Site icon InMarathi

या पंतप्रधानांना महागात पडली दारू पार्टी, नारायण मूर्तींच्या जावयाची लागणार वर्णी?

rushi final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय लोकांची काम करण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि नैतिकता याचं जगभरात नेहमीच कौतुक होत असतं. गुगल, ट्विटर, पेप्सी सारख्या नामवंत कंपन्यांचे सीईओ भारतीय असणं हे आपल्यातील नेतृत्व कौशल्य सुद्धा नेहमीच अधोरेखित करत असतात. सुंदर पिचाई, पराग अग्रवाल, इंद्रा नुई या भारतीयांचा गौरव वाढवणाऱ्या लोकांच्या यादीत ‘ऋषी सोनक’ हे नाव नुकतंच जोडलं गेलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फरक इतकाच आहे की, ऋषी सुनक हे कोणत्या एका कंपनी किंवा उद्योग समूहाचं नेतृत्वासाठी नव्हे तर चक्क इंग्लंडचे पंतप्रधान होण्यासाठी सक्षम असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काळात जर हे घडलं तर उद्योग जगतातील यशानंतर भारतीय व्यक्तींचं राजकीय कौशल्य सुद्धा जगाला मान्य करावं लागेल.

 

 

कोरोनावर मात करण्यास सपशेल अयशस्वी ठरलेले इंग्लंडचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. बोरिस जॉन्सन हे जर पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यावर ऋषी सुनक’ हे त्या पदासाठी सर्वोत्तम आहेत हे इंग्लंडमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. कोण आहेत हे ऋषी सुनक ? अचानक हे नाव कसकाय चर्चेत आलं ? मूळ भारतीय वंशाच्या या व्यक्तीचं इंग्लंड मध्ये काय कर्तृत्व आहे ? हे सर्व अभिमानाने जाणून घेऊयात.

 

 

इंग्लडमधील सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे ?

इंग्लंडचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा कोरोना काळात दारूच्या नशेत पार्टी करण्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. १०, डॉविंग स्ट्रीट येथील पत्त्यावर झालेल्या या पार्टीत कोरोना लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. ‘द डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने सर्वप्रथम या घटनेवर प्रकाश टाकला होता. १७ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या या पार्टीत ३० लोक सामील झाले होते आणि मद्यधुंद अवस्थेत त्यांचे फोटो, विडिओ व्हायरल झाले होते.

 

 

‘पार्टीगेट’ नावाने इंग्लंडमध्ये प्रचलित झालेल्या या घटनेबद्दल बोरिस जॉन्सन यांनी संसदेत रीतसर माफी देखील मागितली. पण, विरोधकांनी बोरिस जॉन्सन यांना माफ न करता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीचा बेजबाबदारपणा यावर इंग्लंडच्या मीडियाने सुद्धा खूप ताशेरे ओढले आहेत.

बोरिस जॉन्सन यांची स्वतःची पार्टी ‘कंजर्व्हेटिव्ह’ने सुद्धा या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे. ब्रिटनच्या सर्वात मोठ्या ‘बेटफायर’ या सट्टा कंपनीने सुद्धा यावर भाष्य करून बोरिस जॉन्सन हे राजीनामा देणार हे जवळपास नक्की केलं आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यानंतर इंग्लंडचा पंतप्रधान होऊ शकतो ? आणि व्हायला पाहिजे ही चर्चा सुरू झाली आणि एकमुखाने ‘ऋषी सुनक’ हे नाव समोर आलंय.

‘ऋषी सुनक’ कोण आहेत ?

ऋषी सुनक यांचा जन्म २ मे १९८० रोजी इंग्लंडमधील हैम्पशायर येथे झाला होता. मूळचे पंजाबचे असलेलं सुनक हे कुटुंब १९६० च्या दशकात कामाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये स्थलांतरित झालं होतं. ऋषी सुनक यांचे वडील यशवीर हे ब्रिटनमध्ये डॉक्टर होते आणि आई उषा सुनक या तिथेच एक ‘फार्मसी’ चालवतात. ऋषी यांचं शालेय शिक्षण हे इंग्लंड मध्येच झालं.

 

महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी विन्चेस्टर कॉलेज मधून घेतलं. पुढील शिक्षणासाठी ऋषी सुनक यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. इथे त्यांनी राजकारण, अर्थशास्त्र यांचा अभ्यास केला. पदव्युत्तर एमबीए चं शिक्षण त्यांनी स्टेन्फोर्ड विद्यापीठातून पूर्ण केलं.

‘ऋषी सुनक’ हे वंशाने तर भारतीय आहेतच. शिवाय, ते भारतात आदराने नाव घेतलं जाणाऱ्या उद्योजक श्री. नारायण मूर्ती यांचे जावई आहेत हे त्यांचं भारतासोबत असलेलं ‘स्ट्रॉंग कनेक्शन’ म्हणता येईल.

स्टेन्फोर्ड विद्यापीठात शिकत असतांना ऋषी यांची भेट नारायण आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता हिच्यासोबत झाली. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि २००९ मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज या दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

 

 

‘ऋषी सुनक’ यांची राजकीय कारकीर्द:

स्टेन्फोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश भारतीयांप्रमाणे ऋषी यांनी काही वर्ष विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१४ पर्यंत नोकरी केल्यानंतर ऋषी यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी ‘कंजर्व्हेटिव्ह’ पार्टीत प्रवेश करून सुरू केली.

ऋषी यांना ‘रिचमंड’ या जागेवरून सर्वप्रथम खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. २०१५ मध्ये ऋषी यांनी ‘रिचमंड’ची प्रतिष्ठित निवडणूक जिंकली आणि इंग्लंडच्या संसदेत जाऊन ते विराजमान झाले.

आपल्या आईला मेडिकलच्या व्यवसायात मदत करण्यात मदत करणाऱ्या ऋषी यांनी उद्योग आणि संशोधन यांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. राजकीय कामांसोबत त्यांनी ब्रिटन मधील लघु उद्योगांमध्ये गुंतवणूक करून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला.

 

२०१६ मध्ये जेव्हा ‘ब्रेक्झिट’ म्हणजेच ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची घटना घडली, तेव्हा ऋषी सुनक यांनी त्याचं समर्थन केलं होतं. बोरिस जॉन्सन यांच्यासोबत काम करण्याची त्यांना यावेळी संधी मिळाली आणि त्या संधीचं ऋषी यांनी सोनं केलं. २०१९ मध्ये जेव्हा बोरिस जॉन्सन हे इंग्लंडचे पंतप्रधान झाले तेव्हा ऋषी सुनक यांना ‘चीफ ऑफ द ट्रेजरी’ हे पद देण्यात आलं होतं.

२०२० मध्ये इंग्लंडचे अर्थमंत्री साजिद जावेद यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा अतिरिक्त पदभार सुद्धा ऋषी सुनक यांनीच यशस्वीपणे सांभाळला होता. सध्या ऋषी सुनक हे इंग्लंडचे अर्थमंत्री आहेत.

अर्थमंत्री पदाची शपथ घेतांना त्यांनी आपल्या भारतीय असल्याचा जगाला प्रत्यय आणून दिला होता. इंग्लंडच्या संसद मधील पारंपरिक प्रथा डावलून ऋषी सुनक यांनी भगवद्गीता मागवून त्यावर आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.

‘ऋषी सुनक’ यांच्या लोकप्रियतेचं कारण काय आहे ?

२०२० मध्ये जेव्हा ऋषी यांनी अर्थमंत्री पदाचा पदभार सांभाळला, तेव्हा जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. इंग्लंड, इटली, अमेरिका सारखे सर्वच युरोपियन देश तेव्हा या जागतिक महामारी समोर हतबल झाले होते. इंग्लंडच्या लोकांना तेव्हा “सरकार त्यांच्यासोबत आहे” हा विश्वास देण्याची गरज होती.

ऋषी सुनक यांनी तयार आणि सादर केलेल्या पहिल्या आर्थिक बजेटने नेमकं हेच काम केलं. कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी त्यांनी आपल्या बजेटमध्ये १२ बिलियन पाऊंड इतक्या सरकारी मदतीची घोषणा केली आणि लोकांची मनं जिंकली.

“देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत मदत नेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे” हे त्यांनी समोर येऊन सांगितलं. “लोकांच्या नोकरी टिकवण्यासाठी, व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जे काही करता येईल, ते सरकार करेल” हे ऋषी सुनक यांचे वाक्य त्रस्त जनतेने ऐकले आणि त्यांना अपेक्षित असलेलं नेतृत्व त्यांना ऋषी सुनक यांच्यात दिसलं.

 

 

ब्रिटन मधील भारतीय लोकांमध्ये लोकप्रिय होण्याचं अजून एक कारण म्हणजे, ऋषी सुनक हे नेहमीच आपल्या भारतीय आणि हिंदू असल्याची निःसंकोचपणे लोकांना जाणीव करून देत असतात. नोव्हेंबर २०२१ मध्ये दिवाळीच्या दिवशी महात्मा गांधी यांचं चित्र असलेलं ५ पाऊंडचं नाणं चलनात आणून त्यांनी गांधीजींच्या अहिंसावादी विचारांना आत्मसात करण्याचं इंग्लंडच्या जनतेला आवाहन केलं आहे.

२०२१ मध्ये इंग्लंडच्या ‘युगोव्ह्’ या मार्केट रिसर्च कंपनीने एक सर्वेक्षण केलं ज्यामध्ये ऋषी सुनक यांची लोकप्रियता सिद्ध झाली. या सर्वेक्षणात त्यांनी लोकप्रिय नेत्यांच्या स्पर्धेत त्यांनी बोरिस जॉन्सन, कियर स्टार्मर, मॅट हंकॉक सारख्या इंग्लिश नेत्यांना मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे.

 

 

२०२२ च्या सुरुवातीला बोरिस जॉन्सन यांनी केलेली घोडचूक ही ऋषी सुनक यांच्या पथ्यावर पडू शकते आणि ते इंग्लंडचे पुढील पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचं मत सर्व राजकीय विश्लेषकांनी सुद्धा व्यक्त केलं आहे. ४१ वर्षीय ऋषी सुनक यांची जर इंग्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली तर हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय असतील. ५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांच्या या कृत्यावर सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. येत्या काळात इंग्लंडच्या राजकारणात काय घडामोडी घडतील याकडे जगाचं आणि ऋषी सुनक हे इंग्लंडच्या पंतप्रधानपदाची कधी शपथ घेतील याकडे सर्व जगभरातील भारतीयांचं सध्या लक्ष लागलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version