आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सर्वसाधारणपणे असा समज असतो की स्त्रिया ह्या जात्याच संवेदनशील असतात आणि त्यांच्याकडे मातृह्रदय असल्याने त्यांच्या मनात लहान मुलांबद्दल प्रेम, करुणा असते. पण ह्यालाही अपवाद आहेत. काही स्त्रिया जणू मानवाच्या रुपात कैदाशिणी असतात. काही स्त्रिया इतक्या भयंकर असतात की प्रसंगी त्या स्वार्थासाठी क्रूरतेच्या सर्व सीमा पार करतात आणि निरागस लहान लेकरांचाही जीव घेण्यास मागेपुढे बघत नाहीत. अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती जी आठवून आजही अनेकांच्या जीवाचा थरकाप उडतो.
मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात १३ अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यातील किमान ९ जणांची हत्या करणाऱ्या दोन बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ह्या प्रकरणात आरोपी असलेल्या गावित भगिनी म्हणजेच सीमा मोहन गावित आणि रेणुका किरण शिंदे ह्या सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत, त्यांना मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी गावित भगिनींची आई अंजनाबाई गावित हिचे १९९८ मध्ये निधन झाले. न्यायमूर्ती नितीन एम जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल ह्यांच्या खंडपीठाने नमूद केले की फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची मागणी करणार्या गावित भगिनींच्या पुनर्विलोकन याचिकेत विलंब झाला आहे.
ही अपहरणे व खुनाची प्रकरणे १९९० ते १९९६ दरम्यान घडली. अंजनाबाई गावित ही महिला रेणुका (उर्फ रिंकू उर्फ रतन) आणि सीमा (उर्फ देवकी) ह्या तिच्या दोन मुलींसह गोंधळे नगर, पुणे येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. हे त्रिकूट मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्रात जत्रा ,मिरवणूक, उत्सवांना उपस्थित राहून आणि ऐतिहासिक मंदिरांत फिरत होते. अशा गर्दीच्या ठिकाणी संधी मिळेल तेव्हा महिलांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू चोरून उदरनिर्वाह करायची.
रेणुकाचा पती किरण शिंदे पुण्यात कपडे शिवण्याचे काम करायचा. तो देखील या चोरीमध्ये पत्नी आणि सासरच्या लोकांना मदत करत असे.
मंदिरात सुचली क्रूर कल्पना
१९९०साली रेणुका तिच्या बाळाबरोबर पुण्याच्या चतुःशृंगी मंदिरात गेली होती. तिने एका महिलेची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला पण ती पकडली गेली. पण तिने गयावया करायला सुरुवात केली आणि स्वतःच्या बाळाला त्या महिलेच्या पायावर ठेवले व सोडून देण्याची भीक मागितली. तेव्हा लहान बाळाकडे बघून लोकांनी तिला सोडून दिले. तेव्हा ह्या त्रिकुटाच्या मनात एक कल्पना आली की लोक लहान मुलाकडे बघून सहानुभूती दाखवून सोडून देतात. म्हणून मग ह्या महिलांनी अनेकांची बाळे त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि नव्वदीच्या दशकात एक भयंकर बालहत्याकांड घडवून आणले.
ह्या बालहत्याकांडामुळे त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता. किरण शिंदे ह्याच्या साथीने अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे व सीमा गावित ह्यांनी १३ बालकांचे अपहरण केले आणि त्यातील ९ बालकांची हत्या केली. पोलिसांनी अतिशय शिताफीने ह्या प्रकरणाचा छडा लावला.
१९९१ सालापासून ह्या मायलेकींनी त्यांच्या ह्या अघोरी कृत्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला बळी कोल्हापुरातील एका भिकाऱ्याचा मुलगा होता आणि त्याला जुलै १९९९मध्ये रेणुकाने उचलले. त्यांनी त्याला पुण्यात आणले आणि त्याचे नाव संतोष ठेवले. एप्रिल १९९१ मध्ये गावित बहिणी व त्यांची आई त्याला कोल्हापूरला घेऊन गेल्या.
–
- तंदूर केस – ज्या हत्याकांडानंतर पुढील अनेक वर्ष दिल्लीकर हॉटेलमध्ये जायला घाबरायचे
- ‘त्या’ एका भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”!
–
तिथे सीमा महालक्ष्मी मंदिरात एका भक्ताची पर्स चोरण्याचा प्रयत्न करताना पकडली गेली. सीमावरून लक्ष विचलित करण्यासाठी, अंजनाबाईंनी त्यावेळी जेमतेम एका वर्षाच्या संतोषला खाली पाडले, आणि तो जखमी झाला. त्यानंतर झालेल्या गोंधळात सीमा पळून जाण्यात यशस्वी झाली.
त्यानंतर तिघीही कोल्हापूर बसस्थानकावर गेल्या. तिथे त्यांनी काही महिलांच्या पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. पण पडल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे संतोष सतत रडत होता. पकडले जाण्याच्या भीतीने अंजनाबाईने संतोषचे तोंड दाबून लोखंडी कठड्यावर त्याचे डोके जोरात आपटले. ह्यामुळे लहानग्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. नंतर त्यांनी त्याचा मृतदेह जवळच्याच एका भंगार रिक्षेत ठेवला आणि तिथून काढता पाय घेतला.
संतोष व्यतिरिक्त गावित भगिनी, अंजनाबाई व किरण शिंदे ह्या चौघांनीही एक ते पाच वर्षांच्या मुलांचे अपहरण केले, ज्यात अंजली, बंटी, स्वाती, गुड्डू, मीना, राजन, श्रद्धा, गौरी, स्वप्नील आणि पंकज ह्या चिमुकल्यांचा समावेश आहे . ह्या सैतानांनी कमीतकमी नऊ मुलांची हत्या केली. त्यांनी संतोष, श्रद्धा, गौरी, स्वप्नील आणि पंकज व इतर काही लहानग्यांचा जीव घेतला.
१९९५ साली अंजनाबाई तिच्या दोन मुली व जावयासह नाशिकला राहायला आली. अंजनाबाईचा तिचा नवरा मोहनशी घटस्फोट झाला होता आणि नंतर मोहनने प्रतिभा नावाच्या स्त्रीबरोबर लग्न करून दुसरा संसार थाटला होता. ह्या दोघांना एक मुलगी होती जिचे नाव क्रांती असे होते.
ऑक्टोबर १९९६ मध्ये, अंजनाबाई, सीमा आणि रेणुका यांना एका वेगळ्या कारणावरून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर क्रांतीचे अपहरण केल्याचा आरोप होता. सीमा व रेणुका ह्यांचा प्रतिभावर राग होता त्यामुळे तिचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांनी क्रांतीचे अपहरण केले होते. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता, कोल्हापूर पोलिसांना त्या ठिकाणी अनेक लहान मुलांचे कपडे सापडले. ह्याचा तपास सुरू झाला आणि तपासातून त्यांचे भयंकर गुन्हे उघडकीला आले.
त्यांनी क्रांतीचा खून केल्याची कबुली दिली. त्यांनी शाळेतून क्रांतीचे अपहरण केल्यानंतर तिला ते नरसोबा वाडीला घेऊन गेले व तिथे त्यांनी तिचा गळा आवळून जीव घेतला व तिचा मृतदेह तिथेच नदीकाठच्या एका शेतात टाकून दिला.
याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अंजनाबाईने तिच्या पूर्वीच्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली व अनेक मुलांचे अपहरण करून त्यांचा जीव घेतल्याचे पोलिसांना सांगितले. या लोकांनी कोल्हापूर, नाशिक, पुणे, कल्याण मुंबई, वडाळा, पनवेल, शिर्डी, नरसोबाची वाडी, सुरत आणि बडोदा या ठिकाणी लहान मुलांचे अपहरण आणि हत्या केल्याचे सांगितले.
हे प्रकरण मोठे असल्याने ही केस नंतर सीआयडीकडे सुपूर्त करण्यात आली. तपासादरम्यान ९ मुलांपैकी केवळ ७ मुलांचे मृतदेह पोलिसांना मिळाले. २ मुलांचे मृतदेह सापडू शकले नाहीत तर ४ मुलांना त्यांना जिवंत सोडल्याची माहिती मिळाली. त्यापैकी केवळ २च मुलांचा पत्ता लागला आहे. इतर २ मुले आजही बेपत्ता आहेत.
चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुले त्रास देऊ लागली तर त्यांना मारून टाकायचे अश्या पद्धतीने ही टोळी काम करत असे.
अटक झाल्यानंतर ह्या चौघांनाही कोल्हापूरच्या कारागृहात ठेवण्यात आले. १९९७ साली अंजनाबाईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. किरण शिंदे या केसमध्ये माफीचा साक्षीदार झाल्याने त्याची ह्या प्रकरणातून सुटका झाली. आणि रेणुका व सीमा ह्या दोघींवर हा खटला चालला.
२८ जून २००१ रोजी ह्या दोघींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी ही शिक्षा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती पण सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यांनी २०१४ साली राष्ट्रपतींकडे देखील दयेचा अर्ज केला होता. पण निष्पाप लहान मुलांची हत्या केल्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांनीही त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा बदलून जन्मठेप करण्याची याचिका दाखल केली. फाशीची शिक्षा देण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याने अखेर १८ जानेवारी २०२२ रोजी उच्च न्यायालयाने गावित भगिनींची ही याचिका स्वीकारली व त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.
अश्या सैतानांना खरं तर शक्य तितकी कठोर शिक्षा व्हायला हवी. पण प्रशासनाच्या नेहमीच्या दिरंगाईमुळे ह्या स्त्रियांना कठोर शिक्षा होऊ शकत नाही ह्यामुळे जनतेच्या मनात संताप उसळला आहे.
==
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.