Site icon InMarathi

माझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद

casteism im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे”

डिजीटल मार्केटिंग ही प्रोफेशनल स्ट्रेंग्थ आणि मराठी लिखाण ही पॅशन – ह्या दोन्हींचा मिलाफ होऊ शकेल आणि त्यामुळे खूप मजा येणारं काम करत मजबूत पैसा छापता येईल ह्या विचाराने डिजिटल मीडिया व्हेंचर सुरू केलं. (पैसे अजूनतरी दिसत नाहीयेत, पण मजा मात्र मजबूत येतीये! असो.) पण त्यासाठी केवळ हे २ स्किलसेट पुरेसे नव्हते.

वेबसाईटचं डोमेन विकत घेण्यापासून – वेबसाईट उभी करून तिचा लोगो तयार करण्यापर्यंत कित्येक गोष्टींत मी कच्चा होतो. अजूनही आहे. वेबसाईटच्या जन्मापासून आज पर्यंत – अनेक टेक्निकल गोष्टीं, ग्राफिक डिझाईन अशा असंख्य गोष्टींत मन लावून मदत करणारे, दिवसभरची नोकरी करून रात्र रात्र जागून माझ्या अडचणी दूर करणारे असंख्य हात माझ्या नशिबाने मला दिले.

त्यातील काही ठळक आडनावं वर दिली आहेत.

 

ही सर्व मित्र मंडळी जॉब करत असताना लाभलेली. कुणीच बालपणाचे सवंगडी नाहीत. सर्वजण फेसबुक, WhatsApp भरपूर वापरतात. न्यूज वाचतात. माझं आडनाव, बोलणं-चालणं ह्यावरून माझी जन्माधिष्ठित जात ओळखणं सोपं जाईल इतकी बुद्धिमत्ता असलेले हे सर्व लोक.

नावांवरून दिसतंच की कुलकर्णी शिवाय इतर अनेक ब्राह्मणेतर – आणि अदरवाईज “ब्राह्मणाला मारायला उठलेले” – लोक त्या यादीत आहेत.

गेल्या आठवड्याभरात काही ब्राह्मण मित्रांनी फेसबुकवर मेसेज केला. “सगळे लोक” फक्त आडनाव बघून खूप द्वेष करतात म्हणून व्यथित आहेत, टेन्शनमध्ये आहेत. हे ठराविक कालखंडात परत परत घडत रहातं.

नवी पिढी फेसबुक जॉईन होते, इकडे पसरलेला चिखल बघते, घाबरून जाते किंवा चिडून उठते.

आपल्याला नेहेमीच वाईट काम करणारा, गलिच्छ बोलणारा एक माणूस दिसतो आणि लक्षात रहातो. पण आपल्याशी प्रेमाने वागणारे, मानवी स्वभावानुसार सहज मदत करणारे शेकडो मित्र-मैत्रिणी नजरेआड होतात. हे फेसबुक-WA वर अधिकच होतं. द्वेष करणारे अनेक आहेत, ती मोठी समस्या आहे आणि त्यावर उपाय योजना करत राहायला हवी हे सत्यच आहे.

पण ही मूठभर मंडळी आपले आपापसात असलेले सौहार्दाचे संबंध तोडू शकतात की नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे!

“एका वाईट माणसामुळे इतर शेकडो चांगल्यांकडे मी काणाडोळा करणार नाही” असं मनात पक्कं ठसवून घेतलं आणि त्यानुसार कृती करत राहिलो तर तो जातीय द्वेष पसरवणाऱ्या लोकांचे मनसुबे उधळण्याचा शुअर शॉट मार्ग ठरेल.

माझे जवळचे स्नेही मागे बोलता बोलता बोलून गेले की केवळ “जोशी” आहेत म्हणून अनेक महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर रात्रंदिवस काम करूनसुद्धा बक्षिसं मात्र इतरांनाच दिली गेलीत. जातीय द्वेष खाजगी क्षेत्रात, इव्हन आय टीमध्येपण शिरलाय हे आता उघड गुपित आहे.

त्यामुळे ही समस्या अधिकच बिकट, अधिक धारदार होत जातीये.

असा जातीयवाद उलट दिशेने सहन करणारेही काही मित्र असू शकतात. जातीयवाद काही एकाच जातीची मक्तेदारी नाही. एखादा जोशी मुद्दाम कुणा कांबळेला त्रास देऊ ही शकतो. मुद्दा तो नाही.

सामान्य माणसाने – विशेषतः तरूणांनी – ह्या प्रश्नाला कसं हाताळायचं हे समजून घेणं फार फार आवश्यक आहे. जातीयवादाची कीड ही विशिष्ठ जातीला लागलेली नसते तर विशिष्ठ माणसांना लागलेली असते.

त्यात ही दोन प्रकारचे लोक आहेत – जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर जातीयवाद पोसणारे व पेरणारे आणि दुसरे म्हणजे अश्या जातीयवाद पेरणाऱ्या लोकांच्या अपप्रचाराला बळी पडून डोक्यात घग घेऊन फिरणारे.

आपल्या समोरची जातीय व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे हे ओळखता यायला हवं. पहिल्या प्रकारातील व्यक्तीच्या तोंडी सामान्य माणसाने लागू नये. उपयोग होत नाही. कारण त्याने ठरवून, स्वतःच्या स्वार्थासाठी हा अजेंडा ठेवला आहे.

दुसऱ्या प्रकारच्या सर्व लोकांशी शक्य तितका सुसंवाद साधावा. जर ते शक्य नसेल – तर किमान – “असे मोजकेच आहेत…चांगले लोक कितीतरी अधिक आहेत…” – हे सतत स्वतःला सांगत रहावं.

लढावं लागणारच. फक्त तो लढा “एक जात/समाज विरुद्ध इतर” असा नसून “जातीयवादी विरुद्ध इतर आपण सर्व” – असा असणार आहे.

जो पर्यंत गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये, एखाद्या वृद्धाला त्याची जात नं बघता/विचारता आपण होऊन सीट दिली जाते,

जो पर्यंत रस्त्यावर अपघात झाल्यावर, क्षणार्धात मदतीला धावण्याआधी गाडीवर “जय भीम” आहे की “जय परशुराम” आहे हे बघितलं जात नाही –

आणि जो पर्यंत –

मला मदत करणारे जसे सर्वजातीय मित्र आहेत, तसे तुम्हाला ही आहेत — तो पर्यंत घाबरून जाण्याचं, “सर्व काही संपलंय” असं वाटून घेण्याचं काहीच कारण नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version