव म्हणजेच आजच्या भाषेत स्विमिंग पूल असायचा, तिथे तो आंघोळ करत असताना तिथे विवस्त्र स्त्रियांनी त्याच्या सोबत असावं अशी त्याची अपेक्षा होती.
‘स्त्रियांचं सौंदर्य’ हे त्याचं जीवंत रहाण्यामागे एकमेव कारण होतं. राजमहालातील स्त्रिया या कायम सौंदर्यवतीच दिसाव्यात म्हणून तो त्या काळात ‘प्लास्टिक सर्जरी’ करून त्यांना नेहमी तरुण दिसण्यासाठी काहीही करायला तयार असायचा.
एडॉल्फ हिटलर हा त्याचा मित्र होता अशी एका पुस्तकात नोंद आहे. ‘मेवाच’ नावाची एक महागडी कार हिटलरने ‘भूपिंदर सिंघ’ ला १९३५ मध्ये बर्लिन येथे भेटवस्तू म्हणून दिली होती. त्यासोबतच, या राजाने इंग्लंडमधून एक विमान सुद्धा खरेदी केलं होतं.
१९२२ चा हा काळ होता जेव्हा ‘भूपिंदर सिंघ’ने ‘प्रिन्स ऑफ वेल्स’च्या भारतातील आगमनाप्रित्यर्थ एका शाही मेजवानीची घोषणा केली होती. या मेजवानीमध्ये राज्यातील आणि प्रिन्ससोबत असलेल्या अश्या एकूण १४०० लोकांना सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवण दिल्याचे काही फोटो आजही उपलब्ध आहेत.
आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी कायम लोकांच्या टीकेचा सामना करणारा हा राजा आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. तो एक उत्तम क्रिकेट खेळाडू होता. त्याने १९११ मध्ये इंग्लंडमध्ये गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचं त्याने नेतृत्व केलं होतं.
त्यावेळी ‘क्रिकेट चॅम्पियनशीप’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेला ज्याला आज ‘रणजी ट्रॉफी’ म्हणतात, त्याच्या प्रचारासाठी या राजाने नेहमीच आर्थिक मदत केली होती.
डॉमनिक लापैर आणि लॅरी कोलिन्स या लेखकांनी मिळून लिहिलेल्या ‘फ्रीडम ऑट मिडनाईट’ या पुस्तकात ‘भूपिंदर सिंघ’बद्दल माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे :
‘भूपिंदर सिंघ’ चा जन्म १८९१ मध्ये पटियाला इथे झाला होता. त्यांचे वडील राजिंदर सिंघ यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ‘भूपिंदर सिंघ’ यांना वयाच्या ९ व्या वर्षी राज गादीवर बसवण्यात आलं होतं.
१९०९ पर्यंत म्हणजे राजा १८ वर्षाचा होईपर्यंत ब्रिटिशांनी आपलं नियंत्रण या राज्यावर ठेवलं होतं. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना मदत करण्यासाठी ‘भूपिंदर सिंघ’ला ‘मेजर जनरल’ची पदवी बहाल करण्यात आली होती. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘राऊंड टेबल कॉन्फरन्स’मध्ये या राजाने शिखांचं नेतृत्व केलं होतं.
स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येणारं चिलखत हा राजा हिऱ्यांचं बनवलेलं वापरायचा असा इतिहासात उल्लेख आहे. १००१ हिरे असलेल्या या वस्तूचा त्या काळात लंडनच्या एका विमा कंपनीने विमा उतरवल्याची सुद्धा नोंद आहे. हे चिलखत या राजाला इतकं प्रिय होतं की, तो त्याच्या कक्षात कित्येक वेळेस ‘फक्त’ हे हिऱ्याचं चिलखत घालूनच फिरायचा.
१९२६ मध्ये ‘भूपिंदर सिंघ’ने एक पेटी भरून हिरे, जगातील ७ व्या क्रमांकावर असलेल्या सर्वात मोठा २३४ कॅरेटचा हिरा या राजाने एक ‘नेकलेस’ तयार करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पर्शियन ज्वेलरीकडे त्याने पाठवले होते.
२९३० हिरे असलेला हा ‘नेकलेस’ तयार करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागला होता. २.५ करोड युएस डॉलर्स इतकी किंमत असलेला हा गळ्याचा हार आजही जगातील सर्वात महागड्या वस्तूंपैकी एक मानला जातो.
भारतीय लेखक खुशवंत सिंघ यांनी लिहलेल्या ‘द मॅग्नीफेसंट महाराजा’ या पुस्तकात सुद्धा ‘भूपिंदर सिंघ’च्या दोन्ही बाजूंबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. भारतवर्षातील सर्वात ‘विचित्र’ वागणारा राजा म्हणून या राजाचं नाव हे कुप्रसिद्ध होते.
जनरल डायर या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याला ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ करण्यासाठी मदत ही ‘भूपिंदर सिंघ’ची सर्वात मोठी चूक मानली जाते ज्यासाठी भारतीय लोक त्याला कधीच माफ करणार नाहीत.
‘महाराजा’या जेरमणी दास यांच्या पुस्तकात ‘भूपिंदर सिंघ’ यांच्या राज्यात चालणाऱ्या ‘सेक्स पार्टी’, ‘नग्न महाल’, राजाला असणाऱ्या ३५६ बायका याबद्दल स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
सतत करण्यात येणाऱ्या संभोगामुळे या राजाची तब्येत बिघडली होती आणि शरीराचं सामर्थ्य वाढवण्यासाठी त्याने फ्रेंच डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याची सुद्धा नोंद आहे. या डॉक्टरांच्या उपचारादरम्यान काही गोळ्यांची उष्णतेची मात्रा अधिक झाल्याने ‘भूपिंदर सिंघ’चा मृत्यू झाला अशी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
आपल्या १० महाराण्यांसाठी या राजाने पटियालामध्ये भव्य राजमहाल बांधले आहेत. हे सर्व महाल हे अगदीच सुखवस्तू होते. आपल्या राण्यांच्या तब्येतीसाठी या राजाने देशी, परदेशी डॉक्टरांची एक टीम आपल्या राजदरबारात कामावर ठेवली होती.
भुपिंदरनगरच्या रस्त्यावरील एक महालाचं नाव हे ‘नग्न महाल’ हे या राजाने ठेवलं होतं, जिथे फक्त नग्न स्त्रियांनाच येण्यास परवानगी होती.
देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा पण शीख लोकांवर कोणतंही संकट आलं, की हा राजा कायम तिथे धावून जायचा. तुमचे अनैतिक कृत्ये जेव्हा नैतिक कृत्यांपेक्षा जास्त असतात, तेव्हा तुमची ओळख ही ‘अनैतिक’ गोष्टींनीच होते.
भूपिंदर सिंघने आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक चांगली कृत्य केली तरीही त्याची ओळख ही कायम एक ‘स्त्रीलंपट’ राजा म्हणूनच पटियालाच्या जनतेच्या मनात रुजली गेली आहे.
–
- माणसाच्या राक्षसी स्वभाव दाखवणारी “एका बैलाची” गोष्ट म्हणजे “जलीकट्टू”!
- आजही या एन्काऊंटर केसला भारतातली सर्वात जास्त वादग्रस्त केस का मानलं जातं?
–
भारतावर इंग्रजांनी इतकी वर्ष राज्य करायचं हे पण कारण सांगितलं जातं, की इथल्या कित्येक संस्थानिकांनी, राजांनी कधी आपल्या राज्य कारभाराकडे लक्षच दिलं नाही. जगणे म्हणजे केवळ मजा करणे, लोकांवर अधिकार गाजवणे हाच त्यांचा समज होता.
ब्रिटिशांनी अश्या राजांच्या वागण्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि ‘भूपिंदर सिंघ’सारख्या राजांना भारतातील, परदेशातील स्त्रियांमध्ये व्यस्त ठेवलं आणि स्वतःची पाळेमुळे या देशात त्यांनी मजबूत केली.
भूपिंदर सिंघसारख्या राजांना कधी त्यांच्या देशाप्रती असलेल्या जबाबदारीचं भान नव्हतं आणि त्यामुळेच आपल्या भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र होण्यासाठी १९४७ पर्यंतची वाट पहावी लागली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.